शनिवार, दि. १० ऑगस्ट-२०२४ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या, ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथील कार्यक्रमाप्रसंगी, काही ‘राज’कीय-समाजकंटकांनी जो काही धिंगाणा घातला, त्यावर ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांचे परखड भाष्य…

गुजराथी-भाषिक बड्या भांडवलदारांसमोर ‘ब्र’ काढण्याची आणि ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधातला ‘क’ काढण्याची हिंमत नसलेल्या…तकलादू, डरपोक मराठी-राजकारण्यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करण्याचे, धमकावण्याचे आणि ‘राडा-संस्कृती’च्या नादाने पोलिस-केसेस अंगावर घ्यायला लावून…मराठी तरुण पिढ्या न् पिढ्या बरबाद करण्याचे ‘राजकीय-धंदे’, आतातरी आवरते घ्यावेत…!!!
—————————
“भितीपोटी गर्भगळीत झालेले विरोधी पक्ष नेते आणि ‘लोकशाही-देवते’चं सत्ताधाऱ्यांकडून झालेलं ‘अपहरण’ आणि ‘वस्त्रहरण’ पाहून गोंधळलेली-धास्तावलेली जनता”, हे जगाच्या पाठीवर कुठेही आणि कुठल्याही देशासाठी…अराजक निर्माण करणारं, एक खात्रीलायक ‘मिश्रण’ ठरतं (जे आपण सध्या बांगला देशात अनुभवतो आहोतच)!
…आपल्याकडेही EC, RBI, IT, ED, CBI व प्रसारमाध्यमांसारख्या इतर एकूणएक सगळ्याच ‘स्वायत्त-यंत्रणा’ व बर्‍याच अंशी न्यायालयीन-व्यवस्था देखील…सत्ताधाऱ्यांच्या आणि त्यांनी पोसलेल्या मूठभर भांडवलदारांच्या पैशाचिक-राक्षसी मुठीत आल्याने, आपल्याही देशात अराजकसदृश परिस्थिती होऊ घातलेली असण्याच्या पार्श्वभूमीवर; एक ध्रुवतार्‍यासारखा अढळ व निधड्या छातीचा (बनावट ५६” छातीचा नव्हे) मराठी नेता, दिल्लीश्वर सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर पाय ठेऊन महाराष्ट्रात उभा ठाकलाय, त्याचं नाव ‘उद्धव ठाकरे’!

…तोच धीरोदात्तपणा, शनिवारच्या ठाण्यातील गडकरी-रंगायतनच्या शिवसेनेच्या कार्यक्रमाप्रसंगी मा. उद्धवजींनी दाखवून दिला…त्याबद्दल, त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
ज्यांच्या डोक्यात ‘सुपार्‍या’ भरलेल्या असतात आणि ज्यांच्या डोक्याची कवटी म्हणजे, निव्वळ ‘नारळ’ बनलेला असतो…अशीच माणसं, लोकशाहीत वेडीवाकडी विध्वंसक वागू शकतात; मग ती कुठल्याही पक्षातली का असेनात! ही प्रवृत्ती ठेचली जाण्याची अपेक्षा पोलिसदलाकडून करण्याचे दिवस, ठाण्यापुरते तरी आता संपलेत. पोलिसांची भिती, फक्त आणि फक्त जनसामान्यांना व पापभीरु लोकांनाच उरलीय!
“भ्रष्टाचाराचे विविध मार्ग कल्पकतेनं शोधणारे व ते पूर्ण क्षमतेने चोखाळणारे अनेक पोलिस-अधिकारी, ‘ईडी’च्या नोटिशीला घाबरणार्‍या डरपोक राजकीय नेत्यांसारखेच, (अर्थातच, आजवर त्यांनी केलेल्या पापाचरणामुळेच) सत्ताधारी राजकारण्यांना कमालीचे टरकून रहायला लागलेत”, हेच लज्जास्पद चित्र, ठाण्यात वारंवार दिसायला लागलंय. अगदी निवडून-वेचून काही बडे अधिकारी, या शहरात ‘खास कामगिरी’साठी…पोलिसदलात, महापालिकेत व जिल्हाधिकारी कार्यालयात आणल्याचं सर्रास बोललं जातं.
‘सारस्वतां’चं असलेलं आमचं ठाणे-शहर, पहाता पहाता ‘रासवटां’चं माहेरघर होण्याची प्रक्रिया, चारपाच दशकांपूर्वीच सुरु झाली होती; ती प्रक्रिया फक्त आता, पूर्णत्वाला पोहोचू पहातेय, टिपेला जाऊ पहातेय इतकंच!
राजकीय गुंडापुंडांचा या शहराला पडलेला विळखा पहाता…या शहराची आणि आम्ही कष्टपूर्वक भरणा करत असलेल्या करांमुळे चालणाऱ्या, या शहरातल्या एकूणच व्यवस्थेची, आम्हा मूळच्या जन्माने ‘ठाणेकर’ असलेल्यांना भयंकर लाज वाटू लागलीय… हे शहर सज्जनशक्तिसाठी आता ‘जहर’ बनलंय…त्याचा निषेध करावा, तेवढा तो थोडाच!

