देवेंद्रजी, नक्षलवाद्यांविरोधात धडाडणाऱ्या तुमच्या बंदुका, भ्रष्टाचाराचा गंज चढल्याने इथे लाचार का होतात…???

देवेंद्रजी, नक्षलवाद्यांविरोधात धडाडणाऱ्या तुमच्या बंदुका, भ्रष्टाचाराचा गंज चढल्याने इथे लाचार का होतात…???

…हा प्रश्न, फक्त बीडच्या धनंजय मुंडेंपुरता किंवा त्यांचा ‘हस्तक’ असलेल्या ‘वाल्मिकी’ कराड-गँगपुरता मर्यादित नाहीच…या गुन्हेगारी-खंडणीखोर राजकारणाचा विळखा पुरत्या महाराष्ट्राला केव्हाचाच पडलाय (इथे ‘आकाचा आका’ म्हटल्या गेलेल्या धनंजय मुंडेंचा कालपर्यंत ‘आका’ कोण होता आणि आज कोण आहे, हा प्रश्नही अप्रस्तुत ठरु नये)!

सध्या, एकीकडे भाजप-संघीय मंडळी अयोध्येत ‘राममंदिर’ बांधताना दिसतायत; तर, दुसरीकडे वस्तुस्थिती ही दिसते की, “सतयुगातल्या रामायणातील ‘वाल्याचा वाल्मिकी’ होण्याचे दिवस संपलेत…आता, वाल्मिकीचा (उदा. सध्याचा बीडचा वाल्मिकी) ‘वाल्या’ होण्याचे दिवस, कलियुगीन भाजपाई-रामायणात आलेत.

…एका अचानक गायब करण्यात आलेल्या प्रामाणिक, बेडर आयपीएस अधिकाऱ्याचा बीडमध्ये अजूनही ठावठिकाणा लागू शकू नये? IPS / IAS अधिकारीवर्ग, हा खरंतरं या देशातील प्रशासनाचा पोलादी-सांगाडाच…जसा आपल्या शरीरातील हाडांचा सापळा, शरीराचा सगळा भार तोलून असतो आणि त्या सांगाड्याशिवाय, शरीर म्हणजे फक्त रक्तामांसाचा नुसता गोळा बनून जाईल…तशीच या IPS / IAS अधिकाऱ्यांची प्रशासकीय-चौकट, ही देशाच्या कारभाराचा सगळा भार सांभाळत असते. पण, आज भ्रष्टाचाराचा पाणी त्यात पुरतं मुरल्याने, त्या पोलादी-चौकटीतलं पोलादचं एवढं गंजून गेलंय-सडून गेलंय की, त्या सेवेतील एखादा अडचणीचा ठरणारा प्रामाणिक व कर्तृत्त्ववान अधिकारी, राजकारणी गावगुंडांकडून गायब करण्यात येतो; तरीही, बाकीच्यांना काहीच खंत किंवा शरम वाटू नये? हे सगळंच, सडलेल्या-किडलेल्या व्यवस्थेचं भयावह लक्षण आहे!

ज्यांना ज्यांना या महाराष्ट्राने आपले मोठे वंदनीय नेते म्हणून आपल्या छाताडावर मिरवले…त्यांनी या महाराष्ट्राला कुठल्या लायकीचे आमदार-खासदार-मंत्री व अन्य लोकप्रतिनिधी दिले…याची आपण एकदा ‘सामाजिक-तपासणी’ (Social Audit) करणार आहोत की, नाही? या तथाकथित वंदनीय नेत्यांनी… ‘इलेक्टिव्ह-मेरिट’, ही निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी लावलेली एकमेव खतरनाक कसोटीच, या नेत्यांना आपसूकच राजकारणाच्या पडद्याआडचे ‘खलनायक’ बनवत असते, हे विसरुन कसं चालेल? …बायबलमध्ये लिहीलंय, “झाडाच्या जातीची-प्रतीची तपासणी करायला मुळं उचकटून पहायची गरजच काय…नुसत्या फळांवरुनच त्यांची खरी परीक्षा होते (Matthew 7:16 “By their fruits you will recognize them…Do people pick grapes from thornbushes, or figs from thistles?)”…याचा केवढा गहनगंभीर अर्थ आहे, तो आम्ही कधि लक्षात घेणार?? तो गहन अर्थच, आम्ही विविध जयंत्या-मयंत्या साजऱ्या करण्याच्या आणि सार्वजनिक पूजा-गणेशोत्सव, दहीहंड्या, गरबे, भंडारे; तसेच, विविध खेळ-महोत्सव यांच्या ‘फाजिल-उत्सवप्रियते’च्या नादाने विसरुन गेलोत!

जे बीडमध्ये तेच ठाण्यात आणि तेच नवी मुंबईत…तेच पुणे, मालवण, पनवेल, नाशिक, नागपूर, संभाजीनगरात देखील! सगळीकडेच राजकारणात हातपाय पसरलेले आणि त्यातल्या गुन्हेगारीवर फोफावलेले ‘धनंजय मुंडे’ किंवा धनंजय मुंडेंचे ‘आका’आहेत…फरक काही असेल तर, तो फक्त नावारुपातच आहे; खंडणीखोर, खुनशी गुन्हेगारी-प्रवृत्ती तशीच…झपाट्याने विकसित होत जाणाऱ्या सगळ्याच ‘महानगरी’ नावाच्या ‘काँक्रिटच्या जंगलां’ची, ती आणि तशीच कर्मकहाणी आहे.

…हे सगळं दुष्टचक्र, ही बीडसारखी नियमितपणे जागोजागी खेळली जाणारी रक्तरंजित क्रौर्यपूर्ण होळी…क्षणभरात थांबवण्याची; नव्हे, ती साफ मोडून काढण्याची क्षमता IPS / IAS अधिकाऱ्यांच्या पोलादी-चौकटीत खचितच आहे…पण, मग मोठमोठी हाॅटेल्स चालवण्यासारखे धंदे किंवा काँक्रिट-बांधकामातल्या भागिदाऱ्या वगैरे बक्कळ पैसा मिळवून देणारे धंदे, राजकारण्यांच्या आशिर्वादाशिवाय कसे जमतील? आपली प्रशासकीय कारकीर्द जनसामान्यांवर गाजवताना कमावलेल्या भ्रष्टाचाराच्या काळ्या पैशाला कायमस्वरुपी संरक्षण कुठून मिळेल?? भरपूर काळ्या कमाईचं, हवं ते ‘पोस्टिंग’ कसं मिळेल???

“अब भी कुछ लोगों ने बेची हैं न अपनी आत्मा
ये पतन का सिलसिला कब तक चलता रहेगा?
हैं बहुत अँधियार अब सूरज निकलना चाहिए
जिस तरह से भी हो ये मौसम बदलना चाहिए…”

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)