राममंदिर न्यायालयीन-निर्णय प्रक्रियेतून बांधलंत (स्वतःच्या निर्णयानुसार नव्हे), रामजन्मभूमीपासून दूर बांधलंत…तरी, सगळ्यांनी स्विकारलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीसा वादग्रस्त होता, त्यातून न्यायमूर्ती गांगुली राज्यसभेवर गेल्याचं बोललं जातं…तरीही, अगदी मुस्लिमांनीसुद्धा समजूतदारपणा दाखवून बव्हंशी शांतपणे सगळं स्विकारलं…पण, तुम्ही लोकशाहीवरच, निवडणूक-प्रक्रियेवरच घाला घालू पहाल… तर, हा तमाम भारत, ‘अळीमिळी गूपचिळी’, असा चूप बसणार नाही…तुम्हाला या लोकसभा-निवडणुकीतून तो धडा शिकवेलच!
…हं, आपण म्हणू शकतो की, यांना प्रभूरामाने २०१४ला संधि दिली (अर्थात, तेव्हा हे थापाडे-जुमलेबाज, ‘सब का साथ, सब का विकास’ म्हणतं, फसव्या ‘गुजराथ-माॅडेल’ची ढोंगी जाहिरातबाजी करत होते आणि ‘राममंदिर’, हा राजकीय-पटलावरचा विषय नसून, तो ‘आस्थे’चा विषय आहे, असंही म्हणत होते).
‘लांडगा आला रे आला’ अशी बतावणी करणार्याला जशी दोनदा संधि दिली गेल्याची कथा, आपण ऐकत आलोत; तशीच, भारतीय-जनतेनं ‘पुलवामा-हत्याकांड व बालासोर सर्जिकल-स्ट्राईक’ या संपूर्ण संशयास्पद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, या थापेबाज ‘गुजराथी-लाॅबी’ला २०१९मध्ये पुन्हा ५ वर्षांची मुदत वाढवून दिली…पण, त्यांनी संधिचं ‘सोनं’ करण्याऐवजी संधिची ‘माती’ केली… सोनं झालंच नाही कुणाचं, असंही नव्हे…ते अंबानी-अदानीसारख्यांचं झालं…लाखो कोटी रुपयांनी त्यांच्या धंद्यांची, अगदी कोविड-काळातही बरकत झाली आणि तमाम भारतीय जनतेच्या जगण्याची बेरोजगारी, अर्धरोजगारी आणि महागाईने अक्षरशः ‘माती’ झाली!
…हे भोग भोगत असतानाच, आपल्या धमन्या-धमन्यांमधून ‘लोकशाही’चं रक्त व आपल्या उरात व्यक्ति-स्वातंत्र्याच्या उर्मिचं वारं खेळवणाऱ्या भारतीय जनतेवर…’तुझी ५ किलो धान्याची भीक नको; पण, तुझा तो ‘सरकारी-दहशती’चा गुरगुरणारा कुत्रा आवर’, असं, दिल्लीच्या हुकूमशहाला सांगण्याची वाईट वेळ आली!
…कालपर्यंत, तथाकथित ‘हिंदुराष्ट्रा’च्या निर्मितीआड येणारी राज्यघटना-संविधान बदलण्याची (म्हणजेच, मुठभरांच्या हातात सत्ता-संपत्ती ठेवणं व महिलावर्गासह बाकी जनतेवर ‘मनुस्मृती’च्या आधारे वरवंटा फिरवणं) उर्मट भाषा बोलणारे…पायाखालची वाळू सरकायला लागली; तसे, अचानक, ‘संविधान-प्रेमी’ बनल्याची नौटंकी सगळ्या जनतेनं नुकतीच पाहिली. ‘लबाड लांडगं स्वांग करतंय’, या मराठी-गाण्याच्या धर्तीवरचं त्यांचं संविधानावरचं ढोंगी प्रेम, एवढं ऊतू गेलं की, “खुद्द बाबासाहेब आले तरी, संविधान बदलू शकणार नाहीत”, अशी एकदम कोलांटी उडी मारुन ते गर्जना करत मोकळे झाले!
…अरे, कशाला बाबासाहेबांचं नाव घेता, शोभतं तुमच्या तोंडात? नाव घ्यायचं तर, तुमच्या गोळवलकर गुरुजींचं घ्या…बाबासाहेबांनी स्वतःच राज्यघटनेत घटनादुरुस्तीची यथायोग्य तरतूद करुन ठेवलीय (ज्याला,१९७३सालच्या, याच एप्रिल महिन्यातल्या २४ तारखेला लागलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ‘केशवानंद भारती’ सर्वोच्च न्यायालयीन निकालानुसारच्या राज्यघटनेच्या ‘मूलभूत चौकटी’ची मर्यादा आहेच)…पण, तुमच्या ‘काळ्या’ टोपीखालच्या डोक्यात जे ‘काळंबेरं’ आहे ना आणि तुमच्या ‘काळ्या’ मनात जे आहे ना, त्याला उद्देशून आम्ही बोलतो आहोत…”घटनेत दुरुस्ती करणं वेगळं आणि घटनाच बदलणं वेगळं”…तुम्हाला घटनाच मुळातून बदलायचीय; केवळ आणि केवळ, “मोजक्यांच्याच हातात ‘राजलक्ष्मी’ (सत्ता) आणि ‘महालक्ष्मी’ (संपत्ती) ठेवण्याची तुमची वर्णवर्चस्ववादी-शोषक-अत्याचारी मानसिकताच, त्यामागे आहे”… तेव्हा, मुंबई बॉम्बस्फोटावर आलेल्या ‘ब्लॅक-फ्रायडे’ चित्रपटामध्ये ‘के के मेनन’ या नटाच्या तोंडी एक प्रभावी संवाद (डायलॉग) आठवतो, तो असा… “पण, यावेळी अल्ला आमच्या बाजुने होता…म्हणून, तुमचं RDX पकडलं गेलं”. अगदी, त्याचधर्तीवर, लोकशाही-स्वातंत्र्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या, समस्त-सर्वधर्मीय भारतीय जनतेनं म्हटलं पाहिजे, “भले तुम्ही एक नव्हे, अनेक मंदिरं बांधा…हव्या तेवढ्या मंदिरांना भेटी द्या, हव्या तेवढ्या पूजा-होमहवन करा…पण, २०२४च्या लोकसभा-निवडणुकीत ‘राम’, न्यायाच्या; म्हणजे, आमच्या बाजुने उभा आहे”!
….हो, ही लढत केवळ NDA विरुद्ध INDIA आघाडी अशी नव्हे; तर ती आहे, “भारतीय जनता पक्ष विरुद्ध भारतीय जनता”, अशीच!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)