इतिहास हा, कोळशासारखा असतो…..

“तप्त-गरम असताना तो हात भाजून काढतोच; पण, थंड असताना हातात धरला, तरी हात काळा केल्याखेरीज रहात नाही!” त्यामुळेच, तो

“जो थांबला, तो संपला”…. या न्यायाने, “जो इतिहासात बुडाला, त्याचं भविष्य बुडालं!”

इतिहास, हे केवळ डोळ्यात घातलं जावं असं ‘अंजन’ मात्र आहे…. त्यातून बोध जरुर घ्यायचा. पण, दिवसाचे चोवीस तास त्याचा ‘पाताळशोध’ नाही घ्यायचा की, त्याला ‘चिवडत’ही नाही बसायचं! हे खरं आहे की, काही इतिहासदत्त घटनांचा कायमचा सोक्षमोक्ष लागणं, गरजेचं असूही शकतं… पण, आम्हा भारतीयांची पुरातन मानसिकता ही, खरेखुरे ‘ऐतिहासिक’ मापदंड वा पुरावे जपण्याची फारशी नसल्यामुळे, ते महत्कार्य कधिकाळी साध्य होऊ शकेलं काय… याविषयी, साशंकता आहेच.

म्हणूनच, तुम्ही वर्तमानात मेहनत, तपश्चर्या, संघर्ष करुन नवा ‘इतिहास’ घडवलात की, बिघडलेला वा कुणी जाणिवपूर्वक बिघडवलेला पूर्वीचा इतिहास, फारसा आपल्याला खुणावत रहात नाही. पण, जेव्हा आपलं भविष्य अंधःकारमय व वर्तमान दुःसह असतं… तेव्हा, माणसं इतिहासाचा मानसिक आधार घेण्याची केविलवाणी धडपड करताना कुठेही दिसतातच!

जगाच्या पाठीवरचा प्रत्येक महापुरुष, प्रत्येक महान स्त्री संदेश देते… देत असते, तो आपला इतिहास घडवण्याचा… इतिहासात अडकून भविष्य बुडवण्याचा नव्हे!

“सद्यस्थितीत, जागतिक पर्यावरणीय महासंकटांच्या पार्श्वभूमीवर तर, ‘जातधर्मां’चं जे काही उणंअधिक महत्त्व होतं; ते केव्हाचचं ‘कालबाह्य’ झालयं…. ‘जातधर्मां’ची एक्सायरी-डेट संपली!

अवघी मानवजातचं जेव्हा, काळाच्या अक्राळविक्राळ जबड्यात, आपल्या कर्माने जात चाललीयं… तेव्हा, कसली आलीयं मानवनिर्मित ‘जात’ आणि कसला आलायं ‘धर्म’? ….अवघ्या चराचरसृष्टीला आपल्या कवेत मिटवून टाकण्याची संहारक क्षमता असणाऱ्या, या नैसर्गिक-पर्यावरणीय महासंकटांपुढे काय त्यांचा पाड??

अगदीच नसेल जमतं; तर, ‘जातधर्मा’ला घरात आणि प्रार्थनास्थळापुरतं राहू द्या…. सार्वजनिक जीवनातलं त्याचं महत्त्व आणि अस्तित्व निर्धाराने नाकारणं, ही काळाची निकडीची गरज आहे!

…. आता, ‘निसर्ग’ हीच ‘जात’ आणि ‘पर्यावरण’ हाच ‘धर्म’!!! जे जे म्हणून निसर्ग-पर्यावरणाला साहवेलं… जेवढं जसं मानवेलं… तिचं आपली जीवनशैली, तेच आपलं अर्थशास्त्र, तेच आपलं ‘विकासाचं प्रारुप’ आणि तेवढीचं आपल्या जागतिक लोकसंख्येची मर्यादा…. असं आपणं यापुढे सत्वर मानून चाललो; तरचं, काही आपलं अस्तित्व टिकण्याची शक्यता आहे… अन्यथा, ‘जातधर्मा’च्या नांवावर असाच थयथयाट करत रहाणार असू…. तर, ‘काळरात्र’ अवघ्या सजीवसृष्टीला आपल्यात सामावून घेण्यासाठी नजिकच्या भविष्यात दबा धरुन बसली आहेच !!!

….. राजन राजे  (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला जातधर्मविरहीत निसर्ग-पर्यावरणवादी पक्ष)