भारतीय योगशास्त्र आणि धर्मग्रंथ-धर्मतत्त्व आदिंच्या केलेल्या बऱयापैकी अभ्यासाद्वारे, लोकांना त्यातला ‘लाभांश (जसा, ‘कॉर्पोरेट-क्षेत्रात भागधारकांना, कंपनी प्रवर्तक वा प्रमुख मिळवून देतात) भारतीय योगशास्त्र आणि धर्मग्रंथ-धर्मतत्त्व आदिंच्या केलेल्या बऱयापैकी अभ्यासाद्वारे, लोकांना त्यातला ‘लाभांश’ (जसा, ‘कॉर्पोरेट-क्षेत्रा’त भागधारकांना, कंपनी प्रवर्तक वा प्रमुख मिळवून देतात) काहीप्रमाणात मिळेल, अशी व्यवस्था व व्यूहरचना करुन, त्यातून आपापली “आध्यात्मिक-दुकाने” (जशी राजकारण्यांची ‘समाजसेवे’ची असतात !) थाटणारे धर्मगुरु, सत्संग-गुरु आणि सदगुरु…. या देशात, पावसाळ्यात उगवणा-या कावळयाच्या छत्र्यांसारखे उदंड झालेतं. त्यातील कदाचित कोणी चुकूनमाकून खरोखरीच “जाज्ज्वल्य” असू शकतील…. बाकी, सगळेच बनावट व ढोंगी (महाराष्ट्रात तर, त्यांची मोठीच मांदियाळी आहे !) असून, बदमाष राजकारण्यांशी ‘शय्यासोबत’ करणारे आहेत (राजकारण्यांकडून सत्कार करवून घेणारे व राजकारण्यांचा सत्कार करणारे), हे वेळोवेळी वेगवेगळया प्रकारे उघड झालेलं आहे. तरीही, त्यांच्या ‘दुकाना’तली गर्दी ओसंडून वहाणं, हे आजच्या समाजाच्या मूढतेचं आणि गुलामी मानसिकतेचं व्यवच्छेदक लक्षण आहे !
सध्या विवादास्पद बनलेलं, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’वाल्या श्री श्री रविशंकरांचं, दिल्लीत ‘यमुनातिरी’ होऊ घातलेलं भव्यदिव्य संमेलन आणि त्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मिळणारा प्रतिसाद…. हे या, बेजबाबदार, मूढ व गुलाम बनलेल्या समाजाचं ढळढळीत ‘प्रतिबिंब’ आहे !! भ्रष्ट-दुष्ट एतद्देशीय राजकारण्यांशी व अनेक बाहेरच्या राष्ट्रप्रमुखांशी (तेही राजकारणीच) संधान बांधून बसलेले, हे ‘अध्यात्मिक गुरु’ नसून, एकमेकांचा हात धरुन, खितपत पडलेल्या सामान्यांना ‘अफूची मात्रा’ पाजण्याचा ‘आध्यात्मिक धंदा करु’ वाले आहेत….. ‘शहाणपण’ नसलेली वा शहाणपण गमावलेली तसेच, ‘बुद्धीमांद्य’ असणारी माणसं, भाकड श्रद्धेचा डांगोरा पिटत, लाखोंच्या संख्येनं यांच्या गळाला अचूक लागतात आणि मग, कायमस्वरुपी त्यांची झापडबंद ‘गुलाम’ बनतात (चटकदार-चमकदार भाषणं करणाऱ्या नेतेमंडळींच्या नादी लागणाऱ्या लाखो पामरांप्रमाणेच !) !!!
