“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ११ : शिवसैनिकहो, तुमच्यासाठी…..

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ११

———————————————————————————-

शिवसैनिकहो, तुमच्यासाठी…..

शिवसेनापक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे, ‘मातोश्री’वर येणाऱ्या शिवसेनेतील नवागतांना…”आज माझ्या हाती तुम्हाला देण्यासारखं काहीही नसताना, तुम्ही माझ्याकडे आलात, हे विशेष आहे”, असं म्हणत असतात. त्यामुळे कुठेतरी, तुमच्या हृदयात निश्चितपणे गलबलून येत असणार. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, भातशेतीसाठी ‘राब’ भाजायचे दिवस आहेत सध्या…म्हणूनच, तो धागा पकडून तुम्ही, मा. उद्धवजींना सांगितलं पाहिजे की, “उद्धवजी, महाराष्ट्रभरात तुम्ही जिथे जिथे जाताय, तिथे उसळणारा हा सगळा जनसागर-जन’सैलाब’, लोकसभा-निवडणुकीच्या मतपेटीतून भाजपा-NDAच्या हुकूमशाही-अत्याचारी राजवटीचा ‘राब’ पुरता भाजून, तुम्हाला तुमचा पूर्वीचा ‘आब’ परत मिळवून देईल, यावर शंभर टक्के विश्वास ठेवा!”

देशाच्या पंतप्रधानाला ‘इंडिया’ शब्दाची ‘ॲलर्जी’ आहे काय? उच्चारताना काय लाज वाटते का हो…की, ‘सहन होत नाही आणि सांगता येत नाही’, असला कसला ‘मूळव्याधी’सारखा त्रास होतो?…इंडिया नाही म्हणत, सारखं ‘इंडी इंडी’ करतात…अरे, ती ईडी-आयटी-सीबीआयचा धाक दाखवून किंवा सरकारी-कंत्राटांतल्या खोक्यांचं आमिष दाखवून लाटलेली…हजारो कोटींची ‘इलेक्टोरल-बाॅण्ड्स्’ची ‘हंडी’, पंतप्रधानांच्या डोक्यात एकदम ‘फिट’ बसलीय, म्हणूनच ते ‘इंडी इंडी’ करतात.

पण, नरेंद्र मोदीजी, लक्षात ठेवा, ही ‘शिवसेना’ आहे…तुम्ही ‘इंडी इंडी’ करता, पण उद्धवजींच्या शिवसेनेला, कुठल्याही निवडणुकीची ‘दहीहंडी’ फोडायचं चांगलंच ‘कसब’ आहे… असं असलं तरीही, सध्या बीजेपीला आधीपासूनच फितूर झालेल्या सरकारी वकील उज्वल निकमांमुळे ‘कसाब आणि कसाब’ची बिर्याणी सध्या खूप गाजतेय… तेव्हा, उद्धवजींनी, चुकूनसुद्धा आपल्या भाषणात ‘कसब’ शब्द वापरता कामा नये…राहुल गांधींच्या प्रत्येक शब्दाची व शब्द-संदर्भाची मोडतोड करणारी ही डँबिस, भाजपाई-संघीय ‘आयटी-सेल’वाली लोकं, त्यांनी ‘कसब’ शब्द वापरला रे वापरला की, ‘कसाब’ची उद्धवजींनी आठवण काढली, म्हणून ‘गोदी-मिडीया’तून, समाजमाध्यमांतून ठो ठो बोंबाबोंब करतील…स्व. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला उद्धवजींनी हरताळ फासला; म्हणून कांगावा करतील!

लक्षात घ्या, शिवसेनेसाठी लोकसभा-निवडणूक २०२४ची महाराष्ट्रातील हंडी…स्पेनच्या गोविंदाचा विक्रम मोडू पहाणारी आठनऊ थरांची हंडी नव्हे; तर, शिवसेनेचे एकवीस उमेदवार लोकसभा-निवडणुकीत उभे असल्याने, यावेळची ‘दहीहंडी’ तब्बल २१ थरांची आहे. ही ‘राजकीय-हंडी’, यंदा मा. उद्धव ठाकरेंची ‘असली’ शिवसेना… “मिंधेंची ‘नकली’ शिवसेना, बारा वाजलेल्या घड्याळाची बाराच्या भावात जाऊ पहाणारी अजित पवारांची ‘नकली’ राष्ट्रवादी, कोमेजलेल्या कमळाची ‘नकली’ भाजपा (अहो, ‘असली’ भाजपा…अटलबिहारी बाजपेयींची) आणि रामदास आठवलेंची RPI” …या चारही पक्षांना, एकाचवेळी ‘चारीमुंड्या चीत’ करुन फोडणार आहे!

“हंडी एकवीस थरांची,

गच्छतींच्या तयारीची…

‘अच्छे दिनां’चं असह्य ओझं,

एकजुटीने झुगारण्याची…

४ जूननंतर कुकर्म्यांना,

तुरुंगात पाठवण्याची…

हंडी शिवसेनेची २१थरांची”!

…अहो, कविता काय फक्त, रामदास आठवलेंनीच करायच्या की, काय? ‘र ला ट आणि ट ला र’ जोडत, आम्हाला नाही करता येत कविता?

आता, ‘रामदास’ आपल्याला ‘आठवले’…म्हणून सांगायचं की, ते बिचारे तिकीट न मिळाल्याने बसलेत हात चोळत…पण, नावातल्या ‘दास’ शब्दाला जागत, आजही ते नरेंद्र मोदींच्याच चरणापाशी बसून आहेत; पण, खरा चमत्कार ४ जूननंतर होईल…तुम्ही ‘याचि देही, याचि डोळा’, तो ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ बघाच!

शिवसैनिकहो,

लक्षात ठेवा, एकनाथजी शिंदे आणि अजितजी पवार…ही, अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादीच्या वटवृक्षावर उगवलेली ‘बांडगुळं’ आहेत…त्यांचाच रस शोषून बेफाम वाढलेली ‘विषवल्ली’ आहे ती!

ती बांडगुळं, ती विषवल्ली… निपटायची, उपटायची; तर, ‘जागते रहा, रात्र वैर्‍याची आहे’!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)