“विक्रांत कर्णिक मरे नहीं…. ‘विक्रांत कर्णिक’ मरते नहीं………”

जेव्हा, एका बाजूला मेल्या आत्म्यांचा समाज अवतीभवती नांदू लागतो… तेव्हा, दुसऱ्या बाजूला नियती कूस बदलत एखादा ‘विक्रांत कर्णिक’ घडवत असते! दाही दिशा अंधारणं, हा सृष्टीच्या अंताचा संकेत असल्यानं, तसं काही आक्रित घडू नये, म्हणून काही शांत-प्रशांत तेजाने तेवणाऱ्या ‘पणत्या’ आणि सोबतीला, काही विक्रांत कर्णिकांसारखे धगधगते पेटते ‘पलिते’, याच सृष्टी-संकेतानुसार त्या त्या वेळी जन्माला येतात!

आपल्या कोशातून बाहेर येतं, स्वानुभवानं जग जसंजसं विक्रांत जाणत गेला, तसतसा तो झपाट्यानं अंतर्बाह्य बदलत गेला! कालचा विक्रांत आणि आताचा विक्रांत…. यातला कमालीचा बदल, त्याच्या जवळच्या स्नेह्यांना आणि आप्तांना अचंबित करणारा होता. पण, त्यातूनच समाजाला एक भ्रष्ट-शोषक व्यवस्थेविरोधात गुरगुरणारा, गुस्सा करणारा ‘अल्बर्ट पिंटो’ मिळाला. मग, जे व्हायचं ते होणारच होतं… ‘सिंहासन’ चित्रपटातल्या ‘मारुति कांबळे’सारखचं, या रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेविरुद्ध खराखुरा ‘एल्गार’ (अलिकडे, तथाकथित ‘विद्रोही’ नेतेमंडळी वापरतात तशी, केवळ, बोलघेवडी खोटी एल्गाराची वा क्रांतिची भाषा नव्हे!) पुकारणाऱ्या विक्रांत कर्णिकांवर राहत्या घरासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वर्ष-२०११ ला खुनी हल्ला झाला (“ठाण्यातल्या पोलीसांना, सातआठ वर्षे उलटून गेली तरी, आजवर ‘विक्रांत कर्णिकां’वर  प्राणघातक चाॅपर हल्ला करणारे मारेकरी व त्यामागचा ‘ब्रेन’, पकडता आलेला नाही”). खुनी हल्ला करणारा पडद्यामागचा सूत्रधार कोण, हे तर पोलिसदलालाच काय पण, अवघ्या ठाण्याला माहीत असलेला, ठाण्यातीलच एक गुंडप्रवृत्तीचा (तसे, बहुतांश सगळेच लहानमोठे राजकारणी हल्ली थेट गुंडचं असतात) ‘तथाकथित’ लोकप्रतिनिधी… विधिमंडळात राजरोस बसणारा, मिरवणारा! सत्तेपुढे शहाणपण लयाला जातं, असं आपण उद्वेगानं म्हणतो… पण, इथे ठाण्यात तर, सत्तेपुढे प्रशिक्षित-शासन (IAS), पोलिस प्रशासन(IPS)सुद्धा, या भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीच्या राजकारण्यांसमोर आपल्या पदाचा, वर्दीचा सन्मान डोईला गुंडाळून त्यांचे ‘बूटचाटे’ झालेले, याचं ठाण्याला, या विक्रांतवरील हल्ल्यासंदर्भात पाहावं लागलं…. पण दुर्दैव हे की, त्यातून समाज-अंतःकरणात जी, संतापाची एकच एक लाट उसळायला हवी होती, ती उसळायची राहीली दूर, वर पुन्हा हीच गुंड प्रवृत्ती, दोन नंबरच्या पैशाच्या राक्षसी ताकदीवर, प्रचंड बहुमतानं वर्ष-२०१४ला विधिमंडळात, दिमाखात प्रवेश करती झाली… काय म्हणायचं, या असल्या, नीतिशून्य-संवेदनाशून्य समाजाला?? रामायणाचं हरघडी पारायण करणारा…. उठसूठ ‘हिंदुत्वा’चा कर्णकर्कश गजर करणारा हा भोंदू समाज, रामायणाला फाट्यावर मारुन ‘वाल्या’ला मतदान करता झाला…. रामायणातील ‘वाल्या’च्या कुटुंबियांचा आदर्श दूर भिरकावून देत ‘वाल्या’च्याच महापातकात, भागीदार होता झाला, यापरतं दुसरं दुर्दैवं कुठलं???

