काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील…

कधि, काश्मीरचं कलम ३७०, कधि बालाकोटचा सर्जिकल-स्ट्राईक; तर, कधि अयोध्येचं राममंदिर…. या पोकळ भावनिक हिंदोळ्यांवर झुलत, असंच सर्वसामान्यांचं आयुष्य, गुलामगिरी व जगण्याच्या कोंडीत वाया जात राहील !!!

या जगात अशी कुठलीही व्यक्ति असू शकत नाही, असत नाही… कुठलाही धर्मग्रंथ वा अन्य, कुठलीही बाबही अशी असूच शकत नाही; की, जी कळीकाळालाही पुरुन उरु शकेल. विश्वाची पोकळी, ही असीम आणि अनंत आहे… त्यातलं, पृथ्वीवरचं लाखो पिढ्यांचं आपलं मानवी-जीवन, हे असंच कधिही कुठल्या धर्मग्रंथाच्या वा महान व्यक्तिमत्वांच्या, प्रेषितांच्या प्रभावाच्या कडीकुलुपात कायमचं बंदिस्त राहू न शकणारं आहे. तेव्हा, आपलं जीवन सुसह्य, सहजसाध्य व्हावं व शाश्वत रहावं, म्हणून काळानुरुप आपल्याला त्यात काही आवश्यक बदल करुन घ्यावे लागतात आणि काळाच्या ओघात शिरलेल्या, काही अनिष्ट-अनावश्यक बाबी त्याज्य म्हणून नाकारत, पुढील जीवन-प्रवास हा करावा लागतोच…. अन्यथा, काळाच्या ओघात, या पिढीजात वा व्यावहारिक शहाणपणाअभावी आपलं अवघं अस्तित्वचं धोक्यात येत जातं आणि आज, तळागाळातील सामान्य माणसांच्या बाबतीत विचार करता (विशेषतः, महाराष्ट्रातील सामान्य मराठी-माणसांचा विचार करता), ते खरोखरच धोक्यात आलेले आहे… सन्मान, सुरक्षा, सुखसमाधान आपल्या आयुष्यातून जणू हद्दपारच केलंय, या ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे’नं!

…. म्हणूनच, अयोध्या राममंदिर-मस्जिद हे केवळ अस्मितेचे असलेले व अस्मितेनेच भरलेले, भारलेले विषय; निदान, आता तरी मागे टाकून, आपण आपल्या जगण्याशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या व मूळस्वरुप अशा Environment, Education, Employment आणि Economics या चार ‘इ’ कारांकडे वळलं पाहीजे. त्यापैकी, ‘निसर्ग-पर्यावरणा’चं महत्त्वं अनन्यसाधारण आहे आणि जागतिक तापमानवाढीपोटी झालेले अनाकलनीय व विनाशकारी जागतिक हवामान-बदल (Climate-Change) पहाता; मानवी-जीवनाबद्दलचे सर्व निर्णय… कुठलाही धर्मग्रंथ, राज्यघटना, प्रेषित, देवदेवता, महापुरुष वगैरेंच्या बिलकूल आहारी न जाता…. या साऱ्यांच्या पलिकडे जाऊन, केवळ आणि केवळ, “निसर्ग-पर्यावरणा”च्याच ऐरणीवर घासून घेतले गेले पाहिजेत… निसर्ग, हीच जात आणि पर्यावरण, हाच धर्म… याच भावनेनं! सजीवसृष्टीसह पुढील पिढ्यांचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी तिथे, अन्य कुठलाही निकष लावला जाताच कामा नये आणि शिवछत्रपतींच्या कठोर पण, अंति जनकल्याणकारी नीतिने, कुणाचाही मुलाहिजा याबाबत, ठेवला जाता कामा नये!

जे, राममंदिराचा आजवर हट्टाग्रह वा फाजील आग्रह धरत आलेले आहेत… त्यांच्यापैकी एकही “मायका लाल” सच्चा ‘हिंदू’ नाही आणि विरोध करणाऱ्यांपैकीही कुणी सच्चा ‘मुसलमान’ नाही…. ना इथे कोणी खरा ‘रामभक्त’ ना ‘रहीमभक्त’!

तसंच, इथे कोणी ‘रामराज्य’ वगैरे निर्मिण्यासाठी सत्तेवर आलेलं नसून, बड्या भांडवलदारांचे ‘गुलाम’ व कळसूत्रीबाहुले असलेली ही सर्वपक्षीय प्रस्थापित घराणेबाज राजकारणी मंडळी, आपल्या बगलबच्चे-गणगोत असलेल्या मूठभरांसाठी…. सामान्यांवरील अन्याय-शोषण-अत्याचारांनी भरलेली, ऐश्वर्यसंपन्न ‘सुवर्णलंका’ (ती ही, मोजक्या शहरांमध्ये) उभारण्यासाठी आलेले आहेत… ही ‘सुवर्णलंका’ उभारली जातेय, ती रावणासारख्या विवेक व नीतिशून्य सैतानी ‘विकासा’ची कास धरुनच! “मुँह में राम और, बगल में रावण”, ही तर, यांची कायमच कावेबाज राजनीति राहीलेली आहे… आपल्याला यांची खरी ओळख, पटायची तरी कधि???

