{भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, असंघटित क्षेत्रातील ज्येष्ठ कामगार नेते, NTUI नेते, सर्व श्रमिक संघ, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ, महाराष्ट्र राज्य मुन्सिपल कामगार युनियन सफाई कामगार, सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी पर्यवेक्षिका संघ, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण-आहार कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य अर्धवेळ स्त्री परिचर संघ आणि अनेक युनियनचे प्रणेते, अध्यक्ष आणि आधारस्तंभ कॉम्रेड मारुती आबा पाटील (एम. ए. पाटील) यांच्या स्मृतिला व कामगारकार्याला ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आदरांजली वाहून….}
लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)
लेख क्रमांक ५
* *एकीकडे कंत्राटी-गुलामां’ना ‘कामगार’ म्हणायचं आणि कामगार म्हणून ‘माणूसपणा’चे असलेले सगळे हक्क नाकारायचे!
…कंत्राटी-कामगार, अन्याय-अत्याचार-शोषणाविरुद्ध संप करतो काय किंवा काही कायदेशीर हालचाली करतो काय…असं म्हटलं रे म्हटलं की, ताबडतोब टाक त्याला नोकरीतून काढून! हा आत्म्यावरचा बलात्कार आहे आणि शारिरीक बलात्कारापेक्षा अधिक गर्हणीय आहे…आणि, तो बलात्कार मुकाट्याने सहन करायचा म्हणे! किमान-वेतनावर नोकरीला लागायचं आणि टाचा घासत त्यावरच निवृत्त व्हायचं.
हल्ली एक नवीच टूम निघालीय की, म्हणे ‘कंत्राटी-कामगारां’ना कायम कामगारांएवढा पगार द्या… म्हणजे पुन्हा इलाज रोगावर नव्हे; फक्त रोगाच्या लक्षणांवरच!
…मुद्दा असा आहे की, गेली तीनचार दशके कंत्राटी-कामगार पद्धतीने देशात धुमाकूळ घातल्याने, याअगोदरच ‘कायम’ कामगारांचं सरासरी-वेतन सरसर खाली घसरलंय; म्हणजे, वेतनाची ‘संदर्भीय-पातळी’च (Reference-Level) एकदम खाली आणून ठेवलीय, त्यामुळे, कंत्राटी-गुलामांचं आर्थिक-उन्नयन होण्याचा विषयच संपला!
…त्यामुळेच, कायम कामगारांचं वेतन कंत्राटी-गुलामांना देण्याचा दिशाभूल करणारा विषयच अजिबात नको…तर, कंत्राटी-कामगार पद्धतीच्या परिपूर्ण निर्मूलनासोबतच ‘किमान-वेतन व एकूणच वेतन-संरचनेत एकदाची आमूलाग्र सुधारणा करणं (Course Correction), हीच आजच्या काळाची गरज आहे.
लक्षात घ्या, आपले भाजपाई कामगार-मंत्री बेधडक खोटं सांगतात… तसे, जगभरात प्रगत देशांमध्ये, ना दिवसाचे कामाचे तास ८ पेक्षा जास्त, ना आठवड्याचे कामाचे एकूण तास ४० पेक्षा जास्त (आपल्याकडे ४८ तास), ना तिथे असली अमानुष शोषण व अमानवी व्यवहार करणारी कंत्राटी-कामगार पद्धत अस्तित्वात! कुठे अशी काही कंपनी-अडचणीच्या काळात पाश्चात्य देशात तात्पुरती व्यवस्था असलीच; तर, या अशा कंत्राटी-कामगारांना, कायम-कामगारांच्या श्रेणीनिहाय सरासरी पगारापेक्षा काही पटीत जास्त पगार सक्तिने द्यावा लागतो, जेणेकरुन कंत्राटी-कामगारांच्या शोषणावर व संख्येवर नैसर्गिकरित्या आपसूकच बंधनं येतात… पण, अशा अनेक कामगारहिताच्या गोष्टी चुकूनही कामगारांना कधि सांगितल्या जात नाहीत आणि कामगारही त्या जाणून घेण्याचे कष्ट घेत नाहीत.
