हे सगळं अमेरिकेत तेव्हा घडतंय; जेव्हा, भारतात कामगार-चळवळी’चं थडगं बांधण्यासाठी खड्डा खणून, दगड रचून तयार आहेत….

एप्रिल महिना उजाडताच, Amazon.com Inc (AMZN.O) या फार मोठ्या अमेरिकन कंपनीच्या न्यूयाॅर्क शाखेत, प्रथमच कामगार-संघटना (युनियन) गुप्तमतदानाद्वारे अस्तित्वात आलीय. आजवर आपल्या कंपनीत युनियनबाजी होऊ नये, यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या कुटील नीतिचा आणि प्रचंड ‘कंपनी-दहशती’चा (Corporate-Terrorism) बेलगाम वापर करुनही, हे ज्यो बायडेन प्रशासनाच्या आशिर्वादाने अघटित घडलेलं आहे!

जवळपास १० लाख लोकांना रोजगार पुरविणारी ॲमेझाॅन ही कंपनी वाॅलमार्टनंतर रोजगार पुरविण्याबाबत दुसर्‍या क्रमांकावर असलेली व जेफ बेझोस यांनी १९९४ साली एका छोट्या पुस्तकाच्या दुकानासारखी सुरु केलेली कंपनी….. आज १.७ ट्रिलियन डाॅलरची कंपनी झालीय. या ॲमेझाॅन कंपनीत “अनुचित कामगार-प्रथांचा कहर झालेला असतानाच, हा अमेरिकन कामगार-चळवळीसाठी मैलाचा दगड ठरावा, असा क्रांतिकारक विजय होय आणि याचं मोठं श्रेय अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कामगारहिताला वाहिलेल्या धोरणाला जातं! अनेक नव्या अमेरिकन उद्योगात ज्यो बायडेन सरकारच्या पाठबळावर युनियन्स धडाक्यात अस्तित्वात येत असतानाच, अमेरिकन कामगार-चळवळी’ला मिळालेलं, हे ॲमेझाॅनमधील फार मोठं यश आहे… आणि, हे सगळं अमेरिकेत तेव्हा घडतंय; जेव्हा, भारतात कामगार-चळवळी’चं थडगं (रवींद्र वर्मांच्या अध्यक्षतेखालील दुसर्‍या कामगार-आयोगाने अटलबिहारी बाजपेयी सरकारला २९ जून-२००२ साली सादर केलेल्या कामगारघातकी शिफारसी अंमलात आणणारी, नरेंद्र मोदी सरकारकृत ४ कामगार-कायद्यांची नवी ‘कामगार-संहिता’) बांधण्यासाठी खड्डा खणून, दगड रचून सगळी रक्तपिपासू-शोषक व्यवस्था (Vampire-State System) तयार आहे; फक्त, समस्त भारतातल्या कामगार-कर्मचारीवर्गाला त्या ‘कबरी’त ढकलून देऊन कधि एकदाचं गाडून टाकायचं, याचाच देशातील एकूण राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन मुहूर्त शोधणं (भाजप/संघाच्या भाषेत ‘पंचांग’ बघणं) सुरु आहे… याशिवाय, “पांढरपेशा कर्मचारीवर्गाची साफ दिशाभूल करीत ‘व्हाईट-काॅलर’वाले युनियन करुच शकत नाही”, अशा धादांत खोट्या अफवा, वदंता पसरवून व त्यांना घाबरवून सोडून हक्काच्या युनियनबाजीपासून दूर ढकण्याचे पाजी उद्योग देशभरात HR/IR बदमाष मंडळींचे जोमात सुरु असतानाच, हे अमेरिकन कामगार-कर्मचार्‍यांनी मिळवलेलं उदंड यश आहे. डोनाल्ड ट्रंप, आज सत्तेत असते; तर, हे घडणं कदापि शक्यच नव्हतं!

या निवडणुकीतील यशापश्चात, लाल रंगाचा वेष परिधान केलेल्या ख्रिस्तियन स्माॅल्ससारख्या युनियन संघटकांनी “आता, अमेरिकेत कामगार-कर्मचार्‍यांच्या जीवनातली अंधारी रात्र संपुष्टात येऊन नवा आशादायक सूर्योदय झाल्याचं”, अत्यानंदाने शँपेन हवेत उडवत म्हटलंय.

मात्र, यामुळे, आजवर ॲमेझाॅनच्या सगळ्या कामगार-कर्मचाऱ्यांवर दहशत, दादागिरी (Corporate-Terrorism) करुन बेलगाम अन्याय, अत्याचार आणि शोषण करणारं, ॲमेझाॅन व्यवस्थापन अस्वस्थ झालं असून कामगारांमधले नीच, अधम वृत्तीचे दलाल शोधून काढून त्यांना हाताशी धरुन कामगारांमध्ये फूट पाडण्याचे तसेच, पैशाच्या बळावर बड्या वकिलांची फौज कामाला जुंपून कामगार-चळवळी’च्या यशाला गालबोट लावण्याचे कारस्थानी उद्योग त्यांनी सुरु केलेत, असे अमेरिकन कामगार-चळवळी’तील सुत्रांकडून खात्रीलायकरित्या समजतं.

या विजयामुळे, अमेरिकन कामगार-चळवळी’चं पुनरुत्थान होऊन सर्वत्र कामगार-चळवळीं’ना जोरदार चालना मिळाली असून, जगभरातल्या कामगार-जगतासाठी एक प्रेरणादायक चित्र उभं राह्यलंय. त्यातूनच, कंपनी-दहशतवाद संपून कामगार-कर्मचारीवर्गाला कामाच्या ठिकाणी भरघोस वेतनमान व चांगल्याचुंगल्या सेवासुविधा मिळण्याची निश्चिंती झाल्याचं, म्हटलं जातंय.

यासंदर्भात, अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, “अमेरिकन कामगार-कर्मचारीवर्गाचा आजवर दडपला गेलेला आवाज, यापुढे ऐकला जाईल, याचं मला समाधान आहे आणि अमेरिकेल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक कामगार-कर्मचार्‍याला युनियनमध्ये सामील होण्याबाबत पूर्ण मोकळीक व पूर्ण स्वातंत्र्य असलंच पाहीजे”, असं म्हटलंय.

महाराष्ट्रातल्या साफ पिचल्या गेलेल्या, गुलामगिरीच्या अंधारयुगात ढकलला गेलेल्या आणि नव-अस्पृश्यतेत जगणार्‍या समस्त कामगार-कर्मचारीवर्गाच्या, काही कानावर पडतंय का… काही नजरेखालून जातंय का???

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)