चंगळवाद

चंगळवाद, महत्त्वाकांक्षाग्रस्तता आणि मानसिक अस्थैर्य यात जवळचा संबंध असून त्यातून आत्यंतिक स्वार्थी, प्रचंड स्वकेंद्रित, चंगळवादी, स्पर्धात्मक वृत्ती तयार होऊन संबंधित लोकं नैराश्य, चिंताग्रस्तता, एकाकीपणा इत्यादी मानसिक व्याधींनी ग्रस्त होत, व्यसनाधीन बनतात…. केवळ, इथपर्यंतच अच्युत गोडबोले म्हणतात त्याप्रमाणे, मानवीअधोगतीचा प्रवास होत नाही; तो ‘चंगळवादा’तून सुरु झालेला हा प्रवास अखेर ‘मानवी-असतित्वा’लाच ग्रहण लावण्यापर्यंत थेट पोहोचतो कसा, हे जरा आपण थोडक्यात तपासून पाहूया….

सध्या, ‘कार्बन व प्रदूषणकेंद्री’ संवेदनशून्य चैनबाजीत जगण्याचा एक अमानुष व सैतानीउन्माद, जगभरात जवळपास सर्वच मानवी समूहात निव्वळ ‘चंगळवादा’मुळे संचारलेला आपण पहाताहोत… तळागाळातल्या माणसाच्या उरावर बसलेली ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्था’ (Vampire-State System) ही, त्यातूनच, केवळ या ‘चंगळवादा’तूनच उभी राहू शकते, अन्यथा नव्हे… हा एक अजून महत्त्वपूर्ण मुद्दा!

पृथ्वीतलावर सर्वांनाच जी जगण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते; ती अंतिमतः ‘सौरऊर्जा’चं होय. तेव्हा, या ऊर्जेवर आधारित परस्परावलंबी सजीवसृष्टीचं (एकपेशीय, बहुपेशीय, वनस्पती, जलचर, किटक, पशूपक्षी, मानव) अस्तित्व, हे सांख्यिकी दृष्टीनं ढोबळमानाने व सर्वसाधारणपणे तुलनात्मक किती असावं… हे या सूर्याच्या स्थिरांकावर ठरतं…. या समीकरणात, मानवानं अक्षम्य ढवळाढवळ करत, सजीवसृष्टीचं सगळंच ‘गतिमान-संतुलन’ बिघडवून टाकलयं. सजीवांची कुठलीही जात-प्रजात आपापसात सुयोग्य प्रमाण राखूनच जगू शकते, जगत असते; कारण, निसर्ग आपसूकच स्वयंभूपणे त्यांच्या संख्येचं अनेक प्रकारे नियमन करत असतो. त्यात कुठल्याही प्रकारे दयेमायेचा संबंध नसतो. जैविक-अस्तित्वाचं परस्परावलंबी ‘गुणोत्तरा’चं सातत्य राखणारी, लाखो-करोडो-अब्जावधि वर्षांची ही अहर्निश स्वयंभू व संथ गतीनं घडणारी “जैव-प्रक्रिया’चं, उण्यापुर्‍या दोन-तीन शतकात शास्त्रीय शोधांच्या आधारे माणसांची संख्या बेसुमार वाढवून, बेलगाम अर्थशास्त्रीय संरचना व विकासाचं प्रारुप उभारुन व चंगळवादी जीवनशैलीचा अंगिकार करुन आपण पूर्णपणे उध्वस्त करत आणलीयं.

माणसांच्या आदिम निसर्गस्नेही जगण्याच्या व आजच्या आधुनिक जगण्याच्या ‘कार्बन पाऊलखुणां’मध्ये (Carbon-footprint) जमीनअस्मानाचा फरक आहे. मुळातच, माणूस इतरे सजीवांपेक्षा, जन्मापासून मेरेपर्यंत निसर्गावर अनेक कितीतरी अधिकचे आघात करत असतो; त्यानं उपजत बुद्धीचा गैरवापर करुन वेडवाकडं उपभोगलेलं ‘चंगळवादी-कर्मस्वातंत्र्य’, हे त्याचं प्रमुख कारण होय. निसर्गासमोर नतमस्तक न होता, जाणतेअजाणतेपणी व अहंकाराने आपण सगळ्याचा सर्वनाश करत सुटलोयं… आणि, ही सर्वनाशाची प्रक्रिया (ज्याला, ‘Tipping Point’ म्हटलं जातं) अणुभंजनासारखी एक मग अनियंत्रित न थांबणारी… “साखळी-प्रक्रिया”च चंगळवादामुळे बनू शकेल!

