अण्णा, या भरकटलेल्या मराठी तरूणाईला ‘माफ’ करा…

लाल, बाल, पाल या त्रिमूर्तिपश्चात स्वातंत्र्यप्राप्तीच्या उंबरठ्यावर महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, सेनापती बापट, चिंतामणराव देशमुख अशा एकेक दिग्गज हिमालयाच्या उंचीच्या राजकीय नेतृत्वाची मांदियाळी या भारत देशाला लाभली आणि त्यानंतर अकस्मात ‘अंधारयुग’ सुरू झाले. ‘मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला’ आणि ‘साध्या टेकडीएवढीचं काय…’ अहो रस्त्याच्या स्पीडब्रेकर एवढी व्यक्तिमत्वाची ‘खुजी’ उंची असलेली माणसं ‘राज्यस्तरीय’ किंवा ‘राष्ट्रीयस्तरीय’ नेतृत्व म्हणून मिरवायला लागली. एकापरीने लबाड ‘कोल्ह्याने’ वाघाचं कातडं ओढून ‘जंगलाचा राजा’ म्हणून मिरवण्यासारख्या ‘राजकीय भांगडा’ महाराष्ट्र देश… हा उभा भारत देश गेली ४०-५० वर्षे निमूटपणे पहातोयं!

एका बाजूला ‘सहन होत नाही……आणि सांगता येत नाही’, अशी सप्रवृत्त मंडळींची अवस्था झाली, तर दुसऱ्या बाजूला अज्ञानी-बाजारबुणग्यांची फौजच्या फौज… या वाढत्या राक्षसी लोकसंख्येमुळे बदमाश राजकारण्यांच्या ‘टाचे’खाली उभी राहायला लागली. काही कळत नाही… काही कळून घेण्याची ‘कळकळ’ उरलेली नाही… ना वस्तुस्थिती भानं, ना पर्यावरणाचं भानं, अशी एक फार मोठी विकृत तरूण पिढी… या महाराष्ट्राच्या मातीनं कशी काय घडवायला घेतलीयं, हा मोठा प्रश्न आहे ! संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही आपलीच महाराष्ट्राची माती आपल्याला कशी फसवते… अशी विकृत पिढी कशी प्रसवते?…. वाटलं होतं तिकडे दिल्लीत उपोषणाच्या ७ व्या दिवशी, त्या ७४ वर्षाच्या महाराष्ट्रातल्यां राळेगणसिध्दीच्या सुपुत्राच्या पोटात उपेषणानं वेदनेचे आगडोंब उसळत असतील… दीर्घ उपोषणानं प्राणाचं पाखरू देहाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी फडफडू पहात असेल… देशाचा ‘महानायक’ बनलेल्या त्या महाराष्ट्राच्या सत्पुरूषाच्या जिवाची विलक्षण घालमेल सुरू असेलं… या भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून देशाची सुटका होईल किंवा नाही, या काळजीनं त्या महापुरूषाच्या जीव पोखरला गेला असेलं… अशा कातरवेळी तरी निदान या महाराष्ट्राच्या संतभूमीतला ‘तरूण’, आपल्यासाठी जीव गहाण टाकायला निघालेल्या या ‘अण्णा हजारे’ नावाच्या ७४ वर्षांच्या तरूणासाठी सहसंवेदना जागती ठेऊन… या राजकारण्यांच्या ‘दहीहंडी’ सारख्या भुलभुलैय्याकडे पाठ फिरवेलं!… पण कसलं काय ? या बदमाश राजकारण्यांमुळेच “कुत्र्याच्या मोतीनं, गुलामाच्या जातीनं अणि रोज नोकरी जाण्याच्या भितीनं’’ जगणारा ‘कंत्राटी’ मजूर तरूणांचा तांडा… मोटरसायकलवरून काय, ट्रकमधून काय, लाखोंच्या फौजेनं निघाला… त्या भ्रष्टाचाऱयांच्या “दहीहंड्या’’ फोडायला! पण, या देशातील भ्रष्टाचाराची ‘काळी’ दहीहंडी कायमची फोडण्यासाठी ‘जन-लोकपाल’ विधेयकासाठीच्या आंदोलनात उतरण्याची मात्र त्यांची इच्छाशक्ति फारशी कुठे दिसली नाही. जागोजागी गुटख्याची पाकीटं विखुरलेली, सिगरेटची थोटकं फेकलेली… त्यात पोटात गेलेल्या द्रव्याचा रंग कुठला… हे फक्त तो ‘कृष्णचं’ जाणे… अशा अवस्थेतली ही भरकटलेली तरूणाई, ही तरूणाई नव्हे, ही तर काळाच्या ओघात मरण पंथाली लागलेली ‘मरणाई’ आहे!

