या मध्यमवर्गीय, “ब्लॅक फ्रायडे नव्हे…. ड्राय डे” मानसिकतेचं काय करायचं???

देविका, शक्य झाल्यास तू आम्हाला माफ कर…..

२६ नोव्हेंबर, २००८… स्थळ: मुंबई, छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस (CST) रेल्वे स्टेशन… पुण्यातील मोठ्या भावाला भेटायला बापासोबत स्टेशनवर, त्यावेळी असणाऱ्या देविकाच्या कानात ट्रेन्सच्या चिरपरिचित धडाडण्याच्या आवाजासोबत, अचानक डांग्या फटाक्यांची माळ भर स्टेशनात कुणी लावल्याचा ध्वनी घुमला… क्षणभर दचकून तिनं वडिलांचा हात घट्ट धरला, तोच तिच्या पित्यानं तिला “देविका पळ” म्हणतं, धावायला सांगितलं… हातात कार्बाईन घेतलेला  कुणी एक तरुण, आपल्याच रोखाने गोळीबार करतोय, याचं त्याचवेळी अवधान आल्यानं, सावध झालेली देविका धावण्याचा प्रयत्न करता करता कोसळली… एक मस्तक भणाणणारी वेदना आत्ता कुठे तिला जाणवली, तोवर गरम रक्ताचा लाल रसरशीत ओघळ पायावरुन खाली वाहता झाला…. तो हातात बंदूक घेतलेला “कर्दनकाळ”, तिच्या नजरेनं नीट टिपला आणि मग, तिची शुद्ध हरपली.

….त्याचं नांव ‘अजमल कसाब’ आणि तुकाराम ओंबळेंसह शेकडो जणांचा बळी घेणारा, तो एक पाकिस्तानी अतिरेकी होता, हे तिला इस्पितळातल्या बिछान्यावर शुद्धीत आल्यावरच कळणार होतं !!!

मरता मरता ‘देविका’ वाचली… पण, तिच्या दुर्दैवाचे फेरे काही थांबले नाहीत! कसाबला फासावर लटकवण्यासाठी “आँखो देखा” हाल सांगणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हवा होता आणि देविकानं तर त्या क्रूरकर्म्याला, डोळ्यावर पूर्ण अंधारी येण्यापूर्वी नीट डोळ्यात साठवून ठेवला होता. देविकानं आपल्या कुटुंबियांच्या मदतीनं एक मोठा धाडसी निर्णय घेतला आणि सरकारी वकिलांना ‘होकार’ कळवला. भर न्यायालयात, त्या थंड डोक्याच्या सैतानाच्या नजरेला नजर भिडवत देविकानं साक्ष दिली, परिणामतः कसाबला फाशी झाली… पण त्यानंतर, पळभर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या देविकाच्या पाठीशी दुर्दैवं, जणू हात धुवून पाठी लागलं!

स्वतःला सभ्य-सुसंस्कृत म्हणवणारा, देवळं आणि तथाकथित सद्गुरुंचे उंबरठे झिजवणारा, निरंतर पूजाअर्चा-जपजाप्य करणारा…. सभोवतालचा जात्यंध स्वार्थी, संवेदनाशून्य, भेकड व आपमतलबी ‘मध्यमवर्ग’, देविकाच्या धाडसाचं कौतुक करत, तिच्या पाठीशी ठामपणे उभं रहाण्याऐवजी, जणू सूड उगवल्यागत तिला छळू लागला, तिला भितीपोटी टाळू लागला!!!

पायात गोळी लागल्याच्या गंभीर जखमेतून बरी झाल्यावर इस्पितळातून काही महिन्यांनी ती घरी परतली… शाळेत यथावकाश गेली. तोच, शाळेतल्या मैत्रिणी तिला “कसाब की बेटी” काय नी काय काय, असं वेडंवाकडं चिडवतं हेटाळणी करु लागल्या. शिक्षिक-शिक्षिकांनाही ती एक ब्याद वाटू लागली… न जाणो, तिच्यावरचा अतिरेकी संघटनेचा रोष-खुन्नस, तिच्या सान्निध्यामुळे आपल्या वाट्याला यायचा…. या दिवाभित्यांपाठी, जणूकाही एका अनामिक भितीचा ब्रह्मराक्षसच लागला होता.