तथाकथित बेगडी व ढोंगी ‘हिंदुत्ववाद्यां’चं सरकार या देशात आल्यापासून तर, या साऱयांना एकच ऊत आलायं आणि ते शब्दशः चेकाळलेतं. त्यामुळेच, या देशात काही निसर्ग-पर्यावरणस्नेही कायदे आहेत… नियम आहेत… याची पत्रास ठेवण्याची त्यांना बिलकूल गरज भासेनाशी झालीयं. सरतेशेवटी, कायदे-नियम हे सामान्यांसाठी असतात… व्यवस्थेशी ‘हातमिळवणी’ वा ‘मिलीभगत’ करुन बसलेल्यांसाठी ते थोडेचं असतात ? तेव्हा, असले कायदेभंग-नियमभंग करुन ज्या, ‘यमुने’च्या पात्रात ‘श्रीकृष्णाच्या बाललीला’ झाल्या आणि युगंधर श्रीकृष्णाचं जिथे अधिष्ठान आहे….. त्याच ‘यमुनातिरी’ एक हजार एकरांमध्ये ही निसर्ग-पर्यावरण घातकी स्वरुपाची “श्री श्री लीला” होऊ घातलेली आहे ! योगशास्त्राचं ‘कंपनीकरण’ (Corporatisation) करुन व वस्तूविक्री-शास्त्रातील ‘मल्टिलेव्हल-मार्केटिंग’ या बदनाम तंत्राचा कौशल्याने वापर करुन, मोठा लोकसंग्रह व अफाट माया जमा करणाऱया ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’सारख्या ‘संस्थांचं यथावकाश संस्थानं’, असं रुपांतरण झाल्याचं ‘चारित्र्य’, निदान या निमित्ताने उघड चर्चेत तरी आलं, हे नशीब…. दुसरं नशीब म्हणजे, आपले राष्ट्रपती या विवादास्पद कार्यक्रमाला जात नाहीयेतं (त्यांच्या निवडीत वा नेमणुकीत श्री श्री रविशंकरांचा ‘रोल’ नसावा; पण, मोदींच्या पंतप्रधान म्हणून निवडीत मात्र त्यांचा ‘मोठा रोल’ आहे, तेव्हा मोदी उपकाराची परतफेड करण्यासाठी नक्कीच जातील… अशा ‘उपकार-परतफेडी’त त्यांचा हात कोणी धरणार नाही, हे अंबानी-अदानींना ‘न’ विचारताही सहजी कळेलं….. आणि, तिसरं नशीब हे की, दिल्लीतल्या शेतकऱयांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’विरुद्ध आंदोलनाचं उशिरा का होईना पण, पाऊल उचललयं !!
यमुना नदी प्रदूषणाचा ठपका ठेवत केवळ पाच कोटींचा दंड आकारुन, ना त्या अतिश्रीमंत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’वाल्यांना काही फरक पडेल (तो ही ते भरायला तयार नाहीत, असं वाहिन्यांवर त्यांचे प्रवक्ते सांगतायतं; तर, त्यांचे वकील ‘निषेध नोंदवून’ म्हणजेच, Under Protest भरणार व त्याला पुढे कायदेशीर आव्हान देणार, अशी विसंगतीपूर्ण वक्तव्ये करत होते…. ‘महाराजांनी’ थेट दंड ‘न’ भरता हरित लवादाला आपल्याला अटक करण्याचं आव्हान दिल होतं ! ), ना एकदा झालेलं निसर्ग-पर्यावरणीय नुकसान पुन्हा कधि भरुन येईल…. याचाच अर्थ, “पैसे भरा आणि प्रदूषण करा”, असा सरळ सरळ होतो. हा निसर्ग-पर्यावरण संहाराचा नवा फंडा आहे. विशेष म्हणजे, ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने हा पाच कोटींचा दंड आकारताना….. दिल्ली सरकार, केंद्रीय मंत्रालये आणि संबंधित संस्थांवर कडक ताशेरे ओढलेले आहेत, हे ध्यानात घेणं येथे गरजेचं आहे.
