(पंजाबच्या आम आदमी पार्टीने सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करण्याचं धोरण अंगिकारलेलं दिसतंय व त्यानुसार, ३५,००० कामगार-कर्मचारीवर्गाला नोकरीत ‘कायम’ करुन घेतल्याचा खालीलप्रमाणे स्पृहणीय संदेश, माझे निकटचे स्नेही ॲड. विजय कुर्ले यांनी पाठवला; त्यावरील माझी प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे….)
हे अभिनंदनीय कार्य जरुर आहेच… हो, मी ते बिलकूल नाकारत नाहीच, नाकारु शकत नाही…. पण, आम्ही खाजगी क्षेत्रातील कंत्राटी-कामगार पद्धतीविषयक प्रकर्षाने बोलतो आहोत… ती ‘आप’ने नाहिशी केल्यास, तिचं उच्चाटन करुन लाखो पंजाबी व दिल्लीच्या कामगार-कर्मचारीवर्गाला ‘कायम’ केल्यास आम्ही स्वतःहून ‘आप’चे अभिनंदन आणि अभीष्टचिंतन करुच!
मात्र, त्यासाठी, संपूर्ण ‘भांडवली-व्यवस्थे’ला अंगावर घ्यावं लागेल… आहे ‘आम आदमी पार्टी’ची त्यासाठी मानसिक तयारी अथवा राजकीय इच्छाशक्ति?
सरकारी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटी-कामगार पद्धत निर्मूलन, ही त्यामानाने सोपी गोष्ट, यासाठी आहे; कारण, त्यात जनतेच्या कररुपाच्या पैशाचं वाटप/वितरण अंतर्भूत असतं, कुणा भांडवलशहाचा तो पैसा नसतो!
मात्र, सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात जरुर घ्यावी की, आपण ‘आप’ पंजाबात सत्तारुढ होत असताना, कंत्राटी-कामगार पद्धतीविरोधात आपल्या पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत प्रसारित केलेल्या संदेशातून उठवलेल्या आवाजाचा, हा कुठेतरी, झालेला परिणाम आहे. त्यातूनच, तुम्हाला, ‘‘धर्मराज्य पक्षा’‘सारख्या जाज्वल्य राजकीय पक्षाच्या अस्तित्वाचं आणि वाढीचं महत्त्व पटावं, ही ‘छोटीसी आशा’!
केवळ, सार्वजनिक/सरकारी क्षेत्रातील ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं निर्मूलन करणं, हे मला यासाठी बिलकूल मान्य नाही; कारण, हे खाजगी क्षेत्रातील (ज्यात, सार्वजनिक क्षेत्राच्या कैकपटीनं कामगार-कर्मचारीवर्ग असतो) कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन पुढे ढकलणं, म्हणजे, अजून किमान एकदोन तरुण पिढ्या गुलामगिरी आणि नव-अस्पृश्यतेत ढकलणं होय….
‘आप’कडे निवडणूक लढविण्यासाठी येणारा एवढा मोठा निधी विशिष्ट भांडवलदारांकडून किती येतो आणि समस्त जनतेकडून किती येतो… याचं ‘forensic audit’ होणं गरजेचं आहेच! कारण, त्याशिवाय, ते खरोखरीच नजिकच्या भविष्यात कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करतील किंवा नाही… हे निश्चित सांगता येणार नाही! अरविंद केजरीवाल यांना मी व्यक्तिशः कंत्राटी-कामगार पद्धत, ही काय आणि कशी समाजघातकी ‘चीज’ आहे, हे प्रथमतः आम आदमी पार्टीच्या स्थापनेनंतर थोड्याच काळात समजावलं होतं. तेव्हा, त्यांनी रोह्यामधील भाषणात मी यासंदर्भात अखिल भारतीय कामगार-कर्मचारीवर्गाचं नेतृत्त्व करावं, असंही जाहीरपणे म्हटलं होतं, पण त्याबाबत अरविंदजींनी माझ्याशी पुन्हा कधि संपर्क साधणं साफ टाळलं, ते अगदी आजपर्यंत!
मी ठामपणे अगदी ठासून सांगतो की, देशात ‘‘काँग्रेसच्याच राजवटीत, ही कंत्राटी-कामगार पद्धतीची अवदसा, देशभर अस्तित्वात आली (महाराष्ट्रात, ती प्रामुख्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भांडवलधार्जिण्या गुन्हेगारी संगनमताने आली) आणि जोपर्यंत, काँग्रेस *कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन आणि अर्थक्रांती-प्रतिष्ठानप्रणित महसुली-संसरचनेत आमूलाग्र बदल किंवा जनलोकपाल विधेयकासारखी भ्रष्टाचार-निर्मूलनासाठी मूलभूत धोरणं, आपल्या ‘विषयपत्रिके’वर घेत नाही… तोवर, गांधी-परिवार काँग्रेस-नेतृत्त्वात राहीला काय किंवा राजीनामा देऊन मोकळा झाला काय… तरीही, काँग्रेसला पुनरपि ऊर्जितावस्था येणं नाहीच आणि येऊही नये! धन्यवाद…..
… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)
‘आप’ची कंत्राटी कामगार विरोधी ‘सर्जिकल स्ट्राईक’…
काँग्रेस-भाजपासह सर्व कंत्राटी कामगारांचे शत्रू प्रस्थापित राजकारणी घायाळ…
ज्या कामगारांना कंत्राटी कामगार पद्धतीने राबवून त्यांचे आर्थिक शोषण करून प्रसाद लाड सारख्या राजकारण्यांनी हजारो करोड रुपयांची काळी माया जमवीली, तशाच ३५ हजार कंत्राटी कामगारांना पंजाबमधील ‘आप’ सरकारने आज कायमस्वरूपी सरकारी सेवेत सामावून घेऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल आणि समृद्ध केले.
‘आप’ झिंदाबाद !