या मूळासकट हादरवून टाकणाऱ्या रोजच्या अनुभवापुढे, तिला ती मूळची शाळा सोडणं, हा एकच पर्याय उरला होता. शेजारीपाजारीही एव्हाना, तिला आणि तिच्या कुटुंबियांना टाळायला लागले होते… जणू, त्या संपूर्ण ‘रोटावन’ त्रिकोणी कुटुंबाला (आई अगोदरच वारल्यामुळे व मोठा भाऊ पुण्याला रहात असल्याने; फक्त देविका, देविकेचे वडील ‘नटवरलाल रोटावन’ व धाकटा भाऊ जयेश असे तिघेच) परिसरातून वाळीत टाकण्यात आलं होतं. दुसऱ्या शाळेतही तोच प्रकार… एवढचं नव्हे; तर देविका आपल्या शाळेत नकोच म्हणून, “तिचं इंग्लिश कच्चं आहे”, वगैरे लंगड्या सबबी सांगत इतर शाळांमध्येही तिचा प्रवेश रोखण्याचं किळसवाणं ‘राजकारण’ खेळलं गेलं (बऱ्याचदा, व्यवहारात असा दाहक अनुभव येत असतो की, “उघड राजकारणी नसलेलीच अराजकीय मंडळी, जास्त खतरनाक ‘राजकारण’ खेळत असतात)… एवढं अघटित घडूनही, कुणाला काही खंत वाटण्याचा प्रश्नच उरला नव्हता… सोशलमिडीयातून रोजचे सहस्त्रावधि ‘सुविचारां’चे संदेश पाठवणाऱ्या, प्रबोधनपर संदेशांवर तत्काळ ‘अंगठे’ उमटवणाऱ्या

या ‘प्रवृत्ती’लाच, तथाकथित पापभीरु-सुसंस्कृत(?) मध्यमवर्गीय मानसिकता म्हणायची का??? इकडे ‘रोटावन’ कुटुंबियांचा छळ सुरुच आणि तिकडे, जो तो, “मला काय त्याचं” वा “प्ले सेफ्” असलं माणुसकीशून्य घृणास्पद मध्यमवर्गीय धोरणं पोंबाळत, आपापल्या घरात सुखासुरक्षिततेत! वर पुन्हा, पाकिस्तानवर आणि पाकिस्तानी अतिरेक्यांवर सोशलमिडीयातून ‘रेकायला’ आणि हाॅटेलातल्या मेजवान्यांमध्ये, घरच्या रंगलेल्या मित्रमंडळींच्या पार्ट्यांमध्ये राजकारण्यांवर शिव्याशाप ‘फेकायला’, अनाहूत गांडू सल्ले द्यायला, हे मोकळेच…. ते तर काही सांगायला नकोच! त्याचा तर, रतीबच ते इमानेइतबारे रोजचे घालत रहाणार, नाही का? ‘ड्राय-डे’ असला की कासावीस होणाऱ्या, या मध्यमवर्गीय गांडूंच्या अवलादीला कोण सांगणार की, “हाती गांडीव धनुष्य धरलेला अर्जुन” आपसूक जन्माला येत नसतो… “शिवाजी, शेजारच्या घरात जन्मत नसतो”…. ‘अर्जुन’ काय किंवा ‘शिवाजी’ काय, स्वतःच्याच घरात जन्मावा अशी ‘कांक्षा’ जेव्हा, संपूर्ण समाज मनोमन जाज्वल्यरित्या धरतो व तसा व्यवहारात वागतो; तेव्हा कुठे समाजमानसात, समाजाच्या ‘गूणसूत्रां’मध्ये (‘DNA’ मध्ये) क्रांतिकारी घुसळणं होत… एखाद्या घरात, एखाद्या युगात हे ‘युगपुरुष’ जन्माला येतात!!! नाहीतर, हे मध्यमवर्गीय टगे बसलेत… मठांमध्ये, देवळांमध्ये, बैठकांमध्ये नाहीतर, तथाकथित सत्संगांमध्ये…. कधि ‘अवतार’ या पृथ्वीवर जन्माला येतोय आणि कधि ही पृथ्वी सुजलाम् सुफलाम् आणि सुखीसुरक्षितनाम् माझ्यासाठी तो करतोय याची वाट पहात!