या ‘ट्रिपल श्री’ शंकरांना किंवा त्यांच्यासारख्या अन्य ‘धार्मिक’ महाभागांना, जो देणग्यांचा अफाट महापूर येतो…. तो सर्व एकतर, या देशातल्या “कामगार-शेतकऱयां”सारख्या श्रमिकांच्या ‘घामा-रक्ता’च्या लुटलेल्या पैशातून येतो किंवा भ्रष्टाचाराच्या-काळया धंद्यातल्या दोन नंबरच्या पैशातून येतो, हे उघडंनागडं जळजळीत सत्य आहे ! १२०० फूट लांब, २०० फूट रूंद, ४० फूट उंच भव्य स्टेज, ४० हजार देशी-परदेशी कलावंत, यमुनातटी अतिभव्य सभामंडप, यमुनेवर तीन पूल… दोन सैन्यदलाने तर, एक सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेले…. एखाद्या शाही सोहळयालाही लाजवेल असा थाटमाट कशासाठी आणि कोणाच्या जीवावर ? हजार एकर जमिनीचे अपरिवर्तनीय स्वरूपाचे, अनैसर्गिक अवस्थांतर घडवून सपाटीकरण करणे, तेथील उरलीसुरली झाडेझुडपे तोडून जलचर, पक्षी, प्राणी आणि किटकांचा अधिवास व अन्नसाखळी उध्वस्त करणे, ही आध्यात्मिकता होय ? या ‘ट्रिपल श्री’ शंकरांना व त्यांच्या अनुयायांना, आता कोणी सांगायला पाहीजे की, सध्या शेवटी नियती अगाध असते व ती खदाखदा हसत असते. ‘अतिशहाण्या’ मनुष्यप्रण्यांच्या अशा उपद्रवी ‘लीलां’नी, आता आपल्या धर्मग्रंथांतून उल्लेखल्याप्रमाणे ‘शंकर’ महादेवाने ‘तिसरा’ डोळा उघडलाय…. ‘अनाकलनीय वातावरणीय बदलां’च्या स्वरूपात त्या ‘शंकरा’चं पृथ्वीच्या पटावर ‘तांडवनृत्य’ सुरू झालेलं आहे…. आणि, अजून तुम्ही तुमच्या भंपक ‘अध्यात्मिक नशे’तच ??? यमुना नदीपात्रात जमणाऱया लाखो लोकांना डासांचा उपद्रव होऊ नये म्हणून, अक्षरशः शेकडो टन घातक रसायनं नदीपात्रातील पिण्याच्या स्त्रोतात ओतली गेलीयतं, ती यथावकाश लोकांच्या व जलचरांच्या शरीरात हानिकारक प्रवेश करणारच. जलचरांच्या जीवनचक्रातील ही अक्षम्य व घातकी ढवळाढवळ तर आहेच; पण, यमुनातिरावरील गाळाच्या सुपीक जमिनीत काँक्रिटचं बांधकाम करुन व प्रचंड भराव घालून ती ‘संजीवन’ जमीन मृतवत करुन टाकणं, त्या जमिनीची सेंद्रियता धोक्यात आणून तिची पाणी संधारण क्षमता व सच्छिद्रता कायमची संपुष्टात आणणं आहे. शिवाय, नैसर्गिक पूर वगैरे आपत्ती प्रसंगी असलेली ही संरक्षक ‘पूर-पातळी’ धोक्यात आणली गेलीयं… आणि, हेच आध्यात्मिक गुरू, नद्या या आपल्याला पोसणाऱया ‘माता’ आहेत, असं प्रवचनातून नित्यनियमाने सांगणार. कार्यक्रमापश्चात, नदीपात्रात ‘सौंदर्यीकरण’ करुन वा जैवबहुविधतेचा प्रयोग राबवून झालेलं जैविक-नुकसान पुन्हा भरुन येणं, शक्यच नाही ! हे असं म्हणणं म्हणजे, आमच्या कोकण, ठाण्या-नवी मुंबईच्या राजकारणी दगडखाण मालकांनी सांगायचं की, डोंगर फोडून-पोखरुन झाले की, तिथे तोडलेल्या-पडलेल्या जुन्या इमारतींचं डेब्रिज वा केरकचरा लिंपून, झाडे लावून पूर्ववत करुन देऊ म्हणण्यासारखं आहे. दुसरीकडे, भारतीय सैन्यदलाला या कामी जुंपणं, ही तर अत्यंत धक्कादायक बाब आहे…. हे सैन्याचं ‘भगवेकरण’ आहे, असं उद्या कोणी म्हटल्यास, त्यांचं काय चुकेल ? शबरीमलाला म्हणे असाच, सैन्यदलाने पूल बनवून दिला होता ! या