जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”…..

५ एप्रिल (रविवार)-२०२० रोजी रात्रौ ठीक ९ वा. जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”…..

“नियतीशी करार”(Tryst with destiny) अशी ऐतिहासिक ललकार पुकारत भारताचे खरेखुरे ज्ञानी, विज्ञानवादी आणि विवेकी, असे पहिले पंतप्रधान पं. नेहरुंनी भारतीय स्वातंत्र्याची उद्घोषणा केली…. त्या, स्वातंत्र्यापश्चातच्या ७२ वर्षाच्या प्रवासातील ५ एप्रिल-२०२० रोजी रात्रौ ९ नंतरची ९ मिनिटे, हा एक ‘अंधारवाट’ दाखवणारा काळाकुट्ट ‘कालखंड’ ठरावा, ज्याची कुठल्याही विवेकी, विचारी भारतीयाला खचितच शरम वाटावी!

“साँप-सपेंरों का देश” अशी लाजिरवाणी प्रतिमा असलेला देश, मला विकास आणि विज्ञान याच्या आधारे मला बदलायचाय… असा २०१४च्या निवडणुकीत प्रचारकी घाट घालणाऱ्यांनीच, ही अवैज्ञानिक व अंधश्रद्धेचा आधार शोधणारी ‘अंधारवाट’, जनतेला सत्तेवर आल्यावर दाखवावी, यात फारसं आश्चर्य नाही; कारण, “विकास आणि विज्ञान” ही सत्तासोपान चढण्यासाठीची फक्त नौटंकी होती, खरा उद्देश पुन्हा तोच… जो, शेकडो वर्षे या भरतवर्षातील बहुजनांवर “ज्ञान पसरविण्याच्या बहाण्याखाली अंधश्रद्धेचं अज्ञान” पसरवून त्यांच्यावर शोषण, लुटालूट, अन्याय, अत्याचार यांनी ग्रासलेलं अभिजनवर्गाचं हितसंबंधी ‘राज्य’ करताना, आजवर जोपासला गेला होता!

“समस्त भारतीयांची एकता, एकतेतून करोना-विषाणुविरुद्धच्या लढ्याचा निर्धार निर्माण करणं”… हे काही टाळ्या-थाळ्या-घंटानादाचं किंवा कालच्या दीपोत्सवाच्या शिमग्याचं उद्दिष्ट नव्हतंच मुळी! तो सगळा प्रचारकी तमाशा वरकरणी दाखवायला… पण, खरा उद्देश पुन्हा अंधश्रद्धांचा फैलाव करुन श्रमिक बहुजनांना वैचारिकदृष्ट्या पथभ्रष्ट करुन त्यांच्यावर परिपूर्ण ताबा मिळवणे (त्याशिवाय, देशातल्या भांडवलदारांची सुपारी घेऊन शेतातल्या शेतकरी-शेतमजूरवर्गाला आणि कारखान्यातल्या कामकरीवर्गाला अगदी स्वस्तात राबवून कसं घेता येईल?) हाच होय. त्यासाठीच तर काल, ५ (तारीख) + ४ (महिना) = ९ तसेच, रात्रीचे ९ आणि पुढे ९ मिनिटे असला आकड्यांचा भुक्कड-भोंदू सारीपाट मांडला गेला आणि त्याआधी, टाळ्या-थाळ्या-घंटानादातून करोना निवारण्यासाठी फसवं ‘नादब्रह्मा’चं जाळं खुबीने विणलं गेलं!

“प्रयत्नातून परमेश्वर” असं ‘यत्नवाद’ रुजवणाऱ्या नेतृत्त्वापेक्षा नियती-नशिबाचा ‘शाॅर्टकट्’ दाखवणारं नेतृत्त्व, सामान्यजनांना नेहमीच सहजी संमोहित करु शकतं (आपलं पोर, परीक्षेत नापास झाल्यावर त्याच्या उडाणटप्पूपणाला नव्हे; तर, राहूकेतू ग्रहदशेला दोष देणारे पालक बहुसंख्येने असण्यामागे, हीच मानसिकता असते)… अंति घातकी ठरणारं ‘सामूहिक संमोहन’ ते हेच होय! बहुजनांना, आपल्या इच्छेनुसार, सोयीनुसार नियंत्रित करण्यासाठी पिढ्या न् पिढ्या वापरलं गेलेलं, तेच घोटून गुळगुळीत झालेलं निसरडं ‘तंत्र’, आता पुन्हा वापरलं जातंय… कालाय तस्मै नमः ! एकूणच सद्यस्थितीत नेतृत्त्वासाठी कोणी पं. नेहरुंसारखा विज्ञानवादी, ज्ञानी, विवेकी पंतप्रधान असण्याची गरज नाही…. ‘काळी जादू’ करणारा ‘बंगाली बाबा’ किंवा हवी तशी जादू करणारा जे. के. राऊलिंगचा ‘हॅरी पॉटर’ही चालू शकेल (अगदी जादूगार रघुवीर किंवा जादूगार इंद्रजितही चालेल). ही अशी, अवघ्या भारताला जी ग्लानी सध्या घेरुन आहे, ती सहजी निपटणार नाही… कारण, तिच्या घेऱ्यात पदव्यांची भेंडोळी पदरात पाडलेले तथाकथित सुशिक्षितसुद्धा (सुसंस्कृत नव्हे) मोठ्या संख्येने आहेत.

