‘नमामि गंगे’ या २०१४पासूनच्या गंगानदीच्या शुद्धीकरण-प्रकल्पाच्या २२ हजार कोटी रुपयांचं गौडबंगाल काय? गंगा-यमुना जर आजही एवढी ‘मैली’ असेल; तर, कुठे गेले ते खर्च केलेले पैसे?? …असे प्रश्न विचारण्याची हिंमत व सकस मानसिकता दाखवण्याऐवजी अंधश्रद्धेचा केवळ ‘बाजार’ नव्हे; तर, फार मोठा ‘आजार’ पसरवणार्या…आणि त्याहीपेक्षा कैकपटीने घातक असा धोका म्हणजे, त्याची परिणती म्हणून हिंसक, विकृत, भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना-राजकारण्यांना व माणुसकीचा लवलेश नसलेल्या भांडवलदारांना भक्कम पाठींबा देऊ पहाणाऱ्या…या अशा कुंभमेळ्यांचं करायचं तरी काय?
चेंगराचेंगरीत मरणाऱ्या हजारो जीवांची यःकिंचितही क्षिती न बाळगता (त्याच्या बातम्या तर लपवल्या गेल्याच; पण, सगळे व्हिडिओसुद्धा पद्धतशीरपणे नष्ट केले गेले) जर समाजाची करोडो करोडो पावलं ‘अमृतस्नान’ नव्हे, तर संगमातलं ‘अशुद्धस्नान’ करण्याकडे बिनदिक्कत वळत असतील…तर, याचा अर्थ सरळ आहे की, “आजचा शिक्षित-अशिक्षित समाज, जी काही उरलीसुरली संस्कृती शिल्लक आहे, ती सोडून झपाट्याने अधिकाधिक विकृतीकडे वळतोय”! जेवढी जेवढी ‘आर्थिक-विषमता’ अधिकाधिक थैमान घालती होईल, सार्वजनिक-जीवनात उजळ माथ्याने सत्याची जागा ‘असत्य’ घेत जाईल, मूळ भारतीय-अध्यात्म्याने (आजच्या बनावट, ढोंगी भाजप-संघीय हिंदुत्ववाद्यांनी नव्हे) वर्णिलेल्या राजनीतिचा पूर्ण संकोच होऊन ‘न्याय’ मिळणं दिवसेंदिवस दुरापास्त होत जाईल…तेवढं तेवढं साधं जगणं देखील मुश्किल होत जाईल आणि जगण्याच्या आधाराचे सगळेच दोर नियतीवर सोपवलेला दिङ्मूढ समाज, विविध धर्मसंप्रदायांच्या गर्दीत चेंगराचेंगरी करताना दिसेल…कधि कुंभमेळा, कधि लालबागचा राजा…तर कधि उत्तरेतल्या चारधाम-कावड-वैष्णोदेवी यात्रेपासून दक्षिणेतल्या शबरीमला-तिरुपती बालाजीपर्यंत ठिकठिकाणच्या लांबच लांब पसलेल्या रांगेत उभा राहिलेला दिसेल!
महत्त्वाची बाब म्हणजे, अगोदरच अंगाला विशिष्ट लेप लावून अस्वच्छ गंगा-यमुनेच्या संगमात डुबकी घेणारे बडे राजकारणी, बडे भांडवलदार…नंतर सप्ततारांकित सोयीसुविधा असलेल्या ठिकाणी कमीतकमी वेळात पोहोचून आपलं ‘मलिन’ अंग, झटपट निर्जंतुक करुन घेतात…हे सामान्य जनतेला आकळत नाही आणि तिला हे ही कळत नाही की, ही फक्त ‘संगमातली डुबकी’ मारण्यापुरतेच ते तुमच्या ‘पातळी’वर असतात…नंतर, ते पाण्याबाहेर येऊन तुमच्यापासून फटकून दूर रहात, जमिनीवर-हवेवर ‘मालकीहक्क’ प्रस्थापित करत सुखनैव संचार करत रहातात; मात्र, ‘भांडवली-व्यवस्थे’त जगण्यातला ‘न्याय-सन्मान-समता’ नाकारले गेलेले शापित सामान्य जीव…तसेच गुदमरलेल्या अवस्थेत कुंभमेळ्यानंतर मरेपर्यंत आपलं आयुष्य जगत रहातात…त्यांना संगमातही मोकळा श्वास नाही आणि संगमानंतरच्या जगण्यातही मोकळा श्वास नाही…!!!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)