भविष्य, नीच-स्वार्थी राजकारण्यांच्या हातात सोपवलेलं… चोरांच्या हातातच खजिन्याच्या किल्ल्या सोपवलेल्या! भातात कालवायला घरात ‘दह्याचा’ पत्ता नाही आणि तरी हे वीर निघाले ‘दहीहंडी खेळायला…. भविष्याची ‘दांडी’ उडालीयं तरी पिचक्या छातीनं हातात ‘दांडी’ घेऊन निघतील उद्या ‘गरबा’ खेळायला!… सापाच्या तोंडात गेलेल्या बेडकाला अंतकाळ जवळ आला आहे, हे माहीत असूनही त्याने आजूबाजूचे किटक जीभ लांब करून खावेत, तशी ही भविष्यकाळाच्या जबड्याच्या अंधारात ढकलली गेलेली मराठी पिढी… दहीहंडी काय, सार्वजनिक गणेशोत्सव काय, तो गुजराथ्यांचा गरबा काय, सार्वजनिक सत्यनारायण पूजा काय, फालतू नेत्यांचे वाढदिवस काय, नाहीतर महापुरूषांच्या जयंत्या-मयंत्या काय… एकेक जमेल तेवढं जमवतं, एकप्रकारे आपल्या ‘भविष्याचं मरणं’ साजर करतेयं! करा बाबांनो अजून साजरं करा… गुटखा, दारू, सिगरेटी प्याss बेहोष होऊन नाचाss नाहीतरी आता, आहार, निद्रा, भय, मैथून यापलिकडे आपण इतर प्राण्यांपेक्षा अजून एकच भरीची नको ती भावना बाळगलीयं, ती म्हणजे सतत ‘करमणूक’, शोधण्याची, बस्स् !!!

लो. टिळकांनी थंडगोळा होऊन पडलेल्या जनतेला ऊब देऊन ‘जागृति’ निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ सुरू केले. मात्र स्वातंत्र्यानंतर, विशेषत अलिकडच्या काळात, सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी, गरबा, सार्वजनिक पूजा इ. उत्सव हे जनतेला ‘अफूची मात्रा’ देऊन ग्लानी आणण्यासाठी… ‘झोपाळ्यावाचून झुलायला लावण्यासाठी’ सर्रास वापरले जातायतं!

बाss मराठी तरूणाss उभं जग तुला हसतयं!…. खिजवतयं!!!… टिनपाट छातीच्या, सगळं ‘मराठी’ सत्व आणि तत्व गमावलेल्या मराठी तरूणाss, जे राजकारणी ‘मदारी’ अशा उत्सवांमधून तुला ‘माकडा’ सारखा नाचवतात, ते सुध्दा तुझ्या मर्कटलीलांना, तुझी पाठ वळताच फिदीफिदी हसतात! जरा, शंभर पिढ्यांना पुरून उरेल एवढ्या गडगंज समृध्दीनं भरलेल्या, त्यांच्या घरांच्या-बंगल्यांच्या भिंतींना ‘कान’ तर लावं… बघ, तुला ऐकू येईल त्याच राजकारण्यांचे उद्गार, “अरे, ये भुक्कड लोगों की ऐसेही बार बार नचानेका, इलेक्शन के टाईम खिलानेका – काला पैसा लुटानेका और बादमें जिंदगी भर उनकोही लुटनेका…. बस्स्, नेता बननेको और क्या लगता है?’’

