लेख क्रमांक ४ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)

लेख क्रमांक ४

* *रक्ताचं पाणी करणाऱ्या कामगारांच्या रक्तात बुडवून पोळ्या खात रहाण्याची चटक लागलेल्या ‘कामगार-मंत्रालय’ नावाच्या ‘जंगली व्याघ्रा’कडून…आजही ‘कागदोपत्री बेकायदेशीर’ असलेल्या कंत्राटी-कामगार पद्धतीविरोधात काही सत्वर पावलं टाकली जातील, अशी अपेक्षा करणं…म्हणजे, नरेंद्र मोदी सरकारकडून ‘मतचोरी’ची जडलेली सवय त्यजून देशात ‘लोकशाही-व्यवस्थे’चा सन्मान राखण्याची अपेक्षा करण्यासारखंच आहे (‘बैलाकडून दुधाची अपेक्षा करणे’, वगैरे डायलॉग जुने झालेत)

* कामगार-मंत्रालयातच नमनाला घडाभर पाणी ओतल्यावर, कंत्राटी-कामगारांना ‘कायम’ कामगारांएवढे वेतन व सोयीसुविधा देण्याचा अथवा मुळातूनच ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ निर्मूलनाचा दावा न्यायालयात दाखल करण्याच्या बाता म्हणजे, दगडावर डोकं आपटून घेण्यापेक्षाही खतरनाक आहे…कारण, एकविसाव्या शतकाच्या शुभारंभालाच ‘कल्याणी स्टील व सिपला कंपनी’ या दोन्ही प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्रपणे दिलेल्या निकालांनी, पूर आल्यावर धरणाचे दरवाजे उघडावेत, तसं कंत्राटी-कामगार पद्धतीला चारही बाजुंनी उधाण आलं (त्यावेळेच्या वृत्तपत्रीय बातम्या व लिखाणावर नजर टाकल्यास, संबंधित न्यायाधीशांच्या नामी-बेनामी संपत्तीत अचानक मोठी वाढ झाल्याची चर्चा, तेव्हा चांगलीच रंगल्याचं दिसतं). त्यानंतरच्याही, अनेक दाव्यांमध्ये राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांचा भंग करुन, भांडवली-व्यवस्थेच्या बाजुने उलटसुलट निकाल दिले गेल्याने… *कंत्राटी-कामगार पद्धतीतल्या भयानक शोषण-अन्यायाविरोधात न्यायालयातून न्याय मिळवणे, आताशी अगदीच दुरापास्त झालंय.

* तेव्हा, सर्वप्रथम, “आजच्या आपल्या दुःसह स्थितीला, देशातील-राज्यातील न्यायालयीन व राजकीय व्यवस्थेसोबतच आपण स्वतःही कुठेतरी जबाबदार आहोत”, ही मनोमन सगळ्याच कामगारांनी (मग, ते ‘कायम’ असोत वा ‘कंत्राटी) खूणगाठ बांधून लढण्यासाठी कंबर कसली पाहिजे.

