SEBI च्या संस्थापकांपैकी एक व NSE च्या भूतपूर्व MD व CEO चित्रा रामकृष्ण आणि तिचा हिमालयीन ‘बाबा’ यांच्या देशघातकी ‘संबंधां’वर पुढे जाऊन बराच प्रकाश पडेल, पडावा… पण, सध्या त्यातल्या एका अतिशय महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधणं, समाजहितासाठी खूपच गरजेचं आहे!
आधुनिक ‘काॅर्पोरेटीय कारभारा’तील ‘अदृश्य’ स्वरुपाचा (जसा, भांडवलशाहीचा उद्गाता ॲडम स्मिथने वर्णिलेला ‘भांडवली-व्यवस्थे’त बाजारपेठीय ‘अदृश्य हात’ असतो); पण, संपूर्ण समाजजीवनावर अतिशय अनिष्ट प्रभाव टाकणारा ‘छुप्या भ्रष्टाचारा’चा एक आगळावेगळा नमुना (ज्याची फारशी कधि चर्चाच होताना दुर्दैवाने कुठे दिसत नाही) आपण विचारात घेणं, अगत्याचं आहे….
सदरहू प्रकरणातील “आनंद सुब्रमण्यम याचा पगार अल्पावधीतच सालिना १५ लाखावरुन ४.५ कोटींपर्यंत पोहोचणं,” हाच तो तथाकथित ‘कायदेशीर’ काॅर्पोरेटीय सुप्त आणि गुप्त भ्रष्टाचार!
…अर्थ याचा हा की, असे असंख्य किंवा बहुतेक काॅर्पोरेटीय अधिकारी (व्यवस्थापकिय मंडळी) असतात की, ज्यांचा पगार व भत्ते… हे त्यांच्या लायकी किंवा योगदानापेक्षा कैकपटीने मोठे असतात, ज्याला, ‘मार्केट-प्राईस’ असं तद्दन दिशाभूल करणारं गोंडस नाव दिलं जातं आणि हा, “कायद्याच्या व्याख्येत चपखल बसवला गेलेला; पण, भ्रष्टाचाराचाच एक नमुना असलेला, ‘छुप्या भ्रष्टाचाराचाच प्रकार’ होय!”
विशेषतः, HR/IR विभागातील अधिकारीवर्ग, इतरांचे पगार/भत्ते ठरवत असताना… युनियन एकजुटीच्या तोडफोडीतून व कामगार कर्मचार्यांच्या फसवणुकीतून त्यांचं अतोनात शोषण करत स्वतः ‘बिनलायकी’चे करोडो रुपयांचे पगार/भत्ते, बड्या बहुराष्ट्रीय व इतर कंपन्यांमधून ओरपत असताना, सर्रास दिसत असतात. हा देखील, फार मोठा, पण सहसा चर्चिला न जाणारा एक ‘भ्रष्टाचारा’चाच गर्हणीय प्रकार होय!
केवळ, चार बुकं शिकले, काही मेहनतीने प्रशिक्षण घेतले म्हणून समस्त अधिकारीवर्गाचे करोडो करोडोंचे पगार/भत्ते (शिवाय, काॅर्पोरेटक्षेत्रातील कधिही बाहेर न पडू शकणार्या वा फारशा कधि चर्चिला न जाणार्या भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीतून होणारी या अधिकारीवर्गाची ‘वरची कमाई’ अजून वेगळीच) आणि सामान्य कामगार-कर्मचाऱ्यांचे मात्र, जेमतेम दरमहा १५ ते २० हजार किंवा अगदी फारतर, २५ हजार एवढेच फालतू, टपराक पगार असावेत? हा कुठला ‘न्याय’?? अशातऱ्हेनं, वार्षिक दोन-सव्वा दोन लाखाच्या आसपास असलेले हे असले फडतूस, तुटपुंजे पगार घेणारा कामगार-कर्मचारीवर्ग शहरं-उपनगरांमधून रहाण्यासाठी ५०-६० लाखांचे महागडे फ्लॅट (त्याकामी, कुटुंबाच्या भरणपोषण, राहणीमानासाठी एकही पैसा खर्च न करता १००० महिन्याचे ‘अख्खे’ पगार; म्हणजे, जवळपास ८०-८५ वर्षांचे पगार लागतील… हे किती धक्कादायक आहे, याचा कोणी कधि विचार करतो?), मुलांसाठी शहरातलं महागडं खाजगी शिक्षण व सर्व कुटुंबियांसाठी भयंकर महागडे वैद्यकिय उपचार कुठून घेणार…. याचा मूळातून अभ्यास कधि होणार???
जर, सरकारी पातळीवरुनच हा अभ्यास कधि होत नसेल; तर, राजकीय पक्षांची ध्येयधोरणे पडद्याआडून ठरवणारे ‘भांडवलदार’ तो कुठून आणि कशासाठी करतील? सध्या, “आऊटसोर्सिंग व कंत्राटी कामगारपद्धती”तल्या पिळवणुकीच्या चरकातून आणि ‘मार्केट-प्राईस’च्या जंगली संकल्पनेचा अमानुष आधार घेऊन शोषणाचा कहर माजवणार्या HR/IR व्यवस्थापकीय मंडळींना, HR/IR प्रशिक्षणसंस्थांच्या अभ्यासक्रमातून या विषयाप्रति ‘संवेदनशील’ बनवलं (sensitisation) जाण्याची सुतराम शक्यता कधितरी, असू शकते काय? उलटपक्षी, “संवेदनशून्यता म्हणजेच, ‘व्यावसायिकता”, अशा निर्मम शिकवणुकीची ‘लस’ टोचून या HR/IR प्रशिक्षणसंस्था त्यांचे मेंदू कार्पोरेट जगतात शिरण्यापूर्वीच साफ बधीर करुन सोडतात, जेणेकरुन ‘संवेदनशीलतेचा, माणुसकीजन्य’ व्यवहाराचा जणू ‘संसर्ग’च त्यांना काॅर्पोरेटीय कारकीर्दीत होऊ नये!
