लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)
लेख क्रमांक २
* *कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग अथवा संपूर्ण चळवळ ग्रासणारा कर्करोग (कॅन्सर) का म्हणायचा?
उत्तर : ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ आणि तिनं प्रसवलेली काळीकुट्टं पिल्लं म्हणजे, आऊटसोर्सिग (OutSourcing), NEEM OR FTE, Sub-Contracting यांच्यासोबतच अगदी वेगळ्या अर्थाने का होईना; पण, हल्लीची लष्कर-भरतीतली ‘अग्निवीर-व्यवस्था’ (नाव फारच गोंडस ठेवलंय, जेव्हा ते लष्करीसेवेत प्रवेश करु पहाणारे नवतरुण, प्रत्यक्षात ‘अग्निवीर’ वगैरे नसून नव्या प्रकारच्या भरतीद्वारे ‘भग्नवीर’ बनवले गेले आहेत)…या सार्याच बाबी म्हणजे, आधुनिक भांडवली-व्यवस्थेतली ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यता’च (Socio-Economic Participatory Exclusion) होय, दुसरंतिसरं काहीही नाही!
‘कंत्राटी-कामगार पद्धत’ मूळ रोग वा कर्करोग म्हणण्याची कारणे ही की, कंत्राटी-कामगार पद्धतीमुळेच केवळ….
१) डावे वगळता सगळेच प्रस्थापित राजकीय पक्ष, हे निवडणुकीत मोठ्या देणग्या मिळवण्यासाठी भांडवलदारांचे सहानुभूतीदार व पडद्याआड कामगारांचे ‘हितशत्रू’ होतेच…पण, या राजकीय पक्षांच्या गुंड प्रवृत्तीच्या मनगटशहांना ‘कंत्राटदार’ बनून, आपल्याच जातीजमातीचं ‘रक्तघाम’ जास्तीतजास्त स्वस्तात विकण्याची व त्यातून बक्कळ पैसा कमावण्याची ‘छप्पर फाड के’ अशी नवी संधि उपलब्ध झाली. ही ‘कंत्राटी-कामगार’ पुरवण्याची बिनभांडवली-बिनकष्टाची आयती ‘सोन्याची खाण’ हाती लागल्याने…बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कामगारांचे अजूनच जास्त ‘हितशत्रू’ बनले (तशी ही बव्हंशी सगळीच मंडळी; यापूर्वीच, संपफोडेगिरीतून पैसा कमावणारे किंवा व्यवस्थापकीय मंडळींशी विविध कारणांसाठी सलगी-साटंलोटं करणारी अथवा कंपन्या-कारखान्यांमधून थेट हप्ते गोळा करण्याच्या निमित्ताने, अगोदरपासून कामगारांचे ‘हितशत्रू’ होतीच)… त्यामुळेच, या ‘राजकीय-मसलपाॅवर’च्या साथीनेच व्यवस्थापकीय मंडळी जागोजागी एकदम शिरजोर बनली
२) ‘कायम व कंत्राटी’, असे ‘फोडा आणि झोडा’ या ब्रिटीश-कुटीलनीतिने कामगारविश्वात भांडवली-व्यवस्थेकडून सवतेसुभे उभे केले गेल्याने व त्याला सगळेच कामगार बळी पडत गेल्याने…कामगारांमध्येच एकमेकांविषयी आकस, संशय व एकप्रकारे शत्रुत्वच निर्माण झाले. त्यामुळे, एकसंध व मजबूत कामगार-संघटना बांधणं व बांधलेली संघटना चालवणं जवळपास अशक्य बनलं
३) व्यवस्थापनांकडून सर्रास ‘अनुचित कामगार प्रथां’चा उघडउघड अवलंब केला जात राहून…व्यवस्थापकीय दहशत व दादागिरी (Corporate-Terrorism), ‘राजकीय-वरदहस्ता’ने कधी नव्हे, एवढी भयानक वाढली व ‘कायम आणि कंत्राटी’ (कंत्राटी-कामगारांची अवस्था अजूनच वाईट) असे दोन्हीप्रकारचे कामगार भयभीत होऊन भांडवली-सापळ्यातील ‘गुलाम’ बनले