या असल्या नीतिशून्य, संवेदना हरवलेल्या समाजात वावरतानाही, त्यातील बहुजनांवर अभिजनवर्गाकडून होणाऱ्या अन्याय-अत्याचार-शोषणाविरुद्ध दीर्घकाळ टोकाची व एकाकी लढत देत रहाणं, हे काही येरागबाळ्याचं काम नव्हेच! ज्या बहुजनांसाठी, घरसंसारावर तुळशीपत्र ठेऊन आपण लढतो आहोत, त्यांना त्याची कपर्दिकही पर्वा नसावी…. या जळजळीत वास्तवामुळे येणारं वैफल्य, विक्रांतला सतावत नव्हतं, असं नाही. पण, ते सारं वैफल्याचं मळभ, आम्ही सारे मिळून एकत्र चर्चाचर्वण करत दूर भिरकावून द्यायचो. म. गांधीची, “हूं, तो कर छूट जो” ही निरपेक्षवृत्ती अथवा श्रीकृष्णाचा, “कुठल्याही परिस्थितीत आपण फळाची अपेक्षा वा चिंता न करता चांगलं काम करत रहायचं”, हा संदेश, आमच्या कामी येत राहीला, एवढचं. पण, तरीही जातधर्मात अडकलेली, ही बहुजन समाजाची (बहुशः, कामगारवर्गाची) स्खलनशीलता विक्रांतला उभी जाळत रहायची… समाजहिताचं अखेरचं कर्म म्हणून त्यानं देहदान केल्यानं, मरणोत्तर विक्रांत चितेवर जरी गेला नाही तरी, उभी हयात ही असली ‘चिता’ त्याला जाळत होतीच… त्यामुळे, वेगळ्या सरणाची गरज कदाचित त्याला भासली नसावी!

विक्रांत कर्णिक, राजेंद्र फातर्पेकर, प्रदीप पाटील, मिलिंद कुवळेकर, प्रशांत महाडिक, अनिल महाडिकसारखी माणसं… अशी कोण लागून गेलीयत? सामान्य फाटके कार्यकर्ते असूनही व्यवस्थेच्या छातीत ते कशी काय धडकी भरवू शकतात??…. मित्रहो, त्याचं एकमेव, एकमात्र कारण एवढचं की, “ही मंडळी, स्वयंस्फूर्तिने या शहराचेच नव्हे; तर, संपूर्ण समाजाच्या “सद्सद्विवेकबुद्धीचे रक्षक” किंवा “काॅन्शस-कीपर्स (Conscience-Keepers) बनतात… आणि, आपल्या वकूबानुसार ही भूमिका बजावताना ते जीवावर उदार होत, ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे’तल्या राक्षसीशक्तिंना भीक घालत नाहीत, हेच होय!!! त्यातून, विक्रांत कर्णिक तर, थेट राजकारणाच्या चिखलात उतरुन घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला चटावलेल्या राजकारण्यांना त्याच चिखलात लोळवायला सिद्ध झालेला!

राजकारणाच्या नावाखाली वाटमारी करायला सरावलेले तद्दन छोटेमोठे राजकारणी जेव्हा, विक्रांतला, “अरे, हे असलं शुध्दतम राजकारण हल्लीच्या कलियुगात करणं, म्हणजे मूर्खपणाच होय”, असं ठासून सांगायचे आणि कुत्सितपणे हसायचे, तेव्हा तो या सार्वत्रिक भ्रष्ट राजकीय-मानसिकतेनं हादरुन जायचा. मग, मला त्याला सावरावं लागायचं… “पांचामुखी परमेश्वर”, या उफराट्या न्यायाने, “शहाण्यालाच वेडा ठरवण्याचा”, हा घृणास्पद प्रकार सर्वत्र बोकाळलेला पाहून, तो कमालीचा अस्वस्थ न झाला तरच नवल! मग, मधल्या काळात राजकारणालाच विटून काही काळ आयुष्याचा सांधा बदलत, त्याने निसर्ग-पर्यावरणाच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं.

