ठाणे शहर हे तलावांचे शहर नसून भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे शहर आहे !!! ठाणे शहर हे…. ‘सुसंस्कृतां’चे, ‘सारस्वतां’चे की, ‘रासवटां’चे ???

विक्रांत कर्णिक, प्रदीप पाटील, मिलिंद कुवळेकर, प्रशांत महाडिकसारखी माणसं… अशी कोण लागून गेलीयत? सामान्य फाटके कार्यकर्ते असूनही व्यवस्थेच्या छातीत ते कशी काय धडकी भरवू शकतात??…. मित्रहो, त्याचं एकमेव, एकमात्र कारण एवढचं की, “ते या शहराचेच नव्हे; तर, संपूर्ण समाजाच्या “सद्सद्विवेकबुद्धीचे रक्षक” किंवा “काॅन्शस-कीपर्स (Conscience-Keepers) आहेत… आणि, आपल्या वकूबानुसार ही भूमिका बजावताना ते जीवावर उदार होत, ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे’तल्या कुठल्याही राक्षसीशक्तिंना भीक घालत नाहीत, हेच होय!!!

याच संदर्भात, प्रथम, दरम्यानच्या काळात विक्रांत कर्णिकांनी प्रसारित केलेला संदेश, आपण जरा नजरेखालून घालण्याची तसदी घेऊया…….

“समाजात निर्भयपणे काम करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांनो, आपण काम करत असताना माझा घातपाती मृत्यू झाला; तरी, तुम्ही तुमचं काम निर्भयपणे करत रहा. जीवनाच्या प्रवासात आपापल्या स्टेशनला सर्वांनाच उतरावं लागतं….कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही त्यामुळे, कोणी सहकारी, मधेच महफिल सोडून निघून गेला; तर, जास्त शोक करत न बसता, त्या सहकाऱ्याचं काम दुप्पट वेगानं पुढे न्यायची जबाबदारी…. ही त्याच्या सर्व सहकाऱ्यांची असते आणि या सर्व प्रसंगातून वाचलोच तर, “बचेंगे तो, आैर भी लडेंगे!!!”….. इति विक्रांत कर्णिक

कुठल्याही समाजातल्या, शहरातल्या ‘अल्बर्ट पिंटो’ला “गुस्सा” येणं बंद झालं किंवा “मारुती कांबळेचं काय झालं”, असा प्रश्नच विचारणं ‘बंद’ झालं… तर, तो समाज वा शहर ‘बेबंद’ होईल!

प्रश्न, विक्रांत कर्णिकांच्या वा मिलिंद कुवळेकरसारख्यांच्या उपोषणाचा नाही… प्रश्न, या प्रकरणांतून व्यवस्थेकरवी (Vampire-State System) समाजाला दिल्या जाणाऱ्या, हाडं गारठवून टाकणाऱ्या भयसूचक ‘संदेशां’चा मुकाबला करण्याचा आहे…. आणि म्हणूनच, आज ठामपणे सांगतो की, “धर्मराज्य पक्षा”तर्फे आम्ही त्या दहशतवादी ‘संदेशां’चा मुकाबला समर्थपणे करणारच… शिवछत्रपतींना स्मरुन, ही रक्तपिपासू-शोषक व्यवस्था, भविष्यात आम्ही उलथवून टाकणारच… बघूया, कोण आमची वाट अडवतं ते !!!

