रावणराज्यात राममंदिर…..कलियुगाचा अगाध महिमा…!!!

इटलीचा क्रूरकर्मा मुसोलिनीची ‘काळी टोपी’ घालणाऱ्या आणि लाखो-करोडोंना यमसदनी पाठवणाऱ्या जर्मनीच्या नृशंस-नराधम हिटलरला आदर्श मानणाऱ्यांच्या नादाने… भारतातली तथाकथित हिंदुत्ववादी तरुणाई, हातात भगवे झेंडे नाचवत-थिरकत ‘जय श्रीराम’ अशा, इतरेधर्मीयांना धमकावणीच्या सुरातल्या आरोळ्या देताना दिसतेय…तेव्हा, एक गोष्ट निश्चित होते, ती म्हणजे, “डेमाॅक्रॅटिक (लोकशाहीप्रधान) भारताची, थिऑक्रॅटिक (धर्मप्रधान) पाकिस्तानच्या दिशेने अधोगती सुरु झालीय”…म्हणजे, पाकिस्तानचा द्वेष करता करता, आपण त्या पाकिस्तानच्याच मार्गाने चाललोयत!

…आपण भारतीय कधिही रामाचा, ‘श्रीराम’ असा उल्लेख करत नव्हतो. जसा, आम्ही मराठी लोकं, शिवछत्रपतींचा उत्कट प्रेमाने ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करायचो किंवा करतो…तसाच, रामाचा सरळ सरळ उल्लेख, एकतर ‘राम’ म्हणून आपण करायचो… किंवा, बर्‍याचदा व्यवहारात रामाचा जयजयकार करताना, सीतेसह रामाचा ‘जय सियाराम’ किंवा ‘जय सीताराम’ असा संयुक्त-उल्लेख करायचो (खरंतरं, रामाचा जयजयकार करताना तसंच, संबोधन आग्रहपूर्वक वापरलं पाहीजे). शिवछत्रपतींचा जयजयकार करताना आजही आम्ही ‘जय शिवाजी’ म्हणतो किंवा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करताना ‘जय भीम’ म्हणतो. ते आणि तेच, ते आणि तसंच, योग्य संबोधन होय!

मुळातूनच, ‘जय श्रीराम’ ही खास, संघ-भाजपाई बनावटीची घोषणाच बोगस, फसवी आहे…रामाच्या मूळ वत्सल, न्यायी-प्रेमळ प्रकृतीला पूर्णतः विसंगत व राम-प्रतिमेला निरर्गल-बेछूट छेद देणारी आहे. रामाला उग्र-रागीट स्वरुपात पेश करुन आमच्या हृदयातल्या-अंतःकरणातल्या रामाला, ती ‘बदनाम’ करणारी आहे!

…पण, ‘रामाची भाजपकृत बदनामी’, इथेच थांबत नाही. त्यासाठी, रामाची एकूणच ‘गुणवैशिष्ट्ये’ आणि ‘जय श्रीराम’ घोषणा प्रसवणाऱ्या व पसरवणार्‍या करंट्यांची ‘अवलक्षणं’ ढोबळमानाने बघूया….

* राम, एकवचनी होता; एवढंच नव्हे तर, आपल्या पित्याचंही वचन मोडू नये म्हणून १४ वर्षांचा खडतर वनवास पत्करणारा होता… तर, *ही भाजपाई लोकं, १५ लाख रु. आपल्या प्रत्येकाच्या खात्यात टाकण्यापासून दरवर्षी २ करोड रोजगार निर्माण करण्यापर्यंतच्या असंख्य भूलथापा (त्यांच्या भाषेत ‘जुमला’ म्हणजेच…असं वचन, असा वादा, जो प्रत्यक्षात कधिच पुरा करायचा नसतो) देणारी आणि थापाड्यांचा ‘विश्वगुरु’ही यांचाच!

* राम, १०० टक्के प्रामाणिक व पारदर्शक कारभार करणारा होता… तर, ही भाजपाई लोकं, *’इव्हीएम’पासून ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’पर्यंत बनावटगिरी व लपवाछपवी करणारी!

* १४ वर्षांच्या वनवासानंतर रामाने अयोध्येत पाऊल ठेवताच, भरताला केलेला प्रश्न म्हणजे, “आपल्या राज्यातले ‘सेवक’ (आजच्या भांडवली-परिभाषेत ‘कामगार-कर्मचारीवर्ग’) खूष आहेत ना, त्यांना समाधानकारक वेतन मिळतंय ना”, हा होता… तर, ही भाजपाई लोकं, शेतकऱ्यांना मुळापासून उखडून फेकून देऊन त्यांच्या शेतजमिनी लुबाडून, बड्या गुजराथी-कंपन्यांना आंदण देण्यासाठी ‘तीन काळे कायदे’ घेऊन आले होते. लष्करात देशसेवेसाठी भरती होऊ पाहणार्‍या तरुणाईचं भविष्य कोळपून टाकणारी अग्निपथ-अग्निवीर योजना आणि कामगार-कर्मचारीवर्गाला उध्वस्त करुन गुलामगिरीत ढकलण्यासाठी ‘चार काळ्या कायद्यां’ची ‘काळी कामगार-संहिता’ (Labour-Code), ही यांचीच वैचारिक-अपत्यं!

