बिल्कीस बानो आणि अयोध्येतलं राममंदिर…

बिल्कीस बानो, प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या सणसणीत निकालाने…ब्रिजभूषणसिंग, कुलदीपसिंग सेंगर, संदीपसिंग सैनी यासारख्या अनेक बलात्कारी किंवा लैंगिक-अपराधी आमदार-खासदार-मंत्र्यांनी खच्चून भरलेल्या; तरीही, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओअशा दांभिक घोषणा तारस्वरात देणाऱ्या आणि मुँह में राम, बगल में छुरीपॅटर्न राबवत अयोध्येत राममंदिरबांधू पहाणाऱ्या…भाजपाई डबल-इंजिन सरकारांचं जागतिकस्तरावर, असं काही वस्त्रहरणअमृतकाळात झालंय की, जे गेल्या सातआठ दशकात, कधि कुठल्या सरकारचं झालं नव्हतं! तेव्हा, या नैतिकदृष्ट्या नागव्या झालेल्या डबल-इंजिनसरकारांच्या, किमान गृहमंत्र्यांनी तरी तत्काळ राजीनामा देऊन तोंड काळं करत सत्तेवरुन पायउतार व्हायला पाहीजे (अर्थातच, ‘जनात नाहीतर मनात तरी’…यत्किंचितही, लाजलज्जा-शरम शिल्लक असेल तरच)…!!!”

आधी, ईडी-आयटी-सीबीआय व करोडोंच्या खोक्यांकरवी फोडोफोडीसाठीचा व विरोधी-सरकारे पाडापाडीसाठीचा भाजपाई-प्रयोगयथासांग पार पडला; तो दंड, भेद, साम, दामाचा आणि आता, सुरु झालाय तो निवडणुका जिंकण्यासाठी प्रयोग जय श्रीरामाचा! पण, भाजपाच्या दुर्दैवाने आणि समस्त न्यायप्रेमी सुजाण भारतीय नागरिकांच्या सुदैवाने…प्रथमग्रासे मक्षिकापातःम्हणून बिल्कीस बानोप्रकरणाचा सर्वोच्च-निर्णय दत्त म्हणत, या भाजपाई-प्रयोगाच्या मार्गात उभा ठाकलाय!

…तळागाळातील जिवंत हाडामांसाच्या माणसांना लाथाडत, दगडाधोंड्यांना शेंदूर फासत देव म्हणून पूजणारं, अयोध्येत ऐश्वर्यसंपन्न अवाढव्य राममंदिर बांधणारं (अर्थातच, बहुशः ग्राहक आणि श्रमिकांच्या लुटीच्या व सरकारी-महसूल बुडवलेल्या भांडवलदारवर्गाच्या ‘काळ्या पैशा’तूनच)… “संघीय-भाजपाई ‘हिंदुत्व’, हे ‘रामा’शी कमी आणि ‘रावणा’शी जास्त नातं सांगणारं आहे”!

रावणही ऐश्वर्यसंपन्न होता (त्याची लंकाच मुळी सोन्यानं मढवलेली होती; त्यामानाने आमच्या प्रातःस्मरणीय रामाची अयोध्या ऐश्वर्यसंपन्नतेच्या दृष्टीने किरकोळच म्हणावी…पण, सत्य, न्यायनीति, प्रेमभावामुळे अयोध्या विश्ववंदनीय होती), रावण विद्वान होता, व्यासंगी होता, सगळी पोथ्यापुराणं-शास्त्रं पालथं घातलेला होता; पण, अंतरी प्रेम-वात्सल्य, न्यायनीति, सत्य…या महत्तम जीवनमुल्यांना पारखा झालेला होता. त्यातूनच आसुरी इच्छा आणि राक्षसी महत्त्वाकांक्षांचा प्रादुर्भाव त्याच्याठायी झालेला होता. परस्त्री-प्राप्ति आणि सत्ता-ऐश्वर्य संपादन करण्यासाठी कसलाही विधिनिषेध न पाळता, कुठल्याही थराला जाणारी विकारी-गुन्हेगारी मानसिकता आणि सर्वांना जाळूनपोळून काढणारा, संत्रस्त-त्राही त्राही करुन सोडणारा अहंकार, त्याच्यात होता. दुसर्‍याची सुंदर पत्नी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने पळवून आणणं काय किंवा आपल्या प्रेमळ पत्नीला तहहयात क्रूरपणे साफ लाथाडणं काय… तत्त्वतः, त्यात फारसा फरक नाहीच!

