“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील अखेरचा लेख-अनुक्रमांक १८

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील अखेरचा लेख-अनुक्रमांक१८

————————————————————-

(या १८व्या लोकसभेची निवडणूक, १८ आकड्यासारखीच ‘लोकविलक्षण’ आहे…भारतीय-अध्यात्मात १८ या आकड्याला विशेष महत्त्व आहे…१८ पुराणं, गीतेचे १८ अध्याय, १८ दिवस चाललेलं महाभारत युद्ध आणि वेदकालीन १८ गणराज्यं इ. …आपलंही गणराज्य (लोकशाही) सुरक्षित रहावं, यासाठी ही ‘स्वातंत्र्याची तिसरी लढाई’ आपण लढतो आहोत…त्याकामी, हा जो लेखनप्रपंच हाती घेतला होता, तो ही या १८ तारखेच्या १८व्या लेखासोबतच जड अंतःकरणाने ‘समाप्त’ करतोय…वाचकांनी, या लेखमालिकेचं मनापासून स्वागत केलं, तिला कौतुकाने उचलून धरलं, याबद्दल सर्वांचे नितांत आभार!)

एका म्हातारीची गोष्ट….

“झोपडीत राहणारी एक म्हातारी होती. आजीबाई खूप गरीब होती; पण, गावाला तिचा खूप आधार होता. कुणी आजारी पडलं, कुणी बाळंतीण अडलीनडली, कुणाची भांडणंतंटणं झाली, गावावर कुठलं पावसापाण्याचं-रोगराईचं नैसर्गिक-संकट आलं किंवा एखाद्या लहरी राजाची अवकृपा की, म्हातारी सगळ्यांच्या मदतीला धावून जाई. त्यामुळे, सगळेच तिचा मान राखीत, तिचं शुभं चिंतीत आणि तिच्या उदंड आयुष्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना करीत.

तिच्या झोपडीबाहेर एक अजब असं आंब्याचं झाड होतं, ज्याला वर्षभर आंबे लागायचे. त्या झाडाचे आंबे विकून ती आपलं पोट भरत असे. परंतु, ती थकल्यावर, तिच्या गावातलीच टगी पोरं, तिचे आंबे चोरायला लागली आणि तिला आपलं पोट भरणं देखील मुश्किल होऊन बसलं…पण, त्या स्वाभिमानी वृद्धेनं कोणाकडे मदतीची याचना केली नाही.

…अशातच एके दिवशी एक तरुण तपस्वी साधू तिच्या झोपडीत आला आणि म्हणाला, “हे माते, मी खूप भुकेला आहे, मला काहीतरी खायला दे”.

म्हातारी म्हणाली, “बाबा, मी गरीब आहे रे…माझ्याकडे एकच भाकरी आहे; पण, त्यातली अर्धी तुला भुकेल्याला देते.” साधूने अर्धी भाकरी खाल्ली, पाणी प्यायला आणि तिला म्हणाला. “माते, तू गरीब असलीस, तरी मनाने खूप श्रीमंत आहेस…तुला खरी माणुसकी आहे. तू अर्धी भाकर दिलीस, मी प्रसन्न झालो…तेव्हा, तू आता तुला हवा तो, कोणताही वर माग!”

म्हातारी म्हणाली, “मला असा वर दे की, माझे आंबे चोरायला कुणी आलं की, झाडाला हात लावताच ते झाडाला चिकटून बसले पाहिजेत आणि मी आज्ञा केल्याशिवाय, त्यांची बिलकूल सुटका होता कामा नये.”

साधू म्हणाला ‘तथास्तु!’

दुसऱ्या दिवशी, तिला सकाळी सकाळीच गावातली आठदहा पोरं आंब्याच्या झाडाला चिकटलेली दिसली. सर्व भितीने गलितगात्र होऊन आकांत करत होती, त्या वृद्ध स्त्रीकडे गयावया करत होती.

