काश्मीरच्या ३७० कलमाचा निकाल

सर्वोच्च-निकालानंतर आता काश्मीरचा, इथून पुढे फक्त पहात रहा, नवा प्रवास….”नैसर्गिक-सौंदर्याने विनटलेलं व काश्मिरियतचा सांस्कृतिक-वारसा लाभलेलं पृथ्वीवरचं नंदनवन” ते “बड्या भांडवलदारांची, बड्या भांडवलदारांकडून, बड्या भांडवलदारांसाठी उभारली गेलेली कृत्रिम-अनैसर्गिक सुवर्णलंका”!

ही ‘सुवर्णलंका’ असेल; स्थानिक जनसामान्यांवरील अन्याय-शोषण-अत्याचारांनी भरलेली…रावणासारख्या अविवेकी, नीतिशून्य, सैतानी ‘विकासा’ची कास धरत, “मुँह में राम और बगल में रावण”, या कावेबाज राजनितीचा हात धरुन उभारलेली!

———————————————————-

भले हे ‘दिल्लीश्वर’, ऐश्वर्यसंपन्न-भपकेबाज ‘राममंदिर’ अयोध्येत उभारतील; पण, इथे कोणी ‘रामराज्य’ वगैरे निर्मिण्यासाठी सत्तेवर बिलकूल आलेलं नसून, बड्या काॅर्पोरेटीय-भांडवलदारांचे दलाल असलेली; ही भाजपाई ‘गुजराथी-लाॅबी’… धनदांडग्या-मुजोर मूठभरांसाठी ऐश्वर्यसंपन्न ‘सुवर्णलंका’ काश्मीरमध्ये, या निर्णयापश्चात, निश्चितच उभारेल…जिथे, ‘काश्मिरियत’ संपलेली असेल व स्थानिक लोकं, ‘कंत्राटी-गुलाम’ बनलेले असतील.

…त्यांनी महाराष्ट्रातल्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, रायगड शहरं-उपनगरांचा कधिकाळी, असाच काँक्रिटचा ‘विकास’ केला…तिथल्या तळागाळातल्या मूळ श्रमिक मराठी-माणसांना यथावकाश, एकतर १० × १० च्या नगरांमध्ये कोंबडी-कुत्र्यासारखं कोंडलं; नाहीतर, शहराबाहेर पार दूरवर देशोधडीला लावलं. त्यांना देशोधडीला लावण्याकामी, ‘स्थानिक-मनगटशहा’ असलेल्या मराठी-नेत्यांची पुरेपूर ‘ओटी’ भरुन…त्यांना यथेच्छ वापरुन घेतलं आणि सोबतीला, सुशिक्षित-उच्चशिक्षित मध्यमवर्गीयांना आपल्या भांडवली-व्यवस्थेचे ‘लाभार्थी’ बनवत, त्यांचीही ‘जीभ’ कापून टाकून…या अन्याय-अत्याचार-शोषणाविरुद्ध त्यांच्याकडून ‘आवाज’ उठवला जाण्याची संभाव्य शक्यताच संपुष्टात आणली.

…त्याचीच कार्बन किंवा झेराॅक्स प्रत कालांतराने, काश्मीरमध्ये थोड्याफार फरकाने, आपल्याला उभी रहाताना दिसेल! महाराष्ट्राचं ‘मराठीपण’, जसं एकाबाजुला धनदांडग्या, मस्तवाल गुजराथी-भाषिकांनी आणि दुसऱ्या बाजुला ‘अस्तित्ववादी’ उत्तर भारतीयांच्या न थांबणाऱ्या लोंढ्यांनी… अशा शहरं-उपनगरांतून जवळपास संपुष्टात आणलं… तो आणि तसाच प्रकार, ‘काश्मीर’संदर्भात होईल! नव्हे, ते तसं होण्यासाठीच ३७० कलम हटवण्याचा घाट घातला गेल्याचं, आपल्या उशीरा ध्यानात येईल… तोपर्यंत, काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील. कधि, काश्मीरचं कलम ३७०, तर कधि बालाकोटचा सर्जिकल-स्ट्राईक; तर, कधि अयोध्येचं राममंदिर…या पोकळ भावनिक हिंदोळ्यांवर झुलत, असंच सर्वसामान्यांचं आयुष्य, ‘गुलामगिरी व जगण्याच्या कोंडी’त वाया जात राहील… हेच ते ‘रामराज्या’च्या बुरख्याआडचं, भाजपाई गुजराथी-लाॅबीचं ‘रावणराज्य’ होय…!!!

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)

 {ता. क. : राममंदिराच्या निकालानंतर, काश्मीरच्या ३७० कलमाचा देखील सर्वोच्च-निकाल लागला; पण, महाराष्ट्राच्या सीमावादाचा (कारवार-निपाणीसह बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याबाबतचा), ज्याचं घोंगडं वर्ष-२००६ पासून गेली १७ वर्षे सर्वोच्च न्यायालयात भिजत पडलेलं आहे, त्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाकडून कधि होणार…???}