मित्रहो, ठाण्याची झपाट्याने ‘मुंबई’हूनही वाईट अवस्था व्हायला लागलीयं…. केवळ, वाहनांचीच नव्हे; तर, शहरात अतोनात माणसांची गर्दी वाढत चाललीयं आणि या गर्दीला कुठलाही आकारऊकार नाही की, कुठला चेहरा नाही. अवघ्या भारतातून माणसं, या शहरात ओतली जातातयं आणि त्यासाठी हे शहर आणि शहरातील मूळ मराठी नागरिक वेठीला धरला जातोयं. शहरात कोलाहल प्रचंड वाढलायं; पण, नैसर्गिक सौंदर्य व आनंद लुप्त झालायं! बिल्डर-राजकारण्यांनी या ठाण्याच्या भूमिचा इंच न् इंच विकून खाल्लायं आणि त्यातूनच, ठाणे शहर आपला मराठमोळा चेहरामोहरा कायमचा हरवून बसलयं! आता, या मायावी नगरीचे प्रशासकच, फक्त  बाहेरचे नसतात; तर, शहरातील उच्चभ्रू वस्त्यातील सगळीचं मंडळी बाहेरुन भरणा होतायतं…. वेगवेगळ्या उपग्रहांवर राह्यल्यासारखी ही मंडळी, या शहरात रहातात. त्यांना प्रशासक काय करतात किंवा  राजकारणी काय धंदे करतात, याच्याशी जसं फारसं देणंघेणं नसतं…. तसचं, कुणी ‘विक्रांत कर्णिक’सारखी हाताच्या बोटावर मोजणारी मंडळी, आपला जीव पणाला लावून, तळहातावर शिर घेऊन या शहराचे ‘काॅन्शस-कीपर्स’ म्हणून वावरत असतात, याच्याशी तर त्यांना अगदी बिलकूलच देणंघेणं नसतं. स्वांतसुखाय व आत्मकेंद्रित स्वरुपाची त्यांची ‘चंगळप्रधान’ जीवनशैली, जोपर्यंत बिनबोभाट चालू रहाते…. तोपर्यंत, “कुणी मेलं कुणासाठी, रक्त ओकून”, याच्याशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो! विक्रांत कर्णिक ‘हेकट’ आहे, असं फारतर इथले डांबरट राजकारणी म्हणतील, पण ‘विक्रांत कर्णिक’ त्यांच्यासारखा ‘हलकट’ आहे,… असं त्यांच्यावर गुंड घालून त्यांचा खूनाचा प्रयत्न करु पहाणारे लोकप्रतिनिधीसुद्धा कधि म्हणू धजावणार नाहीत!

या शहरातली मध्यमवर्गीय जनता, अशा आंदोलनांना साथ देत नाही…. नको देऊ देत! शहरातल्या कृत्रिम झगमगाटामुळे, ते धृतराष्ट्रासारखे सोयिस्करपणे आंधळे होऊन वावरतायतं. त्यांच्या ऐय्याशीत तर त्यांना बिलकूल अंतराय पडायला नकोयं. मग, कोण जगो अथवा मरो…. आम्हाला काय त्याच्याशी देणंघेणं, ही त्यांची स्वार्थांध व संवेदनाशून्य पैशाचिक भूमिका आहे! ते त्यांच्या स्वयंकेंद्रीत-आत्मकेंद्रीत चंगळवादी जगण्यात ‘रत’ आहेत… त्यांना तसं राहू देत. आम्ही जे करत आलेलो आहोत, करतो आहोत आणि करणार  आहोत…. ते केवळ, आमचा ‘अंतरात्मा’ आम्हाला तशी, ‘स्वांतसुखाय’ झोप वा स्वस्थता लाभू द्यायला तयार नाही म्हणूनच! कळिकाळाला पुरुन उरणारा, “कर्मण्ये वाधिकारस्ते…..” आणि “सदरक्षणाय खल निग्रहणाय” हा श्रीकृष्णाच्या जीवनसंदेश आम्हाला सांगून गेलाय की, “तुम्ही तुमचं तुम्हाला यथोचितरित्या पटलेलं समाजहितकारक कार्य, शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडत रहा, नको फळाची चिंता, अपेक्षा तर त्याहूनही नको”…. मग, भले कुठल्याही परिणामांना सामोरे का जावं लागू नये! आपला ‘आत्मन्’, आपलं ‘आत्मतेज’… लखलखतं रहाण्याशी फक्त मतलब! आपल्याकडे तशी क्षमता असताना व परिस्थितीची तशी गरज असतानाही, आपलं निहीत कार्य वा भूमिका, ….पार ‘न’ पाडल्यामुळे, कुठल्याही ‘अपराधीपणाची’ बोच मनाला लागू नये वा कुठलंही ‘शल्य’ आपल्या मनात राहू नये… एवढाच काय तो, आमचा या आणि अशा प्रकरणातला ‘स्वार्थ’ म्हणायचा, तर असतो!