४) एवढं सगळं ‘कंत्राटी-रामायण’ घडायला लागल्यानंतर…कामगारांचे पगार / बोनस रोडावत जात तुटपुंजे होणे, हक्काच्या रजा व मेडिक्लेम वगैरे सोयीसुविधा घटत जाणे; तसेच, कामाचे तास बेकायदा वाढणे (सक्तिचा ओव्हरटाईम, त्यात आलाच) वगैरे ओघानेच येत गेलं
५) आपल्याकडचं ‘किमान-वेतन’, म्हणूनच पाश्चात्य देशातल्या धड ‘बेकार-भत्त्या’च्याही लायकीचं राहीलं नाही… जेव्हा, ते आजच्या फडतूस ‘किमान-वेतना’च्या चौपटीने म्हणजे रु.४०,०००/- (रु. चाळीस हजार) दरमहा असायला हवं होतं… ‘Purchasing Power Parity’चा (PPP) विचार करता चीनचं किमान-वेतन देखील आपल्या दुपटीहून पटीहून जास्त आहे आणि तिथला कुशल कामगार दरमहा ‘सहा आकडी’ म्हणजेच, लाखाहून अधिक पगार घेतो. याचाच अर्थ, चिनी-कामगार आता पूर्वीसारखा बिलकूल ‘स्वस्त’ राहिलेला नाही… तर, प्रगत देशांमध्ये जास्तीतजास्त वेतन (उदा. MD किंवा CEO वगैरेंचं), हे कंपनीतल्या तळाच्या कामगाराच्या वेतनाच्या तुलनेत जास्तीतजास्त १२ ते २० पट ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न असतो (आपल्याकडे तेच प्रमाण हजारो पटीत असतं) व तसा प्रघात आहे. म्हणूनच, तिथल्या कामगाराचं वेतन हे, PPP विचारात घेता, आपल्या कामगाराच्या सातआठ पटीहून अधिक असतं.
विशेष बाब म्हणजे, पाश्चात्य प्रगत देशात एका आठवड्याचे कामाचे तास ३२ ते जास्तीतजास्त ४० असतात…म्हणजेच, ‘५ दिवसांचा कामाचा आठवडा व दररोजचे कामाचे तास ८ किंवा ८ तासांहूनही कमी. अजून महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, तिथे कामगारांच्या ‘ओव्हरटाईम’वर कडक कायदेशीर बंधनं आहेत व कुणाचाही मुलाहिजा न ठेवता, तेथील सरकार त्याची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करतं.
६) पूर्वीसारखा किंवा जगभरात आजही मिळतो तसा, थेट पगार किंवा थेट पगारवाढ न देता…कामगारांची घोर फसवणूक करणारी ‘काॅस्ट टू द कंपनी’ (C.T.C.) ही एक तद्दन फसवी संकल्पना, ‘कंत्राटी-गुलामी’सोबतच रुढ केली गेली आणि जोडीला सन्मानजनक ‘Entry Levels’व बदलता-महागाईभत्त्यासह (VDA), जगभरात व कालपर्यंत भारतातही प्रचलित असलेल्या वेतनश्रेणींच्या शास्त्रीय-संरचनाच उध्वस्त करुन प्रत्येक कामगाराशी वेगवेगळा स्वतंत्र करार करण्याची बदमाषीपूर्ण व्यवस्थापकीय-टूमच निघाली… म्हणजेच, कामगारांच्या लुटालूटीला व लाचारीला आपसूकच सर्वत्र एकच उधाण येऊ लागलं व ‘युनियन्स’ काॅर्पोरेटीय क्षेत्रातून कायमच्या बाद होण्याची प्रक्रिया वेगात सुरु झाली
७) अशाप्रकारे, याअगोदरच मरणासन्न झालेली ‘कामगार-चळवळ’ कायमची संपुष्टात आणण्यासाठी ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour Code) लादण्याची हिंमत… कंत्राटी-कामगारपद्धतीमुळेच भाजप-संघीय NDA सरकारला झाल्याचेही, वाचकांच्या सहजी ध्यानात येईल
…थोडक्यात सांगायचं तर, “घोडा का अडला, भाकरी का करपली, पान का सडलं” या तिन्ही प्रश्नांचं उत्तर जसं एकच म्हणजे, “न फिरवल्यामुळे” असं एकच आहे…तशीच अवस्था, *एका ‘कंत्राटी-कामगार पद्धती’मुळे सगळ्याच कामगारघातकी-धोरणांच्या विषवल्लीची पैदास सुरु होण्यातून झाली!
(क्रमशः)
https://www.facebook.com/share/r/1ZwoGb9pqB/