शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा….

शिक्षण व आरोग्यसेवेचं खाजगीकरणनष्ट करुन त्याचं राष्ट्रीयीकरणकरा…. ही ‘‘धर्मराज्य पक्षा’’ची स्थापनेपासूनची ठाम मागणी आहे!

दर्जेदार शिक्षण (ते ही मातृभाषेतूनच) तर, मोफत मिळायलाच हवं; पण, ‘आरोग्यसेवा’ही एकतर मोफत अथवा किमानपक्षी, वाजवी दरात (विशेषतः, आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या हृदयरोग, मधुमेह, कर्करोगासारख्या अत्यंत महागड्या व खर्चिक आजारपणासंदर्भात) उपलब्ध करुन देण्याची सार्वजनिक-व्यवस्था निर्माण केली गेलीच पाहीजे व या महत्त्वाच्या बाबींवर भरीव राष्ट्रीयनिधी खर्च व्हायलाच हवा… हे ही आम्ही ‘‘धर्मराज्य पक्षा’’च्या व्यासपीठावरुन सातत्याने गर्जून सांगत आलेले आहोत!!!

या मूलभूत स्वरुपाच्या व सामान्यांच्या जगण्याच्या आसाला भिडलेल्या मागण्या, या कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विषयपत्रिकेवर अथवा निवडणूक जाहीरनाम्यात कधिही नसतात. याच प्रमुख कारण, या सगळ्या प्रस्थापित राजकीय धटिंगणांना, अशा ‘खाजगीकरणा’तून गल्लाभरु भ्रष्टाचार करणं, अगदीच सोपं होतं. शिवाय, अशा खाजगी शिक्षण व आरोग्य ‘संस्था’, या यथावकाश घराणेबाज व सरंजामदारी पद्धतीची ‘संस्थानं’ (पिढीजात चराऊ कुरणं) बनतात! त्यातूनच, लुटारु ‘शिक्षणसम्राट’ व हल्ली ‘आरोग्यसम्राट’ (बड्या इस्पितळांचे मालक वा भागीदार) तयार होत जातात, ही लोकशाहीविरोधी व आर्थिक-विषमता निर्माण करणारी, अत्यंत घृणास्पद बाब होय!

खाजगीकरण म्हणजे, ‘‘कार्यक्षमता, तत्परता वा उच्चदर्जा’’, हे जाणिवपूर्वक पसरवले गेलेले ‘गोड गैरसमज’ होत… प्रत्यक्षात, ‘‘खाजगीकरण म्हणजे, सामान्यांची लूट व त्यांच्या जगण्याची ‘कोंडी’च होय’’, याचा दाहक अनुभव जनसामान्यांना आपल्या रोजच्या जगण्यातून मिळत असतोच.

…. आणि म्हणूनच, जेव्हा एखादा ‘रवीशकुमार’सारखा जाज्वल्य पत्रकार (बाकीचे बहुसंख्य पत्रकार, आपला मेंदू भाड्याने देणारे ‘rubbish’कुमार असतात) अशा मूलभूत प्रश्नांवर आवाज बुलंद करतो; तेव्हा, त्याच्या क्रांतिकारी स्वरात आपला सूर मिसळणं; हे आमचं आद्य कर्तव्यच नव्हे; तर, तो आमचाही राजकीय ‘अॅजेंडा’ आहेच… याची कृपया, जनताजनार्दनाने दखल घ्यावी!

धन्यवाद…

II जय महाराष्ट्र, जयहिंद II

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)