विक्रांतचं एखाद्या कार्यात झोकून देणं, म्हणजे काय असतं, हे अनेकांनी अनुभवलं असेल. या पिढीचीच नव्हे, तर पुढच्या पिढ्यांची… आणि, केवळ मनुष्यजातीचीच नव्हे तर, अवघ्या चराचर सृष्टीच्या काळजीची धुरा आपल्या खांद्यावर वागवत, तो बेभानपणे काम करत भारतभर संचार करु लागला. शहरीकरण-औद्योगिकीकरणामुळे होणाऱ्या कार्बन-ऊत्सर्जनामुळे जागतिक-तापमानवाढीच्या महासंकटाचा संदेश घेऊन, हा अवलिया, मग एकटाच निर्भयपणे “ठाणे ते आग्रा” रणरणत्या उन्हात सायकल-सफारीला निघाला…. ना कसलं भय, ना भिती, ना खिशात फारशा दमड्या. मग, वाटेत चंबळखोऱ्यातले दरोडेखोर असोत वा ट्रक ड्रायव्हर, मंदिर-मस्जिदीतले बुवा असोत वा मौलवी, शाळा-काॅलेजातले विद्यार्थी असोत वा शिक्षक-प्राध्यापक… हा फिरस्ता, सर्वांना निसर्ग-पर्यावरणाचा लाख मोलाचा संदेश देत, वारा प्यायल्यागत भटकत राहीला. निढळाचा घाम गाळत पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यापेक्षाही, विक्रांतचे हे, निसर्ग-पर्यावरण संवर्धन-संरक्षण करण्याच्याबाबतीतलं संदेश-पेरणी करण्याचे श्रम, महत्कठीण व उच्चकोटीचे होते!

निसर्गसुंदर कोकणाचा घास घेऊ पहाणाऱ्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातलं आंदोलन वा हल्लीच्याच नाणार-रिफायनरी विरोधातलं आंदोलन… यातला, विक्रांत कर्णिकांचा वाटा किती, हा प्रश्नच गैरलागू आहे… या दोन्ही आंदोलनांसाठी तळागाळात शिरुन अक्षरशः घामरक्त ओकत (या सगळ्याच बाबींचा, त्याच्या प्रकृतीवर परिणाम होतं जाणं, तसं अपरिहार्यच होतं आणि तो सरतेशेवटी, असाध्य अशा यकृताच्या कर्करोगाच्या स्वरुपात झालाच) मेहनत घेणाऱ्या विक्रांत कर्णिकांखेरीज वरील आंदोलनांची, विशेषतः नाणार-तेलशुद्धीकरण प्रकल्पविरोधी आंदोलनाची, उभारणी कठीणच नव्हे; तर, अशक्यप्राय होती… हे किती जणांना ज्ञात आहे आणि ज्ञात असणाऱ्या कितीजणांना आज त्याची पर्वा आहे?

रात्री-अपरात्री खाण्यापिण्याची पर्वा न करता गाववाड्यांवर, पाड्यापाड्यांवर जाऊन लोकांना आंदोलनाचा विषय समजावून सांगणे, हे केवळ, जीवासाठीच धोकादायक नसायचं…. तर, शब्दशः, दगडावर डोकं आपटत बसणं देखील अनेकप्रसंगी असायचं! कोकणात खात्यापित्या घरातली लोकं, हा निसर्ग-पर्यावरणविरोधी प्रकल्पांचा विषय समजावून सांगताना, रात्री खूप उशीर झाला म्हणून काही विक्रांत कर्णिक आणि राजेंद्र फातर्पेकर या जोडगोळीला जेवायला ठेवून घ्यायची नाहीत. ही ब्याद, आपल्या घरात नको, म्हणून खुबीनं विषय टाळून चहावरच बोळवण करायची. अशावेळी, कोण कुठला गोरगरीब मात्र, आवर्जून आपल्या ताटातली मीठभाकर पुढे करायचा. हे सगळं सांगताना, विक्रांतच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भावतरंग, मी आयुष्यात कधिही विसरु शकणार नाही… विशेषतः, त्यातल्या वेदनेच्या अंतःकरण पिळवटून टाकणाऱ्या छटा! महिनोनमहिने, अशी माणसं तळागाळात झिरपत, स्वतःची हाडं झिजवत रहातात… तेव्हा कुठे, या जाढ्य व निर्मम व्यवस्थेला आव्हान देणारी जनआंदोलनं निदान उभी तरी रहातात!

