“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल (युनोचे हवामानबदल-समितीचे प्रमुख)

निवडणुकीच्या रणधुमाळीत, आपल्यासह अवघ्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या आसाला भिडलेला हा क्षीण स्वर, ऐकू येतोय का आपल्याला, जरा पहा…!!!

जागतिक अर्थमंचाच्या (WEF) व्यासपीठावर वर्चस्व गाजवणारी G-20 राष्ट्रे (ज्याची, १८ वी परिषद गेल्यावर्षी ९-१० सप्टेंबर रोजी दिल्लीत मोठ्या दिमाखात भरवली गेली होती)…ही, जगातील ८०% ‘कार्बन-उत्सर्जना’स जबाबदार असून, तथाकथित ‘विकासा’च्या नावाखाली पृथ्वीमातेवरील जीवन नष्ट होण्यासंदर्भात ‘खलनायकी’ भूमिका बजावत आहेत…असं, अत्यंत रोखठोक व गंभीर प्रतिपादन, संयुक्त राष्ट्र संघाच्या (UNO) हवामानबदलविषयक समितीचे कार्यकारी सचिव श्री. सिमाॅन स्टिएल यांनी नुकतंच केलंय.

वर्ष-२०३० पर्यंत जागतिक ‘कार्बन-ऊत्सर्जन’ निम्म्याहून खाली आणून जागतिक-तापमानवाढ, औद्योगिक-क्रांतिपूर्व काळाच्या तुलनेत जास्तीतजास्त १.५°सें.ग्रे. पर्यंत मर्यादित राखण्याकामी योगदान देण्याऐवजी…या G20 राष्ट्रांनी अत्यंत बेजबाबदारपणे, गेल्यावर्षी कार्बन-ऊत्सर्जन कमी करण्याऐवजी वाढवलेलं आहे…अशी त्यांनी अत्यंत धक्कादायक सप्रमाण मांडणी केलीय.

जगभरातील युद्धजन्यस्थिती व ‘भांडवली-व्यवस्थे’तील ‘कार्बनकेंद्री-विकासा’चं मानवजातीला जडलेलं घातकी व्यसन…या दुहेरी पेचामुळे, राजकारण्यांच्या विषयपत्रिकेतून ‘निसर्ग-पर्यावरण संरक्षण-संवर्धना’चा मुद्दा जणू बाजुला पडल्यासारखा झालाय. त्यामुळे, एकूणच हा विषय, सकल मानवजातीच्या हातातून निसटून, त्याचे दोर निसर्ग, अत्यंत प्रलयंकारी स्वरुपात आपल्या हाती घेईल… ही भयंकर दुश्चिन्हं यापूर्वीच दिसू लागलीयत.

या पर्यावरणविषयक गंभीर इशाऱ्याने, आपल्याकडच्या लोकसभा-निवडणुकीच्या कॅनव्हासवर… मोदी-शाह, नितीन गडकरींसारख्या भाजपाई मंडळींचा उदोउदो करणाऱ्या ‘अंधभक्तां’च्या आतातरी ध्यानी आलं पाहिजे की, हे सगळेच ‘विकासपुरुष’ वगैरे नसून ‘विकारपुरुष’ आहेत. यांनी, आपल्या भांडवलदार-मित्रांना (Crony-Capitalists) लाखो कोटी नफा सहजी गिळंकृत करता यावा म्हणून, काँक्रिटचा कार्बनकेंद्री ‘भांडवली-विकार’, या देशात फैलावून दिलाय…तो देशासाठी आर्थिकदृष्ट्या तर घातकी होताच; पण, त्याचे भविष्यकालीन ‘पर्यावरणीय-आयाम’ही विध्वंसक आहेत. त्यामुळेच, आता या सगळ्या तथाकथित विकासाच्या राजकारणाचं सत्य-कठोर मूल्यमापन, वरील संदर्भात होणं, नितांत गरजेचं आहे…कारण, यातून अतिरेकी कार्बन-ऊत्सर्जनासोबतच छत्तीसगडचं हसदेव, मुंबईचं आरे काॅलनी, अंदमानचं ग्रेट-निकोबार वगैरे मधील, मोठ्याप्रमाणावर ‘कर्बग्रहण’ करणारी जंगलं तुटणार आहेत…शेकडो वर्षांचे लाखो महाकाय वृक्ष क्रूरपणे कापले जाणार आहेत किंवा याअगोदरच कापले गेले आहेत.

यातून, या भाजपाई सत्ताधाऱ्यांचा चारही बाजुंनी फायदा (चारों उंगलियाँ घी में) असा की, तथाकथित विकासाच्या नावाखाली अज्ञानी जनतेची व चंगळवादाला सोकावलेल्या मध्यमवर्गीयांची मतं तर मिळतातच…शिवाय, असा लाखो कोटींचा चुराडा करण्यासाठी, अगदी ५० वर्षांएवढ्या अतिप्रदीर्घ काळासाठीचीही कर्ज काढली गेलीयत (काँग्रेसच्या ७० वर्षांच्या कारकीर्दीत अशा प्रकारचं भयंकर आक्रित, अपवादात्मक परिस्थितीतही कधि घडलं नव्हंत), ज्यांची ‘परतफेड’ पुढील पिढ्यांना व पूढील सरकारांना कारावी लागणार आहे. पण, या प्रकल्पांमधल्या अतिप्रचंड नफ्याचे, तर हे सगळेच भाजपाई-संघीय लोकं आजचं भागिदार असतीलच (उदा. छुपी टक्केवारी व इलेक्टोरल-बाॅण्डस वगैरेंमधून निवडणुका जिंकण्यासाठी); शिवाय, महामार्गांच्या व नदी-खाडीवरील पुलांच्या; तसेच, रस्त्यांवरील उड्डाणपुलांच्या ‘टोल-वसुली’च्या सरकारी-दरोडेखोरीतून अफाट-अचाट महसुलाची प्राप्तीदेखील त्यांना तत्काळ होत राहील, ते वेगळंच!

म्हणूनच, नरेंद्र मोदींच्या भाजपा-सरकारने लादलेल्या ‘अघोषित-आणीबाणी’तील हुकूमशाहीविरुद्ध प्रामुख्याने, आपण या लोकसभा-निवडणुकीच्या रुपाने लढा देत असताना, या आपल्या तिसऱ्या स्वातंत्र्ययुद्धात (पहिलं ब्रिटिशांविरुद्धचं १९४७ सालचं, दुसरं १९७७च्या घोषित आणीबाणीविरुद्धचं व तिसरं आताच्या ‘अघोषित’ पण, अतिगंभीर स्वरुपाच्या आणीबाणीतील हुकूमशाहीविरुद्ध), कुठल्याही परिस्थितीत विजयी होण्यासाठी…वरील मुद्देही, प्रकर्षाने व अत्यंत गंभीरपणे भारतीय-मतदारांच्या (विशेषतः, महाराष्ट्रातील मराठी मतदारांच्या) आपण निदर्शनास आणले पाहिजेत…धन्यवाद!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष…भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही ‘हरित-पक्ष’…The First ‘Green-Political Party’ Of India)