केवळ, प्राचीन-अर्वाचीन इतिहासच नव्हे; तर स्थानिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर, आजमितीस घडणारा कुठलाही घटनाक्रम… हा आपल्याला ‘गुरु’ बनून वेगवेगळ्या शिकवणुकीचा ‘धडा’ सातत्याने देत असतो; फक्त, त्यासाठी तसा शोधक व विश्लेषणात्मक दृष्टिकोन मात्र, आपल्यापाशी हवा!
‘‘महाभारतात कपटी इंद्राला कवचकुंडलं दान केल्यानं दानशूरतेचा अतिरेक (सद्गुणाचा अतिरेक, हा ही एक दुर्गुणच) करणाऱ्या कर्णाचा युद्धात वध करणं, अर्जुनाला शक्य झालं… तसाच, काहीसा प्रकार युक्रेनच्या बाबतीत घडताना दिसत आहे’’. फरक इतकाच की, इंद्र हा कौरवांचा शत्रूपक्ष असलेल्या पांडवांपैकी अर्जुनाचा पिताश्री होता; तर, युक्रेनचा ‘घात’ करणारे राजकारणी स्वतः युक्रेनियनच होते. पण, ते होते पक्के कारस्थानी, भ्रष्टाचारी आणि हडेलहप्पी हुकूमशाही पद्धतीने शासन करणारे… तसेच, तत्कालीन रशियन सरकारच्या हातातलं ‘बाहुलं’ असलेले व रशियन सरकारचे संपूर्ण ‘मिंधे’ असलेले!
रशियन सरकारचे ‘हस्तक’, ‘दलाल’ असलेल्या या तत्कालीन युक्रेनियन सत्ताधाऱ्यांनी, मारक-क्षमता व संख्येच्या दृष्टीने जगभरात तिसऱ्या क्रमांकावर असलेला व युक्रेनची संरक्षक ‘कवचकुंडलं’ म्हणून गणला जाणारा, सगळा आण्विक-अस्त्रशस्त्र साठा (By 1996, Ukraine had returned all of its nuclear warheads… estimated 1,900 strategic warheads, 176 intercontinental ballistic missiles-ICBMs and 44 strategic bombers by 1996, and in December 1994) युक्रेन देशाचा ‘अवसानघात’ करत पूर्वनियोजित व पद्धतशीर आखलेल्या कटानुसार रशियाला बहाल केला… सामर्थ्यवान युक्रेन अशातर्हेनं एकप्रकारे ‘नपुंसक’ बनवला गेला आणि त्या बदल्यात, त्यानं मिळवलं काय, तर, फक्त युक्रेनच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची रशियन सरकारतर्फे दिली गेलेली ‘फसवी व तोंडदेखली हमी’ व रशियन रुबलमध्ये मदतनिधी!
सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची हमी देणाऱ्या त्याच रशियाने, संपूर्ण युक्रेनियन जनतेला आज तोंडघशी पाडत, युक्रेनपुढे स्वतःच अस्तित्व टिकवण्याचं आव्हान ठेवलंय!
या सगळ्या घटनाक्रमाचा आरंभ, सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर म्हणजेच, वर्ष-१९९१ नंतर झाला; ज्या, सुमारास ‘‘खाउजा’’ (खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण) धोरणामुळे भारतीय व महाराष्ट्रीय कामगार-चळवळीवर कुऱ्हाडीचे ‘घाले’ पडायला सुरुवात झाली होती… अशी ही, दोन्ही विश्वासघातकी घटनाक्रमांची विचित्र कालसुसंगतता आहे!
युक्रेनियन राजकारण्यांप्रमाणेच ‘भांडवलदारां’चे बटिक, हस्तक बनलेल्या, या तुम्हीच डोक्यावर घेतलेल्या, हृदयसिंहासनावर बसवलेल्या इथल्या राजकारण्यांनी व या अशा विश्वासघातकी राजकीय नेत्यांचा कित्ता गिरवत स्वार्थापोटी पेंढारी बनलेल्या कामगार-पुढार्यांनी, ‘‘कारखाना जगला; तर, कामगार जगेल’’, असे कामगारांचा अवसानघात करणारे ‘हाकारे’ तारस्वरात देऊन महाराष्ट्रातल्या कामगार-कर्मचारीवर्गाची आणि समस्त कामगार-चळवळीची अक्षरशः ‘शिकार’ केली… लांडगेतोड त्यानंतर, आपसूकच झाली… अशाप्रकारे, ‘‘कुऱ्हाडीचे दांडे गोतास काळ ठरले’’!
संरक्षक ‘कवचकुंडलं’ असलेला युक्रेनियन आण्विक-अस्त्रशस्त्र साठा; जसा तेथील ‘रशियाधार्जिण्या’ कारस्थानी, दलाल राजकारण्यांकडून ‘त्यागला’ गेला; तसाच, कामगारांची संरक्षक ‘कवचकुंडलं’ असलेल्या…
१) पगारवाढीच्या करारांचे कालावधि तीन वर्षापेक्षा कधिही जास्त ‘नसणे’
२) बोनस किंवा सानुग्रह अनुदान ‘PF-Base’ सह सगळे भत्ते मिळून ‘एकूण पगारा’च्या सरासरी किमान २०% असणे
३) बदलता महागाईभत्ता-VDA
४) नवीन भरतीसाठी श्रेणीनिहाय पूर्वनिर्धारित पगार (Entry-Level Basic)
५) सगळे कामगार ‘कायम’
६) पगारात किमान ७०% ‘PF-Base’
७) ‘साडेसहा तास’ प्रत्यक्ष कामाचे तास असलेल्या एकूण ‘आठ तासां’च्या कामापेक्षा जास्त कामाला दुप्पट ओव्हरटाईम’’
…. वगैरे, सगळ्या कामगार हितरक्षक संकल्पना, देशी-विदेशी ‘भांडवलदारां’च्या इशाऱ्यावर ‘भांडवलधार्जिण्या’ राजकारण्यांकडून एका झटक्यात त्यागण्यात आल्या आणि त्या बदल्यात कामगार-कर्मचारीवर्गाच्या तेव्हा पदरी काय पाडण्यात आलं… तर, ‘झिरप-सिद्धांता’चं (Percolation or Trickle-Down Theory) केवळ, ‘गाजर’ दाखवत आर्थिक भरभराटीची व रोजगारवृद्धीची ‘फसवी’ हमी! ‘‘ना रोजगार वाढले (खरंतरं, कंपन्या वाढल्या तसे, आधुनिक तंत्रज्ञानाने रोजगार वाढायच्याऐवजी कमीच होऊ लागले)… ना कामगारांना आर्थिक सुरक्षा-सुबत्ता मिळाली’’; उलटपक्षी, जी होती, नव्हती ती सगळीच सुरक्षितता व थोडंबहुत असलेलं आर्थिक-स्थैर्य, कंत्राटी-कामगार पद्धतीच्या व आऊटसोर्सिंगच्या रेट्यात आणि CTC सारख्या तद्दन फसव्या संकल्पना जबरदस्तीने राबवून संपविण्यात आलं… त्यातून, महाराष्ट्रातला कामगार-कर्मचारीवर्ग देशोधडीला लागला!
थोडक्यात, महाराष्ट्रातला सगळा कामगार-कर्मचारीवर्ग, युक्रेनियन जनतेसारखा ‘‘चु…..’’ बनवला गेला आणि ‘‘आजही बनवला जातोय’’… त्याचीच कटू, विषारी फळे गेली काही दशके कामगार भोगतोय व त्याच्या पुढील पिढ्या भोगणार आहेत!
…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)