उरलंसुरलं ‘आरे’ वाचवण्यासाठी आपापल्या पद्धतीने धडपडणारा प्रत्येकजण हा, निसर्ग-पर्यावरणीय महासंकटे टाळण्याच्या जगभरातल्या अखेरच्या ‘प्रयत्न-मालिके’तला एक शिलेदारच होय!

असे, लाखो-करोडो शिलेदार उभं रहाणं, ही काळाची आजची तातडीची गरज आहेच आणि तसं होताना हळूहळू जगभर दिसायला लागलयं, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब असली तरीही………
मुळात, असल्या सगळ्या “कार्बन-केंद्री” विनाशकारी विकासाला, GDP आधारित अर्थव्यवस्थेला, बेबंद शहरीकरण व औद्योगिकीकरणाला आता ‘पूर्णविराम’ दिला नाही… जनसंख्या-जीवनशैली कठोरपणे रोखली नाही, वहातूक व्यवस्था, घरबांधणी (सिमेंट-लोखंडाचा वापर टाळणे), शेतीव्यवस्था (रासायनिक व यांत्रिक शेती थांबवणे) इ. मध्ये “कार्बन-ऊत्सर्जन” रोखण्यासाठी कल्पनातीत आमूलाग्र बदल केले नाहीत…. तर, येत्या काही दशकातच अवघ्या सजीवसृष्टीसह मनुष्यजातीचं अस्तित्वच मिटून जाईल!!!

बरं हे सारं, एकट्यादुकट्या कडून नव्हे; तर, ‘Top Driven’ पद्धतीने जगभरातल्या राजकीय-प्रशासकीय व्यवस्थांना जाग आणून, भाग पाडून… प्रसंगी, प्रस्थापित निसर्ग-पर्यावरणाचा विध्वंस करणारी रक्तपिपासू-शोषक ‘व्यवस्था’ (Vampire-State System) मोडीत काढून, सर्वांकडून करवून घेणं (UNO, WED, WB, IMF इ. इ. असंख्य देशविदेशांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या विविध संस्था एकत्रितरित्या) …. हे जगड्व्याळ आव्हान, सातत्याने ‘जनजागरण’ करत, आपणा सर्वांना पेलावंच लागेल!

निसर्ग आणि पर्यावरणाचं समतोल-संतुलन राखतचं, इतर सजीवसृष्टीसह ‘मानवी-जीवन’, विश्वाच्या अंतापर्यंत शक्य आहे; अन्यथा, मात्र मुळीच नव्हे!

“ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान” अथवा “साधी रहाणी, उच्च विचारसरणी”, ही निसर्ग-पर्यावरणवादी प्राचीन, परंपरागत भारतीय-जीवनशैली, मराठी संत-सज्जनांची शिकवणच, विश्वाला आजच्या भीषण परिस्थितीतून तारुन नेऊ शकते!

अन्यथा, पृथ्वीवरचं सगळं जीवनचं संपुष्टात येणार असेल; तर, कसला विकास, कसली अर्थव्यवस्था आणि कसलं काय …..???

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी हरित पक्ष)