‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक १)

९ सप्टेंबरपासून सुरु झालेला हा संप, अपेक्षेनुसार ३८ दिवसांनंतर १७ ऑक्टोबरला ‘सिटू”प्रणित ‘सॅमसंग इंडिया वर्कर्स युनियन’ने (SIWU) ऐतिहासिक यश मिळवून मागे घेतला आणि सॅमसंगसारख्या इतर अनेक बहुराष्ट्रीय (Multinational) कंपन्यांच्या भारतातील मनमानी कारभाराला चांगलाच चाप लावला!

झालेल्या समझोत्यानुसार….

** कामगारांनी लोकशाही पद्धतीने व स्वेच्छेने निवडलेल्या युनियनशी, पगार-बोनस वाढीसाठी युनियनने दाखल केलेल्या ‘मागणीपत्रा’वर (Charter of Demands…’COD’) चर्चा करायला उद्दामपणे व बेकायदेशीररित्या नकार देणाऱ्या सॅमसंग-व्यवस्थापनाला, या संघर्षाने नीतिनियमानुसार संबंधित युनियनशी वाटाघाटी करण्यास भाग पाडले गेलेले आहे

** आपल्या न्याय्यहक्कांसाठी संप करणाऱ्या संपकरी-कामगारांवर आकसाने कुठलीही कारवाई न करण्याचे व्यवस्थापनाला कबूल करावे लागले आहे

*सर्वात महत्त्वाची बाब जर कुठली असेल; तर, ती या संप-काळातील ३८ दिवसांचा पगार, संपकरी कामगार-कर्मचारीवर्गाला देण्यास व्यवस्थापनाला बाध्य करण्यात आलेलं आहे… आणि, हा या संघर्षपूर्ण सॅमसंग-घडामोडीतून कामगारांच्या हिताच्या दृष्टीने, कामगारविश्वाच्या इतिहासाला एक नवा अध्यायच जोडला गेल्याचं गौरवाने म्हणावं लागेल.

…कारण, आपल्या मनमानी व हुकूमशाही कारभाराने कामगार-कर्मचारीवर्गाची पिळवणूक तर करायचीच; वरुन त्यांच्या ‘माणूसपणा’वरच गदा आणून त्यांना गुलामगिरीत राबवून घ्यायचं आणि त्याविरोधात, आवाज उठू नये म्हणून प्रथमतः कंपनीत युनियनच तयार होऊ द्यायची नाही अथवा कार्यरत असलेली युनियन, कंपनी-दहशतवादाचा व कामगारांमधील नीच-अधम प्रवृत्तींना हाताशी धरुन बेकायदेशीर ‘फोडाफोडी-तंत्रा’चा वापर करत मोडीत काढायची… हा हल्ली, औद्योगिक-सेवा क्षेत्रातील एक कामगारघातकी प्रघात किंवा रिवाजच तयार झाला होता.

…त्याविरोधात कोणी संप करायची हिंमत केलीच तर, तो संप पोलिस बळाचा व बाऊन्सर्स वगैरे कंपनीबाह्य (भाडोत्री गुंडगँग) गुंडशक्तिचा वापर करुन मोडीत काढायचा शिरस्ताच बनला होता. याशिवाय, व्यवस्थापनाच्या, या असल्या “अनुचित कामगार प्रथां”च्या बेदरकार अवलंबामुळे (Unfair Labour Practices) कामगारांना संप करायला भाग पाडलेल्या संपकाळातील पगार, “काम नाही तर, दाम नाही” (NO WORK, NO PAY) या अन्यायकारक सुत्रानुसार कामगार-कर्मचारीवर्गाला देण्याचा प्रश्न, मुळातूनच अलिकडे निपटूनही टाकण्यात आला होता…या सर्व, फार मोठ्या काॅर्पोरेटीय-षडयंत्राला, सॅमसंगच्या कामगार-एकजुटीने जबरदस्त हादरा दिलाय, हे या संपलढ्याचं फार मोठं फलित आहे आणि त्यातून, अवघं ‘कामगारविश्व’ योग्य तो बोध घेईल, अशी आशा करुया…धन्यवाद!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)   (क्रमशः)