* रामाने, कुठल्याही समाजघटकावर यःकिंचितही कधि अन्याय न करता, समस्त जनतेला सुखशांति-समाधान देणारं ‘रामराज्य’ आणलं… तर, ही भाजपाई लोकं, उभारताना दिसतायत, ते *मूठभर भांडवलदारांना (त्यातले, बव्हंशी सगळे गुजराथी-भाषिकच) मालामाल करणारं ‘रावणराज्य’, ज्यात त्यांच्याच मालकीचे चकाचौंध रोषणाईने माखलेले माॅलटाॅल्स-गगनचुंबी इमारती-पंततारांकित बागा व हाॅटेल्स दिसतील. रावणराज्यातली ‘रावणाची लंका’देखील, अशीच ‘वरकरणी सोन्या’ची होती (ती देखील रावणाने, आपला सावत्रभाऊ कुबेराकडून ताकदीच्या बळावर जबरदस्तीने हिसकावून घेत, तिला आपली राजधानी बनवली होती…जसं भाजपा-सरकार, अनेकांचे उद्योग हिसकावून घेऊन कथितरित्या, गौतम अदानीच्या पदरात टाकताना दिसतं); पण, रावणाची लंका, तळागाळातल्या लोकांवर अन्याय-अत्याचार करणारी होती. त्यांचं शोषण करणारी व त्यांचा आक्रोश दमनकारी-यंत्रणांच्या (जशा, सध्या भाजपाई राजवटीत पोलिस, आयटी, सीबीआय, ईडी आदि दमनकारी-यंत्रणा कार्यरत आहेत) टाचेखाली दडपणारी होती…म्हणूनच तर, रावणाला ‘राजधर्म’ सांगत (आठवा, पं. अटलबिहारी बाजपेयींनी, २००२च्या गुजराथ-दंगलीच्या पार्श्वभूमीवर कुणाला ‘राजधर्म’ पाळायला सांगितला होता?) त्याला सन्मार्गावर आणण्याचा, त्याचा सख्खा भाऊ असलेल्या बिभीषणाने आटोकाट प्रयत्न केला होता. पण, तो विफल ठरल्याने, सत्प्रवृत्त बिभीषणाने ‘विद्रोह’ करत, न्यायी-वचनप्रिय रामाला युद्धात साथ दिली व रामाच्याच आशिर्वादाने पुण्यकर्मी बिभीषण, हनुमानासह ‘सप्तचिरंजिवां’पैकी एक चिरंजीव बनला!

* रामाने आपल्या पत्नीसाठी (म्हणजेच, एका स्त्रिच्या अब्रुच्या सुरक्षेसाठी व अपराध्याला मृत्युदंड देण्यासाठी घनघोर युद्ध केलं… तर, ही भाजपाई लोकं, *’ब्रिजभूषणपासून बिल्कीसबानो’ प्रकरणापर्यंत असंख्य प्रकरणांमध्ये महिलांवर अत्याचार करताना किंवा महिलांवरील त्या लैंगिक-अत्याचारांचं समर्थन करताना दिसतात!

म्हणूनच जेव्हा, रासवट ‘हिटलरी हुकूमशाही’च्या शैलीत…दुचाकी/चारचाकी वहानांवर भगवे झेंडे लावत… ‘जय श्रीराम’, अशा उग्र घोषणा देत अथवा जाड्याभरड्या स्वरात ‘जय श्रीराम’ अशा आरोळ्या (जेव्हा, मूलतः राम हा शांति-संयमाचं प्रतिक, भारतीय-अध्यात्म मानत आलेलं आहे) ठोकत फिरणाऱ्या माथेफिरु तरुणाईचे बिनडोक जत्थे, ‘डोंबिवलीपासून आंबोली’पर्यंत फिरताना दिसतात; तेव्हा, त्यांना पुन्हा नव्याने खरंखुरं रामायण सांगावंस वाटतं.

…रामायणात, ‘वाल्या’कोळ्याने आपल्या कुटुंबियांच्याच उदरभरणासाठी केलेल्या महापातकांचा वाटा उचलायला, त्याच्याच कुटुंबियांनी ठाम नकार दिला होता…ते स्मरुन, “खरे ‘रामभक्त’ असाल, तरुणांनो; तर, संघ-भाजपाई लोकांच्या पातकात, असं अर्वाच्च वर्तन करत, आपण आपसूक का सहभागी होऊ इच्छिता,” या प्रश्नाचं उत्तर द्या!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)