“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १५

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १५

————————————————————–

“शब्द घासून घ्यावा, शब्द मापून घ्यावा, शब्द तोलून घ्यावा आणि मगच बोलावा…पाणी, वाणी आणि नाणी कधि नासू नये”, असं सांगणारे ‘जगद्गुरु’ संत तुकाराम कुठे आणि याच्या विपरीत व्यवहार करणारे, अंधभक्तांनी बनवलेले बनावट ‘विश्वगुरु’ नरेंद्र मोदी कुठे?

ज्याला, ‘Mythomania’ नावाचा मानसिक-रोग जडला; तो कधि खरं बोलूच शकत नाही…जणू, खोटं बोलण्याची सवय, त्याच्या हाडामांसातच भिनलेली रहाते. आपल्या पंतप्रधानांचं आणि ते ज्या राजकीय-संप्रदायातून येतात, त्या सर्वांनाच हा मानसिक-रोग जडल्यासारखं दिसतं. त्या रोगाची पुढील अधोगती म्हणजे कपोलकल्पित, पण अगदी सुरस कथानकं रचणं आणि त्याद्वारे भोळसट-अज्ञानी लोकांच्या मेंदुचा ताबा घेणं.

भाजपाई-संघीय नेतृत्त्वाच्या बाबतीत ही गोष्ट इथेच थांबत नाही; तर, अगदी उच्चशिक्षितवर्गाच्याही मेदुंचा, ते रितसर ताबा घेतात आणि त्या तथाकथित बुद्धिजिवीवर्गाची सारासार विचार करणारी विवेकबुद्धीच नष्ट करताना दिसतात…त्यामुळेच, अज्ञानी अंधभक्तुल्यांकडे पाहिलं की, शिक्षणाचं अपरंपार महत्त्व जाणवतं; पण, अगदी मोठे वकील, आयआयटी, आयआयएम, एमडी-एमएस, चार्टर्ड अकाऊंटंट वगैरे अत्युच्चशिक्षित मंडळी देखील, या ‘काळ्या टोपीवाल्यांच्या काळ्या प्रभावाखाली’ आलेली पाहिली की, शिक्षण अगदी व्यर्थ वाटायला लागतं!

…इस्त्रोसारख्या संस्थेतले शास्त्रज्ञ, मोठमोठी काॅर्पोरेटीय व्यवस्थापक मंडळी, मायक्रोसॉफ्टचा सत्या नडेला, गुगलचा सुंदर पिचाई, भारतातल्या अनेक कंपन्यांचे CEO…हे सारे, जणू यांचे इमानदार नोकर किंवा कट्टर कार्यकर्ते असल्यासारखे वागताना दिसतात, या दुर्दैवाला म्हणावं तरी काय?

…”सतत रेटून खोटं बोलायचं; म्हणजे, जनतेला ते वारंवार सांगितलं गेलेलं ‘असत्यच, सत्य’ वाटायला लागतं”, हे ‘गोबेल्स-तंत्र’ ज्यांच्याकडून यांनी, अगदी घोटून घेत शिकलेलं आहे…तो जर्मनीचा नृशंस हुकूमशहा ॲडाॅल्फ हिटलर, दुसर्‍या जागतिक महायुद्धापूर्वी…याच पद्धतीने, सर्वच थरातल्या जर्मन्सच्या मेंदुंचा कौशल्याने ताबा घेऊन बसला होता. मोजके बडे भांडवलदार हाताशी धरुन, सर्वच प्रसारणसंस्थांवर त्याने पूर्ण ताबा मिळवल्याने ‘सत्य’ जनतेपर्यंत पोहोचणंच अशक्यप्राय बनलं होतं (भारतात सध्या काय वेगळी परिस्थिती आहे?) व हिटलरी खोटा प्रचारच, जर्मन जनता अखेरपर्यंत खरा धरुन चालली होती…ते अगदी इतक्या थराला गेलं की, जर्मनीचा पूर्ण पाडाव व सर्वनाश झाल्यापश्चात हिटलरने आपल्या पिस्तुलातून गोळ्या झाडून आत्महत्या केल्यावर देखील, जर्मन जनतेला तो काहीतरी चमत्कार करणार आणि अखेरीस जर्मनी जिंकणार, असंच वाटत राहीलं होतं.

…ज्यूंच्या विरोधात हाकाटी देत लोकशाही-प्रक्रियेतूनच हिटलर निवडून आला. पण, नंतर हळूहळू आपली वाघनखं बाहेर काढत…निवडणूक-प्रक्रियेतच त्याने प्रचंड हेराफेरी केली.

पहिल्या महायुद्धातील जर्मनीचा दारुण पराभव व व्हर्सायच्या अपमानास्पद कराराने, मनोमन कमालीच्या दुखावलेल्या सर्वसामान्य जर्मन नागरिकांसमोर, हिटलरने अल्पसंख्य ज्यू नागरिक, हेच जर्मन देशाच्या अवनत अवस्थेला जबाबदार असल्याचं भासवत, त्यांना देशाचा एक नंबरचा शत्रू बनवला व त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला. पुढे इतर सर्वच विरोधकांना सर्रास तुरुंगात डांबून, ठार करुन… यथावकाश, हिटलर निरंकुश हुकूमशहा बनला. ‘युद्धसामग्री बनवणाऱ्या कारखान्यांचं उत्पादन (War Economy) हिटलरच्या काळात जोरकसपणे वाढल्याने, इतर युरोपियन राष्ट्रांच्या तुलनेत जर्मनी १९२९-३०च्या जागतिक-आर्थिकमंदीतून तुलनेनं लवकर बाहेर आला व त्याचं सर्वसाधारण जर्मन्सच्या मनावर एक गारुडंच तयार झालं.

त्यामुळेच, जर्मनीतले उच्चशिक्षित शिक्षक-प्राध्यापक, इंजिनिअर्स, डाॅक्टर्स, वकील…हे सारेच, संमोहन झाल्यागत हिटलरच्या नादी लागले. लाखो ज्यूंचा रक्तपात व हत्याकांड घडवण्याच्या, त्याच्या महापातकांमध्ये हिरीरीने सहभागी झाले!

दुसर्‍या महायुद्धात हिटलरमुळे जर्मनी बेचिराख झाली, उध्वस्त झाली…कारण, तिथल्या राजकारणीवर्गात, सरकारी-दहशतीपुढे माना टाकणारे एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे, नारायण राणे वगैरे मुबलक नेतेमंडळी होती…पण, जर्मनीमध्ये नव्हते उद्धव ठाकरे, नव्हते अरविंद केजरीवाल आणि हो, मुख्य म्हणजे नव्हते राहुल गांधी!

तेव्हा, भारताचा हिटलरकालिन जर्मनी किंवा आजचा रशिया-चीन-उ. कोरिया होऊ द्यायचा नसेल; तर, ‘इंडिया-आघाडी’ला या लोकसभा-निवडणुकीत घवघवीत यश मिळवून द्यावं लागेल…हे भारतीय जनतेनं मनोमन जाणलंय आणि तिला हे ही उमगलंय की, भाजपला मत, म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारुन घेणं किंवा स्वतःच्या हाताने स्वतःचा मृत्यूलेख (Death Warrant) लिहीणं होय!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)  (क्रमशः)