मिलिंद कुवळेकर, SRA घोट्याळ्याविरुद्ध संघर्ष करतोय. प्रशांत महाडीक, ठाण्यातल्या राजकारण्यांच्या कारभाराची लक्तरं काढतोय….

तर, प्रदीप पाटील नांवाचा तरुण सामाजिक कार्यकर्ता, ठाण्यातला प्रचंड मोठा रस्ते घोटाळा बाहेर काढता झाला. यासंदर्भात, उच्च न्यायालयामध्ये त्याची जनहित-याचिका प्रलंबित आहे. आयुक्तांनी प्रदीप पाटील यांना आपल्या सरकारी बंगल्यावर बोलावून कथितरित्या सदरहू याचिकेसंदर्भात नाराजी व्यक्त करीत धमकी दिली होती. या प्रकरणी पोलीसांनी दाद न दिल्याने, प्रदीप पाटील यांनी, त्याहीसंदर्भात न्यायालयात धाव घेतली होती. सदर प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष व चालढकल केल्याने, न्यायालयाने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेले आहेत. सदर प्रकरणात पाटील यांनी आपल्यासोबत आयुक्तांचीही ‘नार्को टेस्ट’ मागितलेली आहे. त्यामुळे, घाबरुन जाऊन आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, २२ नोव्हेंबरपर्यंतची स्थगिती मिळवल्याची, पालिकेत दबक्या आवाजात; पण, जोरदार चर्चा आहे. सदर प्रकरणात न्यायालयीन चौकशी होऊ नये, अशी आयुक्तांची का मागणी आहे, याचा विचार व्हायला नको? याच दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरील कारवाईने अचानक विचित्र वेग धारण केल्याने, आयुक्तांच्या न्यायालयीन चौकशीचे प्रकरणही या कारवाईस कारणीभूत असू शकते, असा दाट संशय स्वाभाविकच उत्पन्न होतो.

मित्रहो, मागे काही महिन्यांपूर्वी झालेल्या विक्रांत कर्णिकांच्या उपोषणाचं ‘कवित्व’ आजही शिल्लक आहे…. न्यायाची प्रस्थापना होईपर्यंत, प्रत्येक सुजाण नागरिकानं ‘अल्बर्ट पिंटो’ होण्याची गरज आहे व “मारुती कांबळेचं काय झालं”, या धर्तीवर मोजकेच पण, टोकदार प्रश्न सातत्याने, या व्यवस्थेला विचारत राहीलं पाहीजे की,

१) …..”जर, त्या मुलीने ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरात चोरी केली होती तर, तिची पोलीसात तक्रार दाखल न करता, खुनशीपणाने त्या अनधिकृत झोपडपट्टीतल्या ८०-१०० झोपड्यांमधले त्या संबंधित मुलीचेच घर का तोडले गेले???

२)…. संजीव जयस्वाल ‘ठामपा आयुक्त’ म्हणून कार्यरत असताना, अशातऱ्हेनं घर तोडण्याची मुलीला शिक्षा देणं, म्हणजे… शहराच्या ‘पोलीस आयुक्ता’ची व ‘न्यायाधीशा’चीही भूमिका एकत्र बजावणे नव्हे काय???