राजेंद्र फातर्पेकरसारख्या ज्ञानी-व्यासंगी सहकाऱ्यासह, अॅड. गिरीश राऊतांच्या “भारतीय पर्यावरण चळवळी”त काम करताना, सध्याचं बेलगाम “शहरीकरण आणि औद्योगिकीकरण”, कसं अंति सजीवसृष्टीला मारक आहे, याचा जिवंत प्रत्यय आल्यानंतर… पुन्हा, त्यांची नाळ कामगार-चळवळीला किंवा राजकारणाला जोडली जाणं, म्हणजे, तडा गेलेली काच सांधण्यासारखं होतं. तरीही, व्यक्तिशः माझ्या प्रेमापोटी व आग्रहापोटी अलिकडेच दोन्ही बाबींमध्ये विक्रांत लक्ष घालू लागला…. आणि पहाता पहाता, ठाण्यात स्मार्ट-सिटी उभारणीतल्या हिडीस, भ्रष्ट कारभारानेव दंडेलीनं तो संतप्त झाला. विद्यमान पालिकाआयुक्त आणि ठाण्यातील कथित सर्वपक्षीय “गोल्डनगँग” यांच्याविरुद्ध तो शड्डू ठोकून उभा राहीला. फोनवरुन तोंडाळ कौतुक करणारे महाभाग, विक्रांतच्या आंदोलनात सहभाग घेण्याचं तर सोडाच; पण, साधा उघडपणे पाठींबा देण्याचीही हिंमत दाखवेनात.

विक्रांतचं नीतिमान व्यक्तिमत्व किती घट्ट-पिळदार होतं, हे जाणून घ्यायला खालील उणीपुरी दोनचार उदाहरणं पुरेशी आहेत….

१) ठाण्यातील एका आमदाराने एकदा विक्रांतने आयुक्तांच्या जादा सेवाकाळाविरोधात मुंबई उच्चन्यायालयात खटला दाखल केल्यानंतर फोन करुन (अर्थात, रेकाॅर्ड होऊ नये म्हणून व्हाॅट्स्अॅप-काॅल करुन), “विक्रांत, तू जबरदस्तचं लढा देतोयस, मोठं काम करतोयस… अरे, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी साले ‘हिजडे’ आहोत, आम्ही काय आयुक्तांविरोधात लढणार? आम्हाला, परत कुठल्याही परिस्थितीत निवडून यायच असतं, तुमच्यासारखे आम्ही ‘नंगे फकीर’ थोडेच आहोत?…एकतर, माझ्या मतदारसंघात मी फक्त विशिष्ट धर्मियांचीच कामं करतो, असा सर्रास आरोप होत आलाय. त्यामुळे, मी आता ठाण्यातील भुमिपूत्रांच्या विभागातही विकासाची कामं करायला घेतलीयत… अशास्थितीत, आयुक्तांविरोधात मी ‘ब्र’ जरी काढला तरी, माझ्या या कामाच्या फायली अडकतील आणि मग, मी निवडणुकीत सरळ आपटी खाईन… शिवाय, आमच्या पूर्वीच्या फायली त्यांच्या ‘गा…” खाली त्यांनी दाबून ठेवलेल्या आहेतच, त्याही ते ताबडतोब बाहेर काढतील!”

घृणास्पद बाब ही की, याच लोकप्रतिनिधीने दुसऱ्याचं दिवशी, आयुक्तांना ठाम पाठींबा दर्शविणारे जाहीर पत्रक काढले होते… मग, हे राजकारणी नेमके कुठल्या नीचतम पातळीवरचे ‘हिजडे’ म्हणायचे, सांगा???

