लेख क्र.७ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच”

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)

लेख क्रमांक ७

* *”तुम्ही कष्ट करा, भरपूर वे॓ळ कामात व्यतीत करा, थोडीबहुत बचत करा आणि सुखासमाधानाने निवृत्त व्हा”, हे भांडवलदारवर्गाचं पालुपद असतं…. कामगारांकडून जास्तीतजास्त काम करवून घेण्यासाठी खुबीने वापरलेलं…ज्या, खोटेपणाला भुलून कामगार मरमर काम करत रहातो, सुखासमाधानाची आणि स्वातंत्र्याची पहाट आयुष्यात उगविण्याची वाट पहात! पण, ४० वर्षांच्या सेवेत तुटपुंजं वेतन आणि ४० वर्षांच्या सेवेनंतर तुटपुंजं निवृत्तीवेतन, प्राॅ. फंड, ग्रॅच्युईटी घेऊन जगू पहाणार असाल; तर ४० वर्षांच्या तुमच्या कष्टाचं, एकनिष्ठेचं फळ काय मिळालं? आयुष्यभर ४० वर्षांच्या कष्टपूर्वक स्वतःला घुसळण्यातून तुम्ही बनवलेल्या ताकावर तरंगणारा ‘लोण्याचा गोळा’, कुणीतरी यापूर्वीच मटकावलेला आहे आणि हाती पातळ पाचकवणं ताक शिल्लक राहिलंय…ना त्याने पोट भरत, ना त्याने तहान भागत; हे तुमच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. पुढच्या पिढीला भरभक्कम वारसा देण्याऐवजी, तुम्ही त्यांच्यावरच ओझं बनता…मग, तुम्ही तुमच्या आयुष्याचे ‘स्वामी’ होता की, फक्त सेवेकरी म्हणून कुणाच्या तरी मालकीचे ‘गुलाम’? आपलं अवघं तारुण्य, कंपनी-काॅर्पोरेटीय क्षेत्रावर ओवाळून टाकल्यानंतर, वयाच्या साठी-पासष्टीत थरथरता देह, कापरे हात आणि निवृत्ती-वेतनातून भागत नसल्याने (शिलकीचा तर पत्ताच नसतो; उलट, मुलांच्या शिक्षणा-लग्नाखर्चासाठी प्राॅ. फंड संपून कर्जाचा बोजा डोक्यावर झालेला असतो) कॅलेंडरवर भिरभिरणारी नजर…हेच आपलं लाजिरवाणं प्राक्तन व्हावं? “तारुण्य संघर्षांत न गुंतवल्यामुळे, म्हातारपणी हा असा लाचारीचा सामना करावा लागतो!”

* *…पण, तुमचे भांडवलदार मात्र, सुरुवातीलाच एकदा काही कष्ट घेतल्यानंतर, थोडीबहुत धंद्यातला नफानुकसानीचा धोका पत्करल्यानंतर आरामात तहहयात बक्कळ कमाई करत रहातात; …शिवाय, तोच ‘कमाईचा वारसा’ पुढील पिढीकडे सहजगत्या व आयता हस्तांतरित करतात…आणि, तुमची मुलं मात्र ‘नवी पाटी, नवी पेन्सिल’ घेऊन भांडवली-व्यवस्थेत काम शोधत प्रवेश करतात…तेच, शोषणाचं चक्र तुमच्यासाठी आणि तुमच्या पुढील पिढ्यापिढ्यांसाठी गरगरत फिरत रहातं.
नोकरीच्या काळात सगळे नियम, सगळे हुकूम इमानेइतबारे पाळून… सगळं कळूनसुद्धा, न कळल्यासारखं दाखवत ‘हाताची घडी, तोंडावर बोट’, असे ‘हुकूमाचे बंदे’ बनून आपल्याच आत्म्याशी प्रतारणा करत प्रतिकारशून्य चिडीचूप राहिलेलो असतो आपण… त्याचाच अटळ परिणाम म्हणून आपलं कर्म आपल्या पुढ्यात प्राक्तन बनून उभं राहिलेलं असतं.
यालाच, फ्रेडरिक नित्शे ‘गुलामांची नैतिकता’ म्हणतो! ‘गुलामांची नैतिकता’ म्हणजे आपल्यावर अन्यायकारक, अत्याचारी व शोषक हुकूमत गाजवणाऱ्या मालकवर्गाच्या…पाशवी सत्तेच्या, बेलगाम संपत्तीच्या आणि नृशंस अहंमन्यतेच्या नावाने बोटे मोडायची, त्यांना दूषणे द्यायची…पण, आपलं सामर्थ्य, जिद्द व संघर्ष करण्याची लढाऊ वृत्ती वाढविण्याऐवजी आपल्यातच नको तेवढी ‘विनम्रता, दुबळेपणा, संयम व आज्ञाधारकता’ रुजवायची व “प्राप्त गुलामी-अवस्थेत आपल्या अंतःकरणात ‘दुर्गुण’ बनून राहिलेल्या या एरव्हीच्या स्थितीतल्या सद्गुणांचा, उलट गौरव करण्यात धन्यता मानायची”, ज्याला नित्शे “Transvaluation of values, born of ressentment” म्हणतो! असंख्य कंपन्या-कारखान्यांतून व सरकारी कार्यालयांतून मी पहात असतो की, तेथील उन्मत्त, अन्यायी, अत्याचारी अधिकाऱ्यांशी हकनाक कामगार वा सामान्य जनता नम्रपणे वागत रहाते…जेवढा कामगार वा जनता नम्रपणे वागते, तेवढा तेवढा या अधिकारीवर्गाचा उन्मत्तपणा व अत्याचारी वृत्ती वाढीस लागते… त्यातूनच, सुरुवातीच्या काळात जी काही सद्सद्विवेक बुद्धीची टोचणी त्यांना थोडीबहुत लागत होती; ती ही लागेनाशी होते. आपण उर्मटपणे, उन्मत्तपणे वागतोय, तेच बरोबर आहे…असं त्यांना वाटू लागतं; एवढंच नव्हे; तर, “तो जणू आपला हक्कच आहे आणि ही लोकं, त्याच लायकीची आहेत”, अशी त्यांची हुकूमी-धारणा बनू लागते!