३)….. पोलीसांकडे चोरीची तक्रार दाखल न करण्यामागे, ती मुलगी अल्पवयीन असल्याने, घरकामासाठी ठेवल्याची वस्तुस्थिती आपल्याच अंगलट येऊ शकते, ही भिती ठामपा आयुक्त संजीव जयस्वालांच्या मनात होती काय??? तसं प्रत्यक्षात घडलेलं असताना, अजूनही ‘बालकामगार-प्रतिबंधक’ कायद्याअन्वये वा अन्य उल्लंघित कायद्यांअंतर्गत आयुक्तांवर खटले का दाखल केले जात नाहीत?

…. कायद्यापुढे सगळे ‘समान’ असताना “सम् आर् मोअर इक्वल” या लोकशाहीत शिरलेल्या ‘विकृति’नुसार, स्वतःला कठोर प्रशासक म्हणवणारे ‘ठामपा आयुक्त’, “कानून के लंबे हाथों” से, ‘अनटचेबल’ आहेत काय, हे ही एकदा व्यवस्थेनं या समाजाला जाहीरपणे सांगण्याची वेळ आलेली आहे. या देशात “आय अॅम द स्टेट” ही प्रशासकांची व त्यांना ‘अर्थपूर्ण’ समर्थन देणाऱ्या राजकारण्यांची जुलमी हुकूमशाही वा एकाधिकारशाही, या देशात चालू देताच कामा नये… अन्यथा, अवघा देश अंधारयुगात लोटला जाईल! हे प्रशासक, पदसिद्ध अधिकाराच्या बळावर आधुनिक “ब्रह्मा, विष्णू, महेश” बनू पहातायतं, हा मोठाच धोका आहे. यासाठीच, पुन्हा कुठला IAS वा IPS किंवा तत्सम अधिकारी असली घृणास्पद दडपशाही करायला धजावायला नको, म्हणून हा ‘आवाज’ बुलंद व्हायला हवा. उच्चशिक्षितांकडून, समाजाच्या फार मोठ्या अपेक्षा असतात…. बहुतांश राजकारणीवर्ग बदमाषच असतो, हे वास्तव जनतेनं स्विकारलेलं आहे, असं एकवेळ म्हणता येईल. राजकारणी हे बहुतांश गावंढे, अर्धशिक्षित व रासवट असतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. राजकारणी सहसा लोकांच्या आदराला फारसे पात्रही नसतात. पण, अवघा अधिकारीवर्ग हा, केवळ त्यांच्या शैक्षणिक उच्चपात्रतेमुळे लोकांच्या आदराला आपसूक पात्र ठरु शकतो…. पण, उच्चशिक्षित व उच्चपदस्थही असे ‘रासवट व असंस्कृत’ वागू लागले… तर, अवघ्या दिशाच अंधारुन येतील. म्हणून, या संजीव जयस्वाल प्रकरणाचा “तार्किक शेवट” होऊन “कायद्याचं राज्य”, ही लोकशाही-संकल्पना प्रस्थापित होणं, ही निकडीची गरज आहे. “म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावतो”, म्हणून काळाला सोकावू देता कामा नये…. त्याची नांगी वेळीच या प्रकरणात ठेचली गेली; तर, नुसताच या ठाणे नगरीचा लौकिक वाढेल, असचं नाही; तर, प्रत्येक ठाणेकराची ‘कायद्याचं राज्य’ या संकल्पनेवरची श्रद्धा व विश्वास दृढ होईल.

आयुक्त संजीव जयस्वालजींनी ठाणे शहराच्या तथाकथित विकासाचा ‘ट्रेलर’ दाखवून, जनतेला आंदोलनाच्या मार्गापासून दूर ढकलण्याचा, भुलविण्याचा प्रयत्न केला. पण, खरा ‘मोशन पिक्चर’ पडद्यामागे काय घडतं असतो, तो विकासाची विकारपूर्ण ‘रोशनी’च फक्त पहात रहाणाऱ्या ठाणेकर जनतेला कितपत माहिती आहे? …आणि, त्याहीपेक्षा त्यांना तो जाणून घेण्याची कितपत इच्छा आहे??