साऱयांची ‘आध्यात्मिक-मस्ती’ संपुष्टात आणायची तर, सर्वांनाच कायमची जरब बसेल, असा पाचशे कोटींचा दंड करायला हवा होता. BJP सत्तेवर आल्यापासून ही ‘मस्ती’ दिवसेंदिवस वाढत चाललीयं. हीच ढोंगी आध्यात्मिक लोक ‘खेडी दत्तक’ घेणार आणि मोठा आव आणून ‘नैसर्गिक शेती’चे (Natural Farming) व ‘शाश्वत जीवनशैली’चे प्रयोग (show case) करुन दाखवणार ! काय तर म्हणे, बाहेरच्या दिडशेहून अधिक देशांतील लोकं येणार, तेव्हा गडबड गोंधळ करुन देशाची प्रतिमा मलिन करु नका…. खरतर, यांना स्वतःची उघडी पडलेली लाज सावरण्याची चिंता आहे ! ……कधि निसर्ग-पर्यावरण संरक्षणासंदर्भात मूलभूत मुद्दे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’सारख्या आध्यात्मिक संस्थांनी उचललेतं व त्यासाठी व्यवस्थेशी संघर्ष केलायं ? अशासारख्या गोष्टी राजकारण्यांशी समन्वय राखून व शांतपणे चर्चा करुन वा फुटकळ प्रयोग करुन होत असत्या तर, मग काय ???…. सगळचं ‘सुजलाम् सुफलाम’ केव्हाच झालं असतं ! पण, मुळात या ‘आध्यात्मिक दुकानदारां’ना फक्त त्यांची ‘दुकानं’ तूफान चालण्यात व चालवण्यातचं खरा रस आहे….. मूलभूत शाश्वत काही भलं घडण्यात व घडवण्यात मुळीच रस नाही ! या तथाकथित स्वयंघोषित ‘धर्मगुरुं’ना खरतर, तुरुंगात टाकण्याची गरज आहे, हे आमचं विधान कोणाला आगाऊपणाचं व उपमर्द करणारं वाटेल; पण, त्याचं कारण हे की, आजच्या तरुणपिढीला ही सगळी मंडळी निष्क्रिय अध्यात्म्याची ‘अफूची मात्रा’ पाजून षंढ आणि थंड बनवतायत….. त्याद्वारे, अप्रत्यक्षरित्या या देशातील ‘रक्तपिपासू व शोषक व्यवस्थे’ला ‘जनक्षोभा’पासून वाचवत, फार मोठय़ाप्रमाणावर सहाय्यभूत होतायतं. चांगली सतप्रवृत्त व सज्जन माणसं, आपल्याकडे आकर्षून घेतं व त्यांना कायमचं अडकवून ठेवतं, त्या सज्जन माणसांचा राजकारणातला नितांत गरजेचा असा सक्रिय सहभाग एकप्रकारे रोखून धरत, समाजाचं व देशाचं ते फार मोठं नुकसान करतायतं…. हा ‘आध्यात्मिक पसारा’ जेवढा मोठा (Crony Spiritualism), तेवढा तो बदमाष राजकारण्यांच्या पथ्यावर पडतो आणि म्हणूनच अशा ‘आध्यात्मिक गुरूं’ना सर्वपक्षीय स्वरुपाचं मोठं राजकीय पाठबळ लाभत आलेलं आहे. शेवटी, सत्तेच्या खुर्च्या काही सज्जन मंडळी उपलब्ध नाहीत, म्हणून रिकाम्या रहात नाहीत…. तिथे, राजरोस निवडणुकीत बदमाषीनं निवडून जात, दुर्जन मंडळी आरामात स्थानापन्न होतात. त्यामुळेच, या देशाची आणि जगाची अवस्था, ‘निसर्ग आणि माणूस’ यांच्या टोकाच्या शोषणामुळे, आज अतिशय वाईट झालेली आहे. ज्या श्रीराम आणि श्रीकृष्णाला आपण भारतीय ‘अवतार’ मानत आलेलो आहोत; त्यांनी त्यांच्या ‘अवतार कार्यकाळा’त तत्कालीन राजेमहाराजे आणि अभिजन पुरोहितवर्ग , यांच्यामधील जनताविरोधी अर्थपूर्ण व सोयीचे असलेले ‘हितसंबंध’ कठोरपणे संपुष्टात आणले होते…. तोच अनुपम कित्ता, शिवछत्रपतींनी आपल्या स्वराज्यात ‘सरदार-बरकदार व अध्यात्माचे ठेकेदार’ यांच्यातील भ्रष्ट ‘हितसंबंध’ संपवताना, गिरवला होता, हे आम्ही कसं विसरु शकतो ?