…जरी रावण त्यामुळे ‘वध्य’ ठरुन गेला होता, कठोर दंडासाठी पात्र ठरला होता; तरीही रावण, हा सत्ताधारी ‘लंकाधिपती, लंकेचा शासक’ असल्यामुळेच त्याच्या घनघोर अपराधांना शासन होणं, दंड होणं शक्य होत नव्हतं…नियतीनं अखेर ती जबाबदारी रामावर टाकली एवढंच! आता, वर्ष २०२४ मध्ये, ‘रावणा’पेक्षाही हीन-पातकी, अवतारी-अत्याचारी भाजपाच्या राजकीय निःपाताची पुण्यप्रद जबाबदारी, समस्त भारतीय मतदारांवर नियतीनं टाकलीय, हाच काय तो आजच्या स्थितीतला फरक.

गौतम बुद्धही प्रबुद्ध होण्यापूर्वी, राजकुमार ‘सिद्धार्थ’ असताना आपल्या पत्नीला, यशोधरेला व पूत्र राहुलला एकाकी सोडून गेले होते…हा वरकरणी अपराध खरा; पण, दुःखी जगाच्या उद्धारार्थ ‘अंतिम-सत्य’ शोधण्यासाठी झालेला तो अपराध, अपराध न रहाता (त्याबद्दल, जवळपास एका तपानंतर स्वतः गौतम बुद्ध यशोधरेला एकप्रकारे क्षमायाचना म्हणा वा सांत्वन करण्यासाठी म्हणा…पण, भेटायला गेले होते आणि त्या भेटीची परिणती यशोधरा आणि राहुल, दोघंही त्यांच्या पंथात सामील होण्यात झाली होती) तो वैयक्तिक-स्वरुपाचा विश्ववंदनीय असा उच्चतम त्याग बनून गेला. गौतमाचा पत्नीचा त्याग; जनतेला धर्मविद्वेषाच्या अंधःकारात ढकलण्यासाठी नव्हता…नव्हता तो, तळागाळातल्या जनतेवर क्रूरपणे दडपशाही लादून, त्यांना लुटत…आपल्या मित्रपरिवारातल्या मोजक्या भांडवलदारांची (Crony-Capitalists) मत्ता-उन्मत्तता बेलगाम-बेफाम वाढवण्यासाठी! तो गौतमाचा त्याग होता, जगत-कल्याणासाठी…जगात प्रज्ञा, शील, करुणा यासारख्या महन्मंगल जीवनमुल्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी, दुःख दूर सारुन मानवी-जगण्यात शाश्वत सुखशांति आणण्यासाठी!!

थोडं इतिहासात डोकावून पाहीलं; तर, रामदासांनी ‘रामदासी पंथ’ स्थापन करताना, उत्तर भारतीय रामाचं प्रस्थ महाराष्ट्रात निर्माण केलं! त्याअगोदरच्या, संत ज्ञानेश्वरांपासून ते नंतरच्या थेट संत गाडगेबाबांपर्यंत आपले सगळेच मायमराठी संतमहंत, हे आपल्या महाराष्ट्रातलीच महाराष्ट्रीय दैवतं प्रामुख्याने भजत-पूजत होते. शिवछत्रपतींनी कधि कुठलं ‘मोठं राममंदिर’ बांधल्याचं किंवा रामाचं मोठेपण, महाराष्ट्रीय दैवतांवर लादल्याचं तुम्हाला अंशानेही कुठे आढळणार नाही. आमचं हाडामांसाचं आराध्य दैवत असलेले शिवछत्रपती, स्वतः ज्या दैवतांची पूजा करत होते…ती होती तुळजापूरची भवानी, तो होता पंढरपूरचा विठोबा आणि रखमाई व प्रतापगडावरचा शिवशंभो!

दुसरी बाब म्हणजे, राम हा तर तसा क्षत्रियच राजा; त्यामुळे तो शाकाहारी होता की, मांसाहारी…हा प्रश्नच गैरलागू आहे. त्यातून, जर कुणाला मांसाहार करणारे म्हणजे वाईट आणि शाकाहारी म्हणजे चांगले गुणी…असं सुचवायचं असेल; तर, त्या महामूर्खांनी प्रथम हे ध्यानात घ्यावं की, करोडो लोकांची नृशंस हत्या घडवणारे हिटलरसारखे अनेक क्रूरकर्मा, हे शाकाहारीच होते! आपल्याकडच्या डाळभात खाणार्‍या, व्यापार-उद्योग करणाऱ्या तद्दन शाकाहारीगुजराथी-भाषिक जमाती…श्रमिकांचं किंवा ग्राहकांचं आर्थिक-शोषण करताना, कुठल्या थराची असंवेदनशीलता, छुपी हिंस्त्रता दाखवतात; ते आपण व्यवहारात पिढ्यानपिढ्या पहात आलेलो आहोतच…हातच्या कंकणाला आरसा कशाला?

