‘प्लास्टिक-बंदी’

‘प्लास्टिक-बंदी’संदर्भात, प्लास्टिक-वापराविषयी ‘ईशा न्यासा’चे प्रमुख सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी असे विचार मांडले की, “प्लास्टिक, हा अत्यंत उपयुक्त व चमत्कृतिपूर्ण पदार्थ असून त्यावर बंदी आणण्याची भाषा ही, ‘निकृष्ट दर्जा’च्या वाढत्या लोकसंख्येमुळे करावी लागतेय… त्यामुळे, यथायोग्य ‘नागरी-संहिता व संस्कृती’ बाळगली तर, अशी ‘प्लास्टिक-बंदी’सारखी वेळ येणे नाही… प्लास्टिक, ही अत्यावश्यक व पर्यावरणाला पूरक गोष्ट आहे!” सदरहू विचारांचा, भारतातील पहिलावहिला ‘निसर्ग-पर्यावरणवादी’ असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष, राजन राजे यांनी घेतलेला समाचार खालीलप्रमाणे….

या तथाकथित सद्गुरु ‘जग्गी वासुदेवां’ची, तिचं मोठी ‘समस्या’ आहे… जी, तमाम राजकीय-सामाजिक विचारवंतांची आणि हो, सध्याच्या काळातल्या ‘निसर्ग-पर्यावरणवाद्यां’ची आहे!

झालयं काय की, जी, आपली खरी ऋषिमुनींनी कष्टपूर्वक प्रसवलेली व पसरवलेली, ३६० अंशातून परिपक्व विचार करण्याची भारतीय आध्यात्मिक वैचारिक परंपरा आहे; ती आम्ही पूर्णतः सोडून दिलीयं! “हत्ती आणि चार आंधळे”, या कथेप्रमाणे आपली सर्वांची अवस्था आहे. ज्या वैचारिक वा हितसंबंधांच्या पठडीचा आपण चष्मा लावू…. तसतसे आपल्याला भास आणि आभास होत जातात आणि आपण त्याची बेधडक ‘वैश्विक-सत्य’ म्हणून मांडणी करायला धजावतो. आपल्या आजच्या एकूणच सर्व राजकीय, सामाजिक, शास्त्रीय, अर्थशास्त्रीय वा निसर्ग-पर्यावरण विषयक समस्यांचा खोलवर निःपक्षपातीपणे धांडोळा घेतला; तर, मी जे काही प्रतिपादन करु पहातोयं, त्याचा प्रत्यय आल्याखेरीज रहाणार नाही.

यात दोन प्रकारचे महत्त्वपूर्ण मुद्दे अंतर्भूत आहेत…. पहिला म्हणजे, काही जणांची प्रज्ञा, एकतर मर्यादित असते किंवा त्यांना ती तशी जाणिवपूर्वक राखायची असते (कारण, अवघी व्यवस्थाच अंगावर घ्यायची मानसिक तयारी व हिंमत नसते म्हणून…) आणि दुसरा प्रकार म्हणजे काही जणांच्या अशातऱ्हेच्या ‘वैचारिक-मांडणी’ आड त्यांना ‘बळ’(आर्थिक वा राजकीय वा तत्सम) पुरवणाऱ्यांचे “हितसंबंध” दडलेले असतात!!! सद्गुरु जग्गी वासुदेव, हे दुसऱ्या प्रकारात मोडतात… जो, जास्त गर्हणीय आहे!

सद्गुरु वासुदेव यांच्या “नदी-पुनरुज्जीवन वा स्वच्छता” मोहिमेमागच्या औद्योगिक-प्रायोजकांची भली थोरली यादी पहा, म्हणजे मी काय सांगू पहातोयं….. त्याचा आपसूकच उलगडा व्हायला लागेल. हे, नद्या-पुनरुज्जीवन करु पहाणारे “ईशा फाऊंडेशन”वाले पाताळगंगेसारख्या देशातल्या अनेक ‘गंगा’ प्रदूषित करणाऱ्या ‘अंबानीं’सारख्या उद्योगपतींविरुद्ध ‘ब्र’ काढणार नाहीत. कारण, तेच त्यांचे प्रमुख पुरस्कर्ते आहेत! हे फक्त ‘लक्षणां’वरच इलाज करणार, मूळ रोगाला भिडणार नाहीत. रिलायन्स समूह पुरस्कृत “सत्यमेव जयते” हा गाजलेला टीव्हीवरचा कार्यक्रम, प्रख्यात सिनेनट ‘आमीर खान’ ज्याप्रमाणे, कामगार-कर्मचार्यांच्या संदर्भातील ‘कंत्राटी-पद्धती, शोषण, असुरक्षिता’ सारख्या, देशातल्या तळागाळातल्या करोडो करोडो माणसांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांना साफ टाळूनच कार्यक्रम सादर करत होता, त्यातलाच हा “जग्गी वासुदेव”कृत प्रकार होय!

