भाजप-संघाच्या कडव्या धर्मप्रचाराची राळ, विषासारखी कशी समाजपुरुषात हळूहळू भिनायला लागलीय आणि अज्ञानी व महामूर्ख बहुजन कसे त्याला सहजी बळी पडत जातायत…ते ‘रामराम’ वा ‘जय सितारामा’चं, ‘जय श्रीराम’ आणि आता तर, ‘रामनवमी’चं ‘श्रीरामनवमी’ व्हायला लागलेलं पाहून धक्काच बसला (अर्थातच, कडवा धर्मप्रचार…ही बाब मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख वगैरे सगळ्याच विखारी-धर्मप्रचारकांना वेगवेगळ्या प्रकारे लागू आहेच; पण, आपण ‘हिंदू’ म्हणवल्या जाणाऱ्या भारतीय-आध्यात्मिक जीवनशैलीतले असल्याने, त्याबद्दलच प्रामुख्यानं बोलणं ओघानेच आलं)!
राम काय कृष्ण काय, बुद्ध काय किंवा नानक काय…हे सारेच भारताच्या अंतरी वसतात. भारताचं ते केवळ वरवरचं ‘धार्मिक’ अधिष्ठान नसून ते अंतःकरणात अगदी खोलवर झिरपलेलं ‘आत्मिक’ अधिष्ठान आहे! अशा प्रत्येक व्यक्तित्वातलं आपल्याला झेपेल तेवढं, रुचेल तेवढं प्रत्येक भारतीय पिढ्यानपिढ्या घेत असतो आणि पुढेही घेत राहील…त्यातूनच, कळत-नकळत आपलं व्यक्तित्व घडत जातं.
रानावनात फुलांवर उडणाऱ्या पिवळ्या रंगाच्या चिमुकल्या फुलपाखरांच्या पंखांना हळूवार स्पर्श करताच, तो हळवा पिवळा रंग आपल्या बोटांवर अलगद उतरावा…तशी ही भारतीय-आध्यात्मिक प्रतिकं, नुसत्या त्यांच्या स्मरणानं देखील आपल्या अंतःकरणाच्या डोहात उतरत जातात. जे या परिसस्पर्शापासून वंचित रहातात, ते नदीतल्या गोट्यांसारखे समाजजीवनाचा प्रवाह अडवत-बडवत पडून रहातात…ते फक्त वरुन ओले होतात; पण, आतून न भिजल्याने वस्तुतः कोरडेच रहातात!
जी पौर्वात्य-संस्कृती म्हणून आपण अभिमानाने मिरवतो आणि जिची कास धरल्याशिवाय, बेभान होऊन सर्वनाशाप्रत निघालेल्या, आजच्या आधुनिक ‘भांडवली-जगता’ला तरणोपाय नाही…त्या पौर्वात्य-संस्कृतीचा पायाच मुळी, या चिरस्मरणीय व्यक्तित्वांनी घालून दिलेला आहे.
…पण, दुर्दैवाने हा ‘जैविक पाया’च उखडून टाकून, भाजपा-संघासारख्या कडव्या उजव्या राजकारण्यांनी; त्याजागी, राजकीय-संधिसाधू ‘निर्जीव काँक्रीट’ ओतलंय आणि त्यावर आपल्या हिणकस, समाजघातकी व धंदेवाईक राजकारणाची भलीमोठी इमारत उभी केलीय…हे करताना त्यांनी भारतीय-अध्यात्माची चिरफाड करत आपली ‘हिंदुत्वा’ची राजकीय-दुकानदारी तूफान चालावी; म्हणून अनेक ‘कथा आणि व्याख्या’ (Narratives) आपल्या सोयीनुसार हव्यातशा बदलल्या.
सहिष्णुतेचं, प्रेम-वात्सल्याचं, सत्य व न्यायाचं प्रतिकरुप असलेल्या आमच्या प्रेमळ रामाला सीतेपासून तोडून, अगदी हिसकावून घेऊन…त्याचं उग्र, रागीट, शीघ्रकोपी धनुर्धारी ‘श्रीरामा’त रुपांतर केलं. धनुर्धर राम, हा युद्धजन्य परिस्थितीत प्रसंगपरत्वे अपरिहार्यपणे निर्माण होणारा ‘अपवाद’; तर, प्रेम-वात्सल्य व करुणेनं ओंथंबलेला सीतेसह सत्यवचनी राम, हा भारतीय-अध्यात्माचा चिरस्थायी नांदणारा नियम आहे!
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे ‘रामराम किंवा जय सितारामा’चं ‘जय श्रीराम’ आणि आता, चक्क ‘रामनवमी’चं ‘श्रीरामनवमी’ वगैरे नामांतर करुन…महन्मंगल भारतीय-आध्यात्मिक परंपरेचा अवघा ताणाबाणाच विस्कटू पहातायत. ‘सत्यवचनी राम’ कुठे आणि यांत्रिकपणे ‘जय श्रीराम’ म्हणणारे व म्हणता म्हणता उठसूठ क्षणोक्षणी खोटं बोलणारे, हे भाजप-संघीय लोक कुठे…राम, हा भारतीय-नीतिमत्तेचा उत्तुंग आदर्श व आविष्कार; तर, संपूर्ण ‘भाजप’ हा भ्रष्टाचार, बलात्कार व अन्य लफडीकुलंगड्यांनी स्वतः बरबटलेला आणि तशाच अधम प्रवृत्तींना आधार देत, त्यांचा ‘राजकीय-आसरा’ घेणारा पक्ष… सांगा, केवढा हा विरोधाभास?
…तेव्हा प्रश्न, आपण या परिस्थितीवर काही विचारपूर्वक कृती करणार आहोत की, निर्बुद्ध मेंढरांसारखे भाजपाई-संघीय पातकी पावलांवर पाऊल ठेऊन ‘राष्ट्रनाश’ घडवणार आहोत; एवढाच आहे आणि आज ‘रामनवमी’च्या रुपाने, तो आपणा सर्वांसमोर दत्त म्हणत उभा ठाकलेला आहे!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)