(सोबत जोडलेल्या बातमीचा आधार घेत खालील माझं प्रसंगोचित भाष्य…..)
केंद्र आणि राज्य सरकारला भांडवलदारांच्या हितासाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांची बेसुमार पिळवणूक करण्याची सुवर्णसंधी ‘करोना-लाॅकडाऊन’मुळे निर्माण झाली आहे, हे शंभर टक्के सत्य आणि त्याचा ते दमनचक्र वेगाने फिरवून “Profits are private and losses are public”, या भांडवली-तत्त्वानुसार अमानुष फायदा घेतीलच. यालाच, त्याच्या भांडवली-व्यवस्थापकीय परिभाषेत ते, “संकटात संधि शोधणं” म्हणून गौरवांकितसुद्धा करतीलच!
…परंतु, यदाकदाचित हा फासा उलटा पडून १९६०-७०च्या दशकासारखी कामगार-क्रांति (communist) उभी राह्यलीच तर???
ते काहीही असो अथवा होवो… पण, या करोना-महासंकटाच्या निमित्ताने एकूणच मानवी-जगण्यासंदर्भात सखोल व मूलगामी पुनर्विचार करण्याची वेळ मात्र, खचितच आपल्यावर आलेली आहे…
भारतीय आध्यात्मिक परंपरा व विचारधारेनुसार “साधी रहाणी, उच्च विचारसरणी” हे सर्वोच्च मूल्य होय! या संपूर्ण लाॅकडाऊन काळात आपण ते उत्तमरित्या स्वानुभवाने जाणलं. यापुढे, निसर्ग-पर्यावरणाचं भान सदैव राखत, त्याला पूर्णतया जपतचं आपल्या जीवनशैलीचं, अर्थव्यवस्थेचं व विकासाच्या प्रारुपाचं आरेखन-मांडणी व्हायला हवी. जगण्याचा सारीपाट, तीनचारशे वर्ष मागे जात, पुन्हा नव्याने मांडला जायलाच हवा!
जेव्हा, वैज्ञानिक संशोधनाच्या राक्षसी बळावर युरोप-अमेरिकेत “यंत्र आणि यंत्रवाद” प्रचंड धुमाकूळ घालत होता, तेव्हाच तिथूनच बॅरिस्टर होऊन परतलेला एक भारतीय महात्मा, गर्जत होता… “माझा विरोध, यंत्राला नव्हे; तर, ‘यंत्रवादा’ला मात्र जरुर आहेच! आज आपल्याला उमगतयं की, यंत्र-तंत्रवादामुळेच आणि विवेक सोडून विज्ञानवादाच्या अतिरेकी आहारी गेल्यामुळेच, आजच्या जागतिक तापमानवाढीसारख्या महासंकटांची शृंखला उभी राह्यलीय. लाखोंचे बळी घेणारी करोना-विषाणुची जागतिक संसर्गजन्य प्राणघातक साथ, ही एक त्या शृंखलेतील एक कडी मात्र केवळ आहे. “गड्या गाव अपुला बरा”, असं म्हणतं, आपण ज्या गावांकडे फारसं कधि ढुंकूनही पाहीलं नाही… त्याचं गावकुसांचा आधार शोधत, शहर सोडून आपण निघालो आणि म्हणूनच, आपल्यापैकी अनेकजण या संसर्गापासून वाचू शकले. पण, जेव्हा हा महात्मा “खेड्याकडे चला” म्हणत होता… तेव्हा, त्याची आपण टिंगलटवाळी करण्यात धन्यता मानली.
मित्रहो, गांधीवादानुसार “जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”… म्हणजेच, विज्ञानाचा आधार घेऊन बेभान जगण्याचा जुगार कधिही खेळला जाऊ नये, हे आपणा सर्वांकडून अपेक्षित होतं. पण, आपण विज्ञानाचा हात धरुन गेली साडेतीनशे-पावणेचारशे वर्षे तो आत्मघातकी जुगार खेळत आलेलो आहोत आणि त्याचीच विनाशकारी फळं आताशी भोगतो आहोत.
“पृथ्वी, जीवन देण्यासाठी आहे… नोकऱ्या देण्यासाठी नव्हे आणि निसर्ग-पर्यावरणाचे घात करणारे उद्योगधंदे-व्यवसाय, अर्थव्यवस्था, विकासाचं प्रारुप राबवण्यासाठी तर, नव्हेच नव्हे! त्यानुसारच, इथून पुढे आपली मांडणी असायला हवी…. दुसरातिसरा कुठलाही नोकऱ्या-उद्योगधंदे देण्याच्याच दृष्टीने केवळ आखलेला मार्ग स्विकारणे, नजिकच्या काळात मानवजातीसाठी, विशेषतः पुढील पिढ्यांसाठी, अतिशय धोकादायक व आत्मविनाशी ठरेल!!!
… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)