मात्र, इथे एक गोष्ट प्रकर्षाने ध्यानात घेतली पाहीजे; ती म्हणजे विष्णुचा एकमेव परिपूर्ण अवतार असलेला कृष्ण, गवळी (यादव) म्हणजेच, आजच्या परिभाषेत ओबीसीहोता…त्यामुळेच तर त्याचा प्राधान्यक्रम, संघ-भाजपाई लोकांकडून, रामाच्या खाली ढकलण्यात आलेला नाही ना? …की, अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांना खरारा करणारा, गोकुळातील गोपगोपिकांना मुरलीची भुरळ घालणारा आणि आपल्या गीतेतून पातकी अत्याचार्‍यांच्या धातीत धडकी भरवणारा अमोघ-अचूक ‘कर्मसिद्धांत’ मांडणारा श्रीकृष्ण…त्यांना खऱ्याअर्थाने झेपणारा नाही??

रामासह विष्णुच्या अपूर्ण अवतारांपैकी एक असलेलं व हाती सदैव परशू असलेलं परशुराम, हे आपलं एकमेव ज्ञात दैवत वर्णवर्चस्ववादीजातीचं आणि ते अत्यंत रौद्ररुपाचं, रागीट, शीघ्रकोपी, अविचारी आणि क्षत्रियांचा २१ वेळा संहार करणारं…म्हणूनच तर, ‘जय सीताराम किंवा जय सियाराम’, या वात्सल्यपूर्ण-प्रेमळ संबोधनामधल्या सीता माऊलीला दूर सारुन संघ-भाजपाई लोकांनी जाणिवपूर्वक, हाती रामबाण घेऊन कोदण्डाची प्रत्यंचा व भुवया ताणलेला युद्धसन्मुख राम जनमानसावर बिंबवण्यासाठीच श्रीराम’, हे उग्र-रागीट संबोधन निवडलेलं नसावं ना??

इथे, जाणिवपूर्वक दि. ६ एप्रिल-२०२३ रोजी, ‘धर्मराज्य पक्षा’ने प्रसारित केलेला संदेश उद्धृत करणं अगत्याचं ठरावं… तुमच्या शोषण-अन्याय-अत्याचारांनी बरबटलेल्या काळ्या हातांनी, कारस्थानी-कलुषित काळ्या मनांनी (कुणाच्या टोपीच्या रंगाशी आम्हाला देणंघेणं नाही)… तुम्ही लोकं, अयोध्येत बांधत असलेल्या राममंदिरातला राम कधिही कुणाला पावणं, केवळ अशक्यच होय… राम पावायचाच झाला; तर, नाशिकच्या काळाराम-मंदिरातला पावेल; कारण, दलितांच्या प्रवेशासाठी ऐतिहासिक आंदोलन करुन तिथल्या रामाशी न्यायाची, समरसतेची रुजवात आमच्या बाबासाहेबाने करुन ठेवलीय, म्हणूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रसन्न होऊन तो रामसदैव तिथे जागृत स्वरुपात आहे… कितीही प्राणप्रतिष्ठेचे भव्यदिव्य सोहळे मंत्रोच्चारात पार पाडलेत…तरी, अयोध्येतल्या शाही-राममंदिरात रामाची फक्त निर्जीव मूर्ति असेल…पण, रामाचे पंचप्राण, रामाचा आत्मा; अशा ‘काळारामा’सारख्या मंदिरात पददलितांना-शोषितांना, अन्याय-अत्याचारग्रस्तांना लढ्याची प्रेरणा देत, तिथेच वास करुन असेल!

अयोध्येतल्या रामाच्या निर्जीव मूर्तिने निवडणुकीत कदाचित विजय मिळवता येऊ शकेल…पण, तुमच्या विजयात भारतीय जनतेचा दारुण पराभव दडलेला असेल आणि भविष्यातल्या भारतातल्या रामराज्याच्या संभाव्य शक्यतेचा तो करुण अंत असेल!!!

राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)


(ता. क. : “राम म्हणू राम, नाही सीतेच्या तोलाचा हिरकणी सीतामाई, राम हलक्यादिलाचा”…अशी हलक्या दिलाचा म्हणूनच जर आपल्या लोकवाङ्मयाने, लोकभावनेनं साक्षात रामाची संभावना केली असेल; तर, या पातकी भाजपाई-अंधभक्तांना आपण कुठल्या दिलाचं म्हणावं…???)