सतराव्या लोकसभेच्या निकालासोबत कामगार-कर्मचारीवर्गाचा लागला नि:क्काल !!!

एकीकडे, अगोदरच काँग्रेसी-राजवटीत षंढत्व प्राप्त झालेल्या अशा, विकलांग स्वरुपाच्या कामगार-कायद्यांना गुंडाळण्याचा (मूर्ख कामगारवर्गाला गंडवण्यासाठी, या कडू-जहर गोळीला ‘नाममात्र’ किमान-वेतनवृद्धीचं फसवं ‘शर्करा-आवरण’ अथवा ‘sugar-coating’ देऊन); तसेच, “कंत्राटी-कामगार पद्धती”च्या पुढचं पाऊल असलेल्या ‘NEEM’ (तथाकथित, “National Employment Enhancement Mission”… पण, प्रत्यक्षात “National ‘Exploitation’ Enhancement Mission” असलेली फसवी योजना) सारख्या कामगारविरोधी व शिक्षित-अर्धशिक्षित युवापिढीच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातकी योजना राबवून…. उरल्यासुरल्या कामगार-चळवळीचं कंबरडं मोडण्याचा नरेंद्र मोदी सरकारने (ज्याला, आम्ही EVM-सरकार अथवा Electronically Victory Managed-सरकार म्हणून संबोधतो) घाट घातला असतानाच, आता उद्योग-व्यवसाय-धंदा चालविण्यात सुलभीकरणाच्या (Ease Of Doing Business) नावाखाली उद्योगपतींना मोकाट सोडलं जाणार आहे! त्यासाठी, कंपनी-कायद्यात एकूण ३० सुधारणा केल्या जाणार आहेत…. ज्यामुळे, वार्षिक-विवरणपत्र वा आर्थिक-ताळेबंद वेळेवर न भरणे, संचालकपदाचा कालावधी बेकादेशीररित्या वाढवून घेणे, कंपनीला ‘तोटा’ होत असतानाही व्यवस्थापकीयवर्गाला भरमसाठ वेतन व इतर आनुषंगिक सोयिसुविधा बेलगामपणे देत रहाणे, भागभांडवलातील फेरफार दडवून ठेवणे, सवलतीच्या दरात कंपनीच्या समभागांचं वाटप मनमानी पद्धतीने करणे…. वगैरे गंभीर स्वरुपाच्या आर्थिक गुन्ह्यांना ‘सौम्य’ करण्यासाठी (Decriminalisation) त्यातील, संबंधितांवर गुन्हेगारी खटले दाखल करुन अटकेत टाकण्याची तरतूद काढून टाकण्याचे मनसुबे रचले जात आहेत.

२३ मे ला नरेंद्र मोदीचं “उद्योगपतीमित्र” NDA सरकार निवडणूक जिंकल्याचं जाहीर होताच लगोलग, अनेक कंपन्यांमधून (उदा. व्होल्टास, सँडोझ, गोदरेज, माझगाव डाॅक, विविध आयटी कंपन्या आदि अनेक मोठ्या व असंख्य लहान कंपन्या-कारखाने) जवळपास सक्तीची सेवानिवृत्ती, कामगार-कर्मचारीवर्गाची (त्यात, ज्यांना कामगार-कायद्याचं संरक्षण नाही अशी, मध्यम स्तरावरील व्यवस्थापकीय मंडळीही आली) कामाच्या ठिकाणी छळवणुकीत प्रचंड वाढ; तसेच, कामगार-कर्मचारी कपात, अशा अमानुष घटना एकदम घडू लागल्यात…. हा, कुठलाही योगायोग नसून ते राजकीयशक्ति व उद्योग-जगत यांच्या संगनमतानं (Coalition Of Connected) उलगडतं जाणारं एक फार मोठं ‘षडयंत्र’च होय!

…. पण, सदैव आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेण्याची घातकी सवय जडलेल्या अज्ञानी, मूर्ख व बेजबाबदार कामगार-कर्मचारीवर्गाला (विशेषतः, “निळ्या-भगव्या” रंगात रंगलेल्या नादान मराठी कामगार-कर्मचाऱ्यांना) घसा खरवडून सांगून तरी काय उपयोग???

जेव्हा, गायच कसायाला धार्जिणी होते, तेव्हा तिचं ‘हलाल’ आणि तशाच वृत्तीच्या कामगार-कर्मचारीवर्गाचे प्रचंड ‘हाल’… यापेक्षा, कुणाचं वेगळं प्राक्तन काय असू शकतं ???

… राजन राजे  (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष आणि धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)