मराठी घरातील दिवाळी म्हणा, दिपावली म्हणा… हा नवचैतन्यानं सळसळणारा, नरकचतुर्दशीच्या पहाटेला उटण्याच्या दरवळणार्या सुगंधाचं लेणं घेऊन येणारा अन् चकली, चिवडा, करंज्या (कानोले), रवा-बेसनाचे लाडू, अनारसे, शंकरपाळ्या वगैरे फराळाचा घमघमाट चारही दिशांनी उधळून देणारा ‘दिपोत्सव’…दिवाळी रात्री वा पहाटेचं बाहेरचं वातावरण, पणत्यांच्या ज्योतींनी व कंदिलाच्या दिव्यांनी उजळवून टाकण्यापेक्षाही अधिक…वर्षभर, “दिवाळीच्या मुळा, लेकी आसावली”, अशी दिवाळीची चातकासारखी वाट पहाणारी मराठी मनं उजळवून टाकायचा!
आता मात्र, गगनाला भिडलेल्या महागाईत फटाके लावताना फटाक्यांच्या किंमतींनी मराठी फाटक्या खिशातले हात कुठेतरी थरथरत असतात…फटाक्यांचा ‘डेसिबल’ आणि त्यांचं वैपुल्य, दिवाळीतल्या हवेच्या प्रदुषणाला फाट्यावर मारुन कमालीचं वाढत चाललंय. पण, ही दरवर्षी ‘वाढणारी’ आणि कानठळ्या बसेपर्यंत ‘वाजणारी’, जी फटाक्यांची ‘समृद्धी’…महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांच्या (मुं.ठा.पु.रा.ना…मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक-नागपूर) रस्त्यांवर व गगनचुंबी गृहसंकुलातून (टाॅवर्स) दृष्टिक्षेपात येत रहाते; तिचं अधिकांश नातं, ‘गुजराथी-भाषिक’ धनसमृद्धीशी असतं! मराठी कानांनी फक्त बहिरं व्हायचं आणि मराठी-फुप्फुसांनी फटाक्यांच्या धुराची प्रदूषित हवा, दिवाळीत व दिवाळीनंतर हुंगत रहायची…आणि, दिवाळीचा बोनस चुटकीसरशी संपल्यानंतर मराठ्याशी डोक्याला हात लावत, पुढच्या मासिक-हप्त्यांची चिंता करत बसायचं.
फटाक्यांच्या समृद्धीसोबतच आमच्या दगडाधोंड्यांच्या महाराष्ट्रदेशात समृद्धी-महामार्ग, सागरी-महामार्ग, बुलेट-ट्रेन वगैरे महाप्रकल्प येत रहातात; पण, ते येताना…गुजराथी व्यापारी, उद्योगपती, व्यावसायिक यांच्या आर्थिकहिताला प्रथम नजरेसमोर ठेऊन आणि ‘सोद्या’ (‘सोदा’, या ग्राम्य मराठी शब्दाचा अर्थ ‘पक्का बदमाष’) राजकारण्यांकरवी मराठी-जमिनींचे सौदे मांडूनच येतात!
मराठी कामगार-कर्मचारीवर्गाचा ‘बोनस’, ही एक ‘बोगस’ संकल्पना का बनलीय… तर, कंपन्यांचा ‘CSR’ वगैरे एकवेळ, काॅर्पोरेटीय-नफ्यावर आधारित असतो (अर्थात, काॅर्पोरेटीय CSR, हा स्वतःच एक मोठा भ्रष्टाचार आहे आणि ढोंगी ‘हिंदुत्ववाद्यां’च्या देशभर जातधर्म-विद्वेष फैलावणाऱ्या विविध संस्थांना ‘बरकत’ आणणारा आहे, ते वेगळंच); पण, ‘मराठी-बोनस’ मात्र, त्या नफ्यावर आधारित कधि नसतोच.