* या ‘भाजप-संघीय’प्रणित भांडवली-व्यवस्थेला *”कमीतकमी चारा खाणारी आणि लाथा न झाडता निमूटपणे जास्तीतजास्त दूध देणारी चमत्कारी ‘गाय’ हवीय” आणि ती अशी गाय, ‘कंत्राटी-कामगारा’च्या रुपाने त्यांच्या आयतीच हाती लागलीय! …त्यासाठीच, “गाईला ‘गोमाते’चा दर्जा द्यायचा आणि कंत्राटी-गुलामाला, ‘कामगारा’चा!”
पुर्वीच्या ‘चातुर्वर्ण्य-व्यवस्थे’त जसा, खालच्या जातींना, वरच्या जातीत प्रवेश बंद केलेला वा निषिद्ध असतो… तसाच, या हल्लीच्या औद्योगिक-सेवा क्षेत्रातील चातुर्वर्ण्य-व्यवस्थेत ‘कंत्राटी-गुलामां’ना, कायम-कामगारांच्या श्रेणीत प्रवेश, चारही बाजुंनी रोखला गेलेला असतो.
* कधि कुणी त्या कंत्राटी-गुलामांची मनं जाणून घेण्याचा साधा प्रयत्न तरी केलाय? *अवघ्या समाजाने, व्यवस्थेनं त्यांना अत्यंत क्रौर्यपूर्ण पद्धतीने व अगदी थंड डोक्याने आपल्यातून दूर ढकलत…त्यांचं ‘माणूसपण’ नाकारलेले असल्याने त्यांची मनंच मरुन गेलीयत, अवघ्या जगण्यावरचा विश्वासच उडून गेलाय त्यांचा! प्रेतवत झालंय त्यांचं अस्तित्व; त्यात जितेजागतेपणाचा लवलेश नसतो. म्हणूनच व्यसनाधीन होत त्यांनी आपलं आयुष्यच उकिरड्यावर फेकून दिलंय…त्या त्यांच्या वागणुकीतील परिस्थितीवशात निर्माण झालेल्या परिवशतेवर, त्यातील दोषांवर बोट ठेवत…सगळीकडचे कायम-कामगार, त्यांच्याप्रति असलेली आपली जबाबदारी झटकून टाकण्यात धन्यता मानतायत, हे फारच धोकादायक आहे!
अतिरेक होऊन उद्या ही जिवंत प्रेतं, पिशाच्चं (Zombie) बनतील व मग, काय उत्पात घडवतील, त्याचं भविष्य कुणीही वर्तवू शकणार नाही!
* त्यांची कपडे बदलायची खोली, कायम कामगारांपेक्षा वेगळी…कायम-कामगारांशी बोलण्याचं सोडाच, त्यांच्याकडे बघायलाही बंदी…कँटीन-सेवाही असल्या-नसल्यासारखीच किंवा असलीच तर, अनेक ठिकाणी त्यांना वेगळं निकृष्ट दर्जाचं जेवण…बससेवा चुकूनमाकून उपलब्ध असलीच; तर, कायम-कामगार नसतील; तरच बसायचं, नाहीतर उभं रहायचं… अजून ‘अस्पृश्यता’ वेगळी काय असते? ही औद्योगिक-सेवा क्षेत्रातील ‘नव-अस्पृश्यता’च आहे, त्याविरोधात दुर्दैवाने आंबेडकरी-चळवळीकडून आजवर काहीही टोकदार प्रतिकार झालेला दिसत नाही… उलट अनेक कंपन्या-कारखान्यांतून स्वतःला ‘आंबेडकरवादी’ म्हणवणारे कार्यकर्ते ‘कंत्राटदार’ बनलेले दिसतात. कायम-कामगारांचा ‘निळा डगला’ इतिहासजमा होत असताना, पुराणवस्तू-संग्रहालयासारख्या वास्तुतील निव्वळ एक ‘वस्तू’ बनत चालली असताना…’निळ्या झेंड्या’च्या आंबेडकरी-चळवळीने, बाबासाहेबांचा ‘समतेचा संदेश’ पायदळी तुडवणार्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरुद्ध एल्गार पुकारु नये, हे कामगारविश्वाचं फार मोठं दुर्दैवच होय!