कार्बन-ऊत्सर्जनाच्या दृष्टीकोनातून पहाता, अमेरिकेची लोकसंख्या, भारताच्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी जास्त भरते; कारण, अत्याधुनिक ‘चंगळवादी जीवनशैली’ अंगिकारणार्‍या अमेरिकन माणसाचं दरडोई ‘कार्बन-ऊत्सर्जन’ भारतीय माणसाच्या दहा ते वीस पट जास्तीचं असतं… आपली आधुनिक चंगळवादी जीवनशैली ‘न’ बदलता, आपण असचं सगळ्यांनी बेभानपणे जगायचं ठरवलं तर, आपलं अस्तित्व कायम राखायला किमान “सहा पृथ्वी”सारखे ग्रह उपलब्ध असायला हवेत, असं पर्यावरण-तज्ज्ञांचं मत आहे; जेव्हा, अजून पृथ्वीसारख्या अन्य एखाद्या ‘सजीव ग्रहा’चा शोध अजून आपल्या ब्रह्मांडात लागायचायं !

मुद्दा हा की, अशी, चंगळवादी जीवनशैली निरंकुश चालू ठेवण्यासाठी ‘जागतिक तापमानवाढी’ला चालना देणारं प्रचंड ‘कार्बन-ऊत्सर्जन’, यापुढेही असंच चालू ठेवावं लागेल आणि, मग वादळं, दुष्काळ, ढगफुटी, गारपीट, असह्य उष्णतामान, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ज्वालामुखींचे उद्रेक, प्रलयकारी भूकंप, तीव्र हिमपात यासह, कोविड-१९ सारख्या भीषण संसर्गजन्य रोगराईच्या साथी व कर्करोगासारखे असाध्य रोग पसरवत, नियती पृथ्वीभर मानवी-संहाराचं थैमान घालेल…

“अहम् पासून सोहम्” कडे नेणारं ‘भारतीय तत्त्वज्ञान’ आणि ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ म्हणणारी ‘मराठी-संस्कृती’, हे आमचं जगण्याचं तत्त्वज्ञान आहे… म्हणूनच, परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदरच, मुलाबाळा-नातवंडांवर आपलं खरंखुरं प्रेम असेल; तर, आपल्या ‘चंगळवादी’ जीवनशैलीत, अर्थव्यवस्थेत, विकास-प्रक्रियेत युध्दपातळीवरुन ‘निसर्ग-पर्यावरणपूरक’ आमूलाग्र बदल करण्याची नितांत गरज आहे!

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी हरित पक्ष)


चंगळवादाचे थैमान – अच्युत गोडबोले

चंगळवादी मानसिकतेला डोक्यावर घेणारी नवश्रीमंतांची संख्या खाजगीकरण, उदारमतवाद, जागतिकीकरणानंतर वेगाने वाढली. जाहिरातींच्या माध्यमातून माणसांच्या गरजा वाढवल्या जाऊ लागल्या. दुनियाभरच्या वस्तू विकत घेण्यासाठी लोकांना convince केले गेले.

घर-फ्लॅट-बंगला-weekend home-second ining home-farmhouse-जगातल्या मोठ्या शहरामध्ये घरं-इत्यादी. यादी काही संपेचिना.

सायकलीपासून सुरू झालेला प्रवास पुढे-ऍक्टिवा type स्कूटर, बाईक, स्पोर्ट्स बाईक, कार(wagonr, इंडिका)- ब्रेझा-स्विफ्ट डिझायर-venue-innova-fortuner-ऑडी, BMW-Mercedez-jaguar, रोल्स रॉयस-Private Jet- हेलिकॉप्टर-इत्यादी वाहनांची यादी संपेचिना.

पैसे कमावण्यात वाईट काय आहे? पैसा सब कुछ है, पैसे के सामने दुनिया झुकती है, अगर तेरे पास पैसा है, तो लोग पुछेगे कैसा है।

अशी वाक्ये एकमेकांच्या तोंडावर फेकली जाऊ लागली. अन जमिनी वास्तव काही अंशी तसे झाल्याने लोकंही दुजोरा देऊ लागली. लोकं पैसा कमावण्याच्या मागे धावू लागली.

