“बैल गेला आणि झोपा केला….”

महाराष्ट्राच्या साधनसंपत्तीवरील ‘गुजराथी भांडवली-लाॅबी’च्या करकचून पडलेल्या विळख्याने ‘मराठी-श्वास’ गुदमरला असताना…मराठी-भाषा ‘अभिजात’ होण्याचा नेमका उपयोग काय आणि तो उपयोग कोणाला…???

मराठी-भाषा ‘अभिजात’ म्हणून जाहीर करण्यामागचा मूळ कुटील हेतू…जाणून न घेताच किंवा त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करत; ज्यापद्धतीने, स्वतःला साहित्यिक म्हणवणारे एकजात सगळेच महाभाग…गळे काढून तारस्वरात ‘डबल-इंजिन’ सरकारचं (दिल्ली आणि मुंबईस्थित) बेफाम कौतुक करताना दिसतायत…ते पहाता, थोडी तरी त्यांनी “जनाची नाही तर मनाची” राखायला पाहिजे होती, असं वाटल्यावाचून रहात नाही.
…याच न्यायाने मग, सीतेनं रावणाला आणि मावळ्यांनी औरंगजेबाला, वश व्हायला पाहिजे होतं… कुणी अडवलं होतं त्यांना? अडवलं होतं, ते त्यांच्या आंतरिक ‘नैतिक भूमिके’नं…एक अशी वज्रकठोर ‘नैतिक भूमिका’ जी, फक्त आणि फक्त, “सत्य, न्याया”वरच उभी रहाते आणि त्यातून, प्रसवणार्‍या ‘निष्ठे’चा हात धरुन पुढे चालत रहाते!
हे जे कोणी, मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्र आणि दिल्लीच्या आसुरी-राजकीय शक्तिंवर एकदम ‘फिदा’ झालेत… ते साहित्यिक कमी आणि ‘बोरुबहाद्दर’ जास्त आहेत!
हे असले साहित्यिक, म्हणजे फारतर मराठीमनांवर, मराठीभाषेचं ‘गारुड’ घालणारे ‘शब्दप्रभू’ म्हणता येतील… पण, ते मुळातूनच हाडाचे ‘मराठी-हितैषी’ नव्हेतच!
एखादा ‘गारुडी’ जसा साप-मुंगुसाचा खेळ मांडून प्रेक्षकांना रिझवतो व सरतेशेवटी थाळी पसरवून पैसा गोळा करण्याचा पोटार्थी धंदा करतो; तसेच, हे बहुतांश साहित्यिक ‘गारुडी’ आहेत… मराठी-शब्दांचा खेळ मांडत आणि मराठी मनं रिझवत आपलं पोट भरु पहाणारे (आता, ‘अभिजात-भाषा’ दर्जा मराठीला मिळाल्यामुळे त्यातील काहींची पोटं, अगदी तट्ट फुगतील एवढंच); यापलिकडे, त्यांचं मराठी-समाजाला योगदान काय?
…खऱ्याअर्थाने मोडक्यातोडक्या स्वरुपात वा विकलांग अवस्थेत का होईना…पण, ती ‘मायमराठी’ शब्दशः जगवणार्‍या सर्वसामान्य मराठी-माणसांशी, या साहित्यिक म्हणवणार्‍यांचं काहीही नातंगोतं नाही किंवा त्यांना त्यांच्याशी काहीही देणंघेणं नाही…(काही सन्माननीय अपवाद वगळता) यांच्यापैकी, कुणीही उन्मत्त ‘व्यवस्थे’ला अंगावर घेणारे ना पु. ल. देशपांडे, ना विजय तेंडुलकर, ना दुर्गा भागवत!

भाषेचा वारसा ‘अभिजात’ आहे की, तिचा वारसा ‘ज्ञात-अज्ञात’ आहे…यामुळे, ती मुळीच जगणार नाही, वाढणार नाही!
ज्या भाषेची बाजारपेठेतील किंमत घसरत गेल्याने ती अस्तंगताला जाऊ पहाते…ती जगली काय, नी मेली काय…दोन्हीत तत्त्वतः फारसा फरक नाहीच; कारण, ती ज्यांच्या ओठांवर असते…ते ‘ओठ’ भांडवली-व्यवस्थेने आपल्या दमनकारी-यंत्रणेच्या दाभणाने शिवून टाकलेले असतात!
…त्या अशा ‘मायबोली’साठी ‘मरणपंथ’ तर, तेव्हाच अंथरुन तयार ठेवलेला असतो; जेव्हा, तिची भर ‘बाजारातली पत’ आणि जोडीला ती बोलणार्‍यांची ‘आर्थिक ताकद वा क्रयशक्ति’ उतरणीला लागलेली असते!

मराठी भाषा जरुर ‘अभिजात’ ठरावी, तशी ती आहेच… पण, ती कुणाच्या हातून व्हावी, यालाही महत्त्व आहे!
…ज्यांनी ‘महाराष्ट्रधर्म’ भरबाजारी बुडवला-तुडवला, शिवबा-संतांचा महाराष्ट्र पहाता पहाता पार नासवला; तेच जेव्हा, असं पाऊल उचललात; तेव्हा, ते असं पाऊल भाषेच्या निखळ प्रेमापोटी वा ती मायबोली असलेल्या माणसांच्या कल्याणासाठी नव्हे; तर, आपल्या हातून निसटू पहाणारी ‘आसुरी-सत्ता’ राखण्याच्या एकमात्र उद्देशाने उचलत असतात!

