ज्यांनी, आधुनिक-भारताचा व जागतिक-शांततेचा भरभक्कम पाया घातला, असे भारताचे पहिलेवहिले व अत्यंत लाडके पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु… यांच्या, २८ मे-२०२४, या ६०व्या स्मृतिदिनानिमित्ताने…१८व्या लोकसभा-निवडणुकीद्वारे, भारत, तिसरं स्वातंत्र्ययुद्ध लढत असतानाच, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असण्याच्या परिस्थितीचा… थोडक्यात घेतलेला आढावा….)
युक्रेनने पाश्चात्य देशांची युद्धसामग्री रशिया-युक्रेन युद्धात प्रत्यक्ष रशियावरच प्रतिहल्ला करण्यासाठी वापरण्यावरुन सध्या युरोपियन-युनियनमधल्या देशांमध्येच दोन तट पडलेले दिसतायत…असं घडल्यास, त्याची परिणती, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीसारख्या देशांवर रशियाकडून हल्ला होण्यात होईल व स्वाभाविकच, तिसरं महायुद्ध पेटून आण्विक अस्त्रशस्त्रांचा वापर होण्याची शक्यता बळावेल.
या सर्व युद्धजन्य परिस्थितीला केवळ, रशिया-युक्रेन युद्धाचीच नव्हे; तर, इस्रायल विरुद्ध हमास-हिजबुल्ला युद्धाची देखील रक्तरंजित किनार आहे.
ICC (International Criminal Court) या ‘व्यक्तिगत स्तरा’वरील युद्ध-गुन्हेगारी खटले चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने, गाझापट्टीतील नरसंहारासाठी जबाबदार धरुन, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू व संरक्षण मंत्र्यांविरुद्ध; तसेच, ७ ऑक्टोबर-२०२३ रोजी इस्रायलमध्ये घडवलेलं नृशंस हत्याकांड व निरपराध नागरिकांना ओलिस धरणे व त्यांना क्रूरपणे वागवणे, महिलांवर बलात्कार करणे वगैरे संदर्भात, हमासच्या उच्चाधिकार्यांविरुद्ध अटक-वाॅरंट जारी करण्याचे प्रयत्न चालवलेत. रशिया-युक्रेन युद्धातील माणुसकीला काळिमा फासणार्या युद्ध-गुन्ह्यांबाबत, १७ मार्च-२०२३ रोजी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, यांच्याही विरुद्ध ‘ICC’ने अटक-वाॅरंट जारी केलेले, आपणास स्मरत असेलच!
…तर, दुसरीकडे, ICJ ने (International Court of Justice, जे न्यायालय ICCप्रमाणे ‘व्यक्तिगत’ नव्हे, तर देशपातळीवरील खटले चालवते) दक्षिण आफ्रिकेने दाखल केलेल्या दाव्यात, इस्रायल देशाला गाझापट्टीत वांशिक-हत्याकांड घडवण्याबद्दल जबाबदार धरले आहे. तरीही, इस्रायल ना ICC, ना ICJ, ना युनो, ना कोणा मोठ्या राष्ट्रप्रमुखांना धूप घालताना दिसत! त्यामुळे, तिसऱ्या महायुद्धाचे रौद्रभीषण पडघम वाजू लागल्याची दुर्दैवी परिस्थिती, सध्या निर्माण झालीय.