२) एकदा, एका भांडुपमधील कंपनीत आमच्या ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चा संपलढा चालू असताना, विक्रांतला त्याचा अत्यंत जिवलग मित्र व ज्याच्या तत्परतेमुळे व ओळखीमुळे २०११ साली झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून वेळीच वैद्यकियसेवा मिळाल्यामुळे विक्रांतचे प्राण वाचले होते…. अशा एका मराठी अग्रगण्य वृत्तपत्राच्या उपसंपादक मित्राचा, फोन आला आणि त्यांनी, त्या कंपनी-मालकाचा (जो, त्या उपसंपादकाचा खास मित्र होता), आम्ही कोर्टाकडून मिळवलेल्या आदेशाने, जो कच्चामाल कंपनीतच संपकाळात अडकून पडला होता, तो सोडून देण्याची विनंती केली. तेव्हा, क्षणाचाही विलंब न लावता विक्रांत म्हणाला, “जिवलग मित्र, या नात्याने तुझ्या उपकाराची परतफेड म्हणून, एकवेळ तुझ्या घरची धुणीभांडी मी करीन, पण असला ‘कामगारद्रोह’ कदापिही, कुठलीही किंमत चुकवावी लागली तरी, माझ्या हातून होणे नाही!” असा, रामशास्त्री बाणा कुठून येतो? त्यासाठी, न्याय-सत्य-नीतिने खच्चून भरलेली अंतरीची खूणगाठ घट्ट बांधलेली असावी लागते…. म्हणून, विक्रांतसारखी व्यक्तिमत्वं, केवळ, दुर्मिळचं नसतात तर, ती संदेशरुपानं एकप्रकारचा ‘अमरपट्टा’ लेवून आलेली असतात!

३) महाडच्या कर्णिक कुटुंबातील (ज्या, कर्णिक घराण्यात भारतातील पहिलावहिला सवर्ण-दलित विवाहसंबंध घडला होता) सुरबानाना टिपणीस, अनंत चित्रे वगैरे जवळची नातलग मंडळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात अग्रेसर होती व ज्यांच्या महाडच्या घरात राहून बाबासाहेबांनी हे सत्याग्रहाचं आंदोलन चालवलं… त्याच कर्णिक घराण्यात जन्मलेल्या व बाबासाहेबांचा निस्सीम भक्त असलेल्या विक्रांतवरच ‘गँगिंग’ करुन ठाण्यातील राजकारण्यांनी ‘अॅट्राॅसिटी’चा तद्दन खोटा खटला दाखल केला होता. त्या काळात विक्रांतला छायेसारखी आम्ही सोबत देत असताना, त्याचा ‘अॅट्राॅसिटी’चा आग्रह जराही कमी झाला नव्हता, हे विशेष! मात्र, त्यानंतर, अलिकडच्या काळात माझ्यावर व माझ्या सहकाऱ्यांवर अशाचतऱ्हेनं, ‘अॅट्राॅसिटी’चा खटला दाखल झालेला पाहून विक्रांत खूप अस्वस्थ झाला. त्या अॅट्राॅसिटी कायद्यातल्या “तक्रार दाखल होताच अटक करण्याची तरतूद, प्रथमच, त्याला “जाचक व घटनाविसंगत” वाटू लागली, हे मुद्दाम नमूद करावचं लागेल!

४) ‘धर्मराज्य पक्षा’च्या सातव्या वर्धापनदिनाला विक्रांतने जे उत्स्फूर्तपणे भाषण केलं, त्याला तोड नाही. ‘दै. पुण्यनगरी’चे संपादक श्री. सोपान बोंगाणे या ठाण्यातील जाणकार ज्येष्ठ पत्रकारानेही मला व्यक्तिशः फोन करुन विक्रांतच्या भाषणाचं कौतुक केलं आणि म्हणाले की, “विक्रांत, एवढा प्रभावी बोलू शकतो, याची मला कल्पना नव्हती!” विक्रांतचे ते बोल, प्रभावी ठरले… कारण, ते वरवरचे नव्हते… तर, बेंबीपासून कंठापर्यंत दाटलेल्या आणि तिथून वर मस्तकात धुमाकूळ घालणाऱ्या संतप्त लाव्ह्याला मोकळी वाट करुन देणं, ते होतं!

