गांधी, नेहरुंसारख्या ‘जगन्मान्य’ (‘गोदी-मिडीया’तून रंगवलेले बनावट ‘विश्वगुरु’ नव्हेत ते) व्यक्तित्वांना, बदनाम करुन सरळ सरळ विस्मृतीच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न होतो आहे…EC व EVM च्या आधारे बेधडक निवडणुका जिंकल्या जात आहेत; तरीही, काँग्रेसवाल्यांची “तू मोठा की, मी मोठा”, ही सुंदोपसुंदी संपायला व त्यांची झोप उडायला तयार नाही!
एकटे राहुल गांधी आणि त्यांच्या बहिणीसह त्यांचा एक चमू, लढतो आहे…आणि, बाकीचे काँग्रेसजन “तुम लडो, हम कपडे सम्हालते है” असं कालपरवापर्यंत म्हणता म्हणता; एवढ्या अधोगतीला गेलेत की, ते आता, “कपडे सांभाळायलाही तयार नाहीत… तेवढीही तसदी, त्यांना घ्यायची नाहीय”!
२०१४ पूर्वी अनेक दशके ‘सत्तासुंदरी’चा मनमुराद उपभोग घेतल्यानंतरची, ही दारुण व करुण अवस्था आहे, त्यांची…या सगळ्या नाकर्त्या, घरबशा, भित्र्या पदाधिकाऱ्यांना तत्काळ हाती नारळ देण्याची गरज आहे; इतकी, या बहुतेकांची प्रगतिपुस्तकं ‘कोरी’ आहेत. फक्त, कुठलातरी सोहळा, कुठलातरी कार्यक्रम एकदाचा “चटावरचं श्राद्ध उरकावं, तसा जेमतेम पार पाडायचा…समाजमाध्यमांतून त्याचा यथास्थित ‘रतीब’ टाकायचा आणि हात धुवून ‘जितम् मया’ म्हणत, ढेकर देत मोकळं व्हायचं”, हीच यांची आजची ‘रणनीति’ उघड उघड दिसतेय.
“ज्यांची स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेताना ‘हातभर फाटत होती’, जे ब्रिटीशांची (पूर्वी मोगल दरबाराची) ‘हुजरेगिरी’ करत होते, ज्यांनी कधि नेहरु-गांधींसारख्या वर्षानुवर्षे तुरुंगवासाच्या यातना भोगल्या नाहीत”, तेच आज ‘पापात्मे’…तुमच्याआमच्या श्रद्धास्थानांवर हल्लाबोल करत, देशात हुकूमशाहीचा नंगानाच करताहेत…EVMमधून दिवसाढवळ्या बिनधास्त मतांवर ‘दरोडा’ टाकतायत; तरी, काँग्रेसवाल्यांची झोप उडायला तयार नाही…चुकूनमाकून झोपेतून कुठे ते उठलेच; तर, देशहितासाठी निर्धाराने काही निर्णायक स्वरुपाची पावलं टाकण्याची हिंमतच त्यांच्यात उरलेली नाही!
डोळ्यासमोर अंबानी-अदानी सारख्यांच्या काँक्रिटच्या ‘पैशाचिक’ विकासात, ‘सामान्य माणूस’ ‘अनारकली’सारखा चिणला जातोय, निसर्ग रोज त्यासाठी चिरला जातोय…तरी काँग्रेसचे ‘मुखंड’ मूग गिळून गप्पच!
…एकतर, त्यापैकी अनेकांनी (त्यात, काही सन्माननीय ‘अपवाद’ जरुर आहेत) काँग्रेसच्या छत्रछायेत व राजकीय-सत्तेच्या वळचणीला राहून…पचणार नाही, एवढा अफाट पैसा कमावलाय आणि तो राखायचा कसा; याचीच चिंता त्यांना सारखी सतावतेय… तर, दुसर्या बाजुला आपण या सैतानी सरकारविरुद्ध जास्तच टूरटूर केली; तर, आपल्या पूर्वकर्मांमुळे उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवावं लागण्याची, त्यांना साद्यंत भिती वाटते आहे!
…ही सगळी ‘कोंडी’ फोडायची व न सुटणारी ‘कोडी’ सोडवायची; तर, एकजात अशा सगळ्याच ‘नाकर्त्या व भित्र्या’ पदाधिकाऱ्यांसह तथाकथित कार्यकर्त्यांनाही…असंच पोंबाळत बसण्यापेक्षा ‘निरोपाचा नारळ’ तडकाफडकी देणंच उत्तम! मग काय वाटोळं व्हायचं ते होऊ देत, अधिक काय वाईट होणार काँग्रेसचं? नव्या रक्ताचा शोध घेऊन, त्यांना वाव देण्याची हीच योग्य वेळ आहे; कारण, काँग्रेसचं आता अधिक काही वाईट होऊच शकत नाही…ज्या गांधी-नेहरु-पटेल-मौलाना आझाद-सुभाषचंद्राच्या काँग्रेस-चळवळीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं; ती काँग्रेस, ‘पक्ष’ म्हणून इथून पुढे फक्त मोठा उभारच घेऊ शकतो. तळ गाठून झाला आणि ती घटना देखील, आता पुरती मागे पडलीय; म्हणूनच, ‘काँग्रेसमुक्त-भारत’ ही भाषा बोलणारे राजकीय टगे, आता ‘EVM-युक्त’ असूनही…ती पूर्वीची भाषा बोलत नाहीत, हे कशाचं लक्षण आहे?
जोपर्यंत, देशात निवडणुकीसाठी ‘EVM’ आहेत…तोपर्यंत, निवडणूक जिंकणं सोडाच; निवडणूक लढणं, आता विसरायला हवं; एवढी या देशाच्या लोकशाहीची लक्तरं, सर्व देशभर आणि जगभर टांगली गेलीयत…तरीही, “सापाच्या तोंडात गेलेला बेडूक, बाजुला उडणारा कीटक आपल्या लांबलचक जीभेनं ओढत गिळून टाकतो”, तशी या लोकशाहीच्या बनावट उत्सवाची स्थिती, आपली आपणच करुन ठेवलीय आणि ती आपल्यालाच निर्धारपूर्वक सुधारावी लागेल…जय हो!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
ता. क. : एकदा का चोराची ओळख पटली व त्याच्या चोरीच्या तंत्राची सगळ्यांना माहिती झाली की, तो चोर अधिक बिनधास्त होतो…कारण, आता लपविण्यासारखे काही शिल्लक उरलेलं नसतं… “पकडलं जाण्याची भिती, ‘ALL HIS MEN’ या योजनाबद्ध निर्ढावल्या स्थितीनं केव्हाचीच संपलेली असते”; तेव्हा, तो अधिक उजळमाथ्याने आणि मनमोकळेपणाने ‘चोऱ्या’ करु लागतो!
