देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ५
‘जुमले’वाल्यांचं सरकार आलं की, ‘जुलूम’ सहन करण्याशिवाय पर्याय रहात नाही….
अयोध्येत राममंदिर बांधलं यांनी; पण बेरोजगारी, महागाई, नोकरीच्या ठिकाणी ‘कंपनी-दहशतवाद’ (Corporate-Terrorism), हुकूमशाहीतली ‘सरकारी-दहशत’, अमानुष आर्थिक-विषमता, नोटबंदी-इलेक्टोरल बाॅण्ड्स्, ‘PMCare’ फंडासारखे या शतकातले सगळ्यात मोठे घोटाळे याद्वारे, तुमच्याआमच्या जगण्यातला त्यांनी ‘राम’ हिरावून घेतलाय…
ILOच्या म्हणण्यानुसार, भारतात ३० वर्षांखालील ८३% नवतरुण बेकार आहेत…अगदी, IITसारख्या सर्वोच्च तंत्रज्ञान-संस्थांमधून बाहेर पडणारे इंजिनिअर्सही आज मोठ्याप्रमाणावर बेरोजगार म्हणून फिरतायत; कारण, यांच्या गेल्या १०वर्षांच्या सत्ताकाळात ‘जाॅबलेस-ग्रोथ ते जाॅब-लाॅस ग्रोथ’ अशी, रोजगारनिर्मिती क्षेत्राची प्रचंड घसरण झालीय; म्हणजेच, जेवढी जेवढी म्हणून मोजक्या महाकाय कंपन्यांची प्रगती होत जाते, तेवढे तेवढे अधिकाधिक रोजगार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने व घृणास्पद व्यवस्थापकीय डावपेचांनी नष्ट होत जातात. गेल्या १०वर्षांत खाण्याचं तेल तिप्पट, गाड्यांचं इंधन-तेल दुप्पट; तर, स्वयंपाकाचा गॅस अडीचपट महागला. महामार्गांची रुंदी वाढली; पण, कामगार-कर्मचारीवर्गाच्या पगाराच्या पाकिटांची जाडी पूर्ण खंगली…अगदी चिप्पाडं झाली त्यांची. उड्डणपुलांचं-महामार्गाचं काँक्रीटचं जाळं वाढलं; पण, आपल्या व पुढच्या पिढ्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे केले यांनी. जनतेची क्रयशक्ति (खरेदी-शक्ति) घटली, बचत-क्षमता संपुष्टात येऊन कर्ज घेण्याचं प्रमाण बेसुमार वाढलं…गेल्या दोन वर्षात, घरची लक्ष्मी म्हणजेच, घरातलं सोनं गहाण ठेऊन कर्ज घेण्याचं प्रमाण २००० कोटींवरुन मारुतिसारखं कोटीच्या कोटी उड्डाण घेत २६,००० कोटींपर्यंत पोहोचलं!
…याचाच अर्थ, तुम्हाला-आम्हाला कायमचं ‘गुलाम’ बनवू पहातायत ते….
आपली अवस्था, त्या उंदरासारखी त्यांना करुन टाकायचीय, जो एकदा का पिंजऱ्यात कोंडला गेला की, बाहेर पडणं अशक्यच! २०२४ची लोकसभा-निवडणूक, हा तो ‘पिंजरा’ आहे…सावध राहून मतदान केलंत, तर त्या पिंजऱ्यातून वाचाल; नाहीतर, तुमच्यातला ‘माणूस’ हळूहळू मरुन जाईल… त्याची जागा एक ‘गुलाम’ घेईल! तुम्हाला ते उपाशी मारणार नाहीत; तुम्हाला ते निश्चितच तगवतील… १२ तासाला दरमहा १२ हजार पगार देऊन किंवा आज देतात, तसं ८० कोटी लोकांना दरमहा ५ किलो मोफत धान्य देऊन (मात्र, ती किरकोळ मदत, मोदी-शहा सरकारने दिलेली असल्याने, त्याला ‘रेवडी’ म्हणायला ‘बंदी’च); पण, सन्मानाने जगवणार मात्र, नाहीत!
...दावणीला बांधलेल्या, गोठ्यात कोंडलेल्या गुराढोरांसारखं, पुढ्यात टाकलेल्या दर महिन्याच्या ५ किलो चाऱ्यावर गपगुमान गुजराण करायची वेळ आपल्यावर येईल आणि ही भाजपाई-संघीय ‘गुजराथी-लाॅबी’ तुमच्या छाताडावर थयथया नाचेल!
सत्यवचनी राम, स्वप्नात दिलेलं वचन पाळणारा राजा हरिश्चंद्र… ही भारतीय-अध्यात्माची मूर्तिमंत प्रतिकं…तर, हे उठताबसता फेकाफेक करणारे राजरोस ‘फेकू’ आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख टाकणारे, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या निर्माण करणारे महानिर्लज्ज ‘जुमलेबाज’!
…तेव्हा, लक्षात ठेवा, ‘जुमले’वाल्यांचं सरकार आलं की, ‘जुलूम’ सहन करण्याशिवाय पर्याय रहात नाही… त्यांनी लाथा घातल्या तरी, ‘काय छान मालिश केलंत’, शिव्या घातल्या तर, ‘काय छान ओव्या म्हटल्यात’ आणि तोंडावर हे जुमलेबाज थुंकले तरी, ‘काय छान आंघोळ घातलीत’, असं बोलायची नामुष्की आपल्यावर येईल…
तुमच्या त्या ‘शिंदे-पवार’ गटाचं दुसरं काय चाललंय भाजपवाल्यांपुढे? आणि जे, ईडी/आयटी/सीबीआयच्या धाडी पडायला नकोत…म्हणून अगोदरच ढुंगणाला पाय लावून भाजपाच्या दिशेने पळालेत…त्यांचंही वेगळं काय चाललंय?
जगायचंय तुम्हाला असलं ‘गुलामी’चं जीण?? नसेल जगायचं…तर आजचं विचार करुन ठेवा आणि ‘इंडिया-आघाडी’ला साध्या नव्हे; प्रचंड बहुमताने विजयी करा; कारण, त्या EVMच्या किमान काही टक्क्यांच्या हेराफेरीला ओलांडून, आपल्याला ही लोकसभा-निवडणूक जिंकण्याखेरीज दुसरातिसरा कुठलाही इतर पर्याय नाही…
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)