“आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”!

आॅगस्ट १, “पृथ्वी सीमोल्लंघन दिन” (August 1, Earth Overshoot Day…. the world is living on borrowed time) पृथ्वीवरील मानवजात, “आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”!

एखाद्या वर्षाच्या ज्यादिवशी, निसर्गाच्या वार्षिक पुनर्निर्माण क्षमतेपेक्षाही अधिक प्रमाणात, मानवजात नैसर्गिक संसाधनांचा (पाणी, लाकूड, अन्न, कार्बन इ.) अधिकचा वापर करु लागते…. तो दिवस, “पृथ्वी सीमोल्लंघन वा मर्यादोल्लंघन दिन” म्हणून ओळखला जातो! यंदा, तो चक्क दोन दिवस पुढे ढकलला जाऊन ऑगस्ट १, अशी प्रथमच धक्कादायक विक्रमी नोंद झालीय.

३० वर्षांपूर्वी हा दिवस १५ ऑक्टोबरला येत होता… २० वर्षांपूर्वी तो ३० सप्टेंबरला नोंदला गेला; तर, १० वर्षांपूर्वी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजेच, १५ ऑगस्टला येऊन तो धडकला होता. कदाचित, हा दिवस पुढील वर्षी जुलै महिन्यात नोंदला जाण्याची दुःश्चिन्हं आत्ताच दिसू लागलीयतं. हे आपल्या डोईवरचं ‘जैविक-कर्ज’ (ecological debt) आहे…. जसं जसं ते वाढत जाईल, तसं तसं एखाद्या जुगाऱ्यासारखं कर्जबाजारी होऊन, आपण त्या जैविक वा कार्बन कर्जाच्या डोंगराखाली दडपले जाऊन नष्ट होण्याचा धोका वाढत जाईल!!!

आपल्या जगभरातल्या तमाम प्रचलित ‘अर्थव्यवस्था’ व त्यावर आधारलेल्या ‘जीवनशैली’, ब्रह्मांडातील एकमेवाद्वितीय अशा, पृथ्वी नांवाच्या आपल्या ‘सजीव ग्रहा’शी जणू बेभान होऊन ‘द्यूत’ खेळत आहेत !!! भविष्यातल्या पिढ्यांच्या हक्काची सगळी नैसर्गिक संसाधनं, आपण आत्ताच ओरबाडून नाहीशी करत चाललोयत. ‘द्यूत’ वा ‘जुगार’ खेळातला थरार, सुरुवातीला आनंद देऊन जातो…. पण, जसजसा काळ पुढे सरकतो, तशी महाभारतातल्या पांडवांसारखी, सर्वस्व गमावून बसण्याची वेळ कधि येते, ते कळत देखील नाही… ती येणारी वेळ, सगळा सर्वनाश झाल्याखेरीज समजत देखील नाही आणि सर्वनाश झाल्यानंतर समजून-उमजूनही काहीही उपाय शिल्लक रहात नाही. आपणही हे असचं जे द्यूत, पृथ्वीसोबत खेळतोयं… त्यामुळे, पुढील काही दशकातच अंधःकारमय भविष्याचं ताट, मनुष्यजातीच्या पुढ्यात नियतीकडून वाढलं जाणार आहे! पृथ्वीग्रहाच्या आजवरच्या साडेचार अब्ज वर्षांच्या आयुष्याची, मानवी आयुष्याशी तुलना केली तर, ‘एका मिलीसेकंदा’पेक्षाही कितीतरी कमी कालावधिच्या ‘औद्योगिक-क्रांति’नं ही वेळ, अवघ्या मानवजातीवर आणलीय.

परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक व भयावह होत असताना, अजूनही काही थोडा काळ आपल्या हाती शिल्लक राह्यलाय…. तो थोडाथोडका काळही आपण असचं बेजबाबदारपणे वागून गमावला; तर मात्र, या संभाव्य सर्वनाशातून सुटका होणं, सर्वथैव अशक्य आहे… कदाचित तेव्हा, परतीच्या प्रवासाचे दोर कायमचे कापले गेलेले असतील.

जगभरातल्या बेफामपणे वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे व चंगळवादी जीवनशैलीला अनुसरुन असलेल्या उत्पादने-वस्तू-सेवा यांच्या एकत्रित बेबंद वापरामुळे, पृथ्वीच्या संसाधनं निर्मितीच्या अंगभूत मर्यादेचं उल्लंघन १९७० सालीच सुरु झालय. तेथूनच पुढे या आपल्या ग्रहाच्या संसाधनांचं आणि कार्बन-धारणाशक्तिचं वार्षिक-अंदाजपत्रक, धोकादायकरित्या एकेक दिवस पुढे ढकललं जातय.

काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अजूनही काही करता येण्यासारखं आपल्या हाती आहे…. त्यासाठी, व्यक्तिगत केल्या जाणाऱ्या कृतिंपेक्षाही थेट ‘राजकीय निर्णय-प्रक्रिया’ यासंदर्भात फार महत्त्वाची ठरु शकते. पृथ्वीवरील मांसाहारी ५०% जनता जरी शाकाहारी बनली तरी, हा दिन पाच दिवस मागे खेचला जाईल. पृथ्वीवरील ‘कार्बन-ऊत्सर्जन’ जर ५०% कमी केलं तर, तीन महिन्यांची अधिकची सवड (breathing space) मनुष्यजातीला मिळू शकेल. त्यासाठी, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ जोसेफ स्टिग्लिट्झ आणि पूर्वीचे जागतिक बँकेचे प्रमुख निकोलस स्टर्न यांनी ‘दर मेट्रिक टन’ कार्बन ऊत्सर्जनाला १०० डाॅलर्स प्रति मेट्रिक टन, एवढा मोठा “कार्बन टॅक्स” लावला जायला हवा, अशी जोरदार मागणी केलीय (धर्मराज्य पक्ष प्रथमपासूनच, कार्बन-ऊत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी म्हणून… तेल, वायू, पेट्रोल, डिझेल इ. जीवाश्म इंधनांवर भरभक्कम ‘कार्बन-टॅक्स’ लावावा, ही मागणी रेटतोय).

वर्ष २००७-०८ मधल्या जागतिक अर्थसंकटामुळे, सकारात्मक परिणाम घडून तो दिवस ५ दिवसांनी मागे ढकलला गेला होता. १९८०, १९९०च्या दशकातल्या अर्थव्यवस्थेतल्या महामंदीने आणि १९७०मधल्या जागतिक तेल महासंकटानेही असाच तत्कालिन परिणाम साधला होता.

मानवजमात, या पृथ्वीतलावरील सर्व उपलब्ध संसाधनं बकासुरासारखी संपवत चाललीय…. एका अभ्यासगटाच्या म्हणण्याप्रमाणे संपूर्ण वर्षभरातल्या ३६५ दिवसांमध्ये उपयोगात आणावयाचा कार्बन, अन्नपदार्थ, पाणी, लाकूड इ. जीवनावश्यक बाबी, आपण अवघ्या २१२ दिवसातच वापरुन संपवून टाकल्यात.

‘ग्लोबल कार्बन फूटप्रिंट’ या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या म्हणण्यानुसार आपली लोकसंख्या आणि जीवनशैली अशीच पतंगासारखी वरवर जात राहिली तर, मानवजातीच्या अस्तित्वाचा कटिपतंगहोऊ नये, म्हणून किमान एका पृथ्वीऐवजी १.७ म्हणजे जवळपास दोन पृथ्वीसारख्याच ग्रहांची गरज भासेल…. सध्यातरी पृथ्वीसारखा सजीवसृष्टी धारणक्षम ग्रह, हा एकमेवाद्वितीय ग्रह म्हणून अखिल ब्रह्मांडात आपल्याला ज्ञात आहे.

प्रख्यात लेखक-शास्त्रज्ञ कार्ल सॅगान एकदा वैफल्यग्रस्त होऊन म्हणाले होते, आपण पृथ्वीवर नैसर्गिक संसाधनांच्या प्राप्तीसाठी जे खाणकाम करीत आहोत, ते खाणकामनसून आपल्याच कबरीखणण्याचं खोदकामआहे…. आपण अखिल ब्रह्मांडात, एका फिकट निळ्या बिंदूसारख्या असणाऱ्या (पृथ्वीग्रह) आपल्याच राहत्या घरचा विध्वंस करत सुटलो आहोत!”