जो, ‘रामराज्या’ची संकल्पना मांडून तळागाळातील ‘दरिद्री-नारायणा’ची आजन्म सेवा करत राहीला… निसर्ग-पर्यावरणाच्या संरक्षण-संवर्धनासंदर्भातील पूरक जीवनशैलीविषयी आयुष्यभर बोलत राहीला, तशी कृति करत राहीला…. त्या नरोत्तमाचं नाव ‘मोहनदास करमचंद गांधीं’! म्हणूनच, म. गांधींचा शाश्वत-जीवनशैलीचा, सत्याग्रह-अहिंसेचा मार्ग… हे ‘धर्मराज्य पक्षा’साठी केवळ, एक ‘धोरणशास्त्र’ नव्हे; तर, ते आम्हा सर्वांचंच ‘जीवनमूल्य’ व ‘जीवन-धारणाशास्त्र’ आहे! ‘धर्मराज्य पक्षा’च्या अनुयायांप्रमाणे, म. गांधींनी दाखवलेल्या मार्गाने चालणारे (फक्त, म. गांधींचे राजकीय फायद्यासाठी खोटे गोडवे गाणारे नव्हेत), ते खरे ‘रामभक्त’…. खुनी, नराधम नथुराम गोडसेचे गोडवे गाणारे, ते ‘रावणभक्त’!! …यापेक्षा सहजसोपी व अचूक ओळख, सामान्यांसाठी अजून वेगळी काय असू शकेल??? भरत-हनुमानानंतर, म. गांधींएवढा कृतिशील जातिवंत (फक्त, नावाला तोंडाने राममंदिर, ‘रामनाम’ जप करणारा नव्हे) ‘रामभक्त’, या भरतभूमीत ना कधि जन्माला आला; ना कधि येईल!!!

केवळ, आजन्म मनस्वी ‘गांधीभक्त’ असलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांचे भलेथोरले पुतळे उभारुन वा गांधी-जयंतिला म. गांधींना कमरेत वाकून नमस्कार करुन, कुणी म. गांधींचा अनुयायी व पर्यायाने ‘रामभक्त’ होत नसतो!

“जय रामजी की” किंवा “राम राम” अथवा “जय सीयाराम”…. अशी आपली, ‘रामनाम’ जपण्याची वा जतन करण्याची संवेदनशील व ममत्वपूर्ण प्राचीन परंपरा राहीलेली आहे. त्याला, या राजकीय धटिंगणांनी जाणिवपूर्वक ‘श्रीराम’, असलं ‘उग्र स्वरुप’ देऊन त्यातून भारतीय समाजात आपल्या बेबंद स्वरुपाच्या राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी, धार्मिकतेढीची कायमस्वरुपी ‘मुहूर्तमेढ’ रोवली! यांना राम मंदिर बांधून ‘रामा’ची पूजा नाही करायचीय… त्यांना त्यातून ‘राजकीय सत्ते’ची पूजा घालायचीय… तोच त्यांचा कार्यक्रम अथवा ‘अॅजेंडा’ आहे! रावणाची लंका जरी सोन्याची, तरी ती कधिही वंदनीय असू शकत नाही… रामाची अयोध्या, नीती, न्यायाने भरलेली होती; म्हणून, तेवढी श्रीमंत-संपन्न नसूनही पिढ्यानुपिढ्या प्रातःस्मरणीय व अनुकरणीय ठरलीय! त्या, वात्सल्यमूर्ति कौसल्येच्या, प्रेमळ-न्यायी रामाची ‘अयोध्या’ देशात जागोजागी उभारुन आम्हाला दाखवा… आम्हाला, केवळ, ते तुमचं ‘ढोंगी हिंदुत्वा’चा विखार पसरवणारं, ‘उग्रस्वरुपी’ “श्रीराम मंदिर” नको… “जय रामजी की, जय सियाराम”!