गगनगिरी महाराज म्हणून गेले, “ही असली छंदीफंदी, व्यसनी, दिशा भरकटलेली मराठी तरूणाई… शरीरानं हळूहळू इतकी खचत-खंगत जाईल की, शेवटी ३०-४० वर्षांच्या ‘पलिकडे’ तिला आयुष्य नसेल आणि त्याच्या ‘अलिकड’चं तिचं आयुष्य सडलेलं-किडलेलं असेलं!’’

…या तरूणाईसाठी अण्णांनी प्राण पणाला लावायचे? या असल्या तरूणाईसाठी आम्ही ‘कंत्राटी’पध्दत नावाच्या, या नीच राजकारण्यांनी निर्माण केलेल्या गुलामगिरीविरूध्द… औद्योगिक ‘अस्पृश्यते’ विरूध्द, ‘एका हाती’ लढाया लढायच्या?? याच तरूणाईचं साफ खचलेलं-धुळीला मिळालेलं ‘जीवनमान’ उंचावण्यासाठी सतत ‘जीवन-संघर्ष’ करायचा???

देशाला गिळून टाकणाऱ्या अनेक समस्या ‘आ’ वासून पुढ्यात उभ्या ठाकल्यातं! त्यातली सर्वत्र माजलेली आणि हेतूत राजकारण्यांनी माजवलेली, ‘भ्रष्टाचार’ ही प्रमुख समस्या आहे. एखाद्या उंदरानं सतत काहीतरी कुरतडत रहावं, तसा हा ‘भ्रष्टाचार’ नावाचा सर्वत्र फैलावलेला ‘अदृश्य सैतानी हात’ आपल्या सर्वसामान्यांचे खिसे सतत कुरतडतोयं. केवळ आपला पैसाच नव्हे, तर आपला मानसन्मानसुध्दा पोखरून टाकतोयं! भ्रष्टाचाराची सर्वात जास्त झळ गरीबांना लागत असली तरी, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर तळागाळातला गरीब (विशेषत शहरातला) या ‘जन-लोकपाल’ विधेयकाच्या लढ्यात अभावानचं दिसतोयं… उलटपक्षी जो उच्चभ्रूवर्ग (मुख्यत परभाषिक) वा मध्यमवर्ग आंदोलनात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलायं, त्यांचा तर फक्त ‘आत्मसन्मान’च भ्रष्टाचाराच्या बाजारात दाव्यावर लागलायं… त्यांच ‘जीवनमान’ नव्हे! अरे, मराठी तरूणांनो ss तुमचं तर ‘जीवनमान’ आणि ‘आत्मसन्मान’ दोन्ही ‘पणाला’ लागलयं!! तेव्हा, अजुनही वेळ गेलेली नाही… भानावर या, बाबांनो !!!

मानवी मनोरे रचण्यासाठी ‘स्पेन’च्या पथकाशी स्पर्धा करतायं?… त्यांच्या चार-पाच एक्क्यांचं अनुकरण करण्यासाठी धडपडतायं ?? मग जरा हे करताना त्यांच्या ‘जीवनमानाचा’ पण कानोसा घ्या! त्या समृध्द जीवनमानाची, आपल्या हलाखीच्या ‘जिंदगानी’शी कुठे तुलना होतेयं का, पहा! असं केलंत तर २४० व्होल्टचा नव्हे, तर चांगला ४४० व्होल्टचा विजेचा धक्का बसेल. जीवाची बाजी लाऊन तुम्ही फक्त ‘मानवी’ मनोरेचं रचतायं. तिकडे तुमचे घातकी ‘मराठी’ राजकारणी, परभाषिक धनदांडगे, व्यापारी-उद्योगपति, भ्रष्ट ‘मराठी’ खासगी व सरकारी अधिकारी तुमच्या लुटलेल्या संपत्तिने त्यांचे समृध्दीचे ‘अमानवी’ मनोरे रचतायतं!  तुम्ही असले ‘मनोरे’  रचून केवळ स्वतचीच फसवणूक करतायं… ‘मनोरे’ रचतायं तेही वर्षातून एकदाच… पण, बाकी सारे समृध्दीचे ‘मनोरे’ उंचच उंच रचतायतं, त्यांची उंची वाढतच चाललीयं, रोजच्या रोज! मुंबई-ठाण्याच्या ‘पूर्वीच्या’ मराठी मुलखात मराठी छातडावर ‘टॉवर्स्’ काय उभे रहातायतं… ‘मॉल्स्’ काय उभे रहातायतं… ‘सेव्हन स्टार’ हॉटेल्स् काय उभे राहतायतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, “ज्या प्रगतितलं तुमचं स्थान ‘नगण्यं’, ती प्रगती काय कामाची?’’… ‘टॉवर्स् मध्ये फक्त अमराठींचाच वावर, १० x १० मधल्या मराठी माणसा, आता तरी सावरं!,’असं आम्ही कितीकाळ घसा खरवडून सांगायचं ?