१) या शहरात रहाणं एवढं भयानक का ‘महागडं’ व्हायला लागलयं…???

२) सामान्य मराठी माणसांच्या जगण्याची कोंडी, या अतिशय महागड्या होत चाललेल्या शहरात का झालीयं…??? ठाणे शहर वरुन चकचकीत दिसत असलं तरी, आतून सडायला लागलयं आणि त्याच्या रंध्रारंध्रातून या नाकारलेल्या मायमराठी सामान्यांचा आक्रोश प्रस्फुटित व्हायला लागलायं…. पण, सण-उत्सव-पूजा-दहीहंडी-गरबा यांच्या ‘डीजे’च्या कर्कश्श ‘डेसिबल’मध्ये तो आवाज-आक्रोश दाबून टाकण्याची किमया, राजकारण्यांच्या सोबतीने आपणही साधलेली आहे काय???

३) असल्या “बिल्डर-हिताय” विकासाच्या रेट्याखाली दडपला जाऊन, भूमिपूत्र मराठी माणूस शहराच्या मुख्य भागांतून का दूरवर फेकला जातोयं… ???

४) ठाण्याचा (भारतातलं परप्रांतीय लोकं येण्याचं सर्वात मोठं प्रमाण असलेलं शहर) लोकसंख्येच्या बेसुमार फुगवट्याला असचं उधाण येत राहून, या गगनचुंबी ‘टाॅवर्स’च्या झगमगत्या उभ्या ‘झोपडपट्ट्यां’मुळे, शहरात वेडेवाकडे असंख्य पूल उभारुनही ठाण्यातून साधं बाहेर पडायलाही ‘ट्रॅफिक-जॅम’मुळे तास न् तास का लागतायतं… ???

५) शांघायसारख्या चिनी शहरात, “बिग सिटी डिसीज्” मुळे (प्रदूषण, वाहतुकीचा खोळंबा, नागरीसुविधांची वानवा इ.) शहरातील लोकसंख्येवर कडक नियंत्रण घातलं जात असताना, ठाणे शहरात, अशा असंख्य गगनचुंबी इमारती बांधून अफाट-अनियंत्रित गर्दी का जमवली जातेय? ‘विकासा’च्या गोंडस नांवाखाली शहराचे असे का लचके तोडले जातायतं… ???

६) डझनावरी मोठमोठी धरणं आजवर बांधूनही ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला मोठ्याप्रमाणावर विस्थापित करुन, जंगलं नष्ट करुन अवाढव्य धरणांचा घाट (उदा. शाई, काळू नदीवरील धरणं इ.) का घातलो जातोयं…. अशी कुठली अगस्ती मुनींहूनही ‘राक्षसी तहान’ या ठाणे शहराला लागलीयं… ???

७) या सोन्यासारख्या निसर्गसुंदर ‘तलावां’च्या शहराची कोणी वाट लावली…. कोणी निसर्ग ओरबाडला, तलावं-विहीरी-खाड्या कोणी बुजवल्या… एकेकाळच्या ६५ तलावांच्या शहरातली निसर्गसंपदा व ‘तलाव’ नष्ट करुन, शहराची तापल्या ‘तव्या’सारखी अवस्था कोणी केली… ???

८) शहराची फुप्फुसं असलेली नैसर्गिक व जैवबहुविधतेनं नटलेली जंगलं-झाडीझुडपं नष्ट करुन व मुलांच्या खेळण्यांची मैदानं गिळंकृत करुन उच्चभ्रूवर्गासाठीच केवळ (बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था यावी, फ्लॅट्स् चढ्या भावात सहजी विकले जावेत म्हणून केवळ) ‘पंचतारांकित’ बागबगीचे कोणी उठवले… की, ज्या बागबगीच्यांमधून एक ‘मराठी शब्द’ही ऐकू न यावा… ???

