…जेव्हा अमैरिका, युरोपियन व नाॅर्डिक देशांमध्ये आठवड्याला ३२ ते ४० तास कामाचे तास असतात…आणि, सध्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगिकारामुळे आठवड्याला कामाचे तास घटवून जास्तीतजास्त २४ ते २८ तास करण्याचा गांभीर्याने तिथे विचार सुरु असताना; भारतातले इन्फोसिसचे अतिशहाणे (वा)नरायण मूर्ती आठवड्याला ७० तास; तर, L&T चा कुणी सुब्बूटूब्बू नावाचा उन्मत्त CEO, चक्क ९० तास काम करण्याचं फर्मान सोडायला लागले…तेव्हाच, कामगार-कर्मचारीवर्गाचे कामाचे तास वाढविण्याच्या नापाक हालचाली भाजप-शिंदे-पवार या ‘ट्रिपल-इंजिन’गटाकडून पडद्याआड सुरु झाल्याचं सहजी ध्यानात आलंच होतं…आता फक्त प्रत्यक्षात त्यांनी “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेचा’नुसार एक खडा टाकून पाहिलेला आहे, एवढंच!
{भले, यापूर्वीच मी कामगारांसाठी प्रचंड लिखाण, शेकडो भाषणे व असंख्य संघर्ष-आंदोलने केली असली; तरीही खास वरील संदर्भात कामगार-प्रबोधन, कामगार-जागृती (कामगारघातकी धोरणांविरुद्ध प्रभावी उपाययोजनांसह) म्हणून, एक चारसहा लेखांची मालिकाच, क्रमशः व्हाॅट्सॲपवरुन आजपासून शक्यतोवर दर दिवशी पाठवायचं म्हणतोय…कामगारांनी प्रतिसाद दिल्यास ती मालिका चालू राहील व वाचून ती लेखमालिका कामगारांना उपयुक्त वाटलीच; तर, तिची छोटेखानी पुस्तिका आपण प्रकाशित करण्याचा विचार करु शकतो, एवढं कृपया ध्यानात घ्या!}
—————————————
लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)
लेख क्रमांक १
“आज जेवढे आवाज तुम्ही कामगारांना फासावर चढवून कायमचे दाबून टाकताहात; त्याहीपेक्षा, आमचं ‘मौन’ अधिक सामर्थ्यशाली ठरण्याची वेळ लवकरच येईल” असं एखाद्या प्रेषितासारखं उच्चारत ‘ऑगस्ट स्पाईज’ नावाचा कामगार हसत हसत ११नोव्हेंबर-१८८७ रोजी फासावर गेला…वर्ष १८८५-८६ मध्ये शिकागोमधील शेकडो कामगारांचे बळी घेणाऱ्या कामगार-संघर्षाच्या पार्श्वभुमीवरील ते ऐतिहासिक क्रांतिकारी बोल, पुढे खरे ठरले आणि २० शतक उजडता उजाडता ८_८_८ (८ तास काम, ८ तास विश्रांती व ८ तास कौटुंबिक-कार्य व करमणूक) असा प्रघात प्रदीर्घ काळच्या संघर्षांतून तयार झाला…ज्याच्यावर, बोळा फिरवण्याचे अत्यंत संतापजनक व अमानुष काम सध्या महाराष्ट्रात सुरु झालंय.
“दिवसाला १२ तास काम करण्याची” महाराष्ट्र-सरकारची घोषणा” म्हणजे, ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली’ अशा धर्तीची किंवा ‘घड्याळाचे काटे दिडशे-दोनशे वर्षे जबरदस्तीने मागे फिरवण्यासारखं’ आहे!
इंग्लंडमधील कारखान्यांमधून १६-१६ तास राबत फाॅस्फरसच्या वाफा फुप्फुसात गेल्यामुळे ठिसूळ झालेली हाडे व पाठीचा कणा वाकलेल्या लहान मुलांच्या आणि कापड-गिरण्यांच्या कोंदट, तंतूमय प्रदूषित हवेने खोकून खोकून खंगलेल्या कामगारांची कुटुंबच्या कुटुंबे निव्वळ जगण्यासाठी आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करत गुलामीत कशी जगायची आणि “मानवी रक्ताघामाचं सोन्यात आणि जिवंत हाडामांसाच्या कामगारांचं निर्जीव भांडवलात रुपांतरण करण्याचं” एक जीवघेणं जैव-रासायनिक (Alchemy) भांडवली-सूत्र कसं काम करत होतं, त्या विदारक सत्याची कार्ल मार्क्सने केलेली मांडणी (कम्युनिस्ट-मॅनिफेस्टो…वर्ष-१८४८ व ‘दास कॅपिटल’) आज आपल्या सगळ्यांनाच हटकून आठवल्याखेरीज रहाणार नाहीच!
