म्हणे, अण्णा सध्या गप्प का आहेत….

भाजपाची दुसरी टर्म चालू आहे, माहितीचा अधिकार किंवा जनलोकपाल विधेयक यासाठी थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केले कॉंग्रेस सत्तेत असताना, मग आता शांत का?

आता तर काही असेही बोलतात की महाराष्ट्रात बिगर भाजप सरकार आहे, आता अण्णा उपोषण करण्यास तयारी करत असणार?

भाई… कॉंग्रेसकडे एक हाती सत्ता नव्हती, आता तर भाजपला एक हाती सत्ता आहे आणि ही त्यांची दुसरी टर्म चालू आहे, मग अण्णा शांत का असा विचार मनात घोळत असतो?

बिगर भाजप सरकार आल्यानंतर अण्णा पुन्हा आंदोलन करणार का? माहितीच्या अधिकारात सुध्दा निर्बंध घालण्यात आले, तरी काहीच हालचाली दिसल्या नाहीत…

काही चुकीच्या लोकांमुळे कायदा किती चांगला असला तरी गालबोट लागते, हे माहितीच्या अधिकाराच्या कायद्याच्या बाबतीत सुध्दा हेच झाले आहे…

हे केंद्र सरकार कोसळले आणि बिगर भाजप सरकार आले कि ह्या सरकार मधले मंडळी लोकपाल विधेयक यासाठी बाहेर येतील असे वाटते… किती जण होती लोकपाल विधेयक आणि माहितीचा अधिकारासाठी झुंज देणारे… आता सर्व शांतपणे पहात आहेत… असं दिसतं कधी हे सरकार जातं आणि कधी पुन्हा आंदोलन करतो…

———————————————————————————–

(हा टुकार संदेश, समाजमाध्यमातून सर्वत्र व्हायरल झालाय; त्याला, ‘धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलेलं सडेतोड उत्तर खालीलप्रमाणे……)

———————————————————————————–

सगळं काही अण्णांनीच करायचं का? मग, तुमची तरुणपिढी काय करणार… फक्त, घरात आयते आरामात बसून टीव्ही-मोबाईलशी खेळत इतरांनी केलेल्या आंदोलनांचे, इतरांनी केलेल्या संघर्ष-त्यागाचे फायदे उचलणार का?? अण्णा हजारे, मागच्या वेळच्या एका उपोषणाच्या सातव्या दिवसात असताना (पोटात भूकेचे आगीचे लोळ उठत असताना), तुमची तरुणपिढी ठाणे-मुंबईतली बेदरकारपणे दहीहंडी खेळण्यात मश्गुल होती, हे अस्वस्थ करणारं वास्तव आम्ही पाह्यलं… दुर्दैवाने, हे सारं असह्य दृश्य, मनातला उकळणारा संताप, कसाबसा रोखत उघड्या डोळ्यांनी पहाण्याशिवाय आम्ही काही करुही शकत नव्हतो, एवढी तरुणाई बेभानपणे उसळत होती…. तरीही, दारु पिऊन दहीहंडीचा धिंगाणा घालणाऱ्या काही ठाण्यातल्या भरकटलेल्या तरुणांना, मी बेधडक जागच्याजागी चांगलं सुनावलंच!

अण्णा हजारे नावाचा फक्त, चौथी शिकलेला एक अडाणी माणूस (लष्करात साधा ड्रायव्हर असलेला) तुम्हाला ‘‘माहिती अधिकारा’’सारखं (जे मूलभूत ‘लोकशाही-शस्त्र’, तुम्हाला राज्यघटनेनं वा कुठल्या राजकीय पक्षाने, राजकीय नेत्याने नाही दिलेलं…. ती मोठी त्रुटी, अण्णांनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून भरुन काढली!) एवढं महान ‘‘लोकशाही रक्षणाचं व भ्रष्टाचार-निर्मूलनाचा शस्त्र’’ तुम्हाला अण्णांनी मिळवून दिलं…. त्याची बाबांनो, थोडीतरी जाणिव ठेवा. नका होऊत एवढे कृतघ्न! त्या एकट्यादुकट्या अशिक्षित माणसाने काय काय म्हणून करायचं? केवढ्या गोष्टी त्यांनी व्यक्तिगत आयुष्याचा त्याग करत देशासाठी केल्यात? तुमचं कसं झालंय ना की, ‘‘एखादी व्यक्ति तुमच्यासाठी निरपेक्ष बुद्धीने आयुष्यभर ‘चंदना’सारखी झिजत राहिली की, तुम्हाला त्याच्या सुगंधी ‘चंदनमूल्या’चा एवढा विसर पडतो की, तुम्ही त्याला साधं ‘लाकूड’ समजून मोडीत काढता आणि झिजवता झिजवता त्याला सरळ एक दिवस, इंधन म्हणूनही जाळायलाही बेलाशक कमी करत नाही’’…. म्हणून, या अशा तरुणाईच्या उफराट्या वृत्तीनेच, समाजातला चांगुलपणा, त्यागभावना हल्ली साफ लोप पावायला लागलीय, हे नीट ध्यानात घ्या. सध्याची अण्णांची तब्येत वगैरे कशी आहे, याची कधि विचारणा तर सोडाच, आपण साधी कल्पना तरी केलीयत का?? प्रत्येकवेळी, उपोषणापश्चात त्यांना दीर्घकाळ अपचनाचा, पोटदुखीचा भयंकर त्रास होत असे…. आता तर, त्यांचं वयच एवढं वाढलय, अण्णा एवढे थकलेत की, त्यांनी या वयातही पुन्हा पुन्हा उपोषणाचं अस्त्र उपसावं, असला क्षुद्र विचारही तुम्ही मनात आणणं, हे भयंकर पातकी वृत्तीचं लक्षण आहे!!!

त्रिवार धि:क्कार असो, असल्या बाजारबुणग्या, लंपट, स्वार्थी आणि नेभळट तरुणाईचा… जी समाजमाध्यमातून विचारतेय, ‘‘आता, अण्णा सध्या शांत का, म्हणून!!!’’

यातून, एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे, ‘‘सध्या, समाजमाध्यमं म्हणजे, बव्हंशी, ढुंगण धुवायची अक्कल नसलेल्या ‘तथाकथित’ विचारवंत (की, ‘विचारजंत’?) माकडांच्या हाती कोलितं देण्यासारखीच झालीत!’’

… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)