कामगार-कर्मचारीवर्गाची हीनदीन, अवनत-अवमानित अवस्था निर्माण होण्याचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे…त्यांच्यात एकप्रकारे ‘बुद्धीमांद्य’ निर्माण करुन, त्यांना जीवन-संघर्षापासून दूर नेणाऱ्या आणि त्यांना ‘दैववादी’ बनवणाऱ्या यच्चयावत सगळ्याच धर्मसंप्रदायांची महाराष्ट्रभरात झालेली मोकाट पैदास!
‘हिंदुत्वा’च्या भंडार्याची उधळण करतच महाराष्ट्रात ‘दैववादा’ला व किंकर्तव्यमूढतेला एकच उधाण आणण्यात आलं….त्याचाच भाग म्हणून पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्यांच्या-कावळ्यांच्या छत्र्यांप्रमाणेच बैठक-संप्रदाय, बापू संप्रदाय, जीवनमिशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, स्वाध्याय-परिवार, ब्रह्मकुमारी यासारखे नवनवीन धर्मसंप्रदाय महाराष्ट्रात जागोजागी उगवू लागले, फोफावू लागले व ही ‘भांडवली-व्यवस्था’, त्याला चांगलंच खतपाणी घालू लागली. संघर्ष करायचा शिवछत्रपतींचा-बाबासाहेबांचा वसा टाकून देऊन ‘मराठी-समाजमन’ या नवनव्या आध्यात्मिक खेळण्यांशी खेळत बसलंय.
त्यामुळेच, पडद्याआड संगनमत असलेल्या, अशा धर्मसंप्रदायांच्या नादी लागून ‘दैववादी’ बनलेला कामगार, आपल्या भविष्याचे दोर नियतीच्या हाती सोपवून बेजबाबदारपणे मोकळा होताना दिसतोय… कृष्णासारखा कुणी अवतार घेईल किंवा किमानपक्षी एखादा शिवाजी, एखादा बाबासाहेब पुन्हा अवतीर्ण होईल आणि या गुलामगिरीच्या कोंडीतून माझी सुटका करेल… अशा भाकड आशेवर तो जगू पहातोय व आपल्या नाकर्तेपणावर-षंढवृत्तीवर, अशा धर्मसंप्रदायांत सामील होऊन तो ‘धार्मिक-मुलामा’ बेमालूम देऊ पहातोय, हे भविष्याच्या दृष्टीने फारच धोकादायक आहे.
मराठी-नैराश्याचा विस्फोट होऊन ‘विद्रोहाची आग’ भडकू नये… म्हणून जे ‘आध्यात्मिक लेप लावलेलं खेळणं’ मराठी हातामध्ये देण्यात आलं, ते अजूनही हातात खुळखुळ्यासारखं घेऊन आमची मराठी-जमात, तशीच दिशाहीन अवस्थेत बसलेली आहे…लहान मुलं हातातलं खेळणं लवकर टाकून देतात व नव्या खेळण्याचा हट्ट धरतात; हे चांगलंच जाणून असणारी व्यवस्था… IPL क्रिकेट सामने, टीव्हीवर नवनवीन मालिका, नवनव्या करमणुकीच्या टूम काढतातच आहेत. पण, आमची मराठी-जमात हे आध्यात्मिक-खेळणं, सर्वनाश समोर दिसत असूनही हातातलं सोडायला तयार नाही, या दुर्दैवाला काय म्हणायचं? तत्त्वतः कुठल्याही आध्यात्मिक-व्यवहाराला विरोध असण्याचं कारण नाही; पण, त्यातून शिवछत्रपतींसारखा “देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा” असं काही निष्पन्न व्हायला हवं… संघर्षाला तिलांजली देऊन, जातिवंत व सच्च्या लढाऊ बाण्याचं विसर्जन करुन; जर समाज, निष्क्रिय अध्यात्माची प्रतिष्ठापना करु पहात असेल…तर, त्याला या बनावट आध्यात्मिक निद्रेतून गदगदा हलवून जागं करावचं लागेल!
…पण, महाराष्ट्रातील अनेकोनेक ‘बुद्धीमांद्य’ निर्माण करणाऱ्या व त्याद्वारे, जीवन-संघर्षापासून दूर नेत ‘दैववादी’ बनवणाऱ्या धर्मसंप्रदायांच्या नादी लागलेला; तसेच सार्वजनिक पूजा-गणेशोत्सव-चैत्रोत्सव, दहीहंड्या, गरबे, भंडारे अशा ‘फाजिल उत्सवप्रियते’त अडकलेला व दारुबाजी-क्रिकेट, वाढदिवस-सोहळे, पार्टीसंस्कृती…या आयुष्य वाया घालवणार्या अतिरेकी करमणुकीत आकंठ बुडालेला मराठी कामगार-कर्मचारीवर्ग, आपल्या ग्लानीतून जागा होईल तर शपथ!
…आणि, बहुशः ‘कंत्राटी-गुलाम’ असलेला मराठी-कामगार, त्याच्या काळझोपेतून कधि जागाच होऊ नये म्हणूनच तर, (ग्राम्य भाषेत बोलायचं तर); महाराष्ट्रात सध्या मातलेल्या अगदी ‘नीचोत्तम’ पातळीवरील गद्दारी व पक्षबदलू राजकीय रणधुमाळीत… राजकारण्यांच्या हगल्यापादल्याच्या बातम्या दिवसाचे २४ तास देणारा मराठी प्रिंट-मिडीया व इलेक्ट्रॉनिक-मिडीया… सॅमसंग-कंपनीतील एवढ्या मोठ्या कामगार-संघर्षाविषयी तब्बल ३८ दिवस मूग गिळून गप्प का होता? हल्ली मराठी-वृत्तपत्रसृष्टीसह महाराष्ट्रातील सगळ्या टीव्ही-चॅनेल्सनी जणू ‘कामगारविश्वा’वर बहिष्कार टाकल्यागत, अशा स्वरुपाच्या कामगार-संघर्षाच्या बातम्या देणंच थांबवलंय की, काय? की, या देशात मातीला एकवेळ किंमत आहे; पण, कामगारांना काडीचीही किंमत नाही, अशी त्यांची धारणा बनलीय?? ‘गोदी-मिडीया’ला, हे असले ‘आदेश’ देतो कोण??? …बिल्किस बानोच्या बलात्कार्यांचे सत्कार करणाऱ्या, हरयाणाच्या निवडणुकीत बलात्कारी राम रहिमला खास पॅरोल देणाऱ्या आणि बिश्नोईसारख्या गुंडाला सांभाळत पडद्यामागून आदेश देणाऱ्या तथाकथित ‘हिंदुत्ववादी’ मंडळींचंच हे काम नव्हे; तर, अन्य कुणाचं?
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)