“शिवछत्रपती, म्हणजे ‘तलवारबाजी’ नव्हे, तर महान जीवनमूल्यांसाठी लावलेली ‘प्राणाची बाजी’!”

शिवछत्रपतींनी शेतीला सर्वंकष उत्तेजन दिलं… शेतीला उत्तेजन देतानाच, भूमिहीन भूदासांना (Serfs) कसायला जमिनीचे पट्टे नावावर करुन दिले. नैसर्गिक-आपत्तीत बी-बियाणे, शेतीची अवजारे पुरवून प्रसंगी शेतसारा देखील माफ केला…भूमिहीन कुळांच्या आयुष्याला ‘स्थिरता’ दिली. म्हणजेच, आजच्या परिभाषेत सांगायचं; तर, ‘कंत्राटी-कामगार’, नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ना (ज्यांच्या जगण्यातली ‘सुरक्षितता, स्थिरता व सन्मान’ हिरावून घेतला गेलाय) नोकरीत ‘कायम’ केले!

आपले राजकीय अंतःस्थ हेतू साध्य करण्याकामी, शिवछत्रपतींचं उठताबसता शिवछत्रपतींचं नाव घेणारे आजचे राज्यकर्ते व एकूणच सगळे प्रस्थापित राजकारणी, बरोबर उलटा व्यवहार-कारभार करताना दिसतात. ‘कंत्राटी-कामगार पद्धत-आऊटसोर्सिग’ वगैरे कामगारघातकी व घटनाविरोधी (‘Directive principles of state policy’ अथवा घटनेतील ‘राज्यकारभाराच्या मार्गदर्शक सूत्रां’च्या पूर्णतया विपरीत) पायंडे पाडून व चार काळ्या कामगार-कायद्यांची नवी काळीकुट्ट ‘कामगार-संहिता’ लादून… बहुसंख्य असलेल्या सगळ्याच कामगार-कर्मचारीवर्गाच्या आयुष्यात, प्रचंड ‘अस्थिरता व अस्वस्थता’ त्यांनी निर्माण केलीय. त्याद्वारे, अवघ्या कामगारविश्वालाच निव्वळ ‘अस्तित्ववादी-गुलाम’ बनवलंय… नाव शिवछत्रपतींचं; पण, कारभार औरंगजेबाचा!

…तेव्हा, शिवछत्रपतींचं हे वैशिष्ट्य, सतत ध्यानात ठेवलं पाहिजे की, त्यांनी शेतीला उत्तेजन देताना, एकाचवेळेस गोरगरीब भूमिहीनांच्या हाती हक्काचा ‘नांगर’ दिला (ज्यातून, राज्याची पडीक जमीन लागवडीखाली येऊन राज्याचा महसूलही वाढला) आणि गोरगरीब रयतेला लुटणाऱ्या तत्कालिन अत्याचारी बड्या धेंडांच्या गडकोटांवर गाढवाचा ‘नांगर’ फिरवला. त्यातूनच, गोरगरीब जनतेला प्रथमच कुठे न्याय मिळाला, जगण्याला भक्कम आधार मिळाला. त्यांना “शिवाजी, हा रयतेचा राजा आहे आणि ‘शिवाजी’चं राज्य, हे रयतेचं राज्य आहे”, असं प्रथमच खात्रीपूर्वक वाटू लागलं!
…आणि, म्हणूनच, शिवछत्रपतींच्या हाती तलवारीऐवजी, ‘नांगर’ दिसला पाहिजे, ‘नांगर’ दाखवायला पाहिजे!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)