‘लाल बावट्या’च्या डाव्या-चळवळीकडूनही, या देशातल्या करोडो लोकांना गुलामीत ढकलणार्या, कंत्राटी-कामगार पद्धतीकडे आजवर अक्षम्य दुर्लक्ष झालंय, हे ते नाकारु शकतील? आता, ठिणगीचा वणवा झाल्यावर सगळ्यांना हळूहळू जाग येतेय की, जाग आल्याचं ते सोंग करतायत?
* *म्हणूनच जागी होऊ पहात असलेली सगळी ‘कामगार-शक्ति’, सर्वप्रथम फक्त आणि फक्त, कंत्राटी-कामगार पद्धतीला नेस्तनाबूत करायला, नष्ट करायलाच खर्ची घालायची!
त्यासाठीच, कायम आणि कंत्राटी-कामगारांनो, एक व्हा!
…धान्यात ठेवा, संपूर्ण औद्योगिक-विश्वातील टोकाच्या अन्याय-अत्याचार-शोषणाने बर्फासारखा गोठून गेलेला व पूर्ण थिजलेला ‘कामगार-जगता’तील चेतनेचा अवरुद्ध-प्रवाह, “Workers of the world unite” आणि “You have nothing to lose, but your chains” या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमधून (वर्ष-१८४८) दिलेल्या क्रांतिकारी-उद्घोषणांनी…कार्ल मार्क्स व फ्रेडरिक एंगल्स यांनी मोकळा-खळाळता केला होता. त्यातूनच, हा हा म्हणता जगभर कामगारांच्या लढाऊ प्रेरणा जाग्या झाल्या, आंदोलने होऊ लागली आणि कामगारांना प्रथमच माणूसपणाचे हक्क मिळू लागले. आज त्यातले बरेच माणूसपणाचे हक्क धोक्यात आलेले आहेत उदा.. १) दिवसाचे जास्तीतजास्त ८ तास काम व पाच दिवसांचा कामाचा आठवडा २) कायम नोकरीची शाश्वती ३) सन्मानजनक वेतन व समाधानकारक निवृत्तीवेतन ४) हक्काच्या, आजारपणाच्या रजा व बाळंतपणाच्या रजा ५) महागाईनुसार बदलता महागाई भत्ता ६) प्राॅ. फंड व ग्रॅच्युईटी ७) भांडवली-खर्चासाठी वर्षाकाठी उत्तम बोनस वगैरे वगैरे
जगातले कामगार एक होऊ शकतात…तर, एकाच कंपनी-कारखान्यातील ‘कायम आणि कंत्राटी’ कामगार, का एकत्र येऊ शकत नाहीत?
“एकाच्या पायाला काटा टोचला, तर दुसर्याच्या डोळ्यात पाणी येईल” अशा सहसंवेदनेने व “शंभरापैकी एक जण उरलेल्या नव्याण्णव कामगारांसाठी आणि नव्याण्णव कामगार उरलेल्या एकासाठी…म्हणजेच, प्रत्येक जण प्रत्येकासाठी व सर्वजण सर्वांसाठी”, असा ‘कामगारधर्म’ जोपासत आपण पोलादापेक्षाही मजबूत संघटन का बांधत नाही, अत्यंत प्रामाणिक, पारदर्शक व कधिही विकल्या न जाणाऱ्या, झुकल्या न जाणाऱ्या संघटनेचे परमनिष्ठ-एकनिष्ठ सभासद का होत नाही??
रोज थोडं थोडं मरत जगण्यापेक्षा, कुंथत-कण्हत जगण्यापेक्षा…प्रसंगी, एकदाच जीवनमरणाची लढाई लढून पहाणं, काय वाईट?
(क्रमशः)