…जाता जाता, कुणाच्या तरी बहकावण्यातून आपापसात डोकी फोडून घेणाऱ्या, माझ्या प्राणप्रिय मराठी तरुणतरुणींना ‘धर्मराज्य’तर्फे विनम्र निवेदन आहे की, कंत्राटी-कामगार पद्धती’तील गुलामगिरी-नवअस्पृश्यता, अर्धरोजगारीतलं तुटपुंजं वेतन, अमानुष आर्थिक-विषमता, भडकत्या महागाईसारखे अनेक रोजच्या जगण्यातले ज्वलंत प्रश्न आ वासून तुमच्याआमच्या समोर उभे आहेत; तिथे, ‘नारळ आणि सुपार्‍या’ खरेदी करण्यात व फेकण्यात वाया जाणारी तुमची ‘आंदोलन-ऊर्जा’ वापरा व मराठी-माणसांच्या कल्याणाचे धनी व्हा…पण, असलं काही धाडस करायला ‘शेठजीं’चे ‘मिंधे’ असलेले तुमचे नेते कधिच सांगणार नाहीत!
शनिवारी रात्री जे शेण फेकलं गेलं, ते कुणाच्या गाडीवर पडण्याआधी शिवबा-संतांनी निर्मिलेल्या महन्मंगल मराठी-संस्कृतीच्या तोंडावर पडलं, हे कृपया विसरु नका!!
“कालपर्यंत माझ्या नजरेसमोर जे सेकंड-हॅण्ड मोटरसायकल-स्कूटरच्या पेट्रोलला महाग होते आणि जे रस्त्यावर रिक्षा-हातगाड्या आणि कोपर्‍यावर टपऱ्या चालवत होते…ते राजकारणात आल्यावर अल्पावधीतच ऐषोआरामी ४०-५० लाखाच्या महागड्या गाड्यांमधून फिरताना आम्ही पहात आलोय…कुठून येतो हा एवढा अचानक पैसा? कुठून येते ही ‘श्रमाविना संपत्ती’, ज्याला आपल्या भारतीय-अध्यात्मानुसार वा जाज्वल्य ‘हिंदुत्वा’नुसार, थेट ‘महापातक’ म्हटलंय??
…तरीही ‘हिंदुत्वा’चाच ‘बुरखा’ ओढून, मुखवटा घालून हे काळे ‘राजकीय-धंदे’ बेधडक चाललेले दिसतात, हे ही एक आश्चर्यच…आणि, याच गोष्टींचं दुर्दैवाने तुम्हाला जर आकर्षण वाटत असेल; तर मग लक्षात ठेवा, “हजारात एखाद्याच्याच नशिबी, ब्लॅकमेलिंगच्या ‘हप्ता-संस्कृती’तून अशी ‘पातकी श्रीमंती’ येते…पण, ती ज्यांना फळते, लखलाभ होते; ते आतून नुसते केवळ अस्वस्थच नसतात…तर, प्रचंड भयभीतही असतात (म्हणूनच तर, ‘ईडीबिडी’च्या भितीने राजकारणात आपल्या पार्श्वभागाला पाय लावून इकडून तिकडे पळापळ-पक्षांतर करताना दिसतात अथवा आपल्या राजकीय-भूमिका सारख्या बदलताना दिसतात); तर, बाकीचे हजारातले उरलेले ९९९ शब्दशः भिकेला लागतात, तुरुंगात सडतात आणि सरतेशेवटी बेवारस कुत्र्यासारखे रस्त्यावर पोलिसांच्या लाठीमाराचे-गोळीबाराचे बळी ठरतात! भ्रष्ट व्यवहारांतून व अनीतिने झटपट श्रीमंत झालेले कुणीही…यथावकाश, श्रीकृष्णाच्या भगवतगीतेतील ‘कर्मसिद्धांता’नुसार केल्या कर्मांची फळे कुटुंबियांसमवेत, या ना त्या स्वरुपात स्वतःही भोगतातच!

…राजन राजे