परिणामतः, जगभरात सर्वत्र नैसर्गिक आपत्तींनी हाहाःकार उडवून दिला आहे… ग्रीसची राजधानी अथेन्सजवळ माटी नावाच्या गावाभोवतालच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीत हे संपूर्ण गाव बेचिराख होऊन ६० जण आगीत होरपळून मृत्युमुखी पडले… अथेन्सचा संपूर्ण आसमंतच जणू धुराने वेढलेला आहे व त्या भडकलेल्या वडवानलांपैकी जेमतेम ५% आगींवरच नियंत्रण मिळवणं आतापर्यंत शक्य झालय. केवळ, ग्रीसमध्येच नव्हे; तर, युरोपातील अन्य देशांमध्येही तापमानवाढीमुळे जंगलांमध्ये नैसर्गिकरीत्या भीषण वणवे लागलेले आहेत. लाटिव्हिया, स्वीडन, फिनलँड, नाॅर्वे या देशांमध्येही वडवानल पेटला असून स्वीडनमध्ये तर पॅरिसच्या दुप्पट आकारमानाचं जंगल भस्मसात झालेलं आहे. अमेरिकेच्या ‘नॅशनल ओशियॅनिक अॅण्ड अॅटमाॅसफेरिक अॅडमिनीस्ट्रेशन’ने ११८ ठिकाणी, आजवरच्या ‘कमाल तापमाना’ची नोंद जाहीर केलेली आहे. उत्तर अमेरिकेत टेक्सास, कॅलिफोर्नियात विक्रमी तपमानाची नोंद करण्यात आलीय, ज्यामुळे जंगली प्राण्यांच्या अधिवासात वणवे आपसूक भडकू लागले आहेत…. कॅलिफोर्नियाच्या जंगलात शंभराच्या आसपास भीषण वणवे लागले असून, एक लाख एकरांचं जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडलयं!

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघानं, कसोटी मालिकेपूर्वीचा ससेक्स विरुद्धचा महत्त्वाचा सराव सामना, तेथील उष्णतेच्या लाटेपुढे हतबल होत, एक दिवस अगोदरच गुंडाळला!

संपूर्ण युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका व आॅस्ट्रेलिया खंडात हवामानाचा प्रचंड असमतोल निर्माण झालाय. नुकताच जपानला महाप्रचंड पुराचा सामना करावा लागला होता. या महापुरात २०० हून अधिक बळी गेले तर, १५ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवावं लागलं. हे होतय ना होतय… तोच, पाठोपाठ ज्या जपानने जगाला ‘कार्बन-प्रदूषणकारी’ मोटरगाड्या विकल्या त्या जपानमध्ये प्रखर उष्णतेची लाट कोसळली आणि ४०°हून अधिक पारा चढलेल्या उष्माघाताने ६० हून अधिक बळी घेतले तर, २१ हजार जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आग्नेय आशियाई देश व्हिएतनाम, लाओसमध्येही अतिवृष्टीने थैमान घातले आहे. लाओसच्या अटापियू प्रांतात ‘शी पेन’ नदीवर निर्माणाधीन असलेल्या जलविद्युत प्रकल्पातील धरणाला मोठे भगदाड पडून आजूबाजूच्या परिसरात अचानक भयानक पूरसदृश्य स्थिती उद्भवून शेकडो नागरिकांना प्राण गमवावे लागले…. तर, व्हिएतनामच्या ‘येन बाय’ प्रांतातही ढगफुटीसह  मुसळधार पाऊस कोसळून जागोजागी दरडी कोसळल्या आणि या जलप्रलयात २७ जण मृत्युमुखी पडले.

जगात दादागिरी गाजवणारी अमेरिकेसारखी महासत्ता, वारंवार कोसळणाऱ्या नैसर्गिक आपत्तींनी आतून पूर्णतः हादरलेली आहे. पॅरिस COP-21 परिषदेबाबत डोनाल्ड ट्रंप कितीही ‘ट्विटबाजी’ करत ‘टिवटिव’ करोत… पण, ज्या उद्योगजगताचे ते प्रतिनिधित्व करतात, त्याच्या ‘औद्योगिक क्रांति’चीच ही विध्वंसक फळं होतं, हे निखालस सत्य त्यांनी कितीही नाकारलं तरी, त्यानं निसर्गाला काडीचाही फरक थोडाचं पडणार आहे?

…..निसर्ग-पर्यावरणविरोधी मानवी व्यवहारांमुळे आणि निसर्गातील अक्षम्य मानवी हस्तक्षेपामुळे, ‘पंचमहाभूते’ खवळून उठलीयतं. मानवासह अवघ्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचीच ‘उलटी गणती’ (final count-down) सुरु झालीय…. हाच, या आॅगस्ट १, “पृथ्वी सीमोल्लंघन दिना”चा भयकारी, पण वास्तव संदेश आहे…. तेव्हा मानवा, सावध होऊन ऐक काळाच्या हाका, अन्यथा येत्या दशकभरातच गुदरेल वाढत्या तापमानाचा प्रसंग बाका !!!

….राजन राजे (अध्यक्षः धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही हरित पक्ष)