पुरातन भारतीय तत्त्वज्ञानात, जातिवंत योगी पुरुषांनी…. ऋषिमुनींनी नद्यांच्या जीवनदायी पेयजलाचं आचमन करत गंगायमुना, सिंधू, सरस्वती, गोदावरी अशा सगळयाच जीवनदायिनी नद्या अतिपवित्र मानत भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया रचला…. त्यांनी कधि स्वतःचं मोठेपण वा वैभव नव्हतं उभं केलं ! …..अशा सघन पार्श्वभूमीवर, “योगी विरुद्ध यमुना”, असा हा नवा संघर्ष सामोरा येतो आहे….. त्यात, आमचे आधुनिक ‘आध्यात्मिक गुरु’ बिनदिक्कत स्वतःची टिमकी वाजवण्यासाठी, त्या नद्यांना वेठीला धरतायतं ! मित्रहो, ‘विकास’ हा शब्द ज्या अर्थाने, सध्या ‘चलनी नाण्या’सारखा राजकारण्यांकरवी वापरला जातोयं, तसा त्याचा बेबंद व बेलगाम वापर तर सोडाच, पण त्याचा साधा उल्लेखही आपल्या कुठल्याही ‘धर्मशास्त्रा’त नाही, हे या तथाकथित ‘धर्मगुरुं’नी गर्जून सांगायला हवं; पण, ते बव्हंशी ‘भोंदू’ असल्यामुळे असं काहीही करायला धजावणार नाहीत….. प्राचीन-अर्वाचीन पतंजलींसारख्या त्यागमूर्ती असलेल्या योगीपुरुषांच्याच ‘योगा’त, किंचित बदल करीत त्याचं आपल्या खास पद्धतीने ‘मॉडेलींग व मार्केटिंग’ करणारं, हे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ नाही; तर, ‘आर्ट ऑफ डिसिव्हींग’ आहे ! सध्या भारतात, ‘ऑल प्रायमिनिस्टर्स् मेन’ अशी दारुण अवस्था आहे. करोडो शोषित आत्म्यांचा आक्रोश (उदा. गुलाम व नव-अस्पृश्यतेत भरडली जाणारी तरुणाई) आणि विकास व चंगळवादी जीवनशैलीच्या असह्य दडपणाखाली चाललेल्या सजीवसृष्टीच्या संहाराचा भयकंपित नाद टिपायला, ना संवेदनशील कानडोळे शिल्लक आहेत…. ना जाणून घ्यायला संवेदनशील मनं व हृदयं ! हे, यच्चयावत सगळे धर्म-योग संप्रदाय थाटणारे, याबाबत काही कृति करणं तर दूरच; पण, साधं अवाक्षरही काढणार नाहीत…. न जाणो, त्यामुळे व्यवस्थेतल्या दुढ्ढाचार्यांची नाराजी ओढवली जाऊन, आपली ‘आध्यात्मिक-दुकानदारी’ कोलमडून पडायची ! प्रस्तुत कार्यक्रमाला यमुनातिरी फक्त २ लाख लोकं येणार अशी, दिल्ली पोलीसांना लोणकढी थाप मारणारे, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’वाले खाजगीत आणि वाहिन्यांवर मात्र ३०-३५ लाख लोकं येणार असल्याचं छाती ठोकून सांगतायतं…. एकूणच, यातून ‘धार्मिक-दुकानदारां’च्या मानसिकतेची व संस्कृतीची काळी बाजू साफ उघडी पडतेयं. जाहीररित्या २५ कोटींपेक्षा कितीतरी जास्त खर्च करणारी आणि देशाची संसाधनं, आपल्या ‘राजकीय-प्रभावा’ने वेडीवाकडी वापरुन घेणारी, ही अतिश्रीमंत ‘संस्था’ नव्हे; तर, थेट ‘सरंजामी-संस्थानां’ पैकी एक आहे. जगात सर्वत्र, ‘जागतिक-तापमानवृद्धी (Global & Warming) व अनाकलनीय वातावरणीय बदल (Climate Change) याबाबत चिंता व चर्चा होत असताना, हे यमुनातिरी निसर्ग-पर्यावरणीय आघात होत आहेत, हे विशेष. नद्यांना ‘माता’ म्हणायचं, आणि त्यांचा विध्वंस करायचा ? ….