९) तुमच्यासारख्या ‘स्मार्ट-शहरां’च्या स्वप्नांच्या ‘सौदागरां’नी भूलथापा देऊनच सामान्य मराठीजनांना या शहरांतून ‘बहिष्कृत’ करवलतं ना???

स्मार्ट-शहरं, म्हणजे बुद्धिमंत ‘बदमाषां’ची शहरं… ही, साधी व्याख्याही न कळणाऱ्या आमच्या साध्याभोळ्या आगरी-कोळी, मागासवर्गीय बांधवांनी, व्यवस्थेनं दाखवलेल्या आमिषाला बळी पडत, ही शहरं रिकामी करुन तुमच्या हवाली केली…. आणि, तुमच्यासारख्या प्रशासकिय चाणाक्ष मंडळींनी, या मूळ भूमिपूत्र आगरी-कोळी बांधवांच्या, ‘टक्केवारी’त खेळू पहाणाऱ्या ‘स्मार्ट’ बाहुबली नेत्यांना हाताशी धरुन असंख्य सामान्य आगरी-कोळी, मागासवर्गीय बांधवांना अक्षरशः भिकेला लावलत ना? (म्हणून, तर तुमच्यावर बालंट आल्याबरोबर, हीच सगळी तुम्ही उपकृत केलेली ‘हितसंबंधी’ मंडळी, तुम्हाला वाचविण्यासाठी युध्दपातळीवर कामाला लागली… कोण, तक्रारदारांना धमक्या देऊ लागले, तर कोण वैयक्तिक संबंधांचे ‘सातबारे’ आणि ‘दाखले’ घेऊन फिरायला लागले)…. व्यवस्थेनं दाखवलेल्या, ‘टीडीआर’सारख्या वेगवेगळ्या आमिषांना आणि जमिनविक्रीतून येणाऱ्या औटघटकेच्या श्रीमंतीच्या थाटामाटाला बळी पडून स्वतःहून भिकेला लागणारा कुठलाही ‘समाज’, हा प्रथमतः स्वतः तर दोषी असतोच…. पण, या दोषातून, या पातकातून त्यांना ‘फशी’ पाडणारी बुद्धिमंत बाळं आणि बदमाष राजकारणी मंडळी कशी काय नामानिराळी राहू शकतात? निहीत स्वार्थासाठी, त्यांना विविधं आमिषं दाखवून जाणिवपूर्वक भिकेला लावणारी तुम्ही प्रशासकिय व राजकारणी मंडळी तर, त्यांच्यापेक्षाही ‘पातकी’ आहात… तेव्हा तुम्हाला कोणी आणि कुठली ‘सजा’ फर्मावायची???

….तेव्हा, संजीव जयस्वाल कुठल्याही सहानुभूतीला, कुठल्याही अँगलमधून तुम्ही पात्र ठरत नाहीच! तुम्हाला, या शहरातले संवेदनशील व समाजहितैषी नागरिक, कुठलाही सहानुभूतीचा ‘टीडीआर'(TDR) देऊ लागत नाहीत, देऊ इच्छित नाहीत!!!

तुमच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी… प्रशासकिय सोयिसुविधा, मानमरातब वगळता “कायद्यापुढे सारे समान आहेत”, हा जगभरातला लोकशाहीचा ‘आत्मा’ तुम्हाला सजा झाल्यानं ठाण्यापुरताच नाही तर, ‘शिवछत्रपतीं’च्या अवघ्या महाराष्ट्रात पुन्हा झंकारुन उठेल… पुन्हा, असले अहंकारी-मदमस्त धंदे व उचापात्या करणारे उच्चाधिकारी, दहा वेळा नव्हे; तर, शंभर वेळा विचार करतील.

