‘शिवजयंति’च्या निमित्ताने….

(आजच्या इंग्रजी दिनदर्शिकेनुसार असलेल्या ‘शिवजयंति’च्या निमित्ताने….)

शिवछत्रपतींनी एकूणच सर्वधर्मसमभावाचा, न्यायनीतिपूर्ण व्यवहाराचा (“जो चुकला, त्याला ठोकला”, या ‘व्यक्ति व जातधर्मपंथ’ निरपेक्ष रोकड्या-कणखर नीतिद्वारे)…जो केवळ, महाराष्ट्रापुरताच नव्हे; तर, संपूर्ण विश्वासाठी, मूर्तिमंत आदर्श घालून दिलाय; त्याला, कुठे तोड नाही!
म्हणूनच, “शिवछत्रपती, म्हणजे केवळ, ‘तलवारबाजी’ नव्हे; तर, उच्चकोटीच्या जीवनमुल्यांसाठी लावलेली ‘प्राणाची बाजी’ होती”!
आपल्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात, ‘आखरी रास्ता’ म्हणून, न्यायनीतिच्या प्रस्थापनेसाठीच, केवळ नाईलाजास्तव तलवार उचलणाऱ्या या महावीराने, आयुष्यात मोजकीच लहानमोठी युद्धं केली…आपल्याला लाभलेल्या अल्पायुष्याचा शक्यतेवढा समय, राज्यकारभाराची न्यायनीतिपूर्ण घडी बसवण्यात त्याने व्यतीत केला व मानवजातीपुढे एक महान आदर्श उभा केला.
…म्हणूनच, द्वापारयुगात घडलेल्या रामायणातील ‘रामा’पेक्षाही, ‘शिवाजी’ कितीतरी उजवा व श्रेष्ठ होता आणि रामायणकाळ ओलांडून द्वापारयुगाच्या अंताला घडलेल्या महाभारतातल्या ‘श्रीकृष्णा’शीच थेट नातं सांगणारा होता! त्याचं कारणही तसंच आहे… शिवछत्रपतींनी श्रीकृष्णालाच आपल्या सकल व्यवहारात उतरवलं (रामाला नव्हे) ते इतकं पराकोटीचं की, शिवछत्रपतींचा ‘गनिमीकावा’ असो, कठीण समय पाहून युद्धभूमीवरुन तात्पुरती माघार घेत योग्यसमय व योग्य युद्धभूमी निवडून शत्रूवर प्रतिहल्ला करणं असो (जसा, श्रीकृष्ण जरासंधाच्या मथुरेवरील सतरा आक्रमणांपासून माघार घेता झाला व ज्यामुळे, त्याला ‘रणछोडदास’ म्हणून संबोधलं गेलं…पण, अंति श्रीकृष्णानेच भीमाकरवी कौशल्याने जरासंधाचा वध केला, तद्वतच), त्यांची अखंड सावधानता असो, संकटातून न डगमगता मार्ग काढण्याची हातोटी असो, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात टाकून आघाडीवर राहून लढणं असो वा असो न्यायनीतिपूर्ण व्यवहार करण्याप्रसंगीची कठोरता… ही अशी अनेक स्वभाववैशिष्ट्ये, रणनीति व राज्यव्यवहार श्रीकृष्णाच्याच जीवनचरित्रावर-जीवनसंदेशावर पूर्णतः बेतलेला होता.
श्रीकृष्ण काय किंवा शिवछत्रपती काय; या दोघांनीही जनकल्याणार्थ जी प्रासंगिक ‘धोरण-लवचिकता’ दाखवली, ती लोकविलक्षणच होती… जी ‘धोरण-लवचिकता’, रामाला आपल्या संपूर्ण आयुष्यात व्यवहारात उतरवून अधिकचं जनकल्याण साधणं शक्य होतं…सीता व लवकुश या आपल्या कुटुंब-सदस्यांवर पराकोटीचा अन्याय होऊ न देणंही शक्य होतं… पण, शक्य असतानाही ते रामाला जमलं नव्हतं; कारण, महाभारतातल्या पितामह भीष्मांसारखीच आपल्या निहीत तत्त्वांना-वचनांना अविवेकी व अवाजवी कवटाळून बसण्याची रामाची घातकी वृत्ती नडली!
म्हणूनच, *राम ‘सत्ययुगा’त किंवा अधिक ताणलं तर, फारतर त्रेतायुगात ‘आदर्श’ म्हणून मिरवता येऊ शकेल…पण, श्रीकृष्ण काय किंवा शिवछत्रपती काय, ही दोन्ही महान व्यक्तित्वं…काळारंभीच्या ‘सत्ययुगा’पासून आजच्या ‘कलियुगा’पर्यंतच्या चारही-युगांच्या महाचक्रात कायमच ‘आदर्श व अनुकरणीय’ म्हणून, ध्रुवतार्‍यासारखी अढळ राहू शकतात!

तेव्हा, आज भारतातच नव्हे; तर, जगाच्या पाठीवर कुठेही…न्यायनीति, सुखसमाधान, शांतिच्या प्रस्थापनेसाठी, आपल्याला निरतिशय गरज आहे…ती रामाची नव्हे; तर, अवघ्या समष्टीच्या जगण्यातलं न्यायनीति-विवेकपूर्ण संतुलन-समन्वय साधणाऱ्या श्रीकृष्णाची आणि शिवछत्रपतींची…!!!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)