हा सगळा संमेलनाचा अट्टाहास, आंतरराष्ट्रीयस्तरावरील उच्चभ्रू लोकांचे आपापसातील हितसंबंध जपण्यासाठीच(Coalition Of Connected) आहे… सैन्याच्या मदतीसोबतच, स्वच्छ भारत मोहीमेतले सरकारी कर्मचारी आणि संसाधनं, यासाठी मोठय़ाप्रमाणावर वापरली जाणार आहेत. प्रकाश जावडेकरांसारखा ‘व्यवस्थे’चा किळसवाणा राजकीय दलाल असलेला तथाकथित ‘पर्यावरण मंत्री’ तर आपली मूळ निसर्ग-पर्यावरण संरक्षणासंदर्भातील भूमिका सोडून, अशा अस्थायी बांधकामांना आमच्या परवानगीची गरजच नसल्याचं व नंतर सगळं ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’वाले ठाकठीक करणार असल्याचं, निर्लज्ज व बेजबाबदार प्रतिपादन करत फिरतोयं….. वा रे ‘पर्यावरण मंत्र्या’ वा !!!
हे ‘आधुनिक संत’ (त्यात रामदेवबाबा प्रामुख्याने) आता काळया पैशाबद्दल फारसं बोलतं नाहीत…. काँग्रेसच्या काळातल्या सारखे ‘स्कॅम’ अद्याप फारसे उघड झाले नसले तरी, काळया पैशाच्या निर्मितीचं ‘काम’ उद्योगपती-व्यापारी आणि राजकारण्यांकडून अतिप्रचंड प्रमाणात बिलकूल खंड ‘न’ पडता चालूच आहे. पूर्वी ‘ते’ खात होते…. आता ‘हे’ खातायतं…. अधिकची सावधगिरी व हुशारी दाखवून खातायतं, एवढाच काय तो फरक ! काळया पैशाचा सगळयात मोठा हिस्सा, परदेशातील बँकांपेक्षाही इथल्या ‘बांधकाम उद्योगा’त अडकलेला आहे, हे या आध्यात्मिक गुरुंना माहीत नाही काय ? कालपरवापर्यंत निवडणुकीच्या धामधुमीत ‘जन-लोकपाल’ व ‘अर्थक्रांति-संकल्पने’चा उदघोष करणारी, ही नरेंद्र-भक्त ‘आध्यात्मिक मंडळी’, नरेंद्र मोदी सत्तेवर येताच त्यावर मूग गिळून बसलीयतं…. यातच, सगळं आलं. यांचा प्रभाव एवढा मोठा आहे की, हे बिनदिक्कत कायदे मोडू शकतात… वाकवू शकतात; तर, ‘जन-लोकपाल वा अर्थक्रांति-संकल्पना’ यासारखे कायदेही राजकारण्यांकरवी संमत करुन घेऊ शकतात… ते त्यानी संमत करुन घेऊन व निसर्ग-पर्यावरणस्नेही अशा जीवनशैलीचा (त्यात कठोरपणे कुटुंब-नियोजन व चंगळवादी जीवनशैलीला आवर घालणे प्राधान्याने आलचं !) व शाश्वत विकासाच्या प्रारुपाचा आग्रह धरुन दाखवावाच ! उगीचचं तोंडदेखलं ‘शो-केस’ म्हणून मोजक्या खेडय़ांच्या ‘शाश्वत-विकासा’चा गवगवा करुन आपली ‘खोटी’ निसर्ग-पर्यावरणस्नेही ‘प्रतिमा’ उभी करु नये…. हे आधुनिक कंपन्यांच्या CSR (Corporate Social Responsibility) सारखं फसवं व निसरडं ‘मॉडेल’ आहे…. एका बाजुला निसर्ग-पर्यावरण संरक्षणासंदर्भात चार चांगली कामं करायची आणि दुसरीकडे निसर्ग-पर्यावरणाचा बेलगाम विध्वंस करत कंपनी धंदा व नफा वाढवत जायचा. कुठलाही बनेल राजकारणी हेच करतो…. तो व त्याचे चेले, चार चांगली कामं केल्याचा मोठा गवगवा करतात (तेवढी तरी ते करतातच) आणि पडद्यामागून लुटालुटीचे राजरोसपणे बारमाही धंदे करतात. कोणी चार चांगली कामं केलीय म्हणजे, त्या कामांचं ‘व्हिजिटींग-कार्ड’ वा ओळखपत्र दाखवत, आपल्याला पुढे ‘बदमाषी’ करायची परवानगी वा मोकळं रान मिळतं… हा हल्ली रुजू झालेला नवा घातकी ‘फंडा’ आहे !