लोक अचानक वस्तूंच्या मागे धावू लागली का? त्याचे उत्तर नाही असे आहे. लोकांना जाहिरातींच्या माध्यमातून प्रवृत्त केले गेले. Lifestyle ह्या विषयाला धरून सेमिनार भरवले गेले, फॅशन शोज, टेलिव्हिजन वाहिन्यांवर, वृत्तपत्रांमध्ये, सोशल मीडियावर उत्पादनांच्या जाहिरातींचा भडिमार केला गेला. अतिशय महागडी उत्पादनं status शी जोडली गेली. ह्या वस्तू ज्याच्याकडे आहे, तो यशस्वी मानला जावा ह्या अनुषंगाने विविध मीडियाच्या माध्यमातून जनमत घडवले गेले.

हल्ली stress buster म्हणून shopping केली जाते. तणावातून बाहेर निघण्याकरता शॉपिंग करण्याइतकी सधनता नवश्रीमंतांमध्ये आली आहे. जबरदस्त चैन आहे ना.

मी व्यावसायिक असल्याने एका तीन तासाच्या business seminar ला गेलो होतो. तिथल्या ट्रेनरने तीन तास फक्त राहणीमानावर माहिती दिली. त्यात कोणत्या ब्रॅंडचे कपडे घालावे, शूज, बेल्ट, कार, अत्तर इत्यादी सारी माहिती दिली. कार व्यावसायिकांसाठी must आहे, असे सांगितले. ज्याला कार घेणे शक्य नाही, त्याने धाडस करावे, installment वर घ्यावी. पण घ्यावीच. कारण तुम्ही business person आहात, ऐरेगैरे नाही. तेव्हा कार वगैरे डामडौल करून लोकांवर-ग्राहकांवर-client वर इम्प्रेशन पाडणे गरजेचे आहे, असे सांगितले. आणि जो ‘दिखता’ है, वही बिकता है, असे सांगितले अन हॉलमध्ये बसलेल्या 22 पैकी 22 जण सहमत झालो.

अन अशा ट्रेनर्सना एखादा म्हणालाच की साधी राहणी, उच्च विचार किंवा किमान व्यवसाय वाढवण्याचा विचार असेल तरी पुरेसे आहे, तर ट्रेनर शाहरूख खानचे वाक्य तोंडावर फेकून मारतात. “First become rich, then become philosopher.” आता शाहरुख म्हणतोय म्हटल्यावर आक्षेप घेण्याइतका मेंदू विकसित झालेला नसल्याने आमच्यासारखा विद्यार्थीवर्ग गप्प बसतो.

मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी मग ह्याच मानवी भावनेला हात घालत ब्रँडेड वस्तू बाजारात आणून अव्वा च्या सव्वा किमतीला विकायला सुरुवात केली. चड्डी-अंडरवेअर-बनियान-शर्ट-पॅन्ट-टीशर्ट-बेल्ट-शूज-सॉक्स-घड्याळ-गॉगल- पॉकेट-मोबाईल फोन, पेन इत्यादी.

घरात ठेवण्यासाठीही आपण वारेमाप गोष्टी विकत घेत असतो, काहींची आपल्याला बिलकूल गरज नसते. आपण नुसती त्या वस्तू घेऊन शोबाजी करत असतो.

आपल्याला ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’, तृष्णा, हाव, हव्यास दुःखाचं कारण आहे. ‘There is a limit to the need, but no limit to the greed, अशी महापुरुषांनी सुंदर शिकवण दिली आहे. मात्र माणसांना त्याचा विसर पडला. वस्तूचा आनंद घेण्यापेक्षा ती वस्तू माझ्या मालकीची आहे, हे इतरांना दाखवण्यात आनंद वाटू लागला. इगो सुखावू लागला. इतरांना आपल्या आर्थिक स्थितीचा हेवा-मत्सर वाटावा, याकरता क्लृप्त्या लढवणे सुरू झाले. तसे वागणे सुरू झाले. आपल्या आर्थिक श्रीमंतीने समोरच्यांचे डोळे दिपले कसे जातील,याची विशेष काळजी सधनांकडून घेतली जाऊ लागली.

