लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)
लेख क्रमांक ३
…एव्हाना वाचक-कामगारांच्या ध्यानात आलं असेलच (खरंतरं, यायलाच हवं) की, कामगारविश्वात शिरलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ नावाच्या एका भयंकर अवदसेमुळेच केवळ कामगारविश्व, प्रथम झाकोळून गेलं आणि मग चारही बाजुंनी घरघर लागल्यासारखं कोसळू लागलं. “घर फिरल्यावर घराचे वासे फिरतात” असं जे आपण म्हणतो, त्याचा जिवंत प्रत्ययच, चारही बाजुंनी कामगारविश्वावर होऊ लागलेल्या आक्रमणातून आपल्याला यायला लागलाय.
…तेव्हा, “मूळ रोगावरच इलाज करायचा की, फक्त दृश्य स्वरुपातल्या रोगाच्या लक्षणांवर करायचा”, हे ठरविण्याची वेळ आता आलीय. कामगार, भांडवली-व्यवस्थेकडून उघड उघड चार फटके पडायला लागल्यावर (काळी कामगार-संहिता किंवा लेबर-कोड, बेकायदेशीर कामाचे वाढीव तास अधिकृत जाहिर करणे वगैरे) आता कुठे आपल्या ग्लानीतून-झोपेतून जागा होतोय…त्याचा ‘कामगारधर्म’ किंवा कार्ल मार्क्स म्हणतो तशी, त्याची ‘वर्ग-जाणीव’ जागती आहे; तोवरच, या मूळ रोगाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे व त्यासाठी, निश्चय-निर्धारपूर्वक ठाम पावलं टाकली पाहिजेत.
लक्षात ठेवा, ‘भांडवलदारवर्गा’ची वर्ग-जाणीव ही, ते कायमच ‘जागली’ राखतात; म्हणूनच आपण त्यांच्यापेक्षा संख्येनं कैकपटीने अधिक असूनही व मतदानापुरती का होईना; या देशात ‘लोकशाही- व्यवस्था’ असूनही, भांडवलदार आपल्यावर वेडंवाकडं राज्य करतात आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या अन्याय-अत्याचार-शोषणाला आपल्याला सतत तोंड द्यावं लागतं. आपलं अवघं जगणं म्हणजे, “निव्वळ भांडवली-व्यवस्थेची गुलामी…सतत उद्याची चिंता व चिंतेतून जमेल तसा सततचा संघर्ष”, अशा अवस्थेप्रत भांडवली-व्यवस्थेनं आणून ठेवलंय आणि ही भांडवलदार मंडळी मात्र, तूफान चंगळवादानं भरलेलं व बेफाम ऐय्याशीचं आयुष्य आपल्या अवतीभवती भोगताना दिसतात.
…तेव्हा, मूळ रोगावरच इलाज करायचा, आपण ठरवलं असेल; तर, जागी झालेली सगळी ‘कामगार-शक्ति’ फक्त, या कामगारमंत्र्यांच्या “दिवसाचे बारा तास काम करण्याच्या” बेकायदेशीर फर्मानाविरुद्धच पणाला लाऊ नका!
हे भाजप-संघीय लोक व त्यांनी पाळलेले शिंदे-पवार गटाचे तट्टू, कितीही आपले पार्श्वभाग जमिनीवर आपटत बसले; तरी त्यांना ‘कायदा’ करुनही दिवसाचे कामाचे तास, तसे वाढवणे शक्य नाही…कारण, तो कायदाच ‘बेकायदा’ ठरेल. भारत, हा ILO (International Labour Organisation) या ‘आंतरराष्ट्रीय कामगार संघटने’चा संस्थापकीय-सदस्य असून, त्याने पारतंत्र्याच्या काळातच वर्ष-१९१९मध्ये या संघटनेच्या “आठवड्याचे जास्तीतजास्त ४८ कामाचे तास व दिवसाचे जास्तीतजास्त ८ कामाचे तास” अशा करार/ठराव क्र. १ वर सही केलेली आहे, म्हणूनच!
इथे विशेषत्वाने कामगार-कर्मचारीवर्गाने, हे ध्यानात घेणं गरजेचं आहे की, “२३ मे-१९५७ ला जगभरात लागू झालेला, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा करार/ठराव क्र. ४७ हा, ‘पगारात कुठलीही कपात न करता’, दिवसाचे कामाचे तास ४८ वरुन कमी करत ४० तासांवर आणून ठेवतो; म्हणजेच, ‘पाच दिवसांचा आठवडा’ घोषित करतो…मात्र, संतापजनक बाब ही की, त्यावर भारताने अजूनही सही केलेली नाही!”
म्हणूनच, कंपन्या-कारखान्यांमधील ‘कामगार-शक्ति’ ही, युनियन्स एकदम मजबूत बांधण्याकडे (‘तू मोठा की, मी मोठा’ वगैरे आपापसातले फालतू मतभेद गाडून टाकून व कामगारांमधल्या नीच-गद्दार प्रवृत्तींना टाळून) , सततच्या सक्तिच्या ‘ओव्हरटाईम’चा ‘पांगुळगाडा’ आपल्या तुटपुंज्या पगाराला देण्याचं ठामपणे नाकारण्याकडे, सन्मानजनक वेतन-बोनस मिळवण्याकडे व मुख्य म्हणजे, “कंत्राटी-कामगार पद्धतीचं पूर्णतः निर्मूलन करण्याकडे” खर्ची पडली पाहिजे!
…शक्य आहे की, या कंत्राटी-कामगार पद्धतीचा फार मोठा विळखा आपल्या कंपनीत पडलेला असेल, आपल्याच दुर्लक्षामुळे ठिणगीचा वणवा होऊन तो खूप पेटला असेल; तर, कंपनी-दहशतवातून (Corporate-Terrorism) निर्माण झालेल्या ‘कंत्राटी-चक्रव्यूहा’तून नेमका काय आणि कसा मार्ग काढता येईल, ते सविस्तर पुढील लेखातून बघूया…आपणही त्यासंदर्भात सूचना करु शकता, धन्यवाद!
(क्रमशः)