सरकारी ‘शिवजयंति’च्या पूर्वसंध्येला अरविंद केजरीवालांच्या भीमपराक्रमाचा आगळावेगळा; पण, मराठी माणसांच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण अन्वयार्थ…..

Terrorist>>>Traitor>>> Disruptor>>> indisputable Leader…. thy name is Arvind Kejriwal !!!

सौ. सुनिताबाई, आपल्या पतीच्या दिल्ली दिग्विजयापश्चात काय प्रतिक्रिया देतायत, जरा डोकावून पाहूया तर……..

सखोल विश्लेषणाअंति, दिल्ली विधानसभा-२०२० निवडणुकीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील ‘आप’च्या दैदिप्यमान विजयाचे विविधप्रकारे अन्वयार्थ देशभरातील राजकीय विश्लेषक सुयोग्यरित्या लावत असले; तरीही, त्या विश्लेषणांच्या पलिकडे जाऊन अरविंद केजरीवाल यांच्या सुविद्य पत्नीने दिलेली प्रतिक्रिया, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी माणसांसाठी फारच उदबोधक ठरावी!

सौ. सुनिता केजरीवाल वाहिनीवरील मुलाखतीत म्हणाल्या की, “आम आदमी पार्टीचं सक्षम प्रशासन व सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार निर्मूलनाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीसोबतच वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या जीवनावश्यक मुलभूत बाबींसंदर्भात बजावलेल्या कामगिरीमुळेच ‘मतांच्या धृवीकरणा’च्या समाजघातकी राजकारणाला साफ नाकारुन दिल्लीकरांनी ‘आप’ला भरघोस मतदान केलं”, ही चपखल प्रतिक्रिया असली; तरीही, सौ. सुनिता केजरीवाल पुढे जे काही म्हणाल्या, ते मराठी माणसांसाठी राजकीयदृष्ट्या फारच महत्त्वाचं आहे. त्या पुढे म्हणाल्या, “आप सरकारची कामगिरी, अशा तऱ्हेनं इतर पूर्वीच्या दिल्ली सरकारांपैकी कितीही क्रांतिकारक व भव्यदिव्य असली; तरीही, ती समजून-उमजून घेऊन त्याप्रमाणे ‘मतदान करण्याची’ समज दाखवण्याइतपत ‘दिल्लीकर’ जनता ‘शहाणी व बुद्धिमान’ आहे, म्हणूनच केवळ, हा चमत्कार घडू शकला!”

महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून, सुनिताबाईंच्या म्हणण्यात खूपच गर्भितार्थ आहे. ज्या महाराष्ट्राला जगातल्या कुठल्याही प्रदेशात नसेल, एवढी अत्युच्च कोटीच्या जाज्ज्वल्य संतांची ‘मांदियाळी’ लाभली, ज्या महाराष्ट्राला ‘विश्ववंदनीय’ असा, सर्वांना न्याय देणारा व सर्वांचंच ‘कल्याण’ साधणारा ‘शिवछत्रपतीं’सारखा राजा लाभला… म. फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, आगरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी. डी. देशमुख, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे ‘माहिती अधिकारा’चं लोकशाही-शस्त्र आपल्या हाती देणारे ऋषितुल्य अण्णा हजारे यासारखे असंख्य समाजसुधारक व सच्चे राजकारणी अध्वर्यू ज्या, महाराष्ट्राला लाभले… त्या, महाराष्ट्राची आजची सामाजिक, बौद्धिक व राजकीय कुंठितावस्था पाहून शरमेनं मान खाली घालावीशी वाटते.

“अनेक प्रसंगी वीस वर्षांच्या जैन-गुजराथी-मारवाडी तरुणाला जी ‘समज’ आहे, ती साठ वर्षांच्या मराठी-प्रौढाला नसावी, हा दाहक अनुभव रोजच्या जीवनात येत रहातो, हे केवढं महाराष्ट्राचं दुर्दैवं!” अहो, उत्तरभारतीय अशिक्षितालाही आपल्यापेक्षा प्रसंगी बरी राजकीय समज असते. त्यामुळेच एखादं उदाहरणच द्यायचं झालं तर, रेल्वेची अडचण झाल्यास महाराष्ट्रातल्या ट्रेन्स एकवेळ रद्द होतात; पण, उत्तरभारतातल्या बिनतिकीटाच्या फुकट्या प्रवाश्यांना नेणाऱ्या गाड्या कधि सहजी रद्द होत नाहीत की, त्यांनी धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवड्यांना अजून महाराष्ट्रासारखा, उत्तर भारत ‘भारतीयत्वा’च्या फसव्या, गोंडस आवरणाखाली आपला ‘सातबारा’ त्यांच्या नावे करत आंदण दिलेला नाही!

