बरोबर महिनाभरानंतर सॅमसंग विजयाचा अन्वयार्थ समाप्त करत असताना…मुद्दामहून हे सांगितलं गेलं पाहिजे की, त्या सॅमसंग ऐतिहासिक विजयाचं अप्रूप-कौतुक यासाठीच कारण, …हल्लीच्या ‘कामगारधर्म’ नावाची चीजच ठाऊक नसलेल्या ‘नाचीज’ कामगारवर्गाला, संघर्षासाठी तयार करणं आणि एकदा तयार केल्यावर संघर्षाच्या ‘अग्निपथा’वर कायम राखणं…हे फार अवघडच नव्हे; तर, अशक्यप्राय काम होत चाललंय!
…ज्यांना एरव्ही कंपनीतलं काळंकुत्र देखील विचारत नसतं; अशांना फुकटची व बिनलायकीची किंमत संघर्षकाळात, HR/IR व्यवस्थापनाकरवी दिली जाते…युनियन फोडण्यासाठीच नव्हे; तर, युनियन साफ संपवण्यासाठी, कंपनी-व्यवस्थापनाकडून, ती किंमत ठरवून दिली गेलेली असते. औट घटकेच्या ‘चमकोगिरी’साठी उतावीळ व कासावीस झालेल्या, अशा कामगारांमधल्या नीच-अधम प्रवृत्तींना खतपाणी घालण्याकामी खास, HR/IR व्यवस्थापनं त्यांचा हवा तेवढा दांभिक उदोउदो करताना दिसतात…आणि, तेवढं तेवढं लोकांवर आपलं ‘इंप्रेशन’ पडतंय (प्रत्यक्षात, लोकं मनातून शिव्याशाप देत असतात) या गैरसमजुतीतून ही कामगारघातकी मंडळी ‘काॅलर टाईट’ करुन फिरु लागतात. आपण एकूणच चर्चेचा विषय बनल्याचं आकर्षण…अशा कामगार-घातकी प्रवृत्तींना अनावर बनतं व ते व्यवस्थापनाच्या इशाऱ्यावर वाटेल त्या थराला जाऊन, वाटेल तेवढी पातकं करायला एका पायावर तयार होतात. असंख्यांचे संसार उजाड-उध्वस्त करताना, त्यांच्या सदसद्विवेक बुद्धीला किंचितही टोचणी लागू शकत नाही; कारण, एका पातकी बेहोषीत ते जगत असतात… त्या बेहोषीचा अंमल असा की, त्यांची सगळी सदसद्विवेक बुद्धी व्यवस्थापनाकडे ‘गहाण’ पडलेली रहाते.
…विशेषतः, अशा अनेक औद्योगिक व सेवा क्षेत्रातील नमुनेदार संघर्षांचा इतिहास पडताळून पाहिला; तर, दिसतं असं की, “कामगार-कर्मचारीवर्गातले जे ज्येष्ठ असतात व चारपाच वर्षात निवृत्त होऊ घातलेले असतात…असे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले अनेकजण अशाप्रकारची ‘गद्दारी’ करण्यात आघाडीवर असतात (प्रत्यक्षात, त्यांनी आपला ‘सेवाकाळ’ पुरा होत आल्याने ‘कामगारधर्म’ जपत, पुढच्या पिढीसाठी संघर्षाचं नेतृत्त्व करणं आवश्यक असताना, हे असं विपरीत दृश्य दिसतं); कारण, त्यांचा सेवेचा कार्यकाळ संपत आलेला असतो व जाता जाता व्यवस्थापनाकडून ‘युनियन व संघर्ष’ संपवण्याची घसघशीत ‘बक्षिसी’ ते आपल्या घशात घालून जातात…मात्र, भरपूर सेवा कालावधी शिल्लक असलेल्या अनेकांना आणि कामगार-कर्मचार्यांच्या पुढील पिढ्यांना बरबाद करण्याच्या ‘महापातका’चे ते धनी बनून जातात; पण, ते त्यांच्या गावीच नसतं… ते तसं असलं तरी, नियती कठोर असते आणि ती केल्या कर्माची फळं पदरात टाकण्याचं आपलं काम बिनबोभाट व अचूक करत असतेच!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (लेख-मालिका समाप्त)