अजून बरचं पुढे सांगायचयं, पण, वाचतो कोण… हा प्रश्न नेहमीप्रमाणेच आ वासून उभा आहेच. ही ‘मराठी-शोकांतिका’ आहे; म्हणून, अवघ्या विश्वाला वंदनीय व मार्गदर्शक अशी संस्कृती देण्याचं अंगभूत सामर्थ्य असलेली आपली ‘मराठी-संस्कृती’च आज, “विकृती” बनून आपल्याला सामोरी येतेयं…. हा फार मोठं ‘मराठी-दुर्दैव’ होय!

थोडं विषयांतर होणं, यासाठी गरजेचं होतं की, आज ज्या ‘नीति व विचारशून्य’ उच्छृंखल पद्धतीने मराठी-तरुणाईचं काय पण, अगदी मराठी प्रौढसुद्धा समाजात सर्वत्र वावरताना दिसतात…. त्यापाठचं हेच गौडबंगाल आहे… असो!

मुख्य मुद्द्यावर येताना, आपण ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, सद्गुरु वासुदेव म्हणतात तसा सध्यातरी, ‘निकृष्ट दर्जा’च्या ‘लोकसंख्ये’चा विस्फोट असा काही खास वेगळा प्रकार फारसा अस्तित्वात नाहीच…. सगळाच समाज उभाआडवा किडलायं, सडलायं! मुळात लोकसंख्येचा वेडावाकडा विस्फोट, हीच मूळ समस्या आहे. अर्थात, आजच्या उल्का महाजन, मेधा पाटकर असोत वा अॅड. गिरीश राऊत असोत किंवा सदैव ‘बुद्धीजीवी-दगडफेक’ करणारे ‘फातर्पेकरां’च्या राजेंद्रासारखे पर्यावरणवादी असोत…. त्यांच्या ‘निसर्ग-पर्यावरण संरक्षण व संवर्धना’च्या कार्यक्रम-पत्रिकेत, राजकीय व धार्मिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून गणल्या गेलेल्या ‘लोकसंख्येचा विस्फोट’, या  अत्यंत महत्त्वाच्या विषयाला मात्र अजिबात स्थानच नसतं, ही केवढी विपर्यस्त बाब आहे! यांची ‘निसर्ग-पर्यावरण संरक्षण व संवर्धना’ची गाडी “जल, जंगल, जमीन…” या तीन ‘ज’च्या पुढे सरकतच नाही. आपण, ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन पाच ‘ज’ चा(जनसंख्या व जीवनशैली रोखणं, हे ते पुढचे दोन ‘ज’) जो, उच्चार करत रहातो…. तो, या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, ते तुमच्या ध्यानात यावं!

असली ‘निकृष्ट दर्जा’ची माणसं केवळ तळागाळातचं आहेत आणि वरच्या धनदांडग्या वर्गात नाहीत वा उच्चमध्यमवर्गात नाहीत (जे, या सद्गुरु वासुदेवांचे अनुयायी आहेत)…. अशी कृपया गैरसमजूत करुन घेऊ नका. जे जे म्हणून, निसर्ग-पर्यावरणाला ‘अंति घातक’ त्याप्रत्येक पदार्थाप्रति, ज्याप्रमाणे RDX किंवा LPG वगैरे विस्फोटके हाताळताना काळजी घेतली जावी, तशी घेतली गेली पाहिजे… हे उघडचं आहे. पण, ही मनुष्यजात-जमात, ना कधि एवढी सुजाण, जबाबदार होती, ना कदाचित कधि राहील… म्हणूनच, आपल्या ऋषिमुनींनी, बुद्ध-महावीर-नानकादि संतांनी अशा ‘बाह्य’ गोष्टींकडून समाजाला ‘आत’ वळवण्याचं भगीरथ कार्य प्रमुख जिवितकार्य मानलं… हे ‘आतलं’ वैचारिक वा आध्यात्मिक वळणं, किती महत्त्वाचं होतं, ते आजची समाजाची केविलवाणी व अंति आत्मघातकी स्थिती पाहून समजतं. “बहिर्मुख समाज, अंतर्मुख होणं”,  किती गरजेचं आहे, हे आपल्या ऋषिमुनींनी-संतांनी पुरतं ओळखलं होतं.  म्हणून, “ठेविले अनंते, तैसेचि रहावे”, ही मराठी-संस्कृतीची व पर्यायाने पौर्वात्य-संस्कृतीची खूणगाठ बनली!