या अशा परिस्थितीमुळे, महाराष्ट्रातली लाखो-करोडोची दिशाहीन व छंदीफंदी बनलेली तरुणाई… कधी, लाखोंच्या जाती-आरक्षणाच्या महामोर्चात रस्तोरस्ती दिसते, कधि ‘सरकारी संतां’च्या लाखोंच्या ढोंगी-दांभिक संप्रदायात दिसते, कधि नवसाला पावण्याची हमी (गॅरंटी) देणाऱ्या गणेश देवालयात अथवा सार्वजनिक गणेशोत्सवात दिसते, कधि शहरी व ग्रामीण भागातसुद्धा क्रिकेटसारख्या निष्फळ-निरर्थक खेळउत्सवांमधून आपला महत्त्वाचा वेळ वाया घालवताना दिसते (जेव्हा, इतरे प्रांतीय तरुणाई जगण्याची विविध क्षेत्रे, महाराष्ट्राच्या मुलुख मैदानात कठोर मेहनतीने पादाक्रांत करताना दिसतेय), कधि बदमाष राजकारण्यांच्या पैशानं सार्वजनिक पूजा-सणवारांचा महोत्सवी रतीब घालताना दिसते… तर, कधि सर्रास दररोज झेंडे-अॅजेंडे बदलणाऱ्या भ्रष्ट-घराणेबाज राजकारण्यांच्या मागे फुकटात मजा मारण्यासाठी मेंढरासारखी धावताना दिसते!

जिथे जावं तिथे, काही बडी राजकारणी मंडळी, “कामगार-चळवळ संपल्याचं” (म्हणजे, यांनीच मिळून त्या तळागाळातल्या श्रमिकवर्गाच्या चळवळीचं देशी-विदेशी उद्योगपतींच्या हातात हात घालून श्राद्ध घातलेलं असतं) आमच्यासमोर बिनदिक्कत बोलताना जाहीर करतात… तर, काही असंख्य अभिजन-मंडळी, आमचे पाय मागे खेचण्यासाठी, आम्हाला खाजगीत आगंतूक सल्ला देऊ पहातात की, “कामगारांना १०,००० रुपये पगार खूप झाला हो. अहो, त्यांना कुठे तुम्ही डोक्यावर चढवताय, राजन राजे?… पायातली वहाण पायात राहू द्या! अलिकडचे कामगार म्हणजे, फक्त पगारवाढ, बोनस, बढती, ओव्हरटाईम यातच अडकलेली दोन पायांची एक नंबरची स्वार्थी जनावरं आहेत… त्यांना ना कसला विधिनिषेध, ना कसली तत्त्वं, ना कसली नैतिकता… तुमची सैद्धांतिक भूमिका कुठून त्यांना समजायची? म्हणून तर, त्यांच्यामधून जातिवंत-जाज्वल्य राजकीय कार्यकर्ते तयार होण्याची परंपरा गेले कित्येक दशके खंडित झालीय, राजन राजे! …त्यांना ‘कंत्राटी-कामगार पद्धतीत नाहीतर, ज्याच्याविरुद्ध तुम्ही ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन सध्या कंठशोष करत आहात त्या, ‘नीम’ (NEEM) मध्येच सडू द्यात… तरच, ते नीट ठिकाणावर रहातील आणि इमानदारीत मरमरुन काम करतील. जरा, कुठे नोकरीत ‘कायम’ झाले किंवा युनियन केली की, त्यांची हजार नाटकं चालू होतात!” …..हे सगळं ऐकताना कानशिलं तापतात, कानात कुणी लाव्हारसं ओततय, असं वाटतं रहातं, संताप होतो जीवाचा… पण, त्याचवेळी, कुठेतरी जे आजवर अनेक कंपन्यांमधल्या कामगारांनी असंख्य पाठीवर घाव केलेत, ते खुणावत रहातात आणि चरफडत गप्प बसावं लागतं.

महाराष्ट्रात सध्या ‘कंपनी-दहशतवादा’ने (Corporate-Terrorism) जो सर्व उद्योगजगतात भयंकर धुमाकूळ घातला आहे; त्यामुळे, सर्व मराठी नोकरवर्ग हतबल होऊन गुलामगिरीत पिचलेला दिसतो; त्याचंही, मूळ कारणदेखील, हेच होय. उद्योग जगतात दिवस-रात्र राबणाऱ्या या तरुण श्रमिकवर्गाला (त्यात, NEEM मुळे इंजिनिअर्स, अकाऊंटंट्स्, आयटी-अभियंते, महत्त्वाची कामे करणारे ऑफिस-असिस्टंट्स् आदि उच्चशिक्षित तरुणवर्गही या असुरक्षितता आणि शोषणाच्या कचाट्यात सापडलाय) लुटून व त्याचं प्रचंड शोषण करुनच ही सध्याची संपूर्ण राजकीय व प्रशासकीय व्यवस्था, जिला आम्ही नेहमी रक्तपिपासू-शोषक व्यवस्था (Vampire State-System) असं म्हणतो, ती निर्वेधपणे चालू राहते.

“सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः” म्हणून, शिवछत्रपतींचा राज्यकारभार, राजनीति आजही कालसुसंगत ठरावी…. शिवछत्रपतींनी भूदासावरींल वतनदार-सरंजामदारांची अमर्याद पिळवणूक करणारी हुकमत व सत्ता संपुष्टात आणली… सरंजामदार-जमिनदारांकडील अतिरिक्त जमीन काढून घेऊन त्याचं भूहिनांना वाटप केलं… सर्वात महत्त्वाचं म्हणजे, “कुळांना जमिनीचे पट्टे कसायला देऊन आयुष्यात स्थिरता दिली”, याचाच आजच्या परिभाषेतला अर्थ, जणू “कंत्राटी-कामगार प्रथेच्या गुलामीत अथवा ‘नीम (NEEM)च्या अमानुष पिळवणुकीच्या चक्रात अडकलेल्या तळागाळातील हतबल व अभागी श्रमिकवर्गाला नोकरीत कायम करुन त्यांना सुखसमाधान व स्थिरता दिली”… ही ती कल्याणकारी-जाज्वल्य ‘शिवशाही’ होय!!! नाहीतर आताची, उद्योगपतींच्या ताटाखालची सगळी राजकारणी ‘मांजरं’, शिवछत्रपतींच्या नावाचा खोटा जप करत व त्यांचे मोठे पुतळे उभारत, ‘कायम-कामगार’, ही संकल्पनाच नष्ट करण्याच्या महापातकात बेशरमपणे सामील झालेली भारतभर दिसतात.

….रायगडाला कधितरी जाग आली”; म्हणून शिवछत्रपती शतकानुशतकांची गुलामगिरी संपवून नवा कल्याणकारी महाराष्ट्र घडवू शकले. ही अशीच जाग, आमच्या महाराष्ट्रातल्या तरुण मुला-मुलींना, कामगार-कर्मचारीवर्गाला कधी येणार… त्यांची राजकीय समज मूलतः कधि वाढणार… जातधर्माचा भुक्कड अभिनिवेश व ढोंगी-दलाल राजकारण्यांची ‘व्यक्तिगत-पूजा’ (गल्लोगल्ली, शहर-उपनगर-तालुक्यातले साहेब, दादा, भाई, धर्मवीर, कर्मवीर वगैरे वगैरे) सोडून नीतिपर सद्विचारांची कास कधि धरतील… हाच, या घडीचा यक्षप्रश्न होय!

या प्रश्नाचे उत्तर सापडले तर, महाराष्ट्रात चमत्कार घडू लागेल. शिवछत्रपतींच्या जात-धर्मनिरपेक्ष अशा सर्वांचेच हित आणि कल्याण साधणाऱ्या जातिवंत ‘शिवशाही’चं (शिवसेनेची नौटंकी ‘शिवशाही’ नव्हे) अनोखं दर्शन, महाराष्ट्राला घडायला सुरुवात होईल. कारण, त्यावेळी, धर्मराज्य पक्ष आणि धर्मराज्य पक्षाचे ज्वलंत विचार महाराष्ट्राच्या सांदीकोपर्‍यात पोहोचलेले असतील. ज्याप्रमाणे, शेकडो वर्षांनी शिवछत्रपतींच्या कालखंडानंतर प्रथमच महाराष्ट्राने सुखाचा निश्वास सोडला; तसाच, महाराष्ट्रातच्या नशिबी असली तर, ‘धर्मराज्य पक्षा’च्या राजवटीत महाराष्ट्र सुखाने जगू लागेल. दिल्लीकरांनी ज्यापद्धतीने उच्चदर्जाची राजकीय समज दाखवली, तशीच जाज्वल्य स्वरुपाची समज महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना दाखवावी लागेल.

महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातल्या स्थानिक मराठी माणसांचे प्रश्न, हे दिल्लीच्या प्रश्नांपेक्षाही (किंवा भारतातल्या अन्य राज्यांपेक्षा) फारच गुंतागुंतीचे, व्यामिश्र आणि अक्षरशः खंडोगणती आहेत. याचं कारण, स्वातंत्र्यापश्चात सात दशकांहून अधिक काळ, महाराष्ट्रात संपूर्ण भारत ओतला गेलाय… महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी माणसाच्या हातून आणि चिमटीतून महाराष्ट्राची लालकाळी माती केव्हाचीच निसटायला लागलीय. आमच्या निसर्ग-पर्यावरणाचा साफ विध्वंस झालाय. आमची तरुण मराठी पोरं, ‘भिक्षांदेही’ म्हणत माधुकरी मागणाऱ्यांसारखी गरगर फिरत ‘सैराट’ होऊन मिळेल त्या फडतूस नोकऱ्यांच्या मागे धावताना दिसतायत… ना तिथे, त्यांना अजिबात समाधानकारक पगार, ना नोकरीची कुठलीही काडीमात्र हमी…. अशी केविलवाणी जगण्याची कोंडी, या व्यवस्थेनं केलेली आहे.

असं म्हणतात की, दिल्लीमधील सरकारी शिक्षणसंस्थांमधून काम करणाऱ्या शिक्षकांची कंत्राटी-नोकरीची गुलामगिरी, अरविंद केजरीवाल सरकारने संपुष्टात आणलीय. मित्रहो, कंत्राटी पद्धतीतील गुलामगिरी काय असते, हे मी स्वतः अरविंद केजरीवाल यांना, २ डिसेंबर-२०१२मधील रोहा येथील सभेप्रसंगी नीट समजावून सांगितली होतं. तेव्हा, प्रथमच अरविंद केजरीवालांना या समस्येविषयी ज्ञान झालं आणि या समस्येविषयी त्यांना भान आलं. दिल्लीच्या सरकारी शिक्षकांची कंत्राटदारी पद्धतीमधली गुलामगिरी खरीच संपुष्टात आली किंवा नाही, हे आपल्याला नीट तपासून पहावे लागेल. मात्र, इतर राजकारण्यांपेक्षा अरविंद केजरीवाल हे राजकारणी म्हणून कितीही उजवे असले; तरीही, ते गुलामगिरीस्वरुप अथवा अस्पृश्यतास्वरुप असलेल्या, खाजगी उद्योगसेवा क्षेत्रातील कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करतील अथवा अलीकडच्या २०१४ सालापासून नरेंद्र नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या ‘नीम’ (NEEM) या अधिक घातकी व्यवस्थेविरुद्ध अरविंद केजरीवाल कडक उपायोजना करु शकतील… असं चित्र, निदान सध्याच्या घडीला तरी दिसत नाही. आपल्यालाच ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन पुढे होत, सामान्य मराठीजनांचा आवाज बुलंद करत, नवा महाराष्ट्र त्यांची जगण्याची ‘कोंडी’ संपवून त्यांना मोकळा ‘अवकाश’ देणारा घडवावा लागेल! कामगारांना नैतिकतेचं शिक्षण देत त्यांच्यात सामाजिक-बांधिलकी निर्माण करण्यासाठी अजून कसून प्रयत्न आपल्याला करावे लागतील… त्यांची राजकीय-समज प्रयत्नपूर्वक वाढवावी लागेल. ज्याप्रमाणे, प्रगत देशांमध्ये कामगार आणि कामगारनेतेच राजकारणाचा गाडा हाकताना दिसतात; त्याचप्रमाणे, जसा ठाकरे-पवार राजकीय घराण्यांच्या उदयापूर्वी १९७० सालापर्यंत, महाराष्ट्रातल्या मराठी श्रमिकवर्गाचा आवाज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर वर्चस्व गाजवून होता… तोच काळ, पुन्हा आपल्याला खेचून आणावा लागेल. अन्यथा, शतकानुशतके आपल्याच महाराष्ट्रातल्या लालकाळ्या मातीत, तळागाळातल्या मराठी माणसांच्या पिढ्यानपिढ्या गुलामगिरीच्या अंधःकारात खितपत पडताना दिसतील!

….म्हणूनच, सौ सुनीता केजरीवाल, ज्या दिल्लीकरांच्या “समज आणि शहाणपणा”विषयी बोलतात; ती समज आणि तो शहाणपणा, आम्हाला आमच्यात निर्माण करावा लागेल. नव्हे, तो आम्ही निर्माण केलाच पाहिजे. तरच, धर्मराज्य पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून येण्याचा मार्ग मोकळा होईल आणि महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि महाराष्ट्राच्या अस्मानात भिनलेला… हा गुलामगिरीचा अंधःकार कायमचा दूर होऊ शकेल…

जय महाराष्ट्र, जय हिंद!!!

…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)