श्रीकृष्णाचा गीतेतला संदेश थेट आणि टोकदार आहे, “अर्जुना, ऊठ… तुझं युद्ध तूच लढायचं, मी नव्हे… “परित्राणाय साधुनाम् विनाशायच् दुष्कृताम्” ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, केवळ इतरेजनांची नव्हे…. तेव्हाच, कुठे तू न्यायाच्या प्रस्थापनेची अपेक्षा बाळग (तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः II)!”

‘देविका-कथानक’ इथेच थांबवून चालणार नाही…. पुढचं व्यवस्थेविरोधातलं (ज्या व्यवस्थेचा, एक भाग स्वतः सरकारी वकील “उज्ज्वल निकम” देखील आहेत) ‘न्यायकठोर’ निवेदन पण, या इथेच मांडलं पाहीजे. उज्ज्वल निकमांनी ‘देविका नटवरलाल रोटावन’ या युवतीला व तिच्या बापाला एवढी धोकादायक साक्ष देण्यासाठी तयार करण्याचं जे कौशल्य दाखवलं, ते वादातीत आहेच. पण, ते तिथेच थांबले. अशी ‘करियरीस्ट’ माणसं अशीच थबकतात, आपला कार्यभाग उरकल्यावर! सदरहू अजमल कसाब खटल्यात प्रचंड नांवलौकिक मिळवते झालेल्या (ज्यांची, सरकारी खटल्यातील एका दिवसाची फी आकारणीच रु. ५०,०००/- असते) उज्ज्वल निकमांनी मागे वळून पाहीलं देखील नाही की, आपल्या मनधरणीमुळे कसाबविरोधात साक्ष देण्याचं धार्ष्ट्य दाखविणाऱ्या ‘देविका’ला आणि तिच्या कुटुंबियांना दुर्दैवाचे काय दशावतार भोगायला लागलेत ते!!

आजही, ते ‘देविका रोटावन’ कुटुंब आपल्या अवघड आर्थिक-सामाजिक परिस्थितीशी झुंजतयं… कधिही न मिळालेल्या; पण, प्रसिद्धी माध्यमांतून जाहीर झालेल्या सरकारी मदतीविनाच, ते सगळे कुटुंबिय एकत्र राहून  झुंजताहेत, हे विलक्षण कौतुकास्पद आहे. नुसतं खुट्ट झालं (प्रेमात, शिक्षणात, व्यवसायात वगैरे अपयश आलं वा केल्या कर्माची फळं भोगण्याचं प्राक्तन ‘दत्त’ म्हणतं समोर उभं ठाकलं किंवा वैयक्तिक अहंभाव जराही दुखावला गेला) की, दारु-ड्रग्जच्या विळख्यात अलगद अडकणारे किंवा ऊठसूठ आत्महत्येचा मार्ग धरणारे नीतिशून्य कणाहीन पराभूत सर्वत्र पाहिले की, देविका आणि देविकेच्या कुटुंबियांचं ‘कौतुक विशेष’ मनी दाटून आल्याविना रहात नाही.

धर्मराज्य पक्षा’चा अध्यक्ष, या नात्याने मी हे जाहीर करतो की, जर सरकारी प्रशासनाने आणि स्वतःच्या नावलौकिकाच्या धुंदीत वावरणाऱ्या अॅड. उज्ज्वल निकमांनी…. यापुढे ‘रोटावन’ कुटुंबियांची अशीच अन्याय्य हेळसांड केली तर, माझा ‘धर्मराज्य पक्ष’, आमच्याकडे संसाधनांची कमतरता असतानाही, तिच्या शिक्षणाचा पुढील खर्च उचलण्याला जराही कचरणार नाही… नव्हे, ते आम्हा सर्व धर्मराज्य पक्षीय सभासदांचं ‘धर्मकर्तव्य’च आम्ही प्रसंगी मानतो… देविका, तू जिथे असशील तिथे, अशीच ताठकण्याने उभी रहा. समाजातल्या अपप्रवृत्तींविरुद्ध झुंजण्यासाठी तुला पोलिस-प्रशासनात IPS अधिकारी म्हणून भरती व्हायचय ना? तेव्हा, तू कसलीही चिंता न करता, एकाग्रचित्ताने मेहनत करायला लाग…. ‘धर्मराज्य पक्ष’ सदैव तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे !!!”

धन्यवाद….

|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||

आपला नम्र,

राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष… “शेतकरी-शेतमजूर-कामगारकारण  आणि पर्यावरण”, यालाच राजकारणाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानणारा, एक ‘अंतिम-सत्यवादी’ पक्ष!!!)