मराठी संस्कृतित जन्मलेला-वाढलेला कोणीही स्वाभाविकच ‘उत्सवप्रिय’ असणार… अर्थातच मी ही आहेचं! पण, ज्या श्रीकृष्णाच्या नांवानं आपण हा ‘दहीहंडीचा’ उत्सव साजरा करतो, तो ‘कृष्ण’सुध्दा गोकुळात दूधा-तूपाचा महापूर होता – ओसंडून वाहणारी समृध्दी गोकुळभर नांदत होती… तेव्हाचं गोकुळातल्या गोपिकांची ‘दहीहंडी’ फोडत होता… तुमच्यासारखं ‘अर्धपोटी’ असताना नव्हे!

तेव्हा “७०-८० वर्षांपूर्वी ज्या गोष्टींसाठी मी लढत होतो, त्याचं गोष्टींसाठी तुम्ही अजूनही झगडतायं… मग, इतकी वर्ष तुम्ही करत काय होतात?… कमाल आहे बुवा!’’… असे हताश उद्गार जर समतेचा संदेश देणारा, तो ‘महामानव’ उद्या अवतरला, तर त्याला काढायला लागू नयेत, असं वाटत असेल… थोडंतरी ‘आत्मभान’ तुमच्यात शिल्लक असेल तर,… जोपर्यंत ‘कंत्राटदारी’ नांवाची ‘औद्योगिक-अस्पृश्यता’ मिटत नाही, ‘जन-लोकपाल’सारख्या विधेयकानं भ्रष्टाचाराला मोठा आळा बसणं होत नाही, देशात अर्थतज्ञ ‘अनिल बोकिलां’च्या ‘अर्थक्रांति’सारखी क्रांतिकारी करसंरचना राबविली जात नाही, ‘जैतापूर’सारखे अणूऊर्जेचे विनाशकारी राक्षसी प्रकल्प थांबवले जात नाहीत… तोवर पळभर थांबा!

महाराष्ट्राची हवा, पाणी आणि जमीन यांचा ‘सातबारा’च केवळ भ्रष्ट मराठी/अमराठी राजकारणी-नोकरशहा आणि परभाषिक धनदांडग्यांच्या नांवावर गेलायं असचं नव्हे, तर महाराष्ट्राच्या निसर्गाचे-पर्यावरणाचे साफ ‘बारा’ वाजलेत… ते प्रथम एकजूटीनं ‘जोर लगाके हैय्या’ म्हणतं रोखूया! नंतर तुम्हालाच नव्हे, तर पुढच्या पिढ्यापिढ्यांना ‘अमन-शांतित’ उत्सवांचं भरतं यायला… अनंत काळ पुढे शिल्लक आहे!… तेव्हा मी केवळ तुमच्या सोबत असेनं असचं नव्हे, तर मराठी ‘सण-उत्सव’ साजरे करायला सर्वात पुढे असेनं!!!

जय महाराष्ट्र !…जय हिंद…!!

राजन राजे