याच भरतभूमीत श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, शिवछत्रपती महाराज, म. फुले, छत्रपती शाहू, महर्षी धोंडू कर्वे, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, राजा राममोहन राॅय, ईश्वरचंद्र विद्यासागर, म. गांधी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, ओशो, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, साने गुरुजी, हमीद दलवाई, काॅ. श्रीपाद अमृत डांगे, डाॅ. नरेंद्र दाभोळकर, काॅ. गोविंद पानसरे, डाॅ. कलबुर्गी, गौरी लंकेश, तस्लिमा नसरिन …. या आणि इतर असंख्य राजकीय-सामाजिक विचारवंतांनी आणि महानुभाव पंथाचे चक्रधरस्वामी, संत कबीर, संत रोहिदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज… या आणि अशा अनेक संत-महंतांनी त्या त्या काळातल्या जालीम ‘व्यवस्थे’शी, त्यांच्या परिने व समजुतीने झुंज देत, प्रचलित अन्यायी-अत्याचारी ‘व्यवस्थे’शी विद्रोह करत समाजाच्या अज्ञान-अंधश्रद्धांच्या अंधःकाराची काजळी, “तसमो मा ज्योतिर्गमय”, या वेद-उपनिषदातल्या प्रकाश-तत्त्वानुसार फेडून टाकण्याचं मोठं क्रांतिकारी कार्य केलंय!

….त्याच भरतभूमीत, बहुजनांना भुलवून पुन्हा एकवार अंधश्रद्धेचा महाराक्षस पुनरुज्जीवित करण्याचं षडयंत्र धूमधडाक्यात रचलं जातंय. निहीत स्वार्थपूर्तीचं व अन्यायी वर्चस्ववादी सत्तेचं निर्माणकार्य, करोना-विषाणुच्या निमित्ताने सुरु झालंय, एवढंही आपल्या ध्यानी आलं नाही… तर, आपल्यासारखे दुर्दैवी जीव अन्य कोण असू शकतील?

…. त्याच भरतभूमीत, हा अंधश्रद्धेचा बाजार पसरवणारा काळाकुट्ट अंधार आज पसरु पहातोय, तरीही आम्ही हात बांधून गप्पच, या दुर्दैवाला काय म्हणावं?

…याअगोदरच, असे प्रयत्नवादापासून दूर नेणारे ‘दैववादी’ सरकारी संत-महंतांचे लाखोंचे कळप सेवेत असलेले ‘कारखाने’ या देशात (विशेषतः, महाराष्ट्रात) धूमधडाक्यात चालू आहेत… त्यांना अशा मजबूत शासकिय आधाराने यापुढे एकच ऊत येईल आणि सामान्य माणूस अधिकाधिक खोलवर ग्लानीत ढकलला जाईल, जिथून त्याला बाहेर खेचून काढणं, श्रीकृष्णापासून ते तस्लिमा नसरिनपर्यंत व चक्रधरस्वामींपासून ते तुकडोजी महाराजांपर्यंत, उपरोल्लेखित समाजहितैषी विचारवंतांनाही फार अवघड बनावं… मग, तिथे आमच्यासारख्या पामरांची काय कथा?

मित्रहो, करोना-विषाणू रोखण्याकामी आपल्या व्यावहारिक संचारासंदर्भातील ‘लाॅकडाऊन’, हे अगदी योग्यच… पण, आपल्या सारासार विवेकबुद्धीचं व पिढीजात शहाणपणाचं असं ‘लाॅकडाऊन’ मात्र, प्रत्यक्षात करोना-विषाणू संसर्गापेक्षाही अधिक घातक ठरेल !!!

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)