आनुवंशिकतेनं जैवगुणसूत्रांतून आलेल्या गुंडपुंड प्रवृत्तींमुळे येणारी अन् निर्भयतेचा बागुलबुवा उभी करणारी अंगभूत ‘क्रूरता’ वेगळी आणि केवळ, नीतितत्त्वांच्या अमोघ आसक्तीतून येणारी जाज्वल्य, सकारात्मक व कल्याणकारी ‘निर्भयता’, ही पूर्णतया वेगळी. पहिल्याप्रकारची क्रौर्यपूर्ण असलेली वरकरणी ‘निर्भयता’ (जी, अनेक गुंडपुंड राजकारण्यांकडे असते), ही समाजासाठी घातकी व समाजाचं अतोनात नुकसान करणारी…. तर, विक्रांतने अंगी बाणवलेली दुसऱ्या प्रकारची ‘निर्भयता’, ही समाजाला सन्मार्गाकडे व शाश्वत कल्याणाकडे नेणारी असते आणि स्वतःवर मात्र, संकटाचा पहाड कोसळविणारी ठरते. विक्रांत एवढा निर्भय व समाजहिताला वाहून घेतलेला माणूस, तुम्हाला आयुष्यात क्वचितच अभावानं भेटेल…. म्हणूनच, जीवघेण्या हल्ल्यातून मरता मरता वाचल्यानंतर, हा गडी “पुनश्च हरिओम्” म्हणतं, रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेवर (Vampire-State System) तुटून पडण्यासाठी पुन्हा एकवार सिद्ध झाला… ही, असामान्य-असाधारण अशी, एक अलौकिक घटना होती!

दुर्दैवाने, अलिकडच्या आत्ममग्न व स्वार्थाचा बुजबुजाट झालेल्या मध्यमवर्गीय समाजाला, पहिल्या प्रकारच्या क्रौर्यपूर्ण निर्भयतेचं अनिवार आकर्षण असतं (म्हणून, तो अशा राजकारण्यांच्या पालखीचा भोई बनण्यात धन्यता मानतो); तर, विक्रांतसारख्या सकस-नीतिमान ‘निर्भयते’ला मात्र, ती मानसिकता आपल्या ‘चंगळवादा’ला अडसर ठरते किंवा आपल्या हितसंबंधांना मारक ठरते, म्हणून तो तिची हेटाळणी करतो.

विक्रांत गेल्यानंतर अनेकांना, शोक-सभा वा दुखवटा-सभा घेण्याचं सुचू लागलं, त्यात तसं वावगं काही नाही… पण, त्यापैकी अनेकांनी, कधि विक्रांतच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहाण्याची तयारी दर्शवली नाही किंवा अगदी ज्या, कामगारवर्गासाठी तो आयुष्यभर खस्ता खात राहीला, त्या बहुजन कामगारवर्गाने देखील, विक्रांतने जीव तोडून केलेल्या आवाहनानुसार स्वतःच्या कंपनी-स्वार्थापलिकडे जाऊन “धर्मराज्य पक्षा”च्या बिरुदाखाली चाललेल्या मोठ्या राजकीय-परिवर्तनाशी कधि स्वतःची नाळ फारशी जुळवून घेतली नाही… अशा वस्तुस्थितीत, क्रांतिकारी विक्रांतला, अशी एकप्रकारची वरपांगी…. ‘मरण्या’चंही एक ‘इव्हेंट’ बनविणारी… शोकसभा, दुखवटासभा कधि रुचली असती???

त्यापेक्षा, विक्रांत कर्णिकांचा फेसबुकवरचा संदेश खरचं आपल्याला प्रेरित करु शकतो का, ते प्रत्येकाने तपासणं अधिक प्रासंगिक व यथोचित ठरेल, तो संदेश असा, “समाजात निर्भयपणे काम करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांनो, आपण काम करत असताना माझा घातपातात वा आजारपणात मृत्यू झाला; तरी, तुम्ही तुमचं काम निर्भयपणे करत रहा. जीवनाच्या प्रवासात आपापल्या स्टेशनला सर्वांनाच उतरावं लागतं….कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही. त्यामुळे, कोणी सहकारी, मधेच महफिल सोडून निघून गेला; तर, जास्त शोक करत न बसता, त्या सहकाऱ्याचं काम दुप्पट वेगानं पुढे न्यायची जबाबदारी…. ही त्याच्या सर्व सहकाऱ्यांची असते आणि या सगळ्या प्रसंगातून वाचलोच तर, “बचेंगे तो, आैर भी लडेंगे!!!”…..

….राजन राजे (अध्यक्षः धर्मराज्य पक्ष आणि धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)