…अलिकडची जी तरुण बुद्धिमंत बाळं काॅर्पोरेटीय-व्यवस्थापक (मॅनेजर्स) बनलीयत; ती मात्र, कंपन्या-कारखान्यांमधून कामगार-कर्मचारीवर्गाच्या (बहुशः, ‘कंत्राटी-गुलाम’ असलेला) हक्काच्या बोनसवर, पाकिटमाराच्या सफाईने डल्ला मारुन ‘परफाॅर्मन्स-बोनस’ (Performance Bonus) या गोंडस नावाखाली दरवर्षी लाखो रुपये लाटताना-उकळताना सर्रास दिसतात…तरीही, “राख एक वेळ पेट घेईल” (Ash could be destined to burn), पण ‘कंत्राटी-कामगार’ नावाच्या ‘गुलामां’च्या फौजांची विझलेली ‘अस्मितेची ज्योत’ आणि जातधर्माच्या; तसेच, बेगडी धार्मिकतेच्या व ‘फाजिल-उत्सवप्रियते’च्या वर्षावाने झालेली ओलीचिंब मनं, काहीकेल्या पेटायला तयार नाहीत!
एक गुजराथी उद्योगपती, १०५ मराठी-बळी (ते ही प्रामुख्याने मराठी-कामगारांचेच) घेणाऱ्या आमच्या मुंबईत, आमच्या मराठी-नाकावर टिच्चून पाचदहा हजार कोटींचा बंगला काय बांधतो, शेकडो कोटी रुपये आपल्या पोराच्या लग्नात आमच्या नजरेसमोर काय उडवतो-उधळतो…आणि, आम्ही साले दळभद्री मराठी-कामगार, शहरांच्या विविध नगरांमधल्या १०’ × १०’ च्या कोंडवाड्याला पण महाग…???
खरंतरं, ‘मराठी-दिवाळी’ला तोवरच अर्थ होता…तोवरच मराठी-दिवाळीला ‘मराठी-संस्कृति’चा दरवळ होता; जोवर, महाराष्ट्रातली ‘आर्थिक-विषमता’ प्रमाणात होती!
आज काॅर्पोरेटीय क्षेत्रात उच्चतम वेतन (व्यवस्थापकीयवर्गाचं ‘कमाल-वेतन’), हे निम्नतम वेतनाच्या (कंत्राटी कामगार-कर्मचारीवर्गाचं ‘किमान-वेतन’) हजारो पटीत जाऊन पोहोचलंय… भारतातील अमानुष ‘आर्थिक-विषमता’, ‘खाउजा-धोरणा’पश्चात (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) गेल्या काही दशकांमध्ये पराकोटीची टिपेला पोहोचली असतानाच… स्वित्झर्लंडसारख्या अनेक पाश्चात्य प्रगत देशांमधील, मुळात मर्यादेत असलेली ‘आर्थिक-विषमता’, गेल्या दोन दशकात अधिकच उतरणीला लागलीय…तिकडे, संयुक्त राष्ट्र संघाचं (युनो) “समृद्धी सर्वांसाठी” (Shared Prosperity) हे ‘शाश्वत-विकासाच्या लक्ष्यां’पैकी (Sustainable Development Goals…SDGs) प्रमुख ‘लक्ष्य’, कटाक्षाने व पूर्णांशाने व्यवहारात उतरवलं गेलंय. तेथील, यच्चयावत सगळेच नागरिक समृद्धीचे केवळ किरकोळ ‘लाभधारक’ नव्हे (जशा, ‘लाडकी-बहिण’ योजनेअंतर्गत आपल्या वंचित मराठी-महिला, किंचित-लाभार्थी ठरतात) तर, हक्काचे ‘भागधारक’ असतात! मात्र, त्याच स्वित्झर्लंड देशातल्या बड्या कंपन्या, भारतात आपल्या कंपन्यांमधून, कायम-कामगारांची भरती रोखून त्यांच्या जागी ‘कंत्राटी-गुलाम’ वापरण्यासाठी, वाटेल त्या थराला जाताना दिसतात… याचं प्रमुख कारण, आपल्या देशातले भांडवली-व्यवस्थेचे ‘दलाल’ बनलेले तद्दन प्रस्थापित राजकारणी-राजकीय पक्ष, भ्रष्टाचाराला सोकावलेला बुभुक्षित सरकारी अधिकारीवर्ग आणि नीतिशून्य-भेकड बनत चाललेला कामगार-कर्मचारीवर्ग!