** सिंधुदुर्गातला शिवछत्रपतींचा पुतळा ज्यांच्या भ्रष्टाचार व बेपर्वाईने कोसळला….
** न्यायदेवता ज्यांनी साफ भ्रष्ट केली, म्हणून वर्षांनुवर्षे न्यायालयातून निकाल लावले जात नाहीत किंवा लागलेच तरी, न्याय मिळण्याची शक्यता झाकोळलेली रहाते….
** ज्या दुर्गमातेचा आज उत्सव साजरा होतोय; त्या महिलाशक्तिचीच नव्हे; तर, अगदी चिमुरड्या मुलींची देखील महाराष्ट्रात अब्रू हालहाल करुन सर्रास लुटली जातेय….
**आणि, बदलापूरसारख्या अनेक प्रसंगी तर या सरकारच्या तालमीत तयार झालेले पोलिस, अशा भयानक प्रसंगीदेखील स्वतःचे हितसंबंध जपू पहातात आणि आंदोलकांवर मात्र, वरच्या आदेशाने खटल्यांचा ससेमिरा लावतात….
** महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या कंपन्या-कारखान्यांमधून ‘कंत्राटी’ मराठी-तरुणपिढीचं ‘माणूसपण’, गुजराथी ‘भांडवलदार-लाॅबी’कडून (ज्यांच्या जीवावरच व ज्यांच्या हितासाठीच, मुंबई आणि दिल्लीची ‘डबल-इंजिन’ सरकारं चालतायत) राजरोस पायदळी तुडवलं जातं…
तेव्हा, यातले किती साहित्यिक कधि रस्त्यावर उतरले होते, याच सरकारचा निषेध करण्यासाठी?
या सार्‍या अन्याय-अत्याचार-शोषणावर अत्यंत कठोर शब्दात प्रहार त्यांनी केल्याचं किंवा ‘भांडवली-व्यवस्थे’च्या पालखीचे भोई बनलेल्या, या साहित्यिकांच्या साहित्यातून त्याचं जळजळीत प्रतिबिंब उमटल्याचं…खरंच दिसतं कधि???
‘कोमसाप’चे अध्यक्ष वगैरे झालेल्या मधु मंगेश कर्णिक यांचं वानगीदाखल उदाहरण घेऊया…जेव्हा आम्ही जीवाची बाजी लावून ‘विनाशकारी-विकासा’चं मूर्तिमंत प्रतिक असलेल्या जैतापूर अणुऊर्जा-प्रकल्पाविरोधात आंदोलन करत होतो; तेव्हा, या गृहस्थांनी घाईघाईने प्रकल्पाच्या समर्थनार्थ लिहीलेल्या उत्तम बांधणीच्या “जैतापुरची बत्ती” या पुस्तकाच्या हजारो प्रति, नारायण राणेंच्या माणसांकरवी कोकणात सर्वत्र फुकट वाटल्या जात असताना…आमच्यासोबत असलेले निधड्या छातीचे आंदोलक स्व. विक्रांत कर्णिक त्यांना फोन करुन विचारते झाले होते, “तुमच्या ‘जैतापुरची बत्ती’ या पुस्तकाच्या ‘बत्ती’ला ‘तेल’ कुणी पुरवलं, ते सांगा!” (अर्थातच, समोरुन तत्काळ फोन ठेवण्यात आला, हे वेगळं सांगायला नकोच!)

तेव्हा, मराठी भाषा ‘अभिजात’ होण्याचा अभिमान आहेच… पण, ती बोलणार्‍या, ती जगवणार्‍या जिवंत हाडामांसाच्या सामान्य मराठी-माणसांचा, जरा थबकून आपण मुळातून कधि विचार करणार?
मराठी भाषा, ‘अभिजात’ जाहीर झाल्याने, त्यांच्या परिस्थितीत लक्षणीय फरक पडणार असेल; तरच, त्या घोषणेचं उरभरलं स्वागत होण्यात जरुर अर्थ आहे!

पाशवी-वासवी शक्तिंनी मला अगदी ‘स्वर्गसुख’ उपलब्ध करुन दिलं; तरी ते मी मागचापुढचा विचार न करता क्षणभरात लाथाडून देईन, …एवढी मोठी भारतीय-अध्यात्माला (अर्थातच, शिवबा-संतांच्या जाज्वल्य ‘हिंदुत्वा’लाही) अभिप्रेत असलेलीच नव्हे; तर, अगदी लगडून असलेली अपेक्षा…भांडवली-व्यवस्थेची ‘बटीक’ बनलेल्या या लोकशाहीत, वंचित मराठी-जनसमुदायाकडून बाळगता येत नाही…हे व्यवहारतः मान्यच!
…पण, लाडक्या बहिणीची तुटपुंजी ओवाळणी असो (बहिणी लाडक्या; तर, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’त ‘पिचले’ जाणारे, आरपार ‘चेचले’ जाणारे करोडो करोडो ‘भाऊ’, या सत्ताधाऱ्यांचे ‘दुश्मन’ आहेत काय…हा प्रश्न नको विचारायला?) …. निवडणुकीच्या काळात, सत्ताधाऱ्यांकडून होणारं फार मोठं पैसे वाटप वगैरे असो…अथवा, दाखवली-दिली गेलेली इतर आमिषं असोत…त्यातून, महाभारतातल्या धृतराष्ट्रासारखं ‘आंधळेपण’ न येता, डोळसपणे ‘मतदान’ करता येणार नसेल…तर, महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाला, साक्षात ‘ब्रह्मदेव’ जरी वरुन खाली उतरला; तरी, वाचवू शकणार नाही…मग, मराठी भाषा ‘अभिजात’ बनण्याची, सामान्यांच्या दृष्टीने बिनकामाची बात, तर कामी येणं सोडाच…!!!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)