या सगळ्या घटनाक्रमात आपल्या भारताची नेमकी भूमिका काय, हे आजमितीस ना आपलं परराष्ट्रखातं, ना पंतप्रधान-कार्यालय, ना अन्य कुणी सांगू शकेल. एकतर, आपल्या देशाचे पंतप्रधान, हे कायमच ‘इलेक्शन-मोड’वर असतात, शेलक्या मर्जीतल्या पत्रकारांना पूर्वनियोजित मुलाखती देत असतात किंवा कुठलं तरी उद्घाटन करत असतात… अन्यथा, मोठ्या तिकीट-दरामुळे थोड्याच काळात रिकाम्या धावणाऱ्या ‘वंदे भारत ट्रेन्स’ना हिरवा झेंडा (हिरव्या रंगाची ‘ॲलर्जी’ असली तरीही) दाखवत असतात; तरीही, ते एकाचवेळेस ‘विश्वगुरु’ही असतात आणि त्यांचा जन्म ‘अयोनिज’ असल्याने जगभरातलं कुठलंही युद्ध रोखण्याची ‘दैवीशक्ति’ही बाळगून असतात…भले मग, रशिया-युक्रेन व इस्रायल विरुद्ध हमास-हिजबुल्ला, ही प्रदीर्घकाळ चाललेली युद्धं कमालीची चिघळून, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर का उभं राही ना! आपलं सगळंच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण ‘रामभरोसे’ चाललंय…
एक महत्त्वपूर्ण व भारताच्या दृष्टीकोनातून अत्यंत धोकादायक अशी गोष्ट म्हणजे, रशिया-चीन दरम्यानच्या “No Limits Friendship or Partnership” कराराच्या पार्श्वभूमीवर, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी चीनला नुकतीच दिलेली भेट…
कधि नव्हे एवढे, रशिया-चीन हे दोन्ही तथाकथित साम्यवादी देश, जागतिक शीतयुद्ध समाप्तीच्या कालखंडानंतर सर्वच बाबतीत एकत्र आलेत. १९६२च्या चीनने भारतावर केलेल्या आक्रमणात, “भारत आमचा ‘मित्रदेश’ असला; तरी, चीन आमचं ‘बंधूराष्ट्र’ आहे”, अशी रशियाने, चीनच्या बाजुने घेतलेली भूमिका, यासंदर्भात गांभीर्याने ध्यानात ठेवली पाहीजे. भारत-चीन दरम्यान सरहद्दीवरील वादासोबतच (गलवान-खोर्यातील ४०००चौ.कि.मी. पेक्षा जास्त भारतीय भूप्रदेश, लाल चीनने या मोदींच्याच कार्यकाळात बळकावलेला आहे) ‘ब्रह्मपुत्रा नदी’चं पात्र बदलून, चीन त्या पाण्यावर हक्क गाजवू पहातोय (एक महाकाय जलविद्युत-प्रकल्प याअगोदरच उभारुन झालेला असून, दुसरा बाधण्याचं महाप्रचंड काम जोरात चालू आहे…तरीही, आपलं परराष्ट्रखातं डोळ्यावर कातडं ओढून आहे आणि ‘विश्वगुरु’ पंतप्रधान, साधं डोळे वटारुन चीनकडे बघायला तयार नाहीत).
एवढं करुनही चीन थांबण्याचं कोणतंही लक्षण दिसत नाहीय; उलट ‘अगस्ती-मुनी’ बनून चीन सिंधू, सतलज व गंगा नद्यांचंही पाणी प्राशन करु पहातोय. त्यांचा प्रवाह देखील, आपल्या देशांतर्गत रोखण्याची क्षमता व राक्षसी इच्छाशक्ती चीन बाळगून आहे…ही, भारत-चीनमधील संभाव्य युद्धाची भयसूचक नांदी आहे!
सध्या, एकूणच जगभरातील राष्ट्रप्रमुखांमध्ये अधिकाधिक अधम, खुनशी वृत्तीचा ‘हुकूमशहा’ कोण… याचीच अमानुष स्पर्धा लागलेली दिसते!
त्यामुळे, स्वाभाविकच, जग कमालीचं अशांत व अस्वस्थ झालंय. पं. जवाहरलाल नेहरुंसारख्या तरल, संवेदनशील व्यक्तित्वाने पुढाकार घेऊन ‘अलिप्ततावादा’ची (NAM…Non-Aligned Movement) जी नैतिक भूमिका, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली होती… त्यातून केवळ भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी प्रतिष्ठाच लाभली होती, असं नव्हे; तर, तत्कालीन खडतर स्थितीतही ‘जागतिक-शांतता’ बव्हंशी स्थिरावली होती.
…पण, आज नेहरुंसारखं हिमालयाच्या उंचीचं, आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेलं राजकीय-व्यक्तिमत्व, या जगात नाही, याची प्रलयंकारी किंमत तिसऱ्या महायुद्धाच्या रुपाने जगाला मोजावी लागू शकते, हे प्रकर्षाने ध्यानात आल्यावाचून रहात नाही…यापेक्षा, पं. जवाहरलाल नेहरुंना आजच्या दिवशी, मोठी आदरांजली कुठली असू शकते?
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)