* *’भांडवला’चा गुणधर्मच असा (म्हणूनच, कार्ल मार्क्सने आपल्या ऐतिहासिक ग्रंथाचं नाव ‘दास कॅपिटल’ ठेवलं, ‘दास कॅपिटॅलिस्ट’ नाही ठेवलं) की, ‘अत्युच्चपदी थोर बिघडतो’….
…तशी अब्जावधी डाॅलर्सच्या अन्याय्य-अनितीमान वरकड-कमाईने (Surplus-Value) आणि जवळपास निरंकुश सत्तेने…यांची मती साफ फिरलेली असते.
…अमेरिकेचा इलिऑन मस्क असो, जेफ बेझोस असो वा असोत भारतातला इन्फोसिसचा नारायणमूर्ती अथवा ‘एल अँड टी’ चा सुब्रमण्यम…हे सगळेच तथाकथित बडे CEO अथवा भांडवलदार, ‘विकृत’ मानसिकतेचेच उत्तम उदाहरण असतात! तेव्हा, त्यांच्याकडून कुठल्या वेगळ्या अपेक्षा बाळगायच्या? त्यांच्या मेंदुचा एक भाग कमालीचा तल्लख; तर, दुसरा अहंगंड व पराकोटीच्या स्वार्थ-संवेदनशून्य बुद्धीने पूर्ण सडलेला असतो; त्याअर्थी, ते आधुनिक ‘रावण-बुद्धी’चेच असल्याचं कुणी म्हणाल्यास, किती चुकीचं ठरावं?? यांचीही ‘लंका’ सोन्याची असते…पण, रावणाच्या सोन्याच्या लंकेत जशी न्यायनीति नव्हती, सत्याचा अपलाप होता; तोच घृणास्पद प्रघात यांच्याही, कुबेराला लाजवणार्‍या काॅर्पोरेटीय-लंकेत फसफसत असतो. धंदा-व्यवसायातलं यांचं आकलन, शब्दशः लोकविलक्षण असतं; पण, त्यापलिकडे, तंत्रज्ञानालाच ब्रह्मज्ञान समजणारी ही काॅर्पोरेटीय मंडळी, जगण्याच्या आसाला भिडलेल्या समस्यांविषयी बव्हंशी अनभिज्ञ असतात अथवा त्या जाणून घेण्याविषयी ते पूर्णतया उदासीन असतात…जणू एका मर्यादेत परिघात ते ‘आधुनिक ‘राजेमहाराजे, सम्राट, शहेनशहा’ म्हणूनच मिरवत रहाणं पसंत करतात. काॅर्पोरेटीय क्षेत्रात लोकांक्षा जपणं किंवा लोकशाही रुजवणं…म्हणजे, यांच्या बेलगाम ‘सम्राटपदाला-शहेनशाही’ला ते जणू आव्हानच समजतात…त्यामुळेच, कामाच्या ठिकाणी लोकशाहीचा लवलेश शिल्लक न ठेवता, ‘कंपनी-दहशतवादा’चं (Corporate-Terrorism) थैमान घालणं, त्यांच्या व्यवस्थापनाचं अविभाज्य अंगच बनतं; त्याशिवाय, त्यांची ‘शहेनशाही’ संबंधित सर्वांच्या छाताडावर कशी बसेल?

* *व्यवस्थापकीय भांडवलदारवर्ग, कामगारांना कायम ठासून सांगतं असतो की, तुम्ही शिस्तीत निमूटपणे जास्तीतजास्त वेळ काम करत राहिलात; तरच, ही ‘व्यवस्था’ (System) चालेल….
…तुमची व तुमच्यासह इतर सगळ्यांचीच नोकरी टिकून वा बरकरार राहिलं…आणि, आता तर, सगळेच प्रस्थापित राजकारणी आणि सरकारी उच्चशिक्षित उच्चाधिकारीवर्ग इन्फोसिसच्या (वा)नरायण मूर्ती आणि L&Tच्या उन्मत्त सुब्बू-टुब्बूसारख्या भांडवलदारांच्या सुरात सूर मिसळून, हीच ‘पोपटपंची’ करत सांगत असतात. पण, कामगार-कर्मचारीवर्गाला हे कधिच सांगितलं जात नाही की, ही भांडवली-व्यवस्था मुळातूनच तुमच्यासाठी बनवलेली वा जन्माला घातलेली नाही! दुसर्‍या कुणाला (म्हणजे, अर्थातच भांडवलदारांना) अमाप संपत्ती, धारण वा संपादन करता यावी; यासाठीच, केवळ ‘ग्राहक व स्वस्त मजूर’ म्हणून तुमचा यथायोग्य ‘उपयोग’ करवून घेण्यापुरतीच बनवली गेलीय! योग्य आकलनाविना चुकीच्या ठिकाणी वाहिलेली निष्ठा, श्रद्धा माणसाला निर्जीव ‘मशिन’ बनवून टाकते… एक असं ‘मशिन’, जे अखेरीस माणसाच्याच मुळावर उठतं!

(क्रमशः)