“पुन्हा म्हणून आंब्याच्या झाडाकडे फिरकणार नाही, आंब्यांना हात लावणार नाही”, असं त्यांनी कबूल केल्यावरच, तिने त्यांना सोडून दिले.

“आणखी काही वर्षे गेली…ती वृद्धा वयोमानानुसार थकली, आजारी पडली…तिच्या मृत्यूची वेळ हळूहळू जवळ येत चालली आणि यथासमयी, तिला न्यायला यमराज रेड्यावर बसून आले. तशी ती यमराजाला म्हणाली, “मला आणखी काही वर्षे जगू दे रे…या पंचक्रोशीतल्या साध्याभोळ्या लोकांना, खरंच माझी खूप खूप गरज आहे रे!”

यमराज म्हणाले, “नाही, ते शक्य नाही, तुला मला न्यावीच लागेल. तुझ्या आयुष्याची घडी भरत आलीय…जेमतेम तुझ्या हातात शेवटची पंधरा मिनिटं शिल्लक आहेत…तेव्हा, तेवढ्यात काय उरकायचंय ते उरक, काय बोलायचं ते बोल.”

…म्हातारी म्हणाली, “बरं बाबा, ऐक माझं…माझ्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचं झाड आहे. मरण्यापूर्वी त्याचा एक आंबा मला खावासा वाटतोय रे, देशील तेवढा आणून, यमराजा?”

हो, म्हणत…आंबा आणायला, यमराज स्वतः झाडाजवळ गेले. झाडाला स्पर्श केल्याबरोबर यमराज झाडाला चिकटले, कितीही प्रयत्न करुन सुटका होईना; मग, याचना करु लागले, “माते, मला सोडव”…

म्हातारी म्हणाली, “एका अटीवर सोडवीन… ज्यादिवशी, या गावातील सगळ्या जनतेलाच मी नकोशी होईन, त्याच वेळेस मी मरेन; अशी मला ‘लोकेच्छामरणी’ कर, तरच तुला सोडवेन.”

यमराज म्हणाले. “तथास्तु!”

…त्यामुळे, ती आज पाऊणशे वयोमानाची म्हातारी, अजूनही छान जिवंत आहे…धडधाकट, टुकटुकीत, हिंडतीफिरती आहे. लोकांची सेवासुश्रूषा करतेय, त्यांचं निर्दयी राज्यकर्त्यांपासून डोळ्यात तेल घालून संरक्षण करतेय!

….विशेष म्हणजे, तिला मिळालेल्या ‘लोकेच्छा-मरणी’ वरामुळे, ती तोवर मरणार नाही, जोवर लोकं तिच्या जगण्याची प्रबळ ‘वांछा’ उराशी घट्ट धरुन आहेत… तिचं नाव आहे, ‘भारतीय लोकशाही’!

ती आपली ‘वांछा’, आत्ता आणि इथेच, लोकसभा-निवडणुकीत ‘इंडिया-आघाडी’ला मतदान करुन व्यवहारात उतरवायचीय; तर, आणि तरच, ‘रामा’चा वेष परिधान करुन जो भाजपा-NDAरुपी ‘यमराज’, भारतीय-लोकशाहीला ‘यमसदनी’ न्यायला आलाय, त्याला त्याच्याच ‘यमसदनी’ परत धाडता येईल… ‘भारतीय लोकशाही’ नावाच्या ७५ वर्षे वयाच्या ‘लोकेच्छामरणी’ वृद्धेला, महाभारतातल्या ‘मत्स्यगंधे’सारखं नवचैतन्य आणि ‘चिरतारुण्य’ बहाल करता येईल…धन्यवाद!”

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)  (समाप्त)

(‘संसदमार्ग-लोकशाहीचा राजमार्ग’, या बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या पुस्तकातील गोष्टीत, मतदार-प्रभावासाठी महत्त्वपूर्ण व सुयोग्य बदल करुन ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे सादर….)