आमची मराठी-गरीबी, मनाने खरोखरीच श्रीमंत होती…फराळाची ताटं, चाळीचाळींतून-वाड्यावाड्यांतून घरोघरी फिरताना आणि जातधर्म-आर्थिकस्तराचा मागमूस नसलेली सगळी लहान मुलं, मोजकेच फटाके चारपाच दिवस पुरवून पुरवून (त्यात लवंगी आणि डांगी माळा, सुट्या करुन एकेक फटाका काटकसरीने वाजवला जायचा) एकत्र येऊन वाजवताना, ती मराठी मनांची श्रीमंती प्रत्यक्षात साकार व्हायची. ते सगळंच वातावरण, अक्षरशः मंतरलेलं किंवा त्याही पलिकडचं म्हणजे, दिवाळीची अशी खास ‘झिंग’ आणत, शरीराच्या आणि मनाच्या रंध्रारंध्रातून…भिनणारं असायचं!
…पण, आता सगळंच बदललंय. काळानं कूस जरुर बदलावी, पण ती अशी एवढी वेडीवाकडी बदलावी? ज्या महाराष्ट्राच्या लालकाळ्या मुशीत, ही मायमराठी माणसं पिढ्यानपिढ्या जगली…त्यांचीच काळानं ‘माती’ करावी??
उत्तरपूर्वेतून यूपीवाले अन् बिहारी आणि उत्तरपश्चिमेतून जैन-गुज्जू-मारवाडी-सिंधी-पंजाबी…अशा सगळ्याच परप्रांतीयांच्या चौफेर आक्रमणातून, ‘मराठी-श्वास’ कोंडत गेला आणि इथल्या नादान मराठी-राजकारण्यांमुळे ‘भांडवली-व्यवस्थे’च्या कैचीत सापडला!
…म्हणूनच आता, तथाकथित ‘लाडक्या बहिणी’, नाममात्र ‘दिड हजारी ओवाळणी’ची दर महिन्याला आससून वाट बघत बसतात, ज्यातून संसाराच्या फाटक्या गोधडीला एखाददुसरा टाका घातल्याखेरीज फारसं काही हाती लागण्यासारखं नसतं… नवरा आपला ‘कंत्राटी-कामगार’ असलेल्या असंख्य मराठी-महिला, अगदी नाईलाजास्तव ‘रिक्षाचालक’ बनलेल्या रस्तोरस्ती दिसतात… मराठी हताशा आणि दैन्य, पराकोटीला पोहोचल्याचं, हे दुश्चिन्ह आहे!
सरकारी GR नुसार या लाडक्या बहिणींच्या (गरीब महिलांच्या) रक्तातील हिमोग्लोबीनचं घटत प्रमाण वाढवून त्यांचा ॲनिमिया (Anaemia) नियंत्रणात आणणे, त्यांची रोजगार-क्षमता वाढवून त्यांना स्वावलंबी करणे… एवढी सगळी कथित उद्दिष्टे, ‘दिडदमडी’च्या ओवाळणीने, अंशाने तरी साध्य होण्यासारखी आहेत?
…या अस्वस्थ करुन सोडणाऱ्या पार्श्वभुमीवर, आपलं ‘मराठी-साजरेपण’…मग, ते सणांचं असो, सोहळ्यांचं असो वा असो उत्सवांचं…एक ‘सामाजिक-अपराध’ बनू पहातंय…आणि, म्हणूनच, “Ash is burning” चा मराठी-प्रत्यय कधि येतो, तेच पहात रहायचं….
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)