* *कुठलीही पारलौकिक शक्ति वा कुठलाही देवादिकाचा अवतार, आपल्या मदतीला धावून येणार नसून “God helps those, who help themselves” या सुत्रानुसार आपली प्रतिकूल परिस्थिती आपणच बदलायचीय, हे पक्कं ध्यानात घेतलं पाहिजे. लालबागचा राजा, सिध्दीविनायक, अष्टविनायक अन् शिर्डीचे साईबाबाच काय; तर, धर्मसंप्रदायांची दुकानं थाटून बसलेले (बैठक-संप्रदाय, कुठकुठले बापू-बाबा-सद्गुरु संप्रदाय वगैरे वगैरे) कुणी कुणी म्हणून, या जगण्याच्या आसालाच भिडलेल्या समस्येतून तुमची सुटका करण्याच्या काडीमात्र कामी येणे नाहीच…उलटपक्षी, आपण त्यातून आपल्या गुलामीच्या ‘पराभूत’ जगण्याचा दुर्दैवी भार, देवादिकांवर व दैवावर टाकून किंकर्तव्यमूढ व कृतिशून्य बनत रहातो.
…ज्याअर्थी, आम्ही संघर्षरत राहण्याऐवजी, सगळ्या प्रार्थनास्थळांमध्ये तासनतास रांगा लावत व संप्रदायांमध्ये नियमित हजेरी लावत, आयुष्याचा लाखमोलाचा वेळ व ऊर्जा वाया दवडतोय…त्याअर्थी, आपण ‘कामगार’ म्हणून खूप दुःखी जीवन जगतो आहोत…त्या दुःखाला ‘कारण’ आहे, ते कारण म्हणजे, मूलतः ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ हे आहे व ते कारण, निर्धारपूर्वक योग्य उपाययोजना केल्यास दूर होऊ शकते!
एकदा का तुम्ही ‘पुरुषार्थ’ गाजवून, नेटाने या ‘कंत्राटी-चक्रव्यूहा’तून यथावकाश स्वतःला मुक्त करवून घेतलंत की, ‘कामगार’ म्हणून तुमच्या जगण्याचा छिन्नभिन्न व खंडीत झालेला जीवनप्रवाह पुन्हा एकवार खळाळता होत…’सिम सिम खुल जा’ असा, सुखासमाधानाचा व सन्मानाचा मार्ग, तुमच्या नजरेसमोरच मोकळा होत जाईल…मग, खुशाल तुम्हाला कुठल्या प्रार्थनास्थळांमध्ये, धर्मसंप्रदायांमध्ये जायचंय ते जा (मी खात्रीने सांगतो की, ते जाणे नंतर एकदम कमी होऊन जाईल)…पण, या मूलभूत समस्येच्या सोडवणुकीपर्यंत मात्र अजिबात कुठे जाऊ नका, जेणेकरुन “स्वतःची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतल्याने”, तुमच्या मनाचा निर्धार एकदम काँक्रिटसारखा पोलादयुक्त बनू शकेल.

* *’कायम व कंत्राटी’, हे ‘भांडवली-व्यवस्थे’नं ‘फोडा आणि झोडा’ या कुटील हेतूने, अगदी ‘ड्रिलींग’ करुन आपल्या मेंदूत घुसवलेले ‘कामगारा-कामगारांमधले भेदाभेद’, निदान आपल्या मनातून तरी कायमचे पार हद्दपार करुन टाका… हे भेदाभेद म्हणजे, मूठभर भांडवलदारांनी, कामगार-कर्मचारीवर्गावर अमानुष वर्चस्व गाजवण्यासाठी व त्यांचं अमानवी शोषण करण्यासाठी, निर्माण केलेली एक नवीन ‘औद्योगिक चातुर्वर्ण्य-व्यवस्था’च होय!

* आपलं *युनियन-नेतृत्त्वाचं लाजिरवाणं ‘षंढत्व’ झाकलं राखून, आपल्या औटघटकेच्या क्षणिक स्वार्थासाठी उरल्यासुरल्या मोजक्या ‘कायम’ कमगारांसाठीच केवळ, पगार / बोनसवाढीचे ‘नामर्द’ करार करत रहाल (जे करार करणं, कायम-कामगारांची संख्या खूपच मर्यादित असल्याने, षंढ-स्वार्थी युनियन व बदमाष व्यवस्थापन, दोघांनाही ते सहजशक्य असतं)…तर, नजिकच्या भविष्यात काळ तुमच्यावर सूड उगवलेच!
…कारण, निवृत्त होत जाणाऱ्या कामगारांमुळे तुमची ‘घटती सभासद-संख्या’, तुमच्या ‘षंढ’ युनियनची ताकद झपाट्यानं घटवत जाईल व पुढे पुढे व्यवस्थापन, पगार/बोनसवाढ वगैरे मागताच तुम्हाला पेकाटात लाथ मारुन हाकलून देईल… तुमच्या आहेत त्या पगारावर व बोनसवर पण, गदा आणली जाईल आणि त्याबाबत तुम्ही काहीही करु शकणार नाही. संख्येने फुगलेले ‘कंत्राटी-गुलाम’ तुमच्या मदतीला येणार नाहीत…ते दोन कारणांनी, एकतर ते ‘गुलाम’ असल्याने स्वतःलाच मदत करु शकत नाहीत व दुसरं कारण म्हणजे, तुम्ही कायम-कामगारांनी त्यांना कायम-कामगारांचे हक्क मिळवून देण्यात, कधी मदत केली नाहीत वा त्यासाठी लढला नाहीत…तर, ते तरी कशाला तुमच्यासाठी काही करतील?

(क्रमशः)