तेव्हा, मूळ मुद्द्यावर येताना, अधिकारीवर्गाचे अतिरेकी गलेलठ्ठ पगार/भत्ते…. हा अगदी ‘छुपा’; पण, अतिशय समाजघातकी असा “भ्रष्टाचाराचाच एक प्रकार” होय, मग भले तो भांडवलदारांचे ‘बटिक’ असलेल्या राजकारण्यांकडून बनवल्या गेलेल्या कंपनी-कायद्यात किंवा कामगार-कायद्यात व्यवस्थित बसणारा का असेनात… हे ध्यानात घेणं, सद्यस्थितीत कामगार-कर्मचारीवर्गासाठी खूपच गरजेचं आहे.
जगभरच्या प्रगत देशांत, सगळ्याच कंपन्यांमधून सगळ्यात खालच्या पातळीवरचा पगार/भत्ते (निम्नश्रेणीतल्या कामगाराचा) व सगळ्यात वरच्या पातळीवरचा पगार/भत्ते (उदा. CEO चे) यातील गुणोत्तर जास्तीतजास्त १ : १२ राखलं जाण्याची मागणी जोर धरत असताना, अनेक ठिकाणी तत्त्वतः मान्य होत असताना आणि व्यवहारात उतरवली जात असताना… भारतातलं, महाराष्ट्रातलं दुःसह व दुःखद चित्र, या ‘चित्रा-प्रकरणा’च्या चष्म्यातून जरा पहा आणि त्यातून, काही अर्थबोध होतोयं का, ते ही कृपया बघा!
इतर भ्रष्टाचाराच्या थेट प्रकारांहून हा भ्रष्टाचाराचा ‘छुपा’ असलेला प्रकार… अधिक समाजघातकी यासाठीच की, त्यातून बिनलायकीचे प्रचंड पगार/भत्ते लाटणारी व जागतिक अर्थकारण चालवणारी ही व्यवस्थापकीय मंडळी, मूलतः बुद्धिमंत असली तरी, या मोठमोठ्या पगार/भत्त्यांच्या सैतानी आकर्षणातून आपली सदसद्विवेक बुद्धी भांडवली-व्यवस्थेकडे पूर्णतः गहाण ठेवतात… त्या पगार/भत्त्यांच्या पातकी संमोहनातून आपल्या ‘संवेदना’ साफ हरवून ते, सामान्य जनतेप्रति अगदी क्रूर व संवेदनशून्य कधि बनतात, ते त्यांचं त्यांनाच कळत नाही… हे सारंच, निखळ व सुखासमाधानी मानवी ‘जीवन’ नष्ट करणारं (Life-Negative) आणि माणासाला “सत्य आणि न्याय” या महान मानवी-मूल्यांपासून कोसो दूर नेणारं आहे… ज्या, तल्लख बुद्धीच्या व्यक्तिंकडून सुखी, निरामय मानवी जीवनासाठी भरीव योगदान देण्याची अपेक्षा होती, तेच सगळे ‘प्रतिभावान’ मेंदू, ही रक्तपिपासू-शोषक ‘भांडवली-व्यवस्था’, ‘मार्केट-प्राईस’ची मोठी बोली लावून वर म्हटल्याप्रमाणे, बिनदिक्कत खरेदी करतेय… आणि, मग, अशा ‘क्रयविक्रयाची वस्तू’ बनलेल्या बधीर मेंदुंना, ना अन्याय-अत्याचार पिडीतांची अथवा शोषणग्रस्तांची कणव येतं, ना त्यांच्यासाठी काही करायला हवं, याची अंशानेही भावना शिल्लक रहात… माहिती व आज्ञावली ठासून भरलेल्या निर्जीव काॅम्युटरप्रमाणे तंत्रावर यंत्रवत चालणारे त्यांचे ‘भरगच्च’ मेंदू, अधिकाधिक मोठे पगार/भत्ते व मोठ्या पदांच्या (promotions) राक्षसी महत्त्वाकांक्षेने पेटून उठल्यागत काॅर्पोरेटक्षेत्रात दिवसाचे चोवीस तास कार्यरत रहातात… त्यातूनच, समाजमानसातली मानवतेची वीण उत्तरोत्तर विसविशीत होत जाते आणि तेवढ्या तेवढ्या प्रमाणात व्यवस्थेकरवी सामाजिक, आर्थिक, राजकीय अन्याय-अत्याचार-शोषणाचा बुलडोझर सर्वत्र गरगर फिरायला लागतो आणि निसर्ग-पर्यावरणाचा अतोनात विध्वंस होऊन ‘जागतिक तापमानवाढ व अनाकलनीय वातावरणीय बदला’सारखी पर्यावरणीय महासंकटे धुमाकूळ घालायला लागतात…. तोच, हा अवघा, थेट मानवी ‘अस्तित्वा’लाच भिडलेला फार मोठा धोका, सध्या आपल्यापुढे उभा ठाकलाय!!!
….. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)