“धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ???

‘संविधान-मोर्चा’ या एका वैचारिक घुसळणं व अभिसरण करणार्‍या एका चांगल्या ग्रुपमध्ये मला खालील प्रश्न विचारण्यात आला होता….

प्रश्न : ‘धर्मराज्य पक्षा’च्या नांवात असलेलं व त्या पणाला अभिप्रेत असलेलं…. “धर्मराज्य” म्हणजे नेमकं काय ???

माझं वरील प्रश्नाला थोडक्यात उत्तर :

‘धर्मराज्य’ म्हणजे काय…. हा, अनेकवेळा, अनेकप्रसंगी मला विचारला गेलेला एक चांगला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नातच त्याचं उत्तरसुद्धा दडलेलं आहे.

‘धर्मराज्य’ म्हणजे ‘नीतिधर्म राज्य’….. ‘नैसर्गिक न्यायतत्त्व’ सुसंगत व्यक्तिगत, सामाजिक व राजकीय व्यवहाराचा आग्रह…. मानवी पिढ्यापिढ्यांचा व पृथ्वीतलावरील अवघ्या सजीवसृष्टीच्या ‘शाश्वत-कल्याणा’चा ‘अंतिम-सत्यवादी’ विचार व व्यवहार…. ज्याचा, कुणा एका धर्माशी संबंध नसून, वरील दृष्टिकोनाच्या संदर्भात म्हटलं तर, सर्वच धर्मांचं सार आणि जागतिकस्तरावरील यच्चयावत उपलब्ध सर्व तत्त्वप्रणालींचा (ज्याला, कोणी कुठला ‘ईझम्’ही म्हणू शकेल!) साररुपाने विचार त्यात आहे.

यालाच आपण असही म्हणू शकतो की, “अध्यात्म, समाजकारण आणि राजकारण यांचा समष्टिच्या हिताच्या दृष्टिनं सांधा जुळवणं!”

सर्वात महत्त्वाचं हे की, “आचार, विचार, व्यवहार” यात वरील प्रतिपादनानुसार बिलकूल तफावत नसणं, म्हणजेच, “उक्ती आणि कृति” यात संपूर्ण ताळमेळ असणं!

मी, महाराष्ट्र, भारत व अंतिमतः जगाचा जेव्हा, यासंदर्भात आजवर कित्येक दशके साकल्याने विचार केला व आजही करतो तेव्हा, “प्रस्थापित जात-धर्माच्या चौकटीच्या पूर्णतः पलिकडे जाऊन, ‘अंतिम-सत्या’ची मांडणी करत, अचूक व संपूर्णतः निर्दोष ‘राजकीय-व्यवहार’ करणारी “दोन व्यक्तिमत्त्व” मला विशेषकरून भावली (अर्थात, अनेक सन्मान्य राजकीय-विचारवंतां’चे आणि समाजशास्त्रज्ञांचे फार चांगले गुणग्राही संस्कार निश्चितच माझ्यावर झालेले आहेत… आणि, त्याबाबत मी निश्चितच त्यांचा ऋणी आहे व आवश्यक तिथे… आवश्यक त्या प्रमाणात त्यांची विचारसरणी, सदरहू अंतिम-ध्येयाला ललामभूत होईल, अशा सद्हेतूने मी कुठलाही अभिनिवेश ‘न’ बाळगता, निश्चितच अंगिकारतो व व्यवहारात उतरवतो)…. ती महनीय ‘राजकीय-व्यक्तिमत्व’ म्हणजे, “श्रीकृष्ण आणि शिवछत्रपती” !

म्हणूनच, मी कायम प्रतिपादन करीत असतो की, “श्रीकृष्णाच्या जीवनसंदेशानुसार व शिवछत्रपतींच्या राजनीतिनुसार चालणारा एकमात्र ‘अंतिम-सत्यवादी पक्ष’….. “धर्मराज्य पक्ष”!!!

धन्यवाद….

आपला नम्र,

…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)

(१५ मे-२०२६)