…मित्रहो, गंगामातेच्या शुद्धीकरणासाठी व तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वामी आत्मबोधानंद, स्वामी गोपालदास, आयआयटीतील प्राध्यापक प्रो. जी. डी. अग्रवाल ऊर्फ स्वामी ज्ञानस्वरुप सानंद, बाबा नागनाथ योगेश्वर आदि पूजनीय संतमंडळींनी ‘महाबलिदान’ केलयं आजवर; तरीही, “गंगा मैली” होतेच आहे… यमुनातिरीचा जैववैविध्यपूर्ण निसर्ग उध्वस्त करणाऱ्या श्री श्री रविशंकरांसारखी वा ‘पातंजली-उद्योगपती’ रामदेव स्वामींसारखी व्यवस्थेच्या पालखीचे भोई असणारी ‘सरकारी संतमंडळी’ नव्हती ती, ती होती सारी भारतीय आध्यात्मिक-परंपरेतली खरीखुरी जाज्वल्य संतमंडळी….अयोध्येपासून हाकेच्या अंतरावर गंगातिरी, संतशिरोमणी असलेली ही जाज्वल्य साधुसंत मंडळी, गंगामातेसाठी प्राणार्पण करत असताना; हीच, सारी ढोंगी हिंदुत्ववादी मंडळी व त्यांचे नरेंद्र मोदी सरकार, त्या साधुसंतांचे बलिदान व्यर्थ जाऊ देण्यास व नंतर नक्राश्रू ढाळण्यास आतूर राहीलेली, आम्ही कालपरवापर्यंत उघड्या डोळ्यांनी पाह्यली… कसले हे ‘हिंदुत्ववादी’ हो? हे फक्त, पाशवी ‘सत्तावादी आणि भांडवलवादी’ आहेत, बस्स्! पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा… सत्ता, पैसा (शिवाय, हातात EVMचं तंत्र आहेच)… हे गरगर फिरणारं चक्र, यांनी सामान्यांना उध्वस्त करण्यासाठी हाती धरलय. हे कुणी श्रीकृष्ण नव्हेत आणि ते चक्र काही दुष्टदुर्जनांचा नायनाट करणारं सुदर्शनचक्र नव्हे! ते ‘नरकासुरा’सारख्याच्या किंवा ‘रावणा’सारख्याच्या हाती पडलेलं विनाशकारी चक्र आहे आणि ते मूठभरांची घर ढीगभर भरण्यासाठी, सामान्यांच्या सुखसमाधान, अस्तित्व व सन्मान-सुरक्षेवर चालवलं जाणारं घातकी स्वरुपाचं, रक्तपिपासू-शोषक व्यवस्थारुपी (Vampire State-System) ‘क्षेपणास्त्र’ आहे… आणि, ज्याप्रमाणे, महाभारतात दुष्टात्मा अश्वत्थाम्याने सोडलेलं, आग ओकणारं विनाशकारी ‘ब्रह्मास्त्र’ रोखण्यासाठी श्रीकृष्ण पुढे सरसावला होता; तद्वतच, तुम्हाआम्हा सर्वांनाच “धर्मराज्य पक्षा”च्या व्यासपीठावरुन पुढे सरसावत, या ढोंगी-बदमाष हिंदुत्ववाद्यांची ‘क्षेपणास्त्रं’ रोखावीच लागतील आणि ती सातत्याने सोडणाऱ्यांचा, “सद्रक्षणाय, खल निग्रहणाय”, या श्रीकृष्ण-नीतिने यथावकाश राजकीय पटलावरुन मतपेटीद्वारे नायनाट करावाच लागेल!

… त्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाचा राममंदिर उभारणीबाबतचा निवाडा, हा सद्यस्थितीत, शिरसावंद्य मानून पुढे चला आणि अशा दिडदमडीच्या भावनिक मुद्दांना यापुढे फारसं महत्त्व न देता….. नजिकच्या भविष्यात आपण सारे मिळून, “धर्मराज्य पक्षा”ला भरभरुन समर्थन द्या, “धर्मराज्य पक्षा”चे अनुयायी बना आणि आपलं व आपल्या पुढील पिढ्यांचं जीवन सुरक्षित, सुखीसमाधानी करा; हीच, ईशचरणी प्रार्थना व अल्लाकडे दुवा….ईन्शाल्ला !!!

ताजा कलम:- सर्वोच्च न्यायालयात राममंदिराचा निकाल एकदाचा लागला; पण, महाराष्ट्राच्या सीमावादाचा (कारवार-निपाणीसह बेळगाव महाराष्ट्रात सामील करुन घेणे), ज्याचं घोंगडं वर्ष-२००६ पासून गेली १४ वर्षे (१४ वर्षात तर, प्रभू रामचंद्रांचा वनवासही संपुष्टात आला होता) सर्वोच्च न्यायालयात भिजत पडलेलं आहे, त्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालय कधि करणार…??? ज्याप्रमाणे, इस्रायली ज्यूईश लोकांनी पॅलेस्टाईन, चीनच्या हान वंशियांनी तिबेट व उघिर प्रांत जबरदस्तीने तिथे आपल्या वस्त्या सरकारी आशिर्वादाने पद्धतशीरित्या वाढवून बळकावला; त्याचप्रमाणे, संपूर्ण बेळगाव कन्नडिगांनी आपल्या घशात घातल्यावर ????

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)