 

उरुग्वेचा माजी राष्ट्राध्यक्ष जोस मुजीका म्हणतो की तुम्ही जेव्हा एखादी वस्तू विकत घेता तेव्हा तुम्ही त्या बदल्यात विशिष्ट रक्कम अदा करत असता, याचाच अर्थ ती रक्कम कमवण्यासाठी जितका वेळ तुम्ही दिलेला असतो, तो वेळ म्हणजेच त्या वस्तूचे मोल आहे. आणि वेळ जगातील कुठल्याही सुपर मार्केटमध्ये विकत मिळत नाही. तेव्हा अनावश्यक खरेदी करताना तुम्ही तुमचा पैसा नव्हे तर अमूल्य वेळच वाया घालवत असता, जे फार चुकीचे आहे.

आपलं आताचं सुख हे आपल्या पूर्वीच्या अनुभवावर अवलंबून असते. हॅरी हेल्सन हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ याला adaptation level असं म्हणे. म्हणजे एखाद्या पातळीचं सुख मिळाल्यावर आपल्याला त्या पातळीची सवय होते. म्हणजेच ती पातळी आपण आत्मसात करतो अन त्या पातळीवर समाधान होत नसल्याने त्यापेक्षा जास्त सुखाच्या मागे लागतो. म्हणूनच याला सुखाची ट्रेडमिल असे म्हणतात. ट्रेंडमिलवर स्थिर राहण्यासाठी धावावंच लागतं, तसेच भौतिक वस्तूंतून मिळणाऱ्या सुखाचं असतं. माणसाचं समाधान वाढण्याऐवजी अपेक्षाच वाढतात आणि तो अधिक भौतिक सुखं मिळवण्याच्या मागे लागतो. पण त्याच्याकडे त्या वस्तू त्या क्षणाला नसल्याने तो पुन्हा असमाधानीच राहतो. अर्थात माणसाने असमाधानी राहण्यात कंपन्यांचा फायदाच असतो. असमाधानी असतील तर लोक नवनव्या वस्तू विकत घेतील. म्हणून कंपन्या सातत्याने जाहिरातबाजी करतात अन सामान्य माणूस त्याला बळी पडतो. पूर्वीइतकं सुख किंवा समाधान मिळवण्यासाठी माणूस सतत जास्तीत जास्त वस्तू (उदा. लेटेस्ट मोबाईल, घड्याळ, बाईक, कार, टेलिव्हिजन संच) विकत घेईल. यामुळे या साऱ्या प्रक्रियेत त्याला सुख तर मिळत नाहीच, पण प्रचंड मानसिक असुरक्षितता, एकाकीपणा, नैराश्य यांना सामोरे जावे लागते, असे एरिक फ्रॉम म्हणतो.

फक्त स्वार्थी, प्रचंड स्वकेंद्रित, चंगळवादी, स्पर्धात्मक वृत्तीतून अनेक लहानमोठे मनोविकार उदभवू शकतात, असं 2000 साली ‘American Psychiatrist Association’ मध्येही मांडले गेले आहे.

टिम कॅसर आणि त्यांचे सहकारी यांनी पैशाबरोबर प्रसिद्धीला महत्व देणाऱ्या, त्यांच्यामागे धावणाऱ्या लोकांचाही अभ्यास केला. तिथे त्यांना अनेक लोक नैराश्य, चिंताग्रस्तता, एकाकीपणा इत्यादी मानसिक व्याधींनी ग्रासले होते. महत्वाकांक्षा, चंगळवाद आणि मानसिक अस्थैर्य यात जवळचे संबंध दिसून आले. अशा लोकांना सतत कुणीतरी स्तुती केलेली आवडते, ते नारसिसिस्ट असतात, हेही मग लक्षात आलं. यात कित्येक माणसे मानसिक ताण कमी करण्यासाठी धूम्रपान, मद्यपान, गर्द, गांजा ओढत होती, असे लक्षात आले.

तेव्हा बापजाद्यांनी ‘चित्ती असू द्यावे समाधान’ हे जे सांगितलं आहे, त्याचा अंगिकार करा अन जीवन रसरशीतपणे जगा राजेहो.

संदर्भ – चंगळवादाचे थैमान, अच्युत गोडबोले