सरतेशेवटी, ज्या ‘आनंदा’च्या शोधासाठी अवघी मनुष्यजात अहोरात्र वणवण करत असते, तो ‘आनंद’ आतून येतो… आत दडलेला असतो. ‘आनंद’ आत जाऊन शोधणं अवघड असलं, तरी तो ‘बाहेर’ सापडणं, केवळ सर्वथैव अशक्य आहे. म्हणूनच, ऋषिमुनींनी योग-प्राणायाम-ध्यान-धारणा ही, आपली भारतीय-जीवनशैलीच बनवून टाकली होती… आता, ती पश्चिमेकडून परत आल्यावरच कदाचित आपण अंगिकारु!

एकदा का तुम्ही हे सद्गुरु म्हणतात त्याप्रमाणे, शास्त्रीय शोध लावून ‘प्लास्टिक’सारख्या असंख्य ‘चमत्कारी’ गोष्टींचा “पँडोराचा पेटारा” उघडलात की, लक्षात ठेवा की ही विषवल्ली फक्त फैलावतच जाणार…. तिला थांबणं कधिच माहित नसणार… ठिणगीचा वणवा, हा होणारच आणि त्यावर मर्यादांचं कुंपणं घालणं, जवळपास अशक्यप्रायच! प्लास्टिक म्हणजे, समुद्राच्या पोटातून पेट्रोलियम पदार्थांचं उत्खननं आलचं… मग, त्याच्या मागे आणि पुढे, एक औद्योगिक-संरचनांची एक अंति घातकी अर्थशास्त्रीय-साखळीचं अनिवार्यपणे उभी रहाते! “माणूस आणि पदार्थ यांनी जागा बदलली की, ते उत्पात घडवतात!!”

याचाच अर्थ हा की, जोवर अवघी मनुष्यजात सुजाण आणि जबाबदार होत नाही; तोवर, असे शास्त्रीय शोध, ही पुढेमागे फार मोठी शोकांतिका ठरणार, हे उघडचं आहे. तेच, तर आता ‘पर्यावरणीय महासंकटां’मुळे सिद्ध होत चाललयं.

वरील त्रोटक विवेचनावरुन अंमळ ध्यानात यावं की, इतर आनुषंगिक ‘निसर्ग-पर्यावरण संरक्षण व संवर्धना’च्या धोरणांसोबतच…. काही अत्यावश्यक ‘अपवाद’ वगळता, “प्लास्टिक, कृत्रिम रंग व साबण-डिटर्जंट” यांच्या वापरावर तातडीने युध्दपातळीवर बंदी आणली गेली पाहिजे. तरच, “शहरातील वाया जाणाऱ्या व समुद्रात जाऊन समुद्री-जीवसृष्टीला (पर्यायाने अवघ्या सजीवसृष्टीला) हानिकारक ठरणाऱ्या सांडपाण्याचा, ग्रामीण भागात थेट शेतीसाठी वापर करणं”, शक्य होईल… मग, शेतीसाठी तुमच्या मोठ्या धरणांची, नद्याजोड-प्रकल्पांचीही आवश्यकता संपुष्टात येईल! हो, शिवाय भलेथोरले डोंगर, दगडखाणींसाठी सपाट करणंही थांबवा (यासंदर्भात, “पूर्वी डोंगर जमिनीचे आधार भले, पण सुरंग लागल्यापासून लाचार झाले”, ही माझी १९९५ सालची छोटेखानी ‘चारोळी’ आठवा)…. त्यांच्या माथ्यावर शिवकालीन जसे तलाव होते तसे उभारा (म्हणजे, ‘ऊर्जेच्या वापराविना’ पावसाचं मुबलक पाणी विविध वापरासाठी उपलब्ध होईल) वा पवनचक्क्या उभ्या करा…..

करण्यासारखं खूप काही आहे… पण, त्यासाठी औद्योगिक, व्यापारी व राजकीय हितसंबंध; तसेच, ‘चंगळवादी जीवनशैली’ आणि ‘लोकसंख्येच्या विस्फोटा’चा मुद्दा मांजरीसारखा आडवा येत रहातो, त्यावर काय इलाज??? … आणि लोकं अजूनही आपल्या हाती ‘राजकीय-ताकद’ द्यायला तयार नाहीत… “कालाय तस्मै नमः”!!!

धन्यवाद…

….राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)