….या घटनेतून एक सर्वदूर संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल. ‘शिवबा-संतां’चा महाराष्ट्र आणि सामान्यजनांचा ‘आत्मगौरव’ जपण्याचं महान कार्य त्यातूनचं साधलं जाईल. शिवछत्रपतींनी त्यांच्या अमोघ कारकीर्दीत अशाच अनेक उद्दाम सरदार-बरकदारांना व अधिकारीवर्गाला (त्यात खोत, कुलकर्णी, पाटील, देसाई, देशपांडे इ. आलेच) वठणीवर आणलं होतं… त्या ‘शिवछत्रपतीं’चेच आम्ही ‘पाईक’ आहोत!

तुम्ही, केवळ प्रशासकीय दांडगाईचं केली असं नव्हे; तर, आपल्या दुष्कृत्यांवर पांघरुण घालण्यासाठी बदमाष राजकारण्यांचा ‘हात’ धरण्याचा, त्यांचा यथेच्छ वापर करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केलात…. तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या महाभयंकर पोलीस अधिकाऱ्याची ‘पाशवी’ मदत घेण्याचा घाट घातलात…. हा मूळ अपराधाहूनही भयंकर अपराध आहे! हे सर्व घडवण्यामागे, तुमचा ‘क्रिमिनल-माईंडसेट’ आहे म्हणावा की, तो तुमचा ‘विकनेस्’ आहे म्हणावा… ते ठरवण्याच्या फंदात पडण्याचं आम्हाला कोणतही कारण नाही !!!

…..ज्या, “ठाण्यातल्या पोलीसांना आजवर याच ‘विक्रांत कर्णिकां’वर सातआठ वर्षे (२५ जानेवारी-२०११) उलटून गेली तरी, प्राणघातक चाॅपर हल्ला करणारे मारेकरी व त्यामागचा ‘ब्रेन’ असणारा ठाण्यातील तथाकथित गुन्हेगार ‘लोकप्रतिनिधी’ अद्याप पकडता आलेला नाही”… त्या ठाण्यातल्या पोलीसदलाने, विक्रांत कर्णिकांचं उपोषणाचं आंदोलन होऊ नये म्हणून आणि प्रदीप पाटीलने ठामपा आयुक्तांविरोधात केलेली न्यायालयीन कारवाई पुढे सरकू नये म्हणून, ज्या तत्परतेनं पडद्यामागे हालचाली केल्या होत्या, त्या या शहरातल्या सत्प्रवृत्त नागरिकांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत.

संजीव जयस्वाल, तुम्ही, या ठाणे नांवाच्या मायानगरीचे सर्वोच्च नागरी प्रशासक या नात्याने, ही गोष्ट नजरेआड करुच शकत नाही की, या नगरीचा कारभार अशाच हडेलहप्पी व “हम करे सो कायदा” या पद्धतीने चालू राहिला…. तर, रस्ता रुंदीकरणाने आणि विद्युत रोषणाईने चकाचौंध झालेली; पण, सांस्कृतिक व नैतिक ‘रया’ गमावून बसलेली ही ठाणे नगरी, आपला ‘आत्मा’च कायमचा गमावून बसेल! या ठाणे नगरीची चिरफाड करुन तिला श्रीमंती साज व डौल, तुम्ही आणि तुमच्या पूर्वसुरींनी, या ठाण्यातल्या राजकारणी “गोल्डन गँग”चा हात धरुन जरुर वाढवला असेल… पण, ‘आत्मा’ हरवलेली ही ‘विकृत’ ठाणेनगरी, आपणहून संवेदना साफ हरवल्यागत आता ‘ड्रग्ज्’, ऐय्याशीच्या विळख्यात सापडलेली आहे… कोणी आम्हाला भविष्य वर्तवून, ही “उडती ठाणे नगरी”, अशी घडणार आहे, म्हणून सांगितलं असतं…. तरी, त्या भविष्यवेत्त्याला आम्ही ठार वेडा म्हटलं असतं. पण, आता भ्रष्ट ‘ठामपा’ अधिकारीवर्गाचा आणि इथल्या पारंपारिक राजकारणी ‘गोल्डन गँग’चा, या शहराला जो ‘वेढा-विळखा’ पडलेला आहे… त्यातून, यापेक्षा काही वेगळं घडणं शक्य नाही. आता, इथल्या या अशा वातावरणात सुशिक्षित-सुप्रशिक्षित तरुणपिढी घडू शकेल… पण, ‘सुसंस्कृत’ नक्कीच घडणार नाही. मग, सारस्वतांनी-सुसंस्कृतांनी आपली मुलं या शहरात वाढवायचीच नाहीत का??? … याही प्रश्नाचं, तुमच्या ‘व्यवस्थे’ला उत्तर द्यावं लागेलं! ….. त्या उत्तराची आम्हाला बहू प्रतिक्षा आहे !!!