सगळी प्रतिगामी-वाटचाल त्याच दिशेने सुरु झालीय…हे *”दिवसाला १२ तास काम करण्याचं काय घेऊन बसला आहात…या आणि याहीपेक्षा पुढे अनेक गोष्टी घडत जातील, जर असेच आपण राजकीयदृष्ट्या निद्रिस्त व निपचित पडून राहिलो तर! आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुर्हाड मारुन घेणारे, आपल्या देशातले दुर्दैवी कामगार आहोत (विशेषतः, महाराष्ट्रातले), हे लक्षात घ्या…बापजाद्यांनी कष्टाने, त्यागाने कमवून ठेवलेली व आयती हाती आलेला जमीनजुमला-धनसंपदा पुढच्या नादान पिढीला त्यात भर घालणं सोडाचं; पण, आहे ते टिकवून ठेवता येऊ नये…अशी दारुण अवस्था आहे, आपल्या कामगार-चळवळीची.
कामगारच, मोठ्याप्रमाणावर कामगाराचा शत्रू बनणं थांबल्याशिवाय, सतत एकजुटीने ‘संघर्षरत’ राहिल्याशिवाय व कामगार, कामगार म्हणूनच ‘मतदान’ करायला लागल्याशिवाय…ही आपल्याला देशोधडीला लावू पहाणारी व गुलामी-अवस्थेत ढकलू पहाणारी परिस्थिती बदलणार नाही, नाही म्हणजे नाहीच!
…मात्र प्रथम, या सगळ्याचंच मूळ देशातल्या कंत्राटी-कामगार पद्धतीत आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. बैल गेला आणि झोपा केला, तसे आता कुठे कामगार-चळवळीतले अनेक ‘मोरु’ झोपेतून या बारा तासांच्या घोषणेमुळे जागे व्हायला लागलेत आणि आपल्याच लेखांची व भाषणांची काॅपी मारत (ती ही त्यांना धड जमत नाहीये) आळोखेपिळोखे देत आवाज उठवायला लागलेत… जेव्हा, ठिणगीचा वणवा पेटून बराच काळ लोटलाय…!!!
जसा युरोपियन लोकांचा वसाहतवाद जगभर पसरला…ते जसे परक्या देशातल्या (ज्या देशावर त्यांना सत्ता मिळवायची होती) ‘मीर जाफर’सारख्या देशद्रोही व गद्दार लोकांच्या समूहाला ओळखून त्याला जवळ करायचे. त्यांना शस्त्रसाठा, पैसा पुरवत त्यांना हाताशी धरत…त्या त्या देशात चंचूप्रवेश करायचे व पुढे हातपाय पसरायचे; तोच प्रकार व तोच प्रयोग, सगळ्याच कंपन्या-कारखान्यांतून अशा अत्यंत नीच-हलकट व स्वार्थाने पार आंधळे झालेल्या कामगारांमधल्या ‘मीर जाफरी’ अल्पसंख्याक गटाला हाताशी धरुन केला जातोय. एकदा कामगारच कामगाराचा शत्रू बनला की, व्यवस्थापनाचं पुढचं काम अगदीच सोपं होतं. जोडीला शासन व संपूर्ण भांडवली-व्यवस्था असतेच.
…फक्त, महाराष्ट्रातली ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ नष्ट करा (तोच मूळ रोग अहे), मग बघाच! अन्यायी-अत्याचारी-शोषक भांडवली-व्यवस्थेच्या पत्त्याच्या बंगल्याचा एवढा एकच ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चा पत्ता काढून घेतलात की, क्षणार्धात हा अवघा अन्यायी-अत्याचारी बंगला कोसळून पडेल!
(क्रमशः)