अशा आध्यात्मिक मायावीजालाला भुलून, लढाऊ बाणा व राजकीय प्रेरणा हरवून बसलेले, असंख्य जणं आपल्या नजरेसमोर आहेत. म्हणून समाजात एक सन्नाटा… एक ‘न’ संपणारी व सर्वांना घेरुन असलेली ‘उदासीनता’ पसरलेली आहे. एक अशी अस्वस्थ शांतता आहे की, जी देऊळ, मशीद, चर्च, गुरुद्वारा यातली पवित्र शांतता नसून, स्मशानभूमीतील मुडद्याफरासांची अपवित्र शांतता आहे. सामान्यांच्या जगण्याची कोंडी करणाऱया, या व्यवस्थेनं उभारलेल्या भितींची उंची दिवसागणिक वाढतच चाललेली आहे…. तरीही, आपले ‘धर्मगुरु’ याबाबतीत चिडीचूपच; जणू, त्यांना त्याचं काही सोयरसुतकच नाही ! कुठे, “सामर्थ्य आहे चळवळीचे….” म्हणणारे किंवा , “देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा” असं सांगणारे समर्थ स्वामी रामदास आणि कुठे आत्ताचे ‘राजकारण्यांचे दास’ असणारे धर्मगुरु ??? आम्ही आजुबाजुच्या परिसराची वारंवार साफसफाई मोहीम हाती घेणार; पण, अन्यायी, गुन्हेगार व शोषक ‘व्यवस्थे’ची साफसफाई करण्याची, निसर्गदत्त जबाबदारी बेदिक्कत टाळणार. प्रजेला छळणाऱया व लुटणाऱया अन्यायी ‘वेन’ राजाच्या भृकुटीवर अंगठय़ाने जोरकस दाब देऊन, दरबारी ऋषिमंडळ प्रमुखाने ‘श्वेन’ राजाचे प्राण घेतले होते…. हा आपला गौरवशाली इतिहास आहे. पण, तो आपण सोयिस्कररित्या विसरलेलो आहोत…..
एकूण या वरवर निरुपद्रवी वाटणाऱ्या; पण, अंतिमतः समाजाच्या व निसर्गाच्या मुळावर आलेल्या, या अशा धर्म-योग संप्रदायांमध्ये…. ढोबळमानाने, उत्तर भारतीय लोक, रामदेव बाबांकडे; तर, दक्षिण भारतीय श्री श्री रविशंकरांकडे आणि मराठी मंडळी महाराष्ट्रातील बापू, बाबा, आप्पा यांच्या कच्छपी लागून ‘सत्त्व व स्वत्त्व’ हरवून ‘त्रिशंकू’ सारखी मध्येच लटकलेली दिसते !
तेव्हा, सांप्रतप्रसंगी मी एवढचं म्हणू शकतो, “ऊर्ध्वबाहू प्रवक्ष्यामि न् कःश्चित् श्रुणोति मे” !!!
जय महाराष्ट्र । जय हिंद ।।
……..राजन राजे ( अध्यक्षः धर्मराज्य पक्ष)