शिवाय, एक प्रश्न अजून आमच्यासारख्यांना कायम सतावत असतो…. तो हा की, “रासवट राजकारणी आणि त्यांची पिल्लावळ याबाबत फारसं न बोललेलचं बरं…. चोर-दरोडेखोरांना, चोर-दरोडेखोर म्हणतं आपला वेळ किती वाया दवडायचा? अहो, एखाद्या खतरनाक गँगस्टर माफिया दाऊद इब्राहिमचा मुलगा, बापाच्या ‘पातकां’ची ऐश्वर्यसंपन्न पण, अनीतिमान ‘गादी’ साफ धुत्कारुन मशिदीतला संत ‘मौलवी’ बनतो; पण, आमच्या घराणेबाज पातकी राजकारण्यांचा एखादा औरस-अनौरस पुत्र अभावाने तरी कधि संत-सज्जन बनताना कोणी कधि पाह्यलायं??? उलटपक्षी, या राजकारण्यांचे पुत्रपौत्र बापजाद्यांपेक्षाही सवाई बदमाष राजकारणी निपजताना, आपण हरघडी उघड्या डोळ्यांनी पहात असतो. तेव्हा, आमचा प्रश्न प्रशासकीय बुद्धिमंत मंडळींना आहे….. तुमच्यापैकी बरीच मंडळी राजकारण्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन सर्रास भ्रष्टाचार करत, “माणूस आणि निसर्ग यांचं शोषण”, प्रशासकीय सेवेत असताना तर करताच; पण, सेवानिवृत्तीपश्चात तरी तुमच्यापैकी (काही सन्माननीय अपवाद वगळता) कितीजण या देशातील शोषण, अन्याय-अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना दिसतात? आपणच सेवेत असताना पोसलेली ‘विषवल्ली’ रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतात??”

दहावीस टक्के जरी उच्चपदस्थ प्रशासक वा सरकारी अधिकारी नीतिमत्तापूर्ण व संवेदनशील निपजले असते…. तर, या देशाचं चित्र खूप वेगळं आणि सुखीसमाधानी दिसलं असतं! तेव्हा, महाभारतात विचारला गेलेला प्रश्न, अडचणीत सापडल्यावरच ‘नक्राश्रू’ ढाळणाऱ्या, या “रक्त-पिपासू शोषक” व्यवस्थेतल्या(Vampire-State System) प्रत्येक कर्णाला विचारावासा वाटतो, “राधासुता, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?”

…..”सो, यू मस्ट गो” संजीवजी अँड सफर द् डेस्टिनी ऑफ् युवर ओन् डिझाईन्!!!

…..राजन राजे  (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष….. श्रीकृष्णाचा जीवनसंदेश आणि शिवछत्रपतींची राजनीति… यानुसार चालणारा ‘जातधर्मनिरपेक्